Nobel Peace Prize : मारिया रेसा आणि दिमित्री मुरातोव्ह यांना शांततेचा नोबेल पुरस्कार

पत्रकार मारिया रेसा आणि दिमित्री मुरातोव्ह यांना यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख नोबेल समितीनं पुरस्कार जाहीर करताना केला.

नॉर्वेजियन नोबल समितीने या पुरस्कारविजेत्यांच्या नावाची घोषणा केली.

शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तीला तब्बल 10 मिलियन स्वीडिश क्रोना म्हणजेच सुमारे आठ कोटी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.

मारिया रेसा आणि दिमित्री मुरातोव्ह कोण आहेत?

मारिया रेसा आणि दिमित्री मुरातोव्ह हे दोघेही व्यवसायाने पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. समाजातील विविध प्रश्न चव्हाट्यावर आणणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत सातत्याने आवाज उठवणे, याकरिता दोघांना संयुक्तपणे नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला.

मारिया रेसा

फिलिपिन्स येथील मारिया रेसा यांनी 2012 साली रॅपलर नामक एक माध्यमसमूह स्थापन केलं होतं. त्या या समूहाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आपल्या पत्रकारितेदरम्यान त्यांनी निर्भयपणे काम करून समाजाचे प्रश्न मांडण्याचं काम केलं, त्यामुळे शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी रेसा यांच्या नावाचा विचार करण्यात आला, असं समितीने सांगितलं.

दिमित्री मुरातोव्ह

दिमित्री मुरातोव्ह यांनी गेल्या कित्येक दशकांपासून रशियामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आवाज उठवण्याचं काम केलं आहे. यासाठी त्यांना अनेकवेळा आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागला.

1993 मध्ये मुरातोव्ह यांनी नोव्हाजा गॅझेटा नामक एक स्वतंत्र वृत्तपत्र सुरू केलं. 1995 पासून ते तब्बल 24 वर्षे ते या वृत्तपत्राचे मुख्य संपादक राहिले.

सध्या रशियामधील स्वतंत्र वृत्तपत्रांच्या यादीत नोव्हाता गॅझेटाचं नाव घेतलं जातं.

सरकारविरुद्ध कडवी टीका करण्याचं काम या वृत्तपत्राकडून केलं जातं.

रशियात इतर माध्यमांकडून दुर्लक्षित करण्यात येणारे विषय मांडणे, तथ्यांवर आधारित पत्रकारिता करून समस्या लोकांच्या निदर्शनास आणणे यांसाठी हे वृत्तपत्र ओळखलं जातं.

रशियातील भ्रष्टाचार, पोलिसांकडून केला जाणारा हिंसाचार, कायदाबाह्य अटक, निवडणुकीदरम्यानची फसवणूक तसंच रशियन लष्कराकडून चालवण्यात येणाऱ्या कथित टोल फॅक्टरी यासंदर्भात निशाणा साधणारे अनेक लेख या वृत्तपत्रात छापून आले होते.

नोबेल पुरस्कारांचे प्रसिद्ध विजेते

इथिओपियाचे पंतप्रधान अॅबी अहमद यांना 2019साठीचा शांतता पुरस्कार देण्यात आला होता. त्यांनी पुढाकार घेत इथिओपियाचा एरिट्रियासोबतचा 20 वर्षांपासूनचा लष्करी तिढा सोडवला होता.

अण्वस्त्र विरोधी गट असणाऱ्या 'इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्युक्लियर वेपन्स' अर्थात 'आयकॅन' (ICAN ) चळवळीला 2017चा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला होता.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना 2009 मध्ये शांततेसाठीचं नोबेल देण्यात आलं. "आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यासाठी आणि लोकांमधील सहकार्य भावना वाढवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल" त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

आपल्यासाठी हा एक सुखद धक्का असून याबद्दल आपण कृतज्ञ असल्याचं ओबामांनी म्हटलं होतं. पण त्यांना पुरस्कार देण्यात आल्याबद्दल टीकाही झाली होती. कारण हा पुरस्कार जाहीर होण्याआधी केवळ 12 दिवसांपूर्वी त्यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली होती.

यासोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर (2002), मुलींच्या शिक्षणासाठी चळवळ उभारणारी कार्यकर्ती मलाला युसुफजाई (संयुक्तपणे 2014मध्ये), युरोपियन युनियन (2012), युनायटेड नेशन्स आणि त्यांचे सरचिटणीस कोफी अन्नान (2001मध्ये संयुक्तपणे) आणि मदर टेरेसा (1979) यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

तर अल्बर्ट आईनस्टाईन (1921 भौतिकशास्त्र), मेरी क्युरी (1903 भौतिकशास्त्र आणि 1911 रसायनशास्त्र), हॅरल्ड पिंटर (साहित्य 2005) यांनाही नोबेल पुरस्कार मिळाला होता.

रविंद्रनाथ टागोर यांना 1913 साली साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. हा पुरस्कार मिळणारे ते पहिले युरोपियन नसलेले साहित्यिक ठरले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)