हवामान बदलः या देशातल्या लोकांवर किडे खाण्याची वेळ

सध्या जवळपास 30 हजार लोक गंभीर अशा प्रकारच्या पाचव्या पातळीवरील (लेव्हल फाईव्ह) अन्न असुरक्षिततेचा सामना करत असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे.

फोटो स्रोत, WFP/Tsiory Andriantsoarana

फोटो कॅप्शन, सध्या जवळपास 30 हजार लोक गंभीर अशा प्रकारच्या पाचव्या पातळीवरील (लेव्हल फाईव्ह) अन्न असुरक्षिततेचा सामना करत असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे.
    • Author, अँड्रयू हार्डिंग
    • Role, बीबीसी आफ्रिका

मादागास्कर या देशातील लोकांना हवामान बदलामुळं आलेल्या जगातील पहिल्या दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे.

सलग चार वर्षे पाऊस न पडल्यामुळं येथील हजारो लोकांना उपासमार आणि अन्नाची अनुपलब्धता या गंभीर संकटांना तोंड द्यावं लागत आहे, असंही संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे.

गेल्या 40 वर्षांतील सर्वात भयंकर दुष्काळामुळं देशाच्या दक्षिण भागातील शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. त्यामुळं शेतीवर अवलंबून असलेल्या समुदायांना जगण्यासाठी किडे खाण्याचा मार्ग अवलंबावा लागला आहे.

"ही दुष्काळासारखी परिस्थिती असून ती हवामान बदलामुळं ओढावली आहे, " असं मत संयुक्त राष्ट्रांच्या अन्न उक्रमाच्या शेली ठकराल यांनी म्हटलं आहे.

सध्या जवळपास 30 हजार लोक गंभीर अशा प्रकारच्या पाचव्या पातळीवरील (लेव्हल फाईव्ह) अन्न असुरक्षिततेचा सामना करत असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही पातळी अत्यंत गंभीर समजली जाते.

त्यात मादागास्करमध्ये आता पेरणीपूर्वीचा पारंपरिक असा लीन हंगाम सुरू होत आहे. त्यामुळं या आकड्यात अचानक मोठी वाढ होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

"ही परिस्थितीत अभूतपूर्व अशी आहे. विशेष म्हणजे हवामान बदलात या लोकांचा काहीही हात भार नाही. ते जीवाश्म इंधनाचा वापरही करत नाही. तरीही हवामान बदलाच्या आगीत तेच होरपळले जात आहेत,'' असं ठकराल म्हणाल्या.

पाणी नसल्याने शेतीचं नुकसान झालं आणि आत याठिकाणचे लोक किडे आणि निवडुंगाची पानं खात आहेत.

फोटो स्रोत, WFP/Tsiory Andriantsoarana

फोटो कॅप्शन, पाणी नसल्याने शेतीचं नुकसान झालं आणि आत याठिकाणचे लोक किडे आणि निवडुंगाची पानं खात आहेत.

फँडिओव्हा येथील अंबोसरी जिल्ह्यातील दुर्गम भागात एका गावात काही दिवसांपूर्वी जागतिक अन्न उपक्रमाचं पथक भेटीसाठी गेलं होतं. त्यावेळी येथील लोकांनी त्यांना टोळ खात असल्याचं दाखवल होतं.

"मी किडे मला शक्य तेवढे स्वच्छ करते, पण याठिकाणी जराही पाणी नाही," असं चार मुलांची आई असलेल्या टमारिया यांनी सांगितलं.

"माझी मुलं आणि मी आम्ही सगळे गेल्या आठ महिन्यांपासून रोज हेच खात आहोत. कारण आम्हाला खायला दुसरं काहीही नाही. शिवाय आम्ही जी काही पेरणी केली ती उगवण्यासाठी पाऊसच नाही," असंही त्या म्हणाल्या.

कोरड्या ठाक आणि भेगाळलेल्या जमिनीवर बसलेल्या तीन मुलं असलेल्या बोल यांच्याशीही आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी "आज आम्हाला निवडुंगांच्या पानांशिवाय खाण्यासाठी दुसरं काहीही शिल्लक नाही," असं त्या म्हणाल्या.

उपासमारीमुळं नुकतंच पतीचं निधन झालं. तसंच त्यांच्या शेजाऱ्यांचंही निधन झालं. त्यामुळं त्यांच्या दोन मुलांना खाऊ घालण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आल्याचं बोल म्हणाल्या.

मादागास्करच्या दक्षिण भागामध्ये असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर सध्याच्या दुष्काळाचा परिणामही जाणवू लागला आहे.

फोटो स्रोत, Ocha/Reuters

फोटो कॅप्शन, मादागास्करच्या दक्षिण भागामध्ये असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर सध्याच्या दुष्काळाचा परिणामही जाणवू लागला आहे.

"मी काय बोलणार? जगण्यासाठी केवळ आणि केवळ निवडुंगांची पानं शोधत फिरणं एवढंच आमचं जीवन बनलं आहे. "

पाण्याचं नियोजन सुधारावं लागणार

मादागास्करमध्ये नेहमी दुष्काळ पडत असतो. शिवाय अल निनोमुळं याठिकाणी हवामानाचा पॅटर्नही कायम बदलत असतो. पण तसं असलं तरीही सध्याच्या संकटाचा संबंध थेट हवामान बदलाशी लावता येऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.

"IPCC (इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायममेट चेंज) च्या ताज्या अहवालात मादागास्करमध्ये कोरडेपणात वाढ झाली असल्याचं निरीक्षण नोंदवलेलं आहे. हवमानातील बदलांमुळंच असे परिणाम जाणवणं अपेक्षित असतं.

"लोकांनी त्यांच्या वर्तनामध्ये बदल करण्यासाठी हा युक्तीवाद अनेक अर्थांनी अधिक फायद्याचा ठरू शकतो ," असं मूळचे मादागास्कर येथील असलेले सध्या दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन विद्यापीठात कार्यरत असलेले डॉ. रोंड्रो बरिमलाला यांनी म्हटलं आहे.

कॅलिफोर्नियाच्या सेंट बार्बरा विद्यापीठात उपलब्ध असलेली माहिती पाहता याचा वातावरणातील उष्णतेशी संबंध असल्याच्या शक्यतेला विद्यापीठातील क्लायमेट चेंड हझार्ड सेंटरचे संचालक ख्रिस फंक यांनी दुजोरा दिला आहे.

मादागास्करमधील प्रशासनानं पाण्याच्या नियोजनात सुधारणा करण्यासाठी काम करण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले.

"याठिकाणी अगदी कमी कालावधीत खूप काही करता येऊ शकतं असं आम्हाला वाटतं. एखाद्या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कधी पडणार याचा अंदाज आपण बहुतांशवेळा बांधू शकतो. या माहितीच्या आधारे आपण पिकांचं उत्पादन वाढवू शकतो. हवामान बदलाच्या या काळात आपण अगदीच दुर्बलही नाही," असंही ते म्हणाले.

मादागास्करच्या दक्षिण भागामध्ये असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर सध्याच्या दुष्काळाचा परिणामही जाणवू लागला आहे. याठिकाणी अनेक मुलांना रस्त्यांवर भीक मागण्याची वेळ आलेली आहे.

"बाजारांमध्ये वस्तुंच्या किमती तीन ते चार पटींनी वाढत आहेत. अन्न खरेदी करण्यासाठी पैसा मिळावा म्हणून लोकं जमिनी विकत आहेत," असं टोलानारोमध्ये सामाजिक संस्थेसाठी काम करणाऱ्या शिना एंडोर यांनी सांगितलं.

अन्नासाठी हाल होत असलेल्या लोकांनी पिकं घेऊन जाऊ नये म्हणून शेतातील पिकांच्या रक्षणासाठी माझ्यासह अनेक जण शेतामध्येच झोपत आहेत, असं शिना यांचे सहकारी असलेल्या लोंबा हसोवाना यांनी सांगितलं. पण त्यातही धोका वाढला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

"यात तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मला हे अत्यंत कठीण जात आहे. कारण मला रोज स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या जगवण्यासाठी झगडावं लागत आहे. हवामानाबद्दल आता सर्वकाही अनिश्चित झालं आहे. पण उद्या काय होणार? हा सध्याचा एक मोठा प्रश्न आहे," असंही ते म्हणाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)