Tokyo Olympics : लव्हलिनाचं पदक सेमीफायनलमध्येच पक्कं झालं, मग सिंधूचं का नाही?

लव्हलिना बोरगोहाईं आणि पी. व्ही. सिंधू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लव्हलिना बोरगोहाईं आणि पी. व्ही. सिंधू

भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं ऑलिम्पिकमधील सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. यामुळे ती ऑलिम्पिक पदकाच्या आणखी जवळ पोहोचली आहे.

ऑलिम्पिकमध्ये लव्हलिना बोरगोहाईंनंतर भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधूही उपांत्य फेरीत पोहोचली आहे.

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुची हिचा 2-0 नं पराभव करत अंतिम चारमध्ये स्थान पक्कं केलं.

शुक्रवारी भारतासाठी ही दुसरी चांगली बातमी ठरली. त्यापूर्वी लव्हलिना बोरगोहाईंनं बॉक्सिंगच्या उपांत्यफेरीत प्रवेश करत पदक निश्चित केलं होतं.

लव्हलिनाचं पदक पक्कं

लव्हलिनानं 69 किलो वजन गटात उपांत्यपूर्वी फेरीत चीनच्या तैपेईच्या निएन-चीन-चेन चा पराभव करत ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरं आणि वैयक्तिक किमान कांस्य पदक निश्चित केलं आहे.

तिनं उपांत्य फेरीत प्रवेश केला असून, तिचा सामना 4 ऑगस्टला होणार आहे.

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनंही जपानच्या अकाने यामागुची हिचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सिंधुनं दोन सरळ सेटमध्ये विजय मिळवला.

लव्हलिना बोहगोहाईं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लव्हलिना बोहगोहाईं

रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूनं रौप्य पदकाची कमाई केली होती. अंतिम सामन्यात तिला पराभव पत्करावा लागला होता.

लव्हलिनाच्या विजयानं भारताचं आणखी एक पदक पक्कं झालं आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत भारताला केवळ एक पदक मिळालं आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मीराबाई चानूनं भारोत्तोलनात रौप्य पदक मिळवलं आहे. त्याशिवाय भारताला अद्याप पदकाची कमाई करता आलेली नाही.

पण लव्हलिनाच्या पदकाचा समावेश आता भारताच्या खात्यात होणार हे नक्की. उपांत्य फेरीत लवलिनाचा पराभव झाला, तरीही तिला किमान कांस्य पदक मिळणार हे निश्चित आहे.

पण पीव्ही सिंधूच्या बाबतीत तसं नाही. सिंधूदेखील बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचली आहे. पण पदकासाठी तिला अजून मोठा टप्पा गाठायचा आहे.

लव्हलिनाचं पदक पक्कं का आहे आणि सिंधूचं का नाही हे जाणून घेऊ.

लवलिनाला कसं मिळणार पदक?

भारताची बॉक्सर लवलिना उपांत्य फेरीत पोहोचली आहे. पण सामने होण्याआधीच पदक कसं पक्क झालं, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत.

याचं कारण म्हणजे बॉक्सिंगमध्ये तिसऱ्या स्थानासाठी सामना होत नाही. म्हणजे सेमी फायनलमध्ये पराभव होणाऱ्या दोन्ही खेळाडूंना कांस्य पदक मिळतं.

त्यामुळंच लवलिनाच्या रुपानं भारतासाठी पदक निश्चित झालं आहे. पण बॅडमिंटनमध्ये तसा नियम नाही. बॅडमिंटनमध्ये कांस्य पदकासाठी सामना होत असतो.

पी. व्ही. सिंधू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पी. व्ही. सिंधू

बॉक्सिंगच्या याच नियमाच्या आधारे बीजिंग ऑलिम्पिकमध्ये बॉक्सर विजेंदर सिंहला कांस्य पदक मिळालं होतं. मेरी कोमनंही लंडन ऑलिम्पिकमध्ये याच नियमाच्या आधारे कांस्य पदकाची कमाई केली होती.

विजेंदर आणि मेरी कोम दोघांचाही उपांत्य सामन्यात पराभव झाला होता. तरीही भारताला त्यांनी पदक मिळवून दिलं.

पण बॉक्सिंमध्ये सुरुवातीपासूनच हा नियम आहे, असं नाही.

1948 च्या ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्येही तिसऱ्या स्थानासाठी सामना होत होता. त्यात जिंकणाऱ्याला कांस्य पदक मिळायचं.

पण 1952 च्या ऑलिम्पिकपासून नियम बदलले आणि त्यानंतर उपांत्य सामन्यात पराभूत होणाऱ्या खेळाडूंना कांस्य पदक दिलं जाऊ लागलं.

सिंधूचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला?

5 जुलै 1995 रोजी हैदराबादमध्ये सिंधूचा जन्म झाला. सिंधूने 2016च्या रियो ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल जिंकलं आहे.

जागतिक स्पर्धा जिंकणाऱ्या सहा फूट उंच सिंधूची यशोगाथा अनोखी आहे. मात्र हे यश एका रात्रीतून मिळालेलं नाही.

बॅडमिंटनच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली?, असा प्रश्न विचारल्यावर सिंधून बीबीसीला सांगिलतलं होतं, "मी आठ वर्षांची असताना बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. माझे आई-वडील वॉलीबॉल खेळाडू आहेत. वडिलांना वॉलीबॉलसाठी अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. ते रेल्वे ग्राउंडवर वॉलीबॉल खेळायला जात तेव्हा शेजारच्या कोर्टवर बॅडमिंटन कोर्ट होता. मी तिथे खेळू लागले आणि आवड निर्माण झाली. मेहबूब अली माझे पहिले प्रशिक्षक होते. 10 वर्षांची असताना मी गोपीचंद अकादमीत आले आणि आजवर इथेच आहे."

पी. व्ही. सिंधू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पी. व्ही. सिंधू

पी. व्ही. सिंधू चाईल्ड प्रॉटेजी आहे. चाईल्ड प्रॉटेजी म्हणजे विलक्षण मूल. शास्त्रीय भाषेत सांगायचं तर दहा वर्षांच्या आतलं असं मूल जे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात एखाद्या प्रौढ व्यक्तीप्रमाणे मिनिंगफुल आउटपुट देऊ शकतं.

2009 साली सिंधूने सब ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं आणि मग तिने मागे वळून पाहिलं नाही.

ऑलिम्पिकची तयारी कशी सुरू झाली?

वयाच्या 18 व्या वर्षी ती वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं आणि असं करणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू होती. तेव्हापासून आजवर सिंधूने अनेक पदकं पटकावली आहेत. मात्र, तिला सर्वांत जास्त आवडणारं मेडल कोणतं?

असं विचारल्यावर ती म्हणाली, "रियो ऑलिम्पिक माझ्यासाठी नेहमीच खास राहणार आहे. ऑलिम्पिकपूर्वी मला दुखापत झाली होती. सहा महिने कोर्टच्या बाहेर होते. काय करावं, कळत नव्हतं. मात्र, माझे प्रशिक्षक आणि पालकांनी माझ्यावर विश्वास दाखवला. माझ्या मनात फक्त एकच विचार होता की ही माझी पहिली ऑलिम्पिक स्पर्धा आहे आणि मला माझा सर्वोत्तम खेळ करायचा आहे. मग एकापाठोपाठ एक सामने जिंकत गेले.

"फायनलमध्येही मी 100 टक्के दिलं. मात्र, तो दिवस कुणाचाही असू शकला असता. मी सिल्वर मेडल जिंकलं. मात्र, तेही कमी नाही. मी भारतात परतले तेव्हा गल्ली-बोळात माझं स्वागत करण्यात आलं. विचार करून आजही अंगावर रोमांच उभा राहतो."

पी. व्ही. सिंधू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पी. व्ही. सिंधू

सिंधू भारतातील सर्वाधिक यशस्वी महिला खेळाडूंपैकी एक आहे. मात्र, सोबतच सर्वांत जास्त कमावणाऱ्या महिला खेळांडूंपैकीही ती एक आहे.

फोर्ब्सच्या यादीत समावेश

फोर्ब्सने 2018 साली सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये सिंधुच्या नावाचा समावेश केला होता. सिंधू आज स्वतः एक ब्रँड आहे आणि अनेक ब्रँड्सचा चेहराही आहे.

2018 साली कोर्टवर खेळून तिने 5 लाख डॉलर कमावले होते. तर जाहिरातींमधून तिला 80 लाख डॉलर्स मिळाले. म्हणजेच दर आठवड्याला कमीत कमी 1 लाख 63 हजार डॉलर्स. ही रक्कम अनेक क्रिकेट खेळाडूंच्या कमाईपेक्षाही जास्त आहे.

सिंधू एक यशस्वी खेळाडू तर आहेच. पण एक व्यक्ती म्हणूनही तिला तिच्या पात्रतेवर पूर्ण विश्वास आहे. तिच्या खांद्यावर असलेल्या अपेक्षांच्या ओझ्याची तिला पूर्ण कल्पना आहे. मात्र, असं असूनदेखील ती तिच्या खेळाचा पूर्ण आनंद उपभोगते.

सरावाचं शेड्युल, जगभरात खेळण्यासाठी जाणं-येणं, बिजनेस, जाहिराती.... एका 24 वर्षांच्या मुलीसाठी हे ओझं तर नाही?

पी. व्ही. सिंधू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पी. व्ही. सिंधू

मात्र, गेमप्रमाणेच तिच्या विचारातही स्पष्टता आहे. ती म्हणते, "मी हे सगळं खूप एन्जॉय करते. लोकं विचारतात की तुझं पर्सनल लाईफ तर उरतच नसेल. पण माझ्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. मी याचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे. कारण तुम्ही कायमच लाईमलाईटमध्ये असाल, असं गरजेचं नाही. मी आयुष्यात काही मिस करतेय, असं मला कधीच वाटलं नाही. बॅडमिंटन माझी पॅशन आहे."

तर अशा आनंद आणि उत्साहाने ओतप्रोत सिंधुच्या यशाचा मंत्र काय? ती सांगते, "काहीही झालं तरी स्वतःवर विश्वास ठेवा. हीच माझी ताकद आहे. कारण तुम्ही इतर कुणासाठी नाही तर स्वतःसाठी खेळत असता. स्वतःला सांगा की मी काहीही करू शकतो."

भारतीय खेळाडूंचे सामने कधी आहेत? पाहण्यासाठी क्लिक करा..

Please wait...

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)