You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
9/11 हल्ला : 'या' दोन कारणांमुळे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती काही सेकंदात कोसळल्या
- Author, कार्लोस सेरानो
- Role, बीबीसी मुंडो
11 सप्टेंबर 2001 रोजी दोन बोईंग 767 विमानं न्यूयॉर्कमधील सर्वात उंच 110 मजली ट्विन टॉवर या इमारतीला धडकली.
पहिलं विमान 8.45 वाजता उत्तर दिशेला असलेल्या टॉवरला धडकलं. 102 मिनिटं त्याठिकाणी आग धगधगत होती. त्यानंतर 10 वाजून 28 मिनिटांनी अवघ्या 11 सेकंदांमध्ये हे टॉवर कोसळलं.
पहिलं विमान धडकल्यानंतर 18 मिनिटांनी सकाळी 09.03 वाजता दुसऱ्या ट्विन टॉवरला आणखी एक विमान येऊन धडकलं 56 मिनिटं या टॉवरमध्येही आगीच्या ज्वाळा उठत होत्या, त्यानंतर पुढच्या 9 सेकंदामध्ये, तेही जमीनदोस्त झालं.
"इमारत कोसळल्याच्या आवाजानंतर काही सेकंदात त्या ठिकाणी गुडूप अंधार झाला होता. रात्रीपेक्षाही जास्त काळोख होता. काही क्षणांसाठी सर्व आवाजदेखील बंद झाले. मला श्वासही घेता येत नव्हता," असं उत्तरेच्या दिशेला असलेल्या टॉवरच्या 47व्या मजल्यावर काम करणारे ब्रुनो डेलिंगर यांनी या घटनेच्या आठवणी सांगताना म्हटलं.
"मला वाटलं जणू माझा मृत्यू झाला आहे. कारण माझा मेंदू कामच करत नव्हता," असं त्यांनी 11 सप्टेंबरच्या स्मारक आणि संग्रहालयात आपबिती कथन करताना सांगितलं.
टॉवर का कोसळले?
"दोन्ही टॉवर कोसळले, कारण तोच दहशतवादी हल्ल्याचा हेतू होता, हेच उत्तर सर्व तज्ज्ञांनी स्वीकारलं," असं मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (एमआयटी) चे सिव्हील अँड एव्हायर्नमेंटल इंजीनियरिंग विभागाचे निवृत्त प्राध्यापक एडुआर्डो कौसेल यांनी बीबीसी मुंडोशी बोलताना सांगितलं.
हल्ल्यामध्ये हे टॉवर जमीनदोस्त झाल्यानंतर ट्विन टॉवरच्या इमारतीची रचना, त्यासाठी वापरलेलं तंत्रज्ञान, वास्तुरचना या दृष्टीकोनातून विश्लेषण करण्यात आलं होतं. विश्लेषण करणाऱ्या एमआयटीच्या तज्ज्ञांच्या टीमचे प्रमुख कौसेल हेच होते.
जीवघेणा योगायोग
2002 मध्ये एमआयटीच्या अभ्यासाचा अहवाल प्रकाशित झाला. अमेरिकेच्या सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड अँड टेक्नॉलॉजी (एनआयएसटी) नं काढलेल्या निष्कर्षांबरोबर तो बराच मिळता जुळता होता. एनआयएसटीवर इमारती कोसळण्याच्या कारणांचा तपास करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्या तपास आणि अभ्यासाचा अहवाल 2008 मध्ये प्रकाशित करण्यात आला होता.
एमआयटी आणि एनआयएसटी दोघांचाही सारखाच निष्कर्ष समोर आला. तो म्हणजे टॉवर कोसळण्यामागं दोन सर्वात मोठी कारणं एकाच वेळी घडणं हे होते.
पहिलं कारण म्हणजे, विमानं धडकल्यामुळं दोन्ही इमारतींच्या मूळ संरचनेचं (ढाचा) मोठं नुकसान झालं होतं.
दुसरं कारण म्हणजे, विमानं धडकल्यानंतर लागलेली आग अनेक मजल्यांपर्यंत पोहोचली होती.
"त्याठिकाणी आग लागली नसती, तर या इमारती कोसळल्या नसत्या," असं कौसेल म्हणतात.
त्याचबरोबर "जर तिथं केवळ आगच लागली असती, तर इमारतीच्या मूळ बांधकाम किवा ढाचाचं नुकसान झालं नसतं. तसं झालं असतं, तर ट्विन टॉवर कोसळले नसते," असंही ते म्हणाले.
"या इमारतीची प्रतिकार क्षमता प्रचंड होती," असं इंजीनीअर असलेले कौसेल सांगतात.
एनआयएसटीच्या रिपोर्टनुसार उपलब्ध असलेल्या अधिकृत दस्तऐवजांचा विचार करता, हे टॉवर बोईंग 707 सारखी विमानं धडकण्याच्या शक्यतेचा विचार करून तयार करण्यात आले होते. या इमारतींचं डिझाईन तयार करण्यात आलं त्यावेळंचं ते सर्वात मोठं व्यावसायिक विमान होतं.
मात्र, एनआयएसटीच्या अभ्यासकांनी या निष्कर्षावर पोहोचण्यासाठी कोणते मापदंड किंवा पद्धत वापरली याबाबत माहिती दिली नाही.
कसे तयार करण्यात आले होते ट्विन टॉवर्स?
1960 मध्ये या ट्विन टॉवर्सची निर्मिती सुरू करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडं एक डिझाईन होतं. ते डिझाईन त्यावेळच्या मापदंडांवर आधारित होतं.
दोन्ही इमारती स्टील आणि काँक्रिटचा वापर करून तयार करण्यात आलेल्या होत्या. शिवायत त्यात लिफ्ट आणि पायऱ्याही होत्या.
इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर स्टीलचे आडवे बीम लावण्यात आलेले होते. कोपऱ्यापासून सुरू होऊन इमारतीच्या बाहेरच्या भिंती तयार करण्यासाठी मूळ इमारतीत असलेल्या सरळ उभ्या स्टीलच्या कॉलमशी ते जोडलेले होते.
या स्टील बीममुळं प्रत्येक मजल्याचं वजन हे मध्यभागी असलेल्या खांबावर विभाजित करत होते. तसंच प्रत्येक मजल्यावर या खांबाला आधारही दिला जात होता त्यामुळं इमारतीत वाक येत नाही. अभियांत्रिकीच्या भाषेत याला बकलिंग म्हणतात.
ट्विन टॉवरमध्ये वापरण्यात आलेली स्टिलची रचना काँक्रिटनं झाकण्यात आली होती. त्यामुळं आग लागली तर या बीमला वाचवण्यास ती सक्षम होती.
तसंच हे बीम आणि मधला खांब यावर एका पातळ अग्निरोधक थरही चढवण्यात आलेला होता.
हवेमुळं वाढली आग
दोन्ही टॉवरला एक मोठ्या आकाराचं बोईंग धडकलं होतं. हे टॉवर बोइंग 707 धडकल्याचा धक्का सहन करण्यास सक्षम होते. पण त्यापेक्षा खूप मोठं विमान म्हणजे बोइंग 767 यांना धडकलं होतं.
एनआयएसटीच्या रिपोर्टचा विचार करता, या धडकेमुळं खांबाचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळं स्टील बीम आणि खांबावर असलेला अग्निरोधक थर नष्ट झाला होता.
"धडकेमुळं जे कंपन निर्माण झालं, त्यामुळं स्टीवर लावलेलं अग्निरोधक कोटिंग तुटलं होतं. त्यामुळं बीम अगदी सहजपणे आगीच्या संपर्कात आले होते," असं कौसेल सांगतात.
यामुळं संपूर्ण इमारतीत आगीचे लोट पसरण्यासाठी मार्ग तयार झाला आणि इमारतीच्या मूळ ढाच्याचं नुकसान झालं.
आग पसरत होती तेव्हा, इमारतीमध्ये तापमान 1000 अंशावर पोहोचलं होतं. त्यामुळं खिडक्यांच्या काचांना तडे गेले आणि काचा फुटल्या. खिडक्यांच्या काचा फुटताच हवेनं इमारतीत प्रवेश केला आणि त्यामुळं आग अधिक पसरत गेली.
"हवेमुळं आग अधिकच पसरत गेली," असं कौसेल म्हणतात.
'उडणारे बॉम्ब'
अधिकृत आकड्यांचा विचार करता प्रत्येक विमानात जवळपास 10 हजार गॅलन (37,850) लीटर एवढं इंधन होतं.
ही विमानं म्हणजे जणू उडणारे बॉम्बच होते, असं कौसेल म्हणाले.
यापैकी बहुतांश इंधन हे, विमान धडकल्यामुळं लागलेल्या आगीमुळं जळून गेलं होतं, पण मोठ्या प्रमाणावर इंधन हे इमारतीच्या खालच्या मजल्यांपर्यंतही गेलं होतं.
त्यामुळं आग पसरण्यास मदत तर मिळालीच, पण सोबतच इतरही अनेक ज्वालाग्रही पदार्थांमुळं आग भडकायला त्याची मदतही झाली. धगधगत्या आगीमुळं दोन गोष्टी घडल्या, असं एमआयटीचे इंजिनिअर म्हणाले.
पहिली गोष्ट म्हणजे, प्रचंड गर्मीमुळं प्रत्येक मजल्यावर असलेले बीम आणि स्लॅब प्रसरण पावला. त्यामुळं बीम स्लॅबपासून वेगळे झाले. तसंच, बीम प्रसरण पावल्यामुळं त्यांनी खांबाला बाहेरच्या बाजुला ढकललं.
त्यानंतर आणखी एक परिणाम झाला. आगीच्या ज्वाळांनी बीमचं स्टिल नरम व्हायला सुरुवात झाली. त्यामुळं त्यात कडकपणा राहिला नाही. यामुळं ट्विन टॉवरची मजबूत संरचना दोरीसारखी दिसायला लागली आणि संपूर्ण खांबाला आतल्या बाजूला ढकलायला लागली.
"हे टॉवरसाठी धोकादायक होतं," असं कौसेल म्हणाले.
अखेर संपूर्ण इमारत कोसळली
खांब आता पूर्णपणे उभे नव्हते. कारण बीममुळं आधी ते बाहेरच्या बाजुला ढकलले गेले आणि नंतर आतल्या बाजुला ओढले गेले, त्यामुळं त्यात वाक येऊ लागला.
अशा प्रकारे एनआयएसटीच्या रिपोर्टनुसार स्तंभाचा आकार धनुष्यासारखा होऊन ते कोसळू लागले. ज्या बीमशी ते जोडलेले होते, ते त्यांना आतल्या बाजूला ओढत होते.
दुसरीकडं, कौसेल यांच्या विश्लेषणात आणखी एक बाब जोडण्यात आली. ती म्हणजे काही ठिकाणी बीम खांबांना एवढ्या जोरात ओढत होते की, त्यामुळं त्यांचे नट बोल्टदेखील तुटले होते. त्यांच्या आधारेच ते खांबाला जोडलेले होते. त्यामुळं हे मजले कोसळले आणि त्याच्या ढिगाऱ्यामुळं खालच्या भागात खूप जास्त वजन तयार होऊ लागलं.
यामुळं आधीच कमकुवत झालेल्या खांबावर आणखी वजन वाढलं. त्याचा परिणाम म्हणजे इमारत पूर्णपणे कोसळली.
इमारत कोसळली तेव्हा त्या इमारतीच्या मजल्यांमधली हवा निघाली आणि चारही बाजूला पसरली. त्यामुळं त्याठिकाणी आसपास अत्यंत वेगानं हवा वाहू लागली होती. यामुळंच त्याठिकाणी ढगासारखे धुळीचे लोट दिसत होते, असं कौसेल सांगतात.
काही सेकंदामध्येच दोन्ही इमारती कोसळल्या. पण ढिगाऱ्यात अनेक दिवस आग धुमसत होती.
आज 20 वर्षांनंतरही या हल्ल्याच्या वेदना कमी होऊ शकलेल्या नाहीत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)