कोरोना कोव्हॅक्सीन : वादात सापडलेली कोव्हॅक्सीन लस आहे तरी काय?

कोरोना, लस

फोटो स्रोत, SOPA Images

फोटो कॅप्शन, कोरोना लस
    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

केंद्रीय ड्रग्ज कंट्रोलर जनरल यांनी कोव्हिड-19 विषाणू विरोधात स्वदेशी लस 'कोव्हॅक्सीन' ला मंजूरी दिली.

मात्र आपात्कालीन वापराची मंजूरी मिळाल्यानंतर ही लस वादात सापडली आहे.

लशीची चाचणी पूर्ण झालेली नाही. लस प्रभावी आहे का? लशीची कार्यक्षमता ही सिद्ध झालेली नाही. मग आपात्कालीन वापरासाठी परवानगी का? असा सवाल तज्ज्ञांनी उपस्थित केलाय.

'कोव्हॅक्सीन' काय आहे?

'कोव्हॅक्सीन' कोरोना व्हायरसविरोधी लस आहे.

केंद्रीय ड्रग्ज कंट्रोलर जनरल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 'कोव्हॅक्सीन' निष्क्रिय करण्यात आलेल्या कोरोना व्हायरसपासून बनवण्यात आली आहे.

कोरोना, लस

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, कोरोना लस

तज्ज्ञांच्या मते, व्हायरस निष्क्रिय असल्याने संसर्ग होऊ शकत नाही. या व्हायरसची हुबेहुब प्रतिकृती तयार होऊ शकत नाही. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर व्हायरस शरीरात वाढू शकत नाही.

'कोव्हॅक्सीन' लस कोणी तयार केली?

ही लस हैद्राबादच्या भारत बायोटेक कंपनीने तयार केली आहे.

भारत बायोटेक आणि इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने या लशीची निर्मिती केली जात आहे

'कोव्हॅक्सीन' ची निर्मिती कोणत्या टप्प्यात आहे?

लस निर्मितीमध्ये तीन टप्पे असतात.

'कोव्हॅक्सीन' च्या चाचणीचे पहिले दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. भारत बायोटेकच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 375 तर, दुसऱ्या टप्प्यात 380 स्वयंसेवकांवर याची चाचणी करण्यात आली आहे.

केंद्रीय ड्रग्ज महानिरीक्षकांच्या माहितीनुसार, सद्य स्थितीत 'कोव्हॅक्सीन' लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. जुने आजार असलेल्यांनाही या चाचणीत सहभागी करण्यात आलं आहे.

भारत बायोटेकचे अध्यक्ष डॉ. कृष्णा ईला पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ''कोव्हॅक्सीन' च्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये 24000 स्वयंसेवकांची नोंद करण्यात आली आहे. सुरक्षेबाबतची माहिती ड्रग्ज कंट्रोलर जनरलला देण्यात आली आहे. लशीच्या कार्यक्षमतेबद्दलची माहिती तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाल्यानंतर मार्च ते ऑक्टोबर महिन्यात जारी करण्यात येईल.'

कोरोना, लस

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, कोव्हॅक्सिन

'कोव्हॅक्सीन' सुरक्षित आहे?

कोव्हॅक्सीनमध्ये 'कोरोना व्हायरसच्या बदललेल्या स्ट्रेनला लक्ष करण्याची क्षमता आहे' असं सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने नमुद केलं आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात 800 लोकांना तर, तिसऱ्या टप्प्यात आत्तापर्यंत 22,500 लोकांना लस देण्यात आली.

केंद्रीय ड्रग्ज महासंचालक डॉ. व्ही. जे. सोमानी यांच्या माहितीनुसार, 'कोव्हॅक्सीनची निर्मिती विरो सेल प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे. याची सुरक्षा आणि कार्यक्षमता भारतात आणि जगभरात ओळखली जाते.'

'कोव्हॅक्सीन सुरक्षित असल्याचं चाचणी दरम्यान आढळून आलं. लस घेतल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचं ही दिसून आलं.' असं डॉ. सोमानी पुढे म्हणाले.

प्राण्यांवर करण्यात आलेल्या चाचणीत लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कोव्हॅक्सीन लस कसं काम करते?

लशीचं इंजेक्शन दिल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती व्हायरसला ओळखेल. रोगप्रतिकारशक्ती प्रतिसाद देईल आणि व्हायरसवर हल्ला करेल. ज्यामुळे शरीरात विषाणू विरोधात अॅन्टीबॉडी तयार होतील.

कोव्हॅक्सीनच्या चाचणी दरम्यान शरीरात अॅन्टीबॉडी (रोगप्रतिकारशक्ती) वाढल्याचं दिसून आल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोरोना, लस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना लस

कोव्हॅक्सीच्या मंजूरीचा वाद

कोव्हॅक्सीनची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली नसतानाही लशीच्या आपात्कालीन वापराला केंद्रीय ड्रग्ज कंट्रोलर जनरलने मंजूरी देण्यात आली आहे. यावरून वाद सुरू झालाय.

लस प्रभावी आहे का? लशीची कार्यक्षमता काय? याबद्दलची ठोस माहिती अद्यापही समोर आलेली नाही. लस अजून क्लिनिकल ट्रायलमध्येच आहे. क्लिनिकल ट्रायलमध्ये प्रतिबंधित वापराला परवानगी म्हणजे नक्की काय? मग, लशीला मंजूरी का देण्यात आली असा सवाल तज्ज्ञांनी उपस्थित केलाय.

तर, स्वत:ची छाती बडवण्यासाठी सरकारने शास्त्रीय प्रोटोकॉल धाब्यावर बसवले असा आरोप राजकीय पक्षांकडून केला जातोय. त्यामुळे कोव्हॅक्सीनला मिळालेल्या मंजूरीवर राजकीय वाद सुरू झालाय.

कोरोना, लस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना लस

'कोव्हॅक्सीन'ला आपात्कालीन वापराची परवानगी का मिळाली?

कोव्हॅक्सीन'ला मंजूरी देण्याआधी सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने (Subject Expert Committee) यावर चर्चा केली. समितीने मंजूरी देण्याची शिफारस कशी केली हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

•30 डिसेंबर 2020- तज्ज्ञ समितीने भारत बायोटेकला इम्युनिजेनिसिटी, सुरक्षा आणि लस प्रभावी असल्याची माहिती देण्याची शिफारस केली

• 1 जानेवारी 2021 -लस कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवर प्रभावी असल्याचं समितीने नमुद केलं. पण, लशीची कार्यक्षमता अजूनही सिद्ध होणं बाकी असल्याचं ही म्हटलं. कंपनीने लशीच्या कार्यक्षमतेबाबत अभ्यास करावा अशी शिफारस करण्यात आली.

• 2 जानेवारी 2021 - कंपनीने प्राण्यांवरील संशोधनाची माहिती प्रस्तूत केली. ही लस सुरक्षित आणि कार्यक्षम आढळून आली असं समितीने म्हटलं.

वरील गोष्टींचा विचार करता 'व्यापक जनहित आणि खबरदारीची उपाययोजना लक्षात घेता, लशीला क्लिनिकल ट्रायलमध्ये आपात्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापराची परवानगी देण्यात यावी,' अशी शिफारस समितीने केली.

कोरोना व्हायरस म्युटेट झाला किंवा बदलला तर पर्याय असावेत यासाठी परवानगी देण्यात यावी असं नमुद करण्यात आलं.

कोरोना, लस

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, मुंबईतलं एक कोल्ड स्टोरेज

लशीला मंजूरी देण्यातील टप्पे

लस निर्मितीत तीन टप्पे असतात.

महाराष्ट्रात नागपूरच्या डॉ. गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात कोव्हॅक्सीनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याची चाचणी करण्यात आली.

पहिला टप्पा- लस दिल्यानंतर कोणाला त्रास होतोय का? साइडइफेक्ट आढळून येतात का? शरीरावर गंभीर परिणाम होतात का? हे तपासून पाहिलं जातं.

दुसरा टप्पा - यात 14 व्या दिवशी लशीचा पुन्हा एक डोस दिला जातो. लस दिल्यानंतर शरीरात कोरोना विरोधात अॅन्टीबॉडी (रोगप्रतिकारशक्ती) तयार होतात का याचा अभ्यास केला जातो.

कोरोना, लस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना लस

लशीची सुरक्षितता आणि कार्यक्षमता म्हणजे काय?

लसीचे शरीरावर गंभीर साइडइफेक्ट होत नसतील तर लस सुरक्षित मानली जाते.

लशीची कार्यक्षमता फार महत्त्वाची असते. लस न देण्यात आलेल्यांच्या तुलनेत लस देण्यात आलेल्यांमध्ये आजाराचं प्रमाण किती कमी झालं यावरून लशीची कार्यक्षमता किंवा लस किती प्रभावी आहे हे समजतं.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितल्यानुसार, 'सामान्यत: लस 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त प्रभावी असेल तर त्याला आपण लस म्हणू शकतो. पण, सद्य स्थितीत लशीचा परिणाम 50 टक्क्यांपेक्षा चांगला असेल तर त्याला प्रभावी म्हणावं लागेल.'

'लस 30 टक्क्यांपेक्षा कमी प्रभावी असेल तर त्याचा चांगला परिणाम दिसून येणार नाही. 30 टक्क्यांपेक्षा कमी प्रभावी लशीने रोगप्रतिकारशक्ती वाढवता येणार नाही.' असं डॉ. स्वामीनाथन पुढे म्हणाल्या.

क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात मंजूरीमुळे काही धोका आहे?

तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची माहिती समोर आलेली नाही. लस प्रभावी आणि कार्यक्षम आहे का नाही याबद्दल माहिती नाही. ही लस सर्वसामान्यांनी दिली आणि त्यानंतर फक्त 50 टक्के कार्यक्षम असल्याचं समोर आलं तर? असा प्रश्न तज्ज्ञांना पडला आहे.

सामान्यांना याचा फायदा काय?

सद्य स्थितीत सामान्यांना कोव्हॅक्सीनला परवानगी दिल्याचा काहीच फायदा नाही असं तज्ज्ञांच मत आहे.

एड्स सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. इश्वरीप्रसाद गिलाडा सांगतात, "कोव्हॅक्सीन कार्यक्षम आहे का, याची माहिती अजूनही सार्वजनिक करण्यात आलेली नाही. कोरोनाची लस पहिल्यांदा अत्यावश्यक सेवेतील लोकांना दिली जाईल. त्यामुळे सामान्यांना आपात्कालीन मंजूरीचा काहीच फायदा नाही."

"कोव्हॅक्सीनबाबत माहिती नसल्याने डॉक्टर ही लस देताना विचार करतील आणि लोकं लस घेण्यास विरोध करतील. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर लशीच्या कार्यक्षमतेची माहिती सार्वजनिक करावी," असं डॉ. गिलाडा म्हणाले.

तज्ज्ञ सांगतात, एखाद्या वेळेस लशीची अचानक कमतरता भासली किंवा केसेस वाढल्या तर सरकार कोव्हॅक्सीनबाबत विचार करेल. त्यासाठी याला क्लिनिकल स्टेजमध्ये मंजूरी देण्यात आली असावी.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)