गल्फ स्काय: यूएईतून बेपत्ता होत इराणमध्ये सापडलेल्या जहाजाची कहाणी

    • Author, जोशुआ चिथम
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

जुलै 2020 मध्ये ऑईल टँकर गल्फ स्काय (जहाज) संयुक्त अरब अमिरातच्या समुद्रातून बेपत्ता झालं होतं. जहाजावरील क्रू मेंबर्सचाही काही ठावठिकाणा नव्हता.

अनेक दिवसांनंतर इराणमध्ये ते जहाज आढळलं. हे जहाज 'घोस्ट शिप'सारखं काम करत असून त्याच्या माध्यमातून इराण निर्बंधांचं उल्लंघन करून तेल निर्यात करत असल्याचा संशय आहे.

या जहाजाच्या क्रूमध्ये समावेश असलेल्या आठ जणांनी प्रथमच बीबीसीबरोबर याबाबत चर्चा केली आहे. त्यात कॅप्टन वगळता इतर सर्वांनी नावं जाहीर न करण्याची विनंती केली आहे.

संयुक्त अरब अमिरातच्या किनाऱ्यावर सायंकाळ होत होती. त्याचवेळी कॅप्टन जोगिंदर सिंग कुणाची तरी वाट पाहत होते.

त्यांचं जहाज गल्फ स्काय अँकर (जहाजाचा नांगर) टाकून उभं होतं. या जहाचाच्या सध्याच्या आणि माजी मालकांमध्ये कायदेशीर वाद सुरू होता.

कॅफ्टन सिंह यांना जेव्हा जहाजाची जबाबदारी सोपवण्यात आली त्यावेळी त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं की, हे जहाज लवकरच पुन्हा प्रवासावर निघेल.

मात्र हा विलंब दिवसांचा आठवडे आणि आठवड्यांचा महिन्यावर गेला. क्रू मेंबर्समध्ये असलेल्या सर्व भारतीयांना खाण्या-पिण्याच्या गोष्टींचा तुटवडा जाणवू लागला. इंटरनेटही मधून मधून जायला लागलं होतं.

कोरोनाच्या साथीचा काळ होता, त्यामुळं क्रू मेंबर्सना अरब अमिरातमध्ये प्रवेशाचीही परवानगी नव्हती.

त्यात एप्रिल महिन्यापासून या क्रू मेंबर्सचा पगार थांबला, त्यामुळं त्यांच्या अडचणी आणखीच वाढल्या होत्या.

त्या दिवशी म्हणजे 5 जुलैला कॅप्टन सिंह यांना नवी सुरुवात करता येईल अशी अपेक्षा होती. जहाज पुन्हा नव्या प्रवासावर पाठवता यावं यासाठी मालकांनी टँकरच्या सर्वेक्षणासाठी पथक बोलावलं होतं.

अंधारामध्ये जेव्हा एक छोटीशी नाव जहाजाकडं येत असल्याचं दिसलं त्यावेळी कॅप्टननं गँगवे खाली उतरवलं आणि त्या लोकांना भेटण्याची तयारी केली.

सुरुवातीला सर्वकाही अगदी व्यवस्थित आहे असं वाटत होतं. त्या पथकामध्ये सात जण होते आणि त्यांच्या हातात दस्तऐवज होते. त्यांनी जहाजाचं निरीक्षण केलं, असं कॅप्टन म्हणाले.

एक तास सर्वेक्षण केल्यानंतर पथकाच्या प्रमुखांनी क्रू मेंबर्समधील सर्व 28 सदस्यांना जहाजाच्या मेसमध्ये जमण्यास सांगितलं. त्या व्यक्तीचं वय जवळपास 60 होतं आणि त्यांचं वर्तनही मैत्रिपूर्ण होतं.

जहाजाचं रुपांतर तेलाच्या कंटेनरमध्ये करणार असल्याचं त्यांनी सर्वांना सांगितलं. क्रू मेंबर्सना त्यांनी अतिरिक्त वेतनासह नोकरीचा प्रस्तावही दिला. पण क्रू मेंबर्सपैकी फक्त दोन सदस्य त्यासाठी तयार झाले.

मध्यरात्र झाली होती. कॅप्टन सिंग यांनी क्रू मेंबर्सना झोपायला जायला सांगितलं. पण त्याचवेळी अचानक काळे कपडे परिधान केलेले आणि हातात रायफल असलेले तीनजण हॉलमध्ये घुसले आणि त्यांनी सर्वांना खाली झोपायला सांगितलं.

''आम्हाला तुम्हाला हानी पोहोचवायची नाही. मात्र गरज पडली तर आम्ही त्यालाही मागंपुढं पाहणार नाही,'' असं सर्वेक्षण पथकातील प्रमुख म्हणाले.

''अमेरिकेनं हे जहाज चोरलं होतं आणि आता आम्ही ते परत मिळवत आहोत,'' असं ते म्हणाले.

'तुम्ही आमच्या दयेवर जिवंत आहात'

''सुरुवातीला आम्हाला वाटलं की, ते सागरी चाचे (सागरी दरोडेखोर) आहेत. ते पूर्ण तयारीनिशी होते आणि ते नेमकं काय करत आहेत, याचीही त्यांना चांगलीच जाणीव होती,'' असं एका नाविकांनी सांगितलं.

अपहकरणकर्त्यांनी क्रू मेंबर्सचे हात बांधले होते आणि त्यांच्या खिशामध्ये जे काही होतं ते सर्व हिसकावून घेतलं, असंही नाविकांनी सांगितलं.

क्रू मेंबर्सपैकी काही जणांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केला तर त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्या.

या सर्व प्रकारानंतर सुमारे तासाभराने जहाजाचा नांगर वर घेण्यात आला आणि जहाज सुरू करण्यात आलं. म्हणजे जहाजानं प्रवास सुरू केला होता असं या घटनेच्या आठवणी सांगताना एका नाविकानं म्हटलं.

खोर फत्तनहून निघाल्यानंतर गल्फ स्काय जहाज सलग 12 तास चालत होतं. जहाज थांबलं तेव्हा क्रू मेंबर्सचे हात सोडण्यात आले आणि त्यांना दुसऱ्या खोलीत नेण्यात आलं. ती खोली ऑफिसर्स मेस होती त्याठिकाणी खिडक्या कार्डबोर्डनं बंद केलेल्या होत्या.

क्रू मेंबर्सच्या सदस्यांना अनेक दिवस अरबी भाषा बोलणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या निगराणीत ठेवण्यात आलं होतं, असं त्यांनी सांगितलं. अनेक दिवसांनी त्या सर्वांना जेव्हा बाहेर निघण्याची परवानगी देण्यात आली तेव्हा त्यांना जहाजावर अनेक नवी लोकं दिसली.

क्रू मेंबर्सपैकी एका सदस्यानं सांगितलं की, त्यांना किचनमध्ये एक व्यक्ती भेटला त्यानं तो अझरबैजानचा असल्याचं सांगितलं. काहींनी जहाजावर लोकांना फारसी भाषेत बोलताना ऐकल्याचंही सांगितलं.

जहाजावर दुसरे एक साठ वर्षांचे व्यक्ती होते. ते क्रू मेंबर्सबरोबर मेसमध्ये जेवणही करत होते. ते कोणाशी बोलत नव्हते, पण जहाजाचं व्यवस्थापन तेच करत असावेत असं वाटत असल्याचं, क्रू मेंबर्सपैकी अनेक सदस्यांनी सांगितलं होतं.

काहींच्या मते, त्या व्यक्तीकडं एक बंदुकही होती, पण त्यांनी कधीही कुणाला घाबरवलं नाही.

'आम्हाला तुमच्याबद्दल काही तक्रार नाही. आम्ही पैसे दिले होते आणि आता आमचे पैसे मिळणं बंद झालं आहे. यात आमचीही चूक नाही,' असं त्या व्यक्तीनं म्हटल्याचं क्रू मेंबर्सपैकी एकानं सांगितलं होतं.

''सर्वात मोठी अडचण म्हणजे, कोणत्याही देशाला तुम्हाला प्रवेश देण्याची इच्छा नाही. तुमचा स्वतःचा देशही तुम्हाला स्वीकारण्यास तयार नाही. तुम्ही आता आमच्या दयेवर जिवंत आहात,'' असं त्यांनी म्हटलं होतं.

दिवस असेच चालले होते आणि क्रू मेंबर्सच्या सदस्यांची भीती वाढत चालली होती.

''अनेकदा आम्हाला असं वाटायचं की, ते आम्हाला मारून टाकतील आणि आम्ही पुन्हा कधीही आमच्या कुटुंबीयांना भेटू शकणार नाही.''

क्रू मेंबर्सना शांत बसायला सांगण्यात येत होतं. पण वेळ घालवण्यासाठी ते जहाजावरील सुरक्षारक्षकांशी गप्पा मारायचे.

अशाच गप्पांच्या आठवणी एका नाविकानं सांगितल्या. ''मला माहिती आहे की तू खूप चांगली व्यक्ती आहेस आणि तू क्रू मेंबर्सपैकी एक आहेस. पण जर तू काही चुकीचं केलं तर मी तेच करेन जो आदेश मला देण्यात आला आहे,'' असं सुरक्षारक्षक त्यांना म्हणाले होते.

''मला तू आवडतो त्यामुळं मी तुला केवळ कसं मरायचं हे ठरवण्याची संधी देऊ शकतो. मी तुझा गळा कापू शकतो किंवा तुझ्या डोक्यात गोळी मारू शकतो.''

'अत्यंत धोकायदायक परिस्थिती'

सुदैवानं क्रू मेंबर्सना या पैकी एक पर्याय निवडण्याची वेळ आलीच नाही.

14 जुलैला सुरक्षारक्षक क्रू मेंबर्सना डेकवर घेऊन आले. नाविकांनी किनाऱ्यावर चमकणारा कृत्रिम प्रकाश लगेचच ओळखला. दक्षिण इराणमधील ते बंदर अब्बास शहर होतं.

क्रू मेंबर्सच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली. त्यांचे हातही बांधले होते. त्यांना एका लाकडी नावेवर बसवण्यात आलं होतं. त्यापूर्वी गल्फ स्कायच्या नावावर काळं फासल्याचं त्यांनी पाहिलं होतं.

किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर सर्वांना एका एअरफिल्डवर नेण्यात आलं, असं एकानं सांगितलं. त्यांच्या डोळ्यावरून पट्टी काढण्यात आली, त्यावेळी ते लष्कराच्या विमानात होते. ते विमान त्यांना तेहराणला घेऊन गेलं.

तिथून त्यांना एका बसमध्ये बसवून इमाम खमेनई विमानतळावर नेण्यात आलं. त्यांच्या बसमध्ये तीन जणांनी प्रवेश केला. त्यांनी भारतीय दुतावासाचे अधिकारी असल्याचं सांगत, तुम्ही कोण आहात आणि इराणमध्ये काय करत आहात, असं विचारल्याचं, क्रू मेंबर्सपैकी एकानं सांगितलं.

कॅप्टन सिंग यांनी या अपहरणाबाबत त्यांना सांगितलं. ते सर्व ऐकूण त्या तिघांना धक्का बसल्याचं क्रू मेंबर्स म्हणाले.

घरी जाण्यासाठी सर्व त्या सर्वांसाठी तिकिटाची व्यवस्था करण्यात आली असल्याचं अधिकाऱ्यांनी क्रू मेंबर्सना सांगितलं. दोघांना सोडता इतर सर्वांना त्यांचे पासपोर्ट देण्यात आले. त्यांच्या पासपोर्टचं नुतनीकरण व्हायचं होतं.

ते दोघं अधिकाऱ्यांबरोबर गेले आणि इतर सर्वांना विमानात बसवण्यात आलं. सामान्य नागरिकांसाठीचं ते विमान होतं. सर्व नाविकांनी तेव्हा सामान्य नागरिकांसह प्रवास केला.

15 जुलैला हे सगळे नाविक दिल्लीला पोहोचले. तर मागं राहिलेले दोन नाविक 22 जुलैला भारतात पोहोचले.

घरी पाठवण्यापूर्वी भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांना सुरक्षेच्या कारणामुळं हॉटेलमध्ये थांबवलं होतं.

''आम्हाला हॉटेलच्या बाहेर जायचं नाही असं सांगण्यात आलं होतं. कारण जहाजावरील लोक शोधू शकतात,'' असं सांगण्यात आल्याचं एका नाविकानं बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

'ते इराणी जहाज असल्याचं सर्वांना माहिती होतं'

या घटनेला एका वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. पण जहाजाचं अपहरण नेमकं का करण्यात आलं होतं, हे क्रू मेंबर्सना अजूनही लक्षात आलेलं नाही.

हे जहाज यूएईमध्ये उभं होतं, तेव्हापासून त्यांचा जवळपास दोन लाख डॉलरचा पगार थकला असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे.

''या साखळीमध्ये नाविक सर्वात खाली असतात. सध्याच्या आंतरराष्ट्रीय कांद्यांतर्गत त्यांना मूळ मानवाधिकार आणि श्रम अधिकार मिळायला पाहिजे. पण आंतरराष्ट्रीय कायदे प्रभावीप्रमाणे लागू करणं हेच एक आव्हान आहे,'' असं ब्रिटनच्या ह्युमन राइट्स अॅट सी या संस्थेचे डेवीड हेमंड म्हणतात.

जहाजाचं अपहरण करण्यात आलं त्यावेळी ते कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिकाच्या अधिकारक्षेत्रात होतं. क्रू मेंबर्सचं थकीत वेतन मिळवून देण्याचा प्रयत्न करत असल्याचं डॉमिनिकानं म्हटलं आहे. त्यांना नोकरी देणाऱ्या सेव्हन सीज नेव्हीगेशन संस्थेनंदेखील त्याचं वेतन मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं आहे.

गल्फ स्कायचं काय होणार? हादेखील प्रश्न आहे. हे जहाज कुठं आहे आणि त्याचा वापर कशासाठी केला जात आहे, हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

पण याबाबत जी काही मोजकी माहिती उपलब्ध आहे त्यावरून जहाजाचं अपहरण का करण्यात आलं? याचे संकेत मिळतात.

नोंदींनुसार अपहरणानंतर अनेक आठवडे या जहाजाचं ट्रान्सपाँडर बंद राहिलं. ऑगस्ट 2020 मध्ये याचे ट्रान्स्पाँडर ऑन झालं तेव्हा ते जहाज इराणच्या आखातात उभं होतं.

या जहाजाचं नाव आता रिमा असं ठेवण्यात आलं असून ते डोमनिकाऐवजी इराणच्या ताब्यात आहे आणि इराणचं जहाज म्हणूनच ते प्रवास करतं. म्हणजे या जहाजावर आता इराणचा कायदा लागू आहे.

या जहाजाचा मालकी हक्कही आता बदलला आहे. तेहरानमधील एक खाणकंपनी आता या जहाजाची मालक आहे. या कपनीचं नाव एमटीएस किंवा मोश्ताग तिजारत सनात असं आहे.

ऑगस्ट 2020 मध्ये या जहाजानं इराणच्या आखातात प्रवास केला आणि त्याचं ट्रान्सपाँडर बंद झालं तेव्हा ते बुशहर बंदरापासून 60 किलोमीटर अंतरावर दक्षिणेत होतं. हे इराणचं प्रुमख बंदर असलेलं शहर आहे.

हे जहाज अजूनही इराणच्या आखातात सक्रिय असून ते इराणच्या घोस्ट फ्लीटचा एक भाग असल्याचं, लॉयड्स लिस्ट इंटेलिजन्सशी संलग्न मायकल बॉकमॅन म्हणाले.

निर्बंधांचं उल्लंघन करत इराण या जहाजांद्वारे जगभरात तेल पोहोचवत असल्याचं, त्यांचं मत आहे.

' याचं ट्रान्सपाँडर बंद आहे म्हणजे आता ही मदर शिप बनली आहे. यात कच्चं तेल भरलं जात असेल आणि ते इतर जहाजांमध्ये पोहोचवलं जात असेल. हे जहाज इराणच्या सागरी हद्दीच्या बाहेर आलं तरच ते सापडू शकतं. हे इराणी जहाज आहे, हे सर्वांना माहिती आहे,'' असं बॉकमन यांनी म्हटलं.

या जहाजाचं अपहरण होण्यापूर्वीदेखील त्याचा संबंध इराणशी आहे, असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना वाटत होतं.

या जहाजाची पूर्वीची मालकी असलेल्या ताइफ मायनिंग सर्व्हीसेस (टीएमएस) नं ग्रीसच्या एका कंपनीकडून 2019 मध्ये याची खरेदी केली होती. पण हे जहाज ताब्यात दिल्यानंतर याच्या खरेदीशी संबंधित सर्व पैसे अमेरिकेनं जप्त केले होते.

अमेरिकेच्या न्याय विभागानं दोन इराणी नागरिकांवर टीएमसीकडून इराण सरकारसाठी हे जहाज खरेदी केल्याचा खटला दाखल केला आहे. इराणवर अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांचं ते उल्लंघन आहे.

या इराणी नागरिकांपैकी एक असलेले आमीर दियानात एमटीएसचे संचालक आहेत. एमटीएसकडे अपहरण प्रकरणानंतर जहाजाची मालकी आहे.

याबाबत आम्ही टीएमएस आणि एमटीएसची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण कोणीही उत्तर दिलं नाही.

'आता मला कुठंही सुरक्षित वाटत नाही'

गल्फ स्कायच्या नाविकांच्या मते, ते अशा शक्तींच्या हाती लागले होते ज्या नियंत्रणाबाहेर होत्या. बीबीसीबरोबर बोलताना त्यांनी तसं सांगितलं होतं.

अजूनही अनेक प्रश्नांनी त्यांच्या मनात घर केलं आहे. त्यांचं जहाज एवढ्या सहजरित्या यूएईच्या बाहेर कसं गेलं.

इराणनं त्याला सुरक्षित ठिकाणी आश्रय का दिला? जर तत्कालीन मालक असलेल्या टीएमएसनं सर्वेक्षण करणाऱ्यांना बोलावलं होतं, तर त्यांचाही अपहरणात समावेश होता का?

यूएईला जहाज बेपत्ता झाल्याची माहिती द्यायला एवढा वेळ का लागला? असा सवाल सेवन सीज नेव्हीगेशननं उपस्थित केला आहे.

त्याच रात्री नाविकांशी संपर्क तुटला होता आणि दुसऱ्याच दिवशी बंदरावरील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली होती, असं संचालक शेख शकील अहमद म्हणाले.

बीबीसीनं जेव्हा माहिती तपासली तेव्हा अपहणानंतरही काही दिवस बंदरावरील अधिकाऱ्यांनी जहाज अजूनही बंदरात उभं असल्याचं सांगितलं होतं, असं लक्षात आलं. त्यानंतर तीन दिवसांनी संयुक्त अरब अमिरातनं जहाज बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.

तसं असलं तरी, आमचा देश यात सहभागी असल्याचा हा पुरावा ठरत नाही, असं यूएईच्या सागरी वाहतूक प्रकरणांचे विभाग प्रमुख कॅप्टन अब्दुल्ला अल हयास म्हणाले.

जेव्हा हे जहाद बंदर प्रशासनाच्या रडारवरून बेपत्ता झालं तेव्हा त्याला शोधण्यासाठी दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली नव्हती, असं ते म्हणाले.

नाविकांचे काही वेगळे प्रश्न आहेत. पण त्यांनी सांगितलेल्या कहाणीवर सर्वांना विश्वास नाही.

हे नाविकही संपूर्ण प्रकरणात सहभागी असू शकतात, असं अनेकांना वाटतं.

''ते सगळे स्वतःच्या घरी पोहोचले याचा आम्हाला आनंद आहे. पण अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरं मिळायची आहेत,'' असं कॅप्टन अब्दुल्ला म्हणाले.

काळजीचं आणखी एक कारण म्हणजे, अपहरणानंतरही हे जहाज एवढ्या वेगानं कसं प्रवास करू शकलं. साधारणपणे एवढ्या मोठ्या जहाजाचा नांगर उचलण्यात आणि इंजिन सुरू करण्यातच बराच वेळ जातो.

''जहाजाचं इंजिनही खराब झालं होतं आणि अनेक महिने त्याची देखभाल किंवा दुरुस्तीही करण्यात आली नव्हती,'' असं शकील सांगतात.

अपहरण करणाऱ्या कुणालाही हे जहाज सुरू करण्यासाठी क्रू मेंबर्सपैकी नाविकांची गरज नक्की लागली असेल, असं त्यांचं मत आहे. इंजीन आधीच तयार ठेवलेलं असू शकतं आणि जहाज इराणपर्यंत पोहोचू शकेल की नाही, याचा अंदाज आधीच घेण्यात आला असेल.

बीबीसीबरोबर बोललेल्या क्रू मेंबर्सने अपहरण करणाऱ्यांची काहीही मदत केली नाही, असं सांगितलं आहे.

''ही लज्जास्पद बाब आहे. ज्याचं डोकं ठिकाणावर असेल तो आमच्यावर असे आरोप करणार नाही. जर आमचा यात सहभाग असता आणि इराणनं आम्हाला पैसे दिले असते तर आम्ही आज पगारासाठी कशाला भांडत बसलो असतो,'' असं एक नाविक म्हणाले.

गल्फ स्काय कुठं आहे हे माहिती नाही. तसंच त्याच्या आधीच्या मालकांनी काहीही बोलणं टाळलं आहे. अशा परिस्थितीत फार काही हाती लागण्याची शक्यता नसल्याचं क्रू मेंबर्सना वाटत आहे.

बीबीसीनं ज्यांच्याकडून माहिती घेतली होती, ते सर्व आता कामावर परतले आहेत. ते सगळे जगभरात विविध भागांमध्ये काम करत आहेत. पण हा निर्णय घेणं त्यांच्यासाठी सोपं ठरलं नसणार.

''मला अजूनही काळजी वाटतेय. मला आता कुठंही सुरक्षित वाटत नाही. पण माझ्याकडे मुलांचं पोट भरण्यासाठी दुसरा मार्ग नाही. मला केवळ हे एकच काम येतं,'' असं कॅप्टन सिंग म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)