कोव्हिडः कोरोनाच्या चौथ्या लाटेत जर्मनीत 1 लाख लोक मरणार?

    • Author, जेनी हिल
    • Role, बीबीसी न्यूज, लिपझिश, जर्मनी

कोरोनाच्या चौथ्या लाटेला थांबवण्यासाठी काही केलं नाही तर 1 लाख लोकांचा मृत्यू होईल अशी भीती जर्मनीतल्या विषाणूतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जर्मनीमध्ये कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे कोरोना साथ आल्यापासूनचे संसर्गाचे सर्वांत जास्त प्रमाण बुधवार 10 नोव्हेंबर रोजी दिसून आलं. या एका दिवसामध्ये जवळपास 40,000 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं.

"आपण आताच पावलं उचलली पाहिजेत", असं मत ख्रिश्चियन ड्रोस्टेन यांनी व्यक्त केलं.

लिपझिश विद्यापीठ रुग्णालयातील कोव्हिड अतिदक्षता विभागातील डॉक्टरांनी चौथी लाट आतापर्यंतची सर्वांत भयंकर लाट असल्याचं भाकीत केलंय.

इथं उपचार घेणाऱ्या एका विशीतल्या महिलेने नुकताच बाळाला जन्म दिला आहे. बाळाची तब्येत ठीक आहे पण ती बाई वाचेल की नाही याबाबत इथल्या कर्मचाऱ्यांनी शंका व्यक्त केली आहे.

जर्मनीतल्या सॅक्झनी प्रांतामध्ये कोरोना संसर्गाचं सर्वाधिक प्रमाण दिसून येतंय. इथं 1,00,000 लोकांमागे 459 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं दिसतंय. जर्मनीत हे प्रमाण सरासरी 232 इतके आहे.

सॅक्झनीमध्ये लसीकरणाचं प्रमाणही कमी आहे. इथल्या 57 टक्के लोकांनी लस घेतली आहे.

कोव्हिड वॉर्डाचे प्रमुख प्रा. सॅबेस्टियन स्टेर सांगतात, "18 रुग्णांपैकी फक्त चार जणांनी लस घेतलेली आहे. आता चौथ्या लाटेतील रुग्णांवर उपचार करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणं अवघड आहे. बहुतांश लोक अजूनही या प्रश्नाला गांभीर्यानं घेत नाहियेत. आतापर्यंत लोकांना संसर्गाचा धोका समजायला हवा होता. अजूनही लस न घेतलेले रुग्ण मोठ्या संख्येने दिसत आहेत."

जर्मनीच्या आरोग्यमंत्र्यांनी संसर्गाचे प्रमाण वाढण्यासाठी हे लोकच दोषी असल्याचं सांगितलं आहे. 'लस न घेणाऱ्यांची साथ' असं त्यांनी या स्थितीचं वर्णन केलं आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीलाच सॅक्झनी प्रांतात लस न घेतलेल्या लोकांना बार, रेस्टॉरंट, सार्वजनिक कार्यक्रम, क्रीडा, मनोरंजनाच्या सोयीसुविधा असलेल्या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला आहे. बाकीची राज्यंही हेच करतील असं दिसत आहे.

लशीला विरोध करणारे जर्मनीतले लोक यामुळे संतापले आहेत. लिपझिशमध्ये हजारो लोकांनी या निर्णयाविरोधात निदर्शनं केली आहेत.

'लिपशिझ चळवळ' नावाच्या लसविरोधी संघटनेचे प्रतिनिधी लायफ हॅन्सेन यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "हा भेदभाव आहे, आम्हाला समाजात स्वीकारलं जात नाहीये याचा आम्ही निषेध करत आहोत," लस तयार करणाऱ्या कंपन्या आणि त्यांना मान्यता देणाऱ्यांवर लायफ यांचा विश्वास नाहीये.

"ते म्हणतात लसीकरण योग्य आहे. मी ती मुलालाही दिली पाहिजे? आजिबात नाही. लशीने माझ्या शरीरात कधीच प्रवेश करू नये असं मला वाटतं. ती शरीरात येऊ नये यासाठी मी लढत राहाणार," हॅन्सेन सांगतात.

जर्मनीतल्या 12 वर्षांवरील 6 कोटी लोकांचं अजूनही पूर्ण लसीकरण झालेलं नाही. लोकांवर लशीची सक्ती करण्याबाबत कोणताही निर्णय आता झाला नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. तशी सक्ती झाली तर समाजात दुफळी माजेल अशी भीती राजकारण्यांना वाटत आहे.

लॉकडाऊनची भीती

अनेक लोकांना पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची भीती वाटत आहे.

अर्थात लस घेण्यासाठीही रांगा दिसत आहेत. काही लोकांनी आपलं मत बदलून लस घेण्याचं निश्चित केल्याचं यातून दिसत आहे. लसीकरण झालेल्या लोकांच्या अधिक संरक्षणासाठी जर्मनीत बुस्टर डोसचा विचार सुरू आहे.

या स्थितीची परिणाम रुग्णालयांवर झाला आहे. कोव्हिड रुग्णांसाठी शस्त्रक्रीया पुढे ढकलण्यात आल्या आहे. इथपर्यंत आलेल्या लोकांपैकी निम्मे लोक मरतील अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ज्या जर्मनीनं सर्वात आधी लस शोधली त्या देशात ही स्थिती येणं लज्जास्पद आहे असं त्यांना वाटतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)