You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इब्राहिम रईसी कोण आहेत? वकील, धर्मगुरू आणि आता इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष
धर्मगुरु इब्राहिम रईसी हे इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेत आहेत.
रईसी यांनी जून महिन्यात इराणमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला होता. याआधी इराणच्या न्यायपालिकेचे प्रमुख राहिलेले रईसी हे इराणचे 13वे राष्ट्राध्यक्ष असतील.
होज्जात अल-इस्लाम सय्यद इब्राहिम रईसी यांचा जन्म 14 डिसेंबर 1960 रोजी ईशान्य इराणमधील मशहाद भागात झाला. ते रुढीवादी म्हणून ओळखले जातात.
आठवे शिया इमाम रझा यांचं मशहाद शहरातील प्रार्थनास्थळ असलेल्या अस्तान-ए-कुद्स या इराणमधल्या सर्वांत मोठी सामाजिक संस्थेशी ते संलग्न आहेत.
बीबीसी मॉनिटरिंगनुसार रईसी हे नेहमी काळा साफा बांधतात, काळा साफा प्रतीक आहे की ते सय्यीद अर्थात शिया मुसलमानांच्या प्रेषित मोहंमदांचे वंशज आहेत.
वॉशिंग्टन पोस्टच्या एका बातमीनुसार, बीबीसी मॉनिटरिंगने असंही म्हटलंय की रईसी हे पुढे चालून अयातोल्ला अली खामनेई यांचे वारसदार ठरू शकतात. इराणचे सर्वोच्च नेते खामनेई हे सध्या 82 वर्षांचे आहेत, आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध घेण्याचं काम प्राधान्याने सुरू झालं आहे.
राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीद्वारे सर्वोच्च नेता ठरणार का?
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांपूर्वी इराणच्या गार्डियन कौन्सिल अर्थात पालक परिषदेने उमेदवारांसाठी काही कडक नियम लागू केले आहेत. अनेक उमेदवार या कडक नियमांमुळे निवडणूक लढवू शकले नाहीत, अगदी इराणच्या संसदेचे माजी अध्यक्ष अली लारिजानी हेसुद्धा. त्यामुळे शेवटी चारच जण रिंगणात होते.
CNNच्या एका बातमीनुसार इतरांना अपात्र ठरवल्यानंतर रईसी यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात होता.
ब्लूमबर्गसाठी लिहिताना ज्येष्ठ पत्रकार बॉबी घोष यांनी म्हटलंय की खामनेई यांनी पालक परिषदेला हाताशी घेत त्यांच्या आवडीच्या उमेदवाराला विरोध करणाऱ्या, आव्हान देणाऱ्या नेत्यांना जाणूनबुजून रिंगणातून बाहेर काढलं.
अयातोल्ला अली खामनेई हे स्वतः सर्वोच्च नेते होण्यापूर्वी दोन वेळा इराणचे राष्ट्राध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे असं म्हटलं जातंय की राएसी यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यामुळे त्यांचा सर्वोच्चपदापर्यंतचा मार्ग अधिक सोपा होईल.
वॉशिंग्टन पोस्टच्या एका बातमीनुसार, रईसी हे खामेनींच्या सर्वांत विश्वासातल्या लोकांपैकी एक आहेत. देश आणि सरकार मुस्लीम न्यायव्यवस्थेनुसार चालावं, यावर दोघांचंही एकमत आहे.
रईसी यांना असंही वाटतं की इराणने परदेशी गुंतवणुकीच्या भानगडीत पडू नये, आणि अमेरिकेसोबत चर्चेत वेळ वाया घालवू नये. मात्र खामेनी यांनी इराणवरचे आर्थिक निर्बंध उठवण्याबाबत अमेरिकेशी चर्चा व्हायला हवी, अशी भूमिका जाहीर केल्यानंतर रईसी यांनी त्याला पाठिंबा दिला होता.
आणि रईसी यांनी कधीच सर्वोच्च नेता होण्याच्या चर्चा फेटाळल्या नाहीत. सर्वोच्च नेता इराणमधलं सर्वांत महत्त्वाचं राजकीय आणि धार्मिक शक्तीचं पद आहे. इराणी लष्कराचा प्रमुख अर्थात कमांडर-इन-चिफ सुद्धा हाच नेता असतो.
रुहानी यांच्यापेक्षा कमी लोकप्रिय
रईसी यांनी न्यायपालिकेत वेगवेगळ्या पदांवर काम केलं आहे. सर्वोच्च नेत्याची निवड करणाऱ्या कौन्सिल ऑफ एक्सपर्ट्स अर्थात तज्ज्ञांच्या परिषदेचे ते सदस्य आणि अध्यक्ष राहिले आहेत.
1988 साली तेहरान इस्लामिक क्रांती न्यायलायात वकील म्हणून काम करताना, ते एका विशेष चार सदस्यीय समितीत होते. या समितीने डाव्या विचारांच्या अनेक नेत्यांना, राजकीय कैद्यांना आणि विरोधकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. या घटनेनंतर त्यांची लोकप्रियता कमी झाली होती.
यानंतर 2017च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना हसन रुहानी यांच्याविरुद्ध लढताना फक्त 38.5 टक्के मतं मिळाली होती. पण या निवडणुकीतल्या पराभवानंतरही खामेनी यांनी मार्च 2019मध्ये न्यायपालिकेच्या प्रमुखपदी रईसी यांची नेमणूक केली.
जून 2019 मध्ये अमेरिकेने आठ जणांवर निर्बंध लादले, यापैकी एक रईसी होते. अमेरिकेचं म्हणणं होतं की हे सगळे अयातोल्ला अली खामेनी यांच्या अत्यंत जवळचे आहेत आणि इराणमध्ये मानवाधिकार उल्लंघनासाठी तेसुद्धा जबाबदार आहेत. रईसी यांच्यावर या प्रकरणाचा बट्टा आजही कायम आहे. मात्र इराणने कधीही हे मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप स्वीकारले नाहीत, आणि रईसी हेसुद्धा कधीच याबद्दल काही बोलले नाहीत.
मात्र रईसी यांनी स्वतःला भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याचा नायक आणि आर्थिक संकट दूर करण्यासाठी योग्य नेता म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)