ओटोनिएल : 500 सैनिक, 22 हेलिकॉप्टर्स, 1 सॅटेलाईट आणि ड्रग तस्कराच्या अटकेचा थरार

फोटो स्रोत, Reuters
भारतामध्ये गेले काही दिवस आर्यन खान ड्रग्ज प्रकरण बातम्यांत आहे. त्याआधी रिया चक्रवर्ती, कॉमेडियन भारती सिंह यांच्या निमित्तानेही भारतातल्या ड्रग्ज वर्तुळाविषयी चर्चा झाली होती.
पण जगभरातच सध्या ड्रग्ज व्यापार बातम्यांमध्ये आहे. कोलंबियामध्ये ड्रग्जची तस्करी करणारा सर्वांत मोठा तस्कर आणि देशातील सर्वांत मोठ्या गुन्हेगारी टोळीच्या म्होरक्याला अटक करण्यात आली आहे. कोलंबियाबरोबरच अमेरिकेलाही या तस्कराचा शोध होता.
ओटोनिएल नावाने ओळखल्या जाणाऱ्या डेयरो अँटोनियो उसागा याची माहिती देणाऱ्याला कोलंबिया सरकारनं 8 लाख डॉलर म्हणजे जवळपास 6 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. तर अमेरिकेनं त्यापेक्षा अनेकपट अधिक 50 लाख डॉलर म्हणजे जवळपास साडे 37 कोटींचं बक्षीस जाहीर केलं होतं.
ओटोनिएलला लष्कर, हवाई दल आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पकडलं.
कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष इव्हान डुके यांनी स्वतः याबाबत घोषणा केली आहे.
यंत्रणांना मिळालेलं हे मोठं यश असल्याचं त्यांनी टीव्हीवर बोलताना सांगितलं. "ड्रग्ज तस्करीच्या विरोधात देशात करण्यात आलेली आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे," असंही ते म्हणाले.
कसा अडकला जाळ्यात?
ओटोनिएलला पश्चिम उत्तर कोलंबियामध्ये पनामाला लागून असलेल्या सीमेच्या जवळ अँटिओकिया प्रांतातील एका ग्रामीण भागात त्यांच्या भूमिगत ठिकाणावरून अटक करण्यात आली.
या मोहिमेत 500 सैनिक सहभागी झाले होते. त्यांना 22 हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदत केली जात होती. यात एका पोलिसाचा मृत्यूदेखील झाला आहे.

फोटो स्रोत, Reuters
त्यानं या ग्रामीण भागांमध्ये अनेक घरांचं एक जाळं तयार केलेलं होतं. त्याद्वारे तो सारखं स्थान बदलत असायचा. त्याच्याकडे फोन नव्हता. संपर्कासाठी तो इतर लोकांचा वापर करायचा आणि तेच संदेश पोहोचवण्याचं काम करायचे.
मात्र, दोन आठवड्यांपूर्वी ओटोनिएल असलेल्या जागेचा शोध लावण्यात आला आणि नंतर त्याला जाळ्यात अडकवण्याची तयारी सुरू झाली, असं एल टिएम्पो वृत्तपत्रात म्हटलं आहे.
50 पेक्षा अधिक तज्ज्ञांच्या मदतीनं सॅटेलाईटच्या माध्यमातून त्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली. त्यात अमेरिका आणि ब्रिटनमधील तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली, असं पोलिस प्रमुख जोर्गे वर्गास यांनी सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
"कोलंबियाच्या लष्कराच्या इतिहासात जंगलात रावबलेली ही आजवरची सर्वांत मोठी मोहीम होती," असं राष्ट्रपतींनी सांगितल्याचं वृत्त एएफपी वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
कोलंबियाच्या लष्करानं नंतर एक फोटोही प्रसिद्ध केला आहे. त्यात सैनिक ओटोनिएलला घेऊन जाताना दिसत आहेत. त्यात ओटोनिएलच्या हातात बेड्याही आहेत.
गेल्या काही वर्षांत या कुख्यात गुन्हेगाराला पकडण्यासाठी अनेक मोहिमा राबवण्यात आल्या. त्यात हजारो पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र, कुणालाही यश मिळू शकलेलं नव्हतं.
गल्फ क्लॅनची शक्ती किती?
गल्फ क्लॅन (टोळी)ला पूर्वी उसुगा क्लॅन म्हटलं जात होतं. या टोळीचा आधीचा म्होरक्या ओटोनिएलचा भाऊ होता. जवळपास 10 वर्षांपूर्वी एका न्यू इअर पार्टीत पोलिसांच्या कारवाईत त्याच्या भावाचा मृत्यू झाला. त्यानंतर या क्लॅन म्हणजेच टोळीची जबाबदारी ओटोनिएलकडे आली.

फोटो स्रोत, Reuters
कोलंबियाच्या सुरक्षारक्षकांनी ही देशातील सर्वांत मोठी गुन्हेगारी टोळी असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सशस्त्र आणि अत्यंत भयावह म्हटलं होतं.
ही टोळी कोलंबियाच्या अनेक प्रांतांमध्ये सक्रिय असून तिचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय जगतात दूरपर्यंत पसरलेले आहेत.
ड्रग्ज, मानवी तस्करी, सोन्याच्या खाणींमध्ये अवैध खोदकाम आणि तस्करी अशी अनेक अवैध कामं ही टोळी करते.
या टोळीचे जवळपास 1,800 सशस्त्र सदस्य असून, त्या सर्वांना अति-उजव्या निमलष्करी दलांमधून निवडून आणलं असल्याचं सांगितलं जातं. अर्जेंटिना, ब्राझील, होंडुरास, पेरू आणि स्पेनमधून या टोळीच्या सदस्यांना अटक झाली आहे.
कोलंबियापासून अमेरिका आणि रशियापर्यंत ड्रग्जच्या तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक मार्गांवर या टोळीचं नियंत्रण आहे.
अटकेनंतर आता ओटोनिएल यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले आहेत. त्यात अमेरिकेला कोकेन पाठवणं, पोलिसांची हत्या आणि लहान मुलांना टोळीत सहभागी करून घेण्यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
ओटोनिएलला अमेरिकेनं 2009 मध्ये दोशी ठरवलं होतं. त्यामुळं त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली जाऊ शकते. त्यानंतर त्याला न्यूयॉर्कच्या न्यायालयात हजर केलं जाईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








