पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांनी मिळाली कोव्हॅक्सिनला मंजुरी? पाहा WHO ने काय म्हटलं?

फोटो स्रोत, @PMOINDIA
भारतात तयार करण्यात आलेल्या कोरोना विषाणूवरील कोव्हॅक्सिन लशीला जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने मान्यता दिली आहे.
कोव्हॅक्सिनला मान्यता मिळाल्याच्या वृत्ताबरोबरच माध्यमांमध्ये हे पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांमुळे शक्य झाल्याच्याही बातम्या समोर येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी 20 परिषदेसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी WHO चे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांची वैयक्तिक भेट घेतली. या लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यासाठी त्यांनीच घेब्रेयेसस यांना गळ घातल्याचं टाइम्स ऑफ इंडियानं त्यांच्या एका वृत्तामध्ये सुत्राच्या हवाल्यानं म्हटलं आहे.
तर दुसऱ्या एका माध्यम समुहाच्या प्रतिनिधीने एका ट्वीटमध्ये मोदी आणि घेब्रेयेसस यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्याबरोबर "शिक्कामोर्तब झालं ती बैठक" असं त्यांनी लिहिलं आहे.
याचं उत्तर देत WHO च्या एका अधिकाऱ्यानं ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे.
"कोव्हिडच्या लशीचा आपत्कालीन वापर करण्याची मंजुरी देण्याची WHO ची प्रक्रिया कडक नियमानुसार, शास्त्रीय आणि काही मानकांर आधारित आहे. त्यात एका तांत्रिक सल्लागार समुहाच्या बाह्य तज्ज्ञांना सहभागी केलं जातं. ते निर्माते आणि इतरांच्या माहितीचा अभ्यास करतात आणि लस किती उपयोगी आणि सुरक्षित आहे याची माहिती घेतात," असं WHO च्या जनसंपर्क विभागाच्या संचालिका गॅबी स्टर्न यांनी म्हटलं आहे.
भाजप नेते आणि मोदी सरकारच्या कामावर सातत्यानं टीका करणारे नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही या ट्विटवर उत्तर दिलं आहे.
"भाजपच्या धूर्त आयटी सेलचा माध्यमांतील काही लोकांवर नक्कीच वाईट परिणाम झाला आहे," असं स्वामी यांनी पोस्ट केलं.
कोव्हॅक्सिनला मंजुरी
भारतात तयार करण्यात आलेली कोरोना विषाणूवरील लस कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO नं आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून कोव्हॅक्सिनची निर्मिती करणारी कंपनी भारत बायोटेक आणि WHO यांच्यात या विषयावर चर्चा सुरू होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
WHO नं बुधवारी सादर केलेल्या एका निवेदनात, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठीच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित करत असल्याचं म्हटलं होतं.
"WHO नं भारत बायोटेकद्वारे निर्मित कोव्हॅक्सिनला 'आपत्कालीन' वापराच्या यादीत समाविष्ट केलं आहे. आता कोव्हिडला आळा घालणाऱ्या लशींच्या यादीत आणखी एका नावाचा समावेश झाला आहे," असं WHO नं सांगितलं.
"WHO ने तयार केलेल्या टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप, ज्यात जगभरातील नियंत्रक तज्ज्ञ असतात त्यांना कोव्हॅक्सिन ही लस कोव्हिड 19 पासून संरक्षण करण्यासाठी WHO च्या मानकांप्रमाणे असल्याचं आढळलं आहे. या लशीचे फायदे धोक्यांच्या तुलनेत अधिक आहेत. त्यामुळं जगभरात तिचा वापर करता येऊ शकतो," असंही WHO च्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
दुसरा डोस घेतल्यानंतर 14 किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांनी कोव्हॅक्सिन कोव्हिड 19 चा सामना करण्यात 78% सक्षम आहे. साठवणुकीच्या दृष्टीनं ती सोपी असल्यानं कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी ती अत्यंत उपयोगी आहे, असंही WHO नं म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
गर्भवती महिलांसाठी कोव्हॅक्सिनच्या वापरास मात्र अद्याप WHO नं मान्यता दिलेली नाही.
"गर्भवती महिलांवर या लशीचा वापर किती सुरक्षित आहे, याबाबत अद्याप आकडे उपलब्ध नाहीत. तसंच गर्भवती महिलांबाबत आणखी अभ्यास करण्याचा विचार आहे," असंही WHO नं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कोव्हॅक्सिनच्या पूर्वी WHO ने भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं तयार केलेल्या 'कोव्हिशिल्ड' लशीला मान्यता दिली होती.
कोव्हिशिल्ड ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनेका या औषध कंपनीने मिळून तयार केलेली लस आहे. तीच सीरम इन्स्टिट्यूट भारतात तयार करत आहे.
त्याशिवाय भारतात रशियाने तयार केलेल्या स्पुतनिक-V चाही वापर होत आहे. त्या लशीलाही WHO ची मंजुरी मिळाली आहे.
कोव्हॅक्सिनची शेल्फ लाईफ एक वर्ष
लशीला निर्मितीनंतर 12 महिन्यांपर्यंत वापरास योग्य असेल अशी परवानगी मिळाल्याचं भारत बायोटेकनं बुधवारीच स्पष्ट केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भारत सरकारच्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशेननं कोव्हॅक्सिनची शेल्फ लाईफ निर्मितीच्या तारखेपासून वाढवून एक वर्ष केली आहे, असंही भारत बायोटेकच्या वतीनं सांगण्यात आलं.
कंपनीला आधी कोव्हॅक्सिनची शेल्फ लाईफ सहा महिन्यांची मिळाली होती, नंतर ती वाढवून नऊ महिने केली होती, असं भारत बायोटेकच्या एका प्रवक्त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
कोव्हॅक्सिन कसे काम करते?
कोव्हॅक्सिन ही एक निष्क्रिय लस आहे. म्हणजेच कोरोनाच्या मृत विषाणूचा वापर करून ती तयार करण्यात आली आहे.
ती तयार करणाऱ्या भारत बायोटेकनं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीतून निवडलेल्या कोरोना विषाणूच्या सँपलाचा यासाठी वापर केला आहे.
शरीरातील रोगप्रतिकार करणाऱ्या पेशी विषाणू मृत असला तरी त्याला ओळखतात आणि त्यानंतर त्या रोगप्रतिकार संस्थेला या विषाणू विरोधात लढण्यासाठी अँटिबॉडी तयार करण्यासाठी प्रेरित करतात.
या लशीच्या दोन डोसमध्ये चार आठवड्यांचं अंतर ठेवण्यात येतं. दोन ते आठ अंश तापमानात ती साठवली जाऊ शकते.
या लशीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यातील माहितीनुसार ही लस 81 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचं समोर आलं आहे.
24 वर्षं जुनी असलेली भारत बायोटेक कंपनी एकूण 16 आजारांपासून संरक्षण करणाऱ्या लशी तयार करते. या लशी जगभरातील 123 देशांमध्ये पुरवल्या जातात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








