चीनकडून आण्विक शस्त्रांचा साठा? भारतासाठी ही धोक्याची घंटा?

    • Author, राघवेंद्र राव
    • Role, बीबीसी न्यूज

आपला शेजारी चीन गेल्या काही दिवसांपासून आण्विक शस्त्रांचा साठा आणि ते लॉँच करण्याची क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नात आहे, अशी शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे.

अमेरिकेने नुकतेच सॅटेलाईटच्या मदतीने काही छायाचित्रे घेतली होती. त्यावरून चीनच्या झिनझियांग प्रांतात पूर्व दिशेला एका मोठ्या परिसरात भूमिगत सायलो (स्टोअरेज) बनवण्यासाठी मोठ-मोठाले खड्डे खणले जात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

चीन झिनझियांग प्रांतात एक नवं मिसाईल फिल्ड बनवत असल्याचा दावा फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स (FAS) नामक एका संघटनेने या या फोटोंचाच आधार घेत केला आहे.

फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स या संघटनेच्या वेबसाईटवर त्यांच्याबाबत माहिती दिली आहे.

ते स्वतःला एक निःपक्षपाती, गैर-सरकारी संघटना असल्याचं म्हणवून घेतात. या संघटनेची स्थापना 1945 मध्ये झाली होती. राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान असणाऱ्या गोष्टींचा सामना शास्त्रीय मदतीने करण्याचा उद्देश याठिकाणी नमूद करण्यात आला आहे.

चीनच्या गांसू प्रांतात युमेनजवळ 120 मिसाईल सायलोंचं बांधकाम होत असल्याच्या बातम्या जुलै महिन्याच्या सुरुवातीला आल्या होत्या.

नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार, चीनचं एक नवं मिसायल सायलो फिल्ड पूर्व झिनझियांग प्रांतात पाहायला मिळालं आहे.

FAS च्या म्हणण्यानुसार, पूर्व झिनझियांग प्रांतातील सायलो फिल्ड युमेन साईटच्या तुलनेत बांधकामाच्या संदर्भात पहिल्याच टप्प्यात आहे. त्याचं बांधकाम मार्च 2021 च्या सुरुवातीला सुरू झालं. त्यानंतर याठिकाणी वेगाने काम सुरू आहे.

आतापर्यंत याठिकाणी किमान 14 घुमटाकार सायलो कव्हर बांधले गेले आहेत. तसंच आणखी 19 सायलोंच्या बांधकामासाठी परिसराची साफसफाईही करण्यात आली आहे, असंही FAS ने म्हटलं.

FAS च्या मते, या संपूर्ण परिसरात एका ग्रिडप्रमाणे रचना दिसून येते. याठिकाणी सुमारे 110 सायलो बनून तयार होतील.

पण हे खड्डे खोदण्याचा अर्थ काय लावायचा? यामध्ये मिसाईल ठेवण्यासाठीच हे बनवण्यात आले का?

तज्ज्ञांच्या मते, पूर्वीपासूनच अशा प्रकारच्या सायलोंचा वापर मिसाईलचा साठा करण्यासाठीच केला जातो.

मिसाईल सायलो की पवन ऊर्जा प्लांट?

बीबीसी चायनीज सर्व्हीसचे संपादक हॉवर्ड ज्हंग सांगतात, "अमेरिकेत याविषयी प्रकाशित होत असलेल्या बातम्या फेक न्यूज आणि अफवा असल्याची प्रतिक्रिया चिनी मीडियाकडून दिली जात आहे."

त्यांच्या मते, "ग्लोबल टाईम्ससारख्या सरकारी माध्यमांनी तर या बातम्या बिनबुडाच्या असल्याचं सांगत त्या फेटाळून लावल्या. उपग्रहांमधून दिसत असलेलं दृश्य हे नव्या पवन उर्जा प्लांटचं असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

पण चीन सरकारने याविषयी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.

दरम्यान, आण्विक हल्ल्यांच्या बाबतीत 'आधी प्रयोग नाही' हे चीनचं धोरण कायम राखण्यास आपण प्रतिबद्ध असल्याचं चीन सरकारने आवर्जून म्हटलं.

हॉवर्ड ज्हंग सांगतात, "चीनने नेहमीच आपल्याकडे आण्विक शस्त्र असल्याचं सांगणं टाळलं आहे. पण दुसरीकडे त्यांच्याकडे मिनिमम डेटरेंट प्रकारचे आण्विक शस्त्र आहेत, हे चीन मान्य करतो. म्हणजेच, संभाव्य हल्लेखोरांना भीती दाखवण्यासाठी ते आण्विक शस्त्र बाळगतात, असा त्याचा अर्थ होतो.

अमेरिका चीनला सध्या आण्विक शस्त्र नियंत्रणासंदर्भातील चर्चेत सहभागी करून घेऊ इच्छितो. अशा स्वरुपाची चर्चा अमेरिका आणि रशियामध्ये झालेली आहे. पण चीनने आपण या विषयात दोन देशांच्या तुलनेत अतिशय छोटे असल्याचं सांगत त्याला नकार कळवला आहे.

ज्हंग सांगतात, "आगामी काळात चीनच्या आण्विक क्षमतेत वाढ होऊ शकते, असा इशारा FAS च्या बातमीतून देण्यात आला आहे. FAS च्या बातमी वास्तविकतेला धरून असल्यास चीनकडील आण्विक शस्त्रांची संख्या रशियाइतकी किंवा त्यांच्यापेक्षा जास्त होईल.

आंतरराष्ट्रीय परिस्थिती

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टीट्यूटच्या नव्या संशोधनानुसार, रशियाकडे 6255, अमेरिकेकडे 5550, ब्रिटनकडे 225, भारताकडे 156 तर पाकिस्तानकडे 165 आण्विक शस्त्रास्त्र आहेत. त्या तुलनेत चीनकडे 350 आण्विक शस्त्रांचा साठा आहे.

ज्हंग सांगतात, या माहितीची चीनने कधीच पुष्टी केली नाही, किंवा ते नाकारलंही नाही. त्यामुळे बाहेरच्या पत्रकारांकडून त्याबाबत निश्चित उत्तर मिळणं कठीण आहे.

त्यांच्या मते, काही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सायलो दिसणं ही एक प्रकारची रणनितीही असू शकते.

चीन विरुद्ध अमेरिका

बीबीसीने दिल्लीतील फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये चीनी विषयक घडामोडींचे तज्ज्ञ डॉ. फैसल अहमद यांच्याशी याबाबत चर्चा केली.

चीनने शेकडो सायलो बनवण्यामागे काय कारण असू शकतं, हा प्रश्न त्यांना विचारला.

डॉ. अहमद म्हणतात, गेल्या काही काळात अमेरिका आणि चीनदरम्यानच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे युमेन आणि पूर्व झिनझियांग प्रांतात मिसाईल सायलो दिसणं यामागे चीनची रणनिती असू शकते.

ते सांगतात, आण्विक क्षमता विकसित करून हिंदी महासागर-पॅसिफिक क्षेत्रात विशेषतः दक्षिण-चीन समुद्रात दबदबा निर्माण करण्याचा चीनचा प्रयत्न आहे.

डॉ. अहमद यांनी विचारलं की चीन आपली आण्विक शस्त्रं वाढवण्याचा आताच का प्रयत्न करत आहे, हा मुख्य प्रश्न आहे. चीनची सध्याची क्षमता रशिया आणि अमेरिकेच्या तुलनेच खूपच कमी आहे. ही वाढ केवळ किरकोळ असेल. पण चीनला यामधून एक वेगळा संदेश द्यायचा असू शकतो.

हत्तीचे दात

संरक्षण तज्ज्ञांच्या मते, चीन हे सायलो आपल्या प्रतिस्पर्ध्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.

सुयश देसाई तक्षशिला इन्स्टिट्यूटमध्ये चायना स्टडीज प्रोग्रॅममध्ये कार्यरत असलेले संशोधक आहेत.

देसाई यांच्या मते, चीन इतर देशांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ- चीनने 100 सायलो तयार केले असतील. तर त्या प्रत्येक ठिकाणी तो मिसाईल ठेवेल किंवा नाही, हे सांगता येत नाही. तणावादरम्यान हे दृश्य पाहून इतर देशांना मात्र संभ्रम होईल. चीनवर हल्ला करण्यासाठी आलेल्या कोणत्याही देशाला या शस्त्रास्त्रांपासून पिच्छा सोडवून घ्यायचा असेल तर ते प्रत्येक सायलो उद्ध्वस्त करावे लागतील.

पण चीनकडील आण्विक शस्त्रांची संख्या वाढत आहे. त्यांची संख्या 300 वरून वाढून कदाचित 900 पर्यंत पोहचली असेल, असा अंदाज देसाई यांनी व्यक्त केला.

भारतासाठी नवी डोकेदुखी

चीन आजूबाजूच्या क्षेत्रात आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे भारताला याचा किती धोका आहे?

डॉ. अहमद सांगतात, भारताला याकडे लक्ष केंद्रीत करावं लागेल. भारताला दोन बाजूंनी तयारी करावी लागेल. नाविक निगराणी वाढवणं तसंच नौदलाला आधुनिक बनवणं ही कामे भारताला करावी लागतील.

डॉ. अहमद यांच्या मते, हिंद महासागरात अमेरिकेवर अवलंबून राहण्याच्या रणनितीबाबत भारताला सतर्क राहावं लागेल.

चीनचा उदय रोखण्यात अमेरिकेचं हित आहे, तर अमेरिकेला मागे टाकण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षा आहेत. भारताला या गोष्टी योग्यरित्या हाताळाव्या लागतील.

देसाई म्हणतात, चीनमधील मिसाईल सायलो हा अमेरिका केंद्रीत विषय आहे. त्यामुळे भारताला काळजी करण्याची गरज नाही. पण तरीही गेल्या काही दिवसांत भारताचा चीनसोबत असलेला तणाव पाहता भारताने सतर्क राहिलं पाहिजे, हे नक्की.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)