कोरोना काळात 'हे' मानसिक आजार वाढण्याची भीती तज्ज्ञांना का वाटते?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मॅडी सॅव्हेज
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या संसर्गाने आपल्यापैकी अनेकांच्या जीवाला घोर लावला आहे. इतकंच नाही तर या जागतिक साथीचा लोकांच्या मनःस्वास्थ्यावर विपरित परिणाम होईल आणि हे आरोग्य संकट निघून गेल्यावरही त्यांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
स्टॉकहोमजवळ राहणाऱ्या सुझान केम्प कोव्हिड-19 ची साथ येण्याआधी बऱ्यापैकी अॅक्टिव्ह लाईफस्टाईल जगत होत्या. सुझान त्यांचा पार्टनर, नातलग यांच्यासोबत रेस्टॉरेंटमध्ये जायच्या, मित्र-मैत्रिणींसोबत बुक क्लबमध्ये जायच्या. मात्र, एप्रिलपासून त्या फक्त 5 वेळा घराबाहेर पडल्या आहेत. ते सुद्धा घरात राहून सोशल अँक्झायटी आणि ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह बिहेव्हिअर वाढल्यामुळे.
तिशीतल्या केम्प कॉपीरायटर आणि विद्यार्थिनी आहेत. कोव्हिड-19 चा उद्रेक झाल्यापासून त्यांना सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करण्याची भीती वाटते. घरातली भांडीही त्या वारंवार स्वच्छ करतात. इतकंच नाही तर कोरोना विषाणूचं चित्र बघितल्यानंतर त्यांना घबराट होते.
त्या म्हणतात, "हा अतिरिक्त ताण मी यापूर्वी बऱ्यापैकी मॅनेज करायचे. महत्त्वाचं म्हणजे मी रडते. मला मी मरणार आहे, असं वाटत राहतं आणि मग मला रडू कोसळतं."
या सगळ्यांमुळे आपण खूप मागे ढकललो गेल्याची निराशा त्यांना दाटून येते. ओसीडीवर नियंत्रण मिळवून आयुष्य पूर्ववत होण्यासाठी बरीच वर्ष लागतील, अशी भीतीही त्यांना वाटते.
कोव्हिड-19 च्या या काळात आपल्यापैकी अनेकांची अँक्झायटी (चिंता) थोडी वाढली आहे. मात्र, काहींना मानसिक आरोग्याच्या तक्रारी जडल्या आहेत किंवा त्यात वाढ झाली आहे, हे सुझान केम्प यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं. कोव्हिड-19 मुळे होणारे मानसिक परिणाम दूरोगामी असतील, अशी चिंता मानसोपचारतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-सीरम इन्स्टिट्यूटला लशीची चाचणी पुन्हा सुरू करायला परवानगी
- वाचा- कोरोना व्हायरसचं संकट टाळण्यासाठी कोणते उपाय उपलब्ध आहेत?

The Psychology of Pandemics पुस्तकाचे लेखक आणि युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठात मानसोपचार विषयाचे प्राध्यापक स्टिव्हन टेलर म्हणतात, "जवळपास 10 ते 15 टक्के लोकांच्या मानसिक आरोग्यावर या जागतिक आरोग्य संकटाचा जबरदस्त परिणाम होणार आहे. त्यामुळे त्यांचं आयुष्य पुन्हा पूर्ववत होऊ शकणार नाही."
ऑस्ट्रेलियाच्या ब्लॅक डॉग इन्स्टिट्युट या मानसिक आरोग्यविषयक संशोधन करणाऱ्या स्वतंत्र संस्थेनेही अशाच प्रकारचा इशारा दिला आहे.
"काही लोकांना दीर्घकाळासाठी तणावाचा सामना करावा लागू शकतो," असं या संस्थेचं म्हणणं आहे.
तर युकेतल्या काही मानसिक आरोग्यविषयक तज्ज्ञांनी ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये लिहिलेल्या लेखात कोव्हिड-19 चा शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांपेक्षा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम दीर्घकाळ टिकेल, असं म्हटलेलं आहे.
इतिहासातून धडा
यापूर्वी आलेल्या जागतिक साथी आणि आणीबाणीच्या प्रसंगांचासुद्धा लोकांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. 2003 साली सार्सची साथ आली होती. त्यावेळी 65 वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तींच्या आत्महत्यांमध्ये 30 टक्क्यांची वाढ दिसून आली होती.

फोटो स्रोत, Alamy
कुठल्याही संसर्गजन्य आजारात तो पसरू नये यासाठी क्वारंटाईन होणं गरजेचं असतं. मात्र, या क्वारंटाईन म्हणजेच विलगीकरणाचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ- मानसिक तणावानंतरची लक्षणं (PTSD) दिसून येतात. नैराश्य येतं. निद्रानाश, अशा समस्या भेडसावू शकतात.
शिवाय, जागतिक अर्थव्यवस्थाच जेव्हा ढेपाळते तेव्हा येणाऱ्या आर्थिक असुरक्षिततेमुळेसुद्धा मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो.
याविषयी सविस्तर सांगताना अमेरिकेतल्या मेरिलँड इथल्या सेंटर फॉर स्टडी ऑफ ट्रॉमॅटिक स्ट्रेसचे सहसंचालक जोशुआ सी. मॉर्गनस्टेन म्हणतात, "ऐतिहासिकदृष्ट्या कुठल्याही आपत्तीचा अनेकांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांपेक्षा तो जास्त काळ टिकतो. इतिहासातून काही शिकण्यासारखं असेल तर ते हेच की संसर्गजन्य आजाराची साथ गेल्यानंतरही त्याचा मानसिक आरोग्यावर झालेला परिणाम टिकून राहतो."
यासाठी ते युक्रेनमधल्या चेर्नोबिलच्या दुर्घटनेचं उदाहरण देतात. तब्बल दोन दशकांनंतर या दुर्घटनेतून बचावलेल्यांमध्ये गंभीर मानसिक समस्या जडल्याचं संशोधकांना आढळलं. इतकंच नाही तर मानसिक आरोग्यावर होणारा दुष्परिणाम हा त्या दुर्घटनेचा सर्वात महत्त्वाचा परिणाम होता. या मानसिक दुष्परिणांमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. शिवाय, अर्थव्यवस्थेचंही मोठं नुकसान झालं.

फोटो स्रोत, Alamy
2005 साली अमेरिकेतल्या न्यू ओरलिअँस प्रांतात आलेल्या कॅटरिना चक्रीवादळाने मोठं नुकसान केलं होतं. या वादळात आपलं घर गमावलेल्या अनेकांना मानसिक आरोग्याच्या समस्यांचा विशेषतः ताण आणि PTSD चा सामना करावा लागल्याचं संशोधक सांगतात.
ज्यांचं मानसिक स्वास्थ्य कमकुवत आहे किंवा आर्थिकदृष्ट्या जे फारसे सक्षम नाहीत, अशा लोकांना अधिक त्रास झाल्याचं त्यावेळी समोर आलं होतं.
कोव्हिड-19 चे दीर्घकालीन परिणाम काय होऊ शकतात?
मानसशास्त्रज्ञांच्या मते ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह बिहेव्हिअर (OCD) असणाऱ्यांना कोव्हिड-19 शी संबंधित मानसिक आरोग्यविषयक तक्रारी दीर्घकाळ सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
कोव्हिड-19 काळात ओसीडी असणाऱ्यांच्या वागणुकीत कमालीचे बदल झाल्याचं दिसून आलं आहे. टेलर म्हणतात मानवी शरीरातील जनुकं आणि पर्यावरणाचे घटक यांच्यातल्या संबंधामुळे ओसीडी उद्भवतो आणि म्हणूनच कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा ओसोडी असणाऱ्यांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.
एखादी गोष्ट वारंवार करण्याचा विचार मनात येणे आणि ती कृती सतत करणे, याला ओसीडी म्हणतात. एखादी कृती वारंवार करण्याचं ऑबसेशन. अनेकांना अस्वच्छेतेचा तिटकारा असतो आणि स्वच्छतेबाबत ते टोकाचे आग्रही असतात. त्यांच्यात स्वच्छतेबाबत ओसीडी असतो.
टेलर म्हणतात, "जनुकीय स्थितीमुळे हे घडतं. कोव्हिड-19 मुळे ओसीडी उद्भवू शकतो किंवा ज्यांना तो असेल त्यांचा ओसीडी अधिक वाढू शकतो. इतकंच नाही तर योग्य मानसिक उपचार मिळाले नाही तर यातले काही लोक 'क्रोनिक जर्मोफोबिक'ही होऊ शकतात."
जर्मोफोबिया म्हणजे जंतूंची भीती बसणे. जर्मोफोबिक व्यक्ती कुठल्याही पृष्ठभागाला हात लावल्यावर हात साबणाने स्वच्छ धुते.

युके कौन्सिल फॉर सायकोथेरपीच्या प्रवक्त्या आणि मनोचिकित्सक युको निप्पोडा म्हणतात, "ओसीडी ही चिंतेची अभिव्यक्ती असते. मात्र, ओसीडीप्रमाणेच जनरल अँक्झायटी म्हणजेच सामान्य चिंतादेखील महत्त्वाचा घटक आहे आणि त्यावरही लक्ष ठेवण्याची गरज आहे. आजच्या आधुनिक समाजात अनेकांना अँक्झायटी आहे. मात्र, या जीवघेण्या आजारामुळे (कोव्हिड-19) ज्यांना चिंता करण्याची सवय आहे त्यांच्या चिंतेत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे."
त्या पुढे म्हणतात, "कोव्हिडची साथ संपल्यानंतरही अनेकजण अति-चिंताग्रस्त होऊ शकतात."
सोशल आयसोलेशनमुळे लोकांना एकटेपणा आला आहे, तर अनेकांना आयुष्यात काही उरलंच नाही, असं वाटू लागलं आहे. हीदेखील आणखी एक चिंतेची बाब असल्याचं निप्पोडा म्हणतात.
सोशल आयसोलेशनमुळे अनेकांचा इतरांशी संपर्क तुटला आहे आणि भविष्यात पूर्वीसारखे नातेसंबंध जोडता येतील का, अशी काळजी त्यांना वाटते. काही जणांनी स्वतःच स्वतःला इतरांपासून दूर करून घेतलं आहे. म्हणजेच त्यांनी एकटेपणा स्वतःहून ओढावून घेतला आहे. त्यामुळे भविष्यात ही साथ गेल्यानंतर ते पुन्हा लोकांमध्ये मिसळतील का, याबाबत शंकाच आहे.
निप्पोडा म्हणतात, "बाहेरच्या जगात जोखीम असेल तर लोक स्वतःला बाहेरच्या जगापासून तोडून घेतात. मात्र, त्यानंतर पुन्हा बाहेर पडून इतरांशी जुळवून घेणं कठीण जाऊ शकतं."
दरम्यान, पूर्वी आयुष्यात कटू अनुभव आलेल्यांनाही कोव्हिड-19 च्या काळात मानसिक समस्यांचा त्रास होऊ शकतो. निप्पोडा म्हणतात, "जाणते-अजाणतेपणाने तुमच्या जुन्या कटू आठवणींना उजाळा मिळून तुमच्या मनावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. अशावेळी जुन्या जखमा पुन्हा उगाळल्या गेल्याने मानसिक आरोग्यविषयक समस्या दीर्घकाळ टिकू शकतात."

फोटो स्रोत, Getty Images
न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या 35 वर्षांच्या लिंडसे हिगिन्स यांच्या जोडीदाराने 2014 साली आत्महत्या केली होती. या घटनेचा त्यांचा मनावर खोल परिणाम झाला होता. त्या PTSD मधून बाहेर पडण्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागले होते. बरीच वर्ष त्यांनी कौन्सिलिंग सेशन्स केले.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून आयुष्य पुन्हा सुरळित झाल्याचं त्यांना जाणवू लागलं होतं. मात्र, कोव्हिड-19ने त्यांना पुन्हा एकदा मानसिक तणावाचा त्रास सुरू झाला आहे. त्या सांगतात, "मी पुन्हा माझ्या एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावून बसेन, अशी भीती मला वाटते."
त्यांचा मित्र घराबाहेर पडला की त्यांना भीती वाटायला लागते. त्या सांगतात, "अर्थातच, तो घराबाहेर गेला म्हणजे तो मरणार नाही, हे तुम्हाला माहिती असतं. मात्र, काहीतरी अघटित घडेल, अशी भीती वाटते. त्याला कोव्हिड-19 ची लागण होऊन तो गंभीर आजारी पडेल, अशी भीती वाटते. माझ्या घरचे आणि मित्रांबद्दलही मला असचं वाटतं."
कोव्हिड-19 मुळे ओढावलेली बेरोजगारी किंवा पगार कपात याचाही मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अमेरिकेत यासंबंधी डेटा गोळा करण्यात आला. त्यात असं आढळून आलं की, कोव्हिड काळात जे बेरोजगार आहेत किंवा ज्यांची पगार कपात झाली आहे त्यातल्या निम्म्याहून जास्त लोकांनी मानसिक ताण जाणवत असल्याची तक्रार केली आहे. कमी पगार असणाऱ्यांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे.
मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात आधीच आर्थिक संकट होतं. कोव्हिड-19 मुळे त्यात अनिश्चिततेची भर पडली आहे. पर्यटन आणि मनोरंजन या दोन क्षेत्रांवर कोव्हिड-19 चा सर्वाधिक परिणाम झाला आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसली आहे. त्यामुळे जोवर लस येत नाही तोवर या क्षेत्रावरचं आर्थिक अनिश्चिततेचं सावट दूर होणार नाही.
निप्पोडा म्हणतात, "आपण आज अनिश्चिततेच्या जगात वावरतोय. काहींना अनिश्चितता आणि अज्ञात यांची भीती वाटते. अशांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होणार, हे निश्चित."
काय शिकलं पाहिजे?
मानसोपचारतज्ज्ञ जो इशारा देत आहेत, तो कितपत खरा ठरेल, हे काळच सांगेल. जगातल्या वेगवेगळ्या संस्थांनी मानसिक आरोग्याच्या या समस्यांवर काही मार्गदर्शक तत्वंही जारी केली आहेत.
यावर्षाच्या सुरुवातीलाच जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आरोग्यासाठी काही शिफारसी प्रकाशित केल्या होत्या. अमेरिका, ब्रिटन आणि जगातल्या इतरही काही देशांनी अशीच काही मार्गदर्शक तत्त्वंही प्रसिद्ध केली होती.
याच महिन्यात अमेरिकेतल्या सायकोलॉजीकल असोसिएशनने दीर्घकालीन तणावाचे परिणाम आणि अनिश्चिततेच्या या काळाचा सामना कसा करायचा, यासंबंधीचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
शिवाय, लोकांच्या अनुभवांच्या आधारे या अभूतपूर्व आरोग्य संकटाचा मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविषयी अधिक सखोल माहिती देणारा डेटा गोळा करण्याचंही काम सुरू आहे. यातून या समस्यांचं निराकरण कसं करता येईल, याचाही मार्ग सापडू शकेल.
यासंबंधी ब्रिटनमध्ये एक महत्त्वाचं संशोधन सुरू आहे. यात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले कोरोनाग्रस्त आणि कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या नर्स यांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष ठेवण्यात येतंय, तर स्वीडनमल्या स्टॉकहोममध्ये सेंटर फॉर सायकॅट्रिक रिसर्चमध्ये नैराश्य, चिंता, ओसीडी अशा मानसिक समस्या असणाऱ्या 3000 लोकांचा वर्षभर अभ्यास करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमधील मॅटिल्डा सेंटर फॉर रिसर्च इन मेंटल हेल्थ ही संस्था कोव्हिड-19 चा लोकांच्या मनस्वास्थ्यावर होणारा परिणामांचा सर्व्हे करतंय.
स्टॉकहोम प्रकल्पाच्या ऑपरेशन मॅनेजर नित्या जयराम-लिंडस्टॉर्म म्हणतात, "मानसिक स्वास्थ्यविषयक समस्या वाढतील किंवा त्या वाढत आहेत, याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येते. मात्र, त्या चांगल्या पद्धतीने समजून घेण्याची गरज आहे." कोव्हिड-19मुळे मानसिक आजारांच्या समस्या किती वाढल्या आहेत, पुढच्या वर्षभरात रुग्णाची लक्षणं कशी तयार झाली किंवा बदलली आणि कुणाला याचा सर्वाधिक धोका आहे, या साऱ्यावर स्वीडनमध्ये सुरू असलेल्या संशोधनात लक्ष केंद्रित करण्यात आल्याचं त्या सांगतात.
त्या म्हणतात, " रिस्क फॅक्टर्सएवढेच चित्त प्रसन्न ठेवणारे घटकही महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच असे घटक कोणते, याचाही आम्हाला अभ्यास करायचा आहे. "

फोटो स्रोत, Twitter
अशाप्रकारची संशोधनं आरोग्यक्षेत्र आणि सरकार दोन्हीसाठी उपयुक्त ठरतील, असं मेरिलँडमधील सेंटर फॉर स्टडी ऑफ ट्रॉमॅटिक स्ट्रेसचे जोशुआ सी मॉर्गनस्टेन यांना वाटतं. ते म्हणतात, "वेगवेगळ्या धोक्यांचं आकलन करण्यासाठी लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यातून भविष्यात येणाऱ्या संसर्गजन्य साथीच्या वेळी किंवा सार्वजनिक आरोग्यविषयक प्रसंगांसाठी योजना आखण्यात मदत होईल."
ते पुढे म्हणतात, "ताण हा विषासारखा असतो. तो समजून घेण्यासाठी आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी कोणाला ताण आहे, तो कधीपासून सुरू झाला, किती प्रमाणात ताण आहे आणि त्याचे काय परिणाम झाले हे जाणून घेणं गरजेचं आहे."
आतापर्यंत यासंबंधीची खूप कमी माहिती उपलब्ध आहे. मात्र, सध्याच्या जागतिक आरोग्य संकटाने मानसिक आरोग्य समस्या प्रकर्षाने पुढे आणल्या आहेत आणि म्हणूनच दीर्घकालीन अभ्यासांमधून वंश, लिंग आणि आर्थिक पातळीवर असणारी आरोग्य असमानता अधिक चांगल्याप्रकारे जाणून घेता येईल आणि भविष्यासाठीच्या योजनाही आखण्यासाठी ते उपयोगी ठरेल, असं मॉर्गनस्टेन यांना वाटतं.
भविष्यासाठीच्या आशा
कोव्हिड-19 मुळे उद्भवलेल्या मानसिक आरोग्याविषयी एकीकडे चिंता व्यक्त होत असताना यातून काही सकात्मक बाबीही शिकण्यासारख्या असल्याचं मानसोपचार तज्ज्ञाचं म्हणणं आहे.
कोरोनाच्या साथीमुळे काही लोकांना दीर्घकालीन मानसिक आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता असली तरी अनेकांनी हा ताण उत्तमरित्या मॅनेज केल्याचं टेलर म्हणतात.
त्यासाठी वुहानचं उदाहरण घेता येईल. वुहानमधूनच या जागतिक साथीची सुरुवात झाली. मात्र, तिथे 76 दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. शिवाय, मोठ्या प्रमाणावर चाचण्या झाल्या. या सर्वांचा परिणाम म्हणून तिथे ही साथ बऱ्यापैकी आटोक्यात आली आणि गेल्या ऑगस्ट महिन्यात तर वुहानवासियांनी एक मोठा वॉटर पार्क म्युझिक फेस्टिव्हल आयोजित केला होता. या उत्सवात हजारो लोकांनी भाग घेतला. कुणीही मास्क घालून नव्हतं. न्यूझिलँडमध्येही कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला होता. मात्र, तिथेही या साथीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आणि आज न्यूझिलँडमध्येसुद्धा संगीत महोत्सवांना सुरुवात झाली आहे.
टेलर म्हणतात, "यावर्षाच्या पूर्वार्धात अनेकांनी आयुष्य पुन्हा पूर्वपदावर येईल का, पुन्हा सामान्य आयुष्य जगता येईल का, यावर शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र, आज आपण बघतोय की जगात अनेक ठिकाणी आयुष्य हळूहळू रुळावर यायला सुरुवात झाली आहे. ही जागतिक साथ संपल्यानंतर जगाच्या इतर भागांमध्येही असेच कार्यक्रम आयोजित केले जातील."
अनेकांच्या मनावर या विपरित परिस्थितीचा अत्यंत सकारात्मक परिणाम झाल्याचं, लोक मनाने अधिक कणखर बनल्याचंही दिसून आलं आणि हा परिणामही दीर्घकाळ टिकण्याची शक्यता आहे, असं मानसोपचारतज्ज्ञ निप्पोडा म्हणतात. बाहेरच्या जगात वावरताना येणाऱ्या ताणामुळे मानसिक समस्यांचा सामना करावा लागणाऱ्या काही जणांची अँक्झाईटी पातळी लॉकडाऊनमध्ये कमी झाल्याची, त्यांचे पॅनिक अॅटॅक्स कमी झाल्याचं आढळून आलं आहे. स्वतःच्या घरात जास्त वेळ घालवल्यामुळे अनेकांमध्ये स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेची भावना वाढली आणि त्याचाच हा परिणाम असल्याचं निप्पोडा सांगतात.
यातून एकटेपणा येण्याची भीती असली तरी उद्या सामान्य आयुष्य सुरू झाल्यावर वर्कलाईफ आणि खाजगी आयुष्य याची उत्तम सांगड कशी घालायची, याचा धडा या लॉकडाऊनमधून अनेकांना मिळणार असल्याचं निप्पोडा म्हणतात.
त्या सांगतात, "अनेकांनी सोशल डिस्टंसिंगमुळे मिळालेला काळ घराची साफसफाई करण्यात, अनावश्यक वस्तू काढून घर मोकळं-ढाकळं करण्यात घालवला. यामुळे घरात आलेल्या ताजेपणाचा त्यांच्या मनस्वास्थ्यावरही सकारात्मक परिणाम झाला. जणू घराप्रमाणेच मनातली गुंतागुंत सोडवण्याची प्रेरणा त्यांना मिळाली."
छंदासाठी वेळ देता आला आणि यातूनही अनेकांना समाधान, तृप्ती आणि ताण-तणावापासून मुक्तता मिळाली.
मात्र, अशाप्रकारचे अनुभव स्टॉकहोममधल्या जर्मोफोबिक सुसॅन केम्प यांच्यासाठी पोकळच ठरले. केम्प म्हणतात, "सावधगिरी बाळगणे आणि अतिरेक करणे, यात समतोल साधणं गरजेचं आहे आणि मला ते अजूनही जमलेलं नाही. आजच्या परिस्थितीत मी कधी सावधगिरी बाळगतेय आणि कधी अतिरेक होतेय, हे मला ठरवता येत नाहीय."
PTSD चा सामना करणाऱ्या अमेरिकेतल्या लिंडसे हिगिन्स म्हणतात, "स्वतःला स्थिर ठेवणं, माझ्यासाठी खूप खूप अवघड आहे." लस आल्यानंतरही आपल्या मानसिक आरोग्यात काही सुधारणा होईल का, याबाबत त्या साशंक आहेत. हिंगीन्स म्हणतात, "लस वितरणाला वेळ लागेल. शिवाय, लस घेण्यासाठी लोकांना तयार करण्यातही वेळ लागणार आहे. खरं सांगायचं तर मला यापुढे कधी सुरक्षित वाटेलही की नाही, याची खात्री वाटत नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








