जपानी राजकुमारी माको: प्रियकराबरोबर विवाह करण्यासाठी सोडलं शाही दर्जा

माको कोमुरो आणि तिचा प्रियकर

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, माको कोमुरो आणि तिचा प्रियकर

जपानच्या राजकुमारी माको यांनी 2017 मध्ये त्यांचे वर्गमित्र असलेल्या केई कोमुरोबरोबरच्या नात्याची घोषणा केली. त्यांनी 'सूर्यासारख्या तेजस्वी हास्यानं' माझं हृदय जिंकलं असं त्या म्हणाल्या होत्या.

विद्यापीठात शिक्षणादरम्यान त्या दोघांची पाच वर्षांपूर्वी भेट झाली. वर्षभरातच त्यांनी विवाह करण्याबाबत निर्णय घेतला होता. म्हणजेच राजकुमारी या सर्वसामान्य नागरिक बनणार होत्या. त्याचं कारण म्हणजे शाही कुटुंबातील महिला सदस्यांनी सामान्य व्यक्तीशी विवाह केल्यास त्यांचा शाही दर्जा रद्द होतो.

शाही कुटुंबाकडे सगळ्यांच्या नजरा असतात आणि त्यांनी परंपरांचं पालन करावं अशा अपेक्षा असलेल्या देशाचं मनही, त्यांच्या हास्यानं त्यांनी जिंकलं होतं. याबाबत माध्यमांत प्रचंड चर्चा झाली पण तीही बहुतांश सकारात्मकच होती.

मात्र, लवकरच सगळं काही बदलून गेलं.

दोन महिन्यांनंतर कोमुरो यांच्या आई आणि त्यांचा पूर्वाश्रमीचा जोडीदार (होणारा) यांच्यातील एक आर्थिक वाद समोर आला. कोमुरो आणि त्यांच्या आईनं कर्ज चुकवलं नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळं कोमुरो यांना भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार, अशाही चर्चा सुरू झाल्या.

लोकांचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर लग्नाची तयारी करण्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याचं अधिकृत स्पष्टीकरण देत त्यांचं लग्न पुढं ढकलण्यात आलं.

पूर्वाश्रमीच्या राजकुमारी सध्या माको कोमुरो म्हणून ओळखल्या जातात. सध्याच्या शासकांचे लहान भाऊ असलेल्या राजकुमार आकिशिनो यांच्या त्या पहिलं अपत्य आहेत. 23 ऑक्टोबर 1991 ला माको यांचा जन्म झाला.

शाही परंपरेचं पालन करत त्यांनी सुरुवातीचं शिक्षण एलाईट गोकुशिऊन स्कूलमध्ये घेतलं. शक्यतो या शाळेत शाही कुटुंबातील सदस्य शिक्षण घेतात.

दोघांची भेट 2012 साली विद्यापीठात शिक्षण घेताना झाली होती.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, दोघांची भेट 2012 साली विद्यापीठात शिक्षण घेताना झाली होती.

मात्र उच्च शिक्षणासाठी तिथून बाहेर पडत त्यांनी ही परंपरा मोडली. त्यांनी टोकियो इंटरनॅशनल ख्रिश्चन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. त्याठिकाणी त्यांनी कला आणि सांस्कृतिक वारसा याचं शिक्षण घेतलं.

त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गमध्ये एक वर्ष घालवलं. त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ लेसिस्टरमध्ये त्यांनी मास्टर्स डिग्री मिळवली. तो अत्यंत सुंदर अनुभव होता, असं त्यांनी म्हटलं.

माको यांच्या निकटवर्तीयांनी त्या स्वंतंत्र विचारसरणीच्या आणि मैत्रीपूर्ण स्वभावाच्या असल्याचं सांगितलं. शाही कुटुंबाची कवर्तव्ये पार पाडत त्यांनी, करिअरही घडवलं असं त्यांच्याबाबत जपानमधील वृत्तसंस्था क्योदोनं म्हटलं.

2012 मध्ये विदेशात जाण्यासंदर्भातील नियोजना बाबतच्या बैठकीत कोमुरो यांच्याशी त्यांची पहिली भेट झाली होती. कोमुरो यांचा जन्मही 1991 मध्येच झालेला आहे. त्यांचा स्वभाव अत्यंत नम्र होता.

माध्यमांमध्ये त्यांच्या कुटुंबाबत बरंच काही वाईट-साईट प्रकाशित होत होतं. 2018 मध्ये या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ते कायद्याच्या शिक्षणासाठी न्यू यॉर्कला फॉर्धम युनिव्हर्सिटीत गेले. त्यानंतर माको आणि कोमुरो इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते.

माको कोमुरो

फोटो स्रोत, AFP

सप्टेंबरमध्येच ते जपानमध्ये परतले. त्यावरूनही वाद झाला. कोमुरो यांनी अगदी साधे कपडे परिधान केले होते. तसंच त्यांनी केस वाढवलेले होते. अनेकांसाठी त्यांची ही प्रतिमा म्हणजे, राजकुमारीबरोबर विवाहास ते योग्य नसल्याचा जणू पुरावाच होता.

अखेर ऑक्टोबर महिन्यात त्या दोघांनी लग्न केलं. माको यांनी शाही कुटुंबातील विवाहाशी संबंधित एका परंपरेलाही छेद दिला. शाही कुटुंबातील महिला सदस्य कुटुंबातून जाताना त्यांना दिली जाणारी 13 लाख डॉलरची रक्कम त्यांनी नाकारली.

असं करणाऱ्या माको या पहिल्याच महिला होत्या, त्यामुळं ती परंपराही त्यांनी मोडली.

कोमुरो यांच्या आर्थिक अडचणींचा विषय अजूनही कायम आहे. संबंधित 35 हजार डॉलरची रक्कम कर्ज नव्हे तर भेट होती, असं त्याचं म्हणणं आहे. तरीही यावर तडजोडीची तयारी त्यांनी दाखवली आहे. त्यांच्या लग्नाच्या दिवशी एक आंदोलनही झालं. त्यात "आमच्या घरांचं रक्षण करा" आणि "शाही कुटुंब जपानचा आरसा आहे" असे फलक झळकवण्यात आले.

माध्यमांध्ये प्रचंड बातम्या आणि सोशल मीडियावरून झालेल्या हल्ल्यांमुळं माको यांच्यावर मानसिक परिणाम झाला आहे. त्या सध्या पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर या आजारानं ग्रस्त असल्याचं, सांगण्यात आलं आहे.

अगदी साध्या पद्धतीनं झालेल्या विवाहानंतर आयोजित पत्रकार परिषेदत माको यांनी, कोमुरो यांच्याबाबतच्या चुकीच्या बातम्यांनी प्रचंड भीती, तणाव आणि दुःख झाल्याचं सांगितलं.

"माझ्या जीवनातलं केई यांचं स्थान कोणीही घेऊ शकत नाही. एकमेकांची मनं आनंदी ठेवत जगण्यासाठी आमच्याकडे विवाह हाच एकमेव पर्याय होता," असं त्या म्हणाल्या.

कोमुरो यांनी विवाहापूर्वी केस कापले. पत्नीची संपूर्ण काळजी घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. "माझं माकोवर प्रेम आहे. माझं एकमेव जीवन मला माझ्या एकमेव प्रेमाबरोबर घालवायचं आहे," असं ते म्हणाले.

कोमुरो अमेरिकेत वकील म्हणून काम करतात. त्यामुळं हे दोघं तिथंच स्थायिक होण्याची शक्यता आहे. त्या दोघांची तुलना ब्रिटनच्या शाही कुटुंबातील मेघन मर्कल आणि प्रिन्स हॅरी यांच्याशी होत आहे. त्यामुळं त्यांना "जपानचे हॅरी आणि मेघन" म्हटलं जात आहे.

माको अमेरिकेला जाण्याची तयारी करण्यासाठी काही दिवस जपानमध्येच राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. या तयारीत त्यांचा पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज करण्याचाही समावेश आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)