You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सेक्सः अरब देशांमधल्या 'कामसूत्रा'बद्दल तुम्हाला माहिती आहे का?
- Author, झुबिन बेखरॅड
- Role, बीबीसी कल्चर
सेक्ससंदर्भातील साहित्याची चर्चा जेव्हा होते तेव्हा लोकांच्या डोक्यामध्ये साधारणतः काही नावं येतात. लोलिता, लेडी चॅटर्लीज लवर, फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे सारखी ही नावं असतात.
सेक्सवर सर्वात जास्त चर्चेत असणारं पुस्तक भारतात लिहिलं गेलं, ते म्हणजे वात्सायनानं लिहिलेलं 'कामसूत्र'.
लैंगिक संबंधासंदर्भात सर्वात चांगलं साहित्य म्हणून हा ग्रंथ जगभरात प्रसिद्ध आहे. सर रिचर्ड फ्रान्सिस बर्टन यांनी मूळ संस्कृत ग्रंथाचा इंग्रजीत अनुवाद केला आहे. त्याचे अनेक अनुवाद जगभरात प्रसिद्ध आहेत. पण आपण आज त्या कामसूत्र ग्रंथाची चर्चा करणार नसून अरब देशांमधील सेक्स संदर्भातील साहित्यावर माहिती मिळवणार आहोत.
आश्चर्य वाटलं ना... सेक्ससंदर्भातील पुस्तकं तेही अरब देशांमध्ये?? हो ही गोष्ट थोडी आश्चर्य वाटायला लावणारी आहेच. पण ही पूर्णपणे खरी गोष्ट आहे.
कामसूत्राचा अनुवाद करणाऱ्या सर रिचर्ड फ्रान्सिस बर्टन यांनीच एका अरबी पुस्तकाचा अनुवाद केला होता. या पुस्तकाचं नाव 'द परफ्युम्ड गार्डन' असं होतं. अर्थात मूळ अरबी पुस्तकाचा तो अनुवाद नव्हता.
बर्टन यांनी हे पुस्तक फ्रेंचमधून इंग्रजीत आणलं. हे पुस्तक पंधराव्या शतकात ट्युनिशिया या अरब देशातील शेख नफजोई यांनी लिहिलं होतं.
या पुस्तकात शारीरिक संबंध ठेवण्याच्या पद्धती तपशीलवार दिल्या आहेत. साधारणतः कामसूत्र हे शरीरसंबंधांच्या पद्धतींवर लिहिलेलं पुस्तक मानलं जातं.
महिलांचा आत्मविश्वास
या पुस्तकात महिलांच्या अधिकारावर जास्त भर दिला आहे. या पुस्तकातील माहितीनुसार सेक्सचा अधिकार फक्त पुरुषांचाच नाही तर त्यात महिलांचाही समान वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या अधिकारांकडे दुर्लक्ष करता येत नाही.
दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर कामसूत्र पुस्तक सेक्समध्ये महिलांचा आत्मविश्वास वाढवण्याची चर्चा करते, तर 'द परफ्युम्ड गार्डन'मध्ये शारीरिक संबंधांचा शुद्ध स्वरुपात आनंद घेण्याबद्दल चर्चा केली आहे. याशिवाय या पुस्तकात सेक्स करण्याच्या पद्धतींबाबत विविध कहाण्यांच्या रुपात माहिती दिली आहे.
वाचकांचं मनोरंजन
'अलिफ लैला' ज्या पद्धतीनं लिहिलं गेलंय ना त्याच शैलीत या कहाण्या लिहिल्या आहेत. त्यामुळे भरपूर मनोरंजन होतं. 'द पर्फ्युम्ड गार्डन'मध्ये समलैंगितेवरही भरपूर चर्चा करण्यात आली आहे.
बर्टन यांनी आपल्या लेखनामध्ये 21 भाग याच विषयांना दिले आहेत. या पुस्तकाचा दुसरा भाग 'द सेंटेड गार्डन' नावाने बर्टन लिहिणार होते असं अनेक लोकांचं मत आहे. मात्र त्यापूर्वीच बर्टन यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे बहुतांश लेखन त्यांची पत्नी इसाबेलने जाळून टाकलं.
धार्मिक मान्यता
अरबी साहित्याच्या तज्ज्ञ सारा इर्विंग यांच्या मते आज जरी अरब देशांमध्ये सेक्सचा उल्लेख करणंही टाळलं जात असलं तरी एकेकाळी अरब देशांमध्ये सेक्सचा उल्लेख करणाऱ्या पुस्तकांना धार्मिक मान्यता होती. ही पुस्तकं लोकांना शारीरिक संबंध नीट ठेवण्याचं शिक्षण देतात असं मानलं जायचं.
त्यामुळे ही पुस्तकं म्हणजे देवानं दिलेलं वरदान मानलं जायचं. पण आता मात्र सेक्स हा अरब देशांमध्ये एक मोठा बागुलबुवा झालेला आहे. म्हणजे इथं लोक सेक्स करत नाहीत किंवा त्यांना सेक्स करण्याची इच्छा नसते असा याचा अर्थ नाही, तर ते सेक्सवर बोलणं टाळतात. हा विषय कुठल्या तरी निराळ्याच जगातला असल्यासारखं ते वागतात.
'अलिफ लैला'च्या गोष्टी
त्यामुळे आता 'द पर्फ्युमड गार्डन'सारख्या पुस्तकाला सैतानी पुस्तकासारखं पाहिलं जातं. एकीकडे सेक्स बागुलबुवा आहे तर दुसरीकडे सेक्ससाठी वेड लागण्याच्या पातळीपर्यंत जाणारे लोकही इथं आहेत.
आता जरी सेक्सवर बोलणं टाळत असले तरी प्रत्येक काळामध्ये अरबी लोक शारीरिक संबंधाची भरपूर इच्छा बाळगून होते. बर्टन यांनी अरबी साहित्याचा इंग्रजीत भरपूर अनुवाद केला आहे. त्यात अलिफ लैलाच्या गोष्टीही समाविष्ट आहेत.
राजकुमार शहरयार
या गोष्टी फारसी भाषेत हजार अफसाने या नावानेही लिहिल्या गेल्या आहेत. मात्र या गोष्टींचा मुख्य मुद्दा सेक्सच असे.
उदाहरणासाठी या हजार अफसानेमधल्या राजकुमार शहरयारची कहाणी घेऊ. आपली बायको आपल्याला फसवत असल्याचं समजल्यावर शहरयार तिला रात्री मारुन टाकतो. त्यानंतर तो रोज एका कुमारीसह रात्री घालवतो आणि रोज सकाळी त्यांना मारुन टाकू लागतो. एकेरात्री त्यानं आपल्या वझिराच्या मुलीलाच शय्यासोबतीला बोलावलं. तिनं राजकुमाराला अख्खी रात्र गोष्ट सांगून गुंतवून ठेवलं.
या गोष्टी शहरयारला इतक्या चांगल्या वाटल्या की तो दररोज एक गोष्ट ऐकू लागला. हा क्रम 1000 रात्रीपर्यंत चालला. शेवटी शहरयार तिचा नवराच झाला. शहरयारच्या या कहाण्यांचा संग्रह राजकुमाराच्या एक हजार रात्री नावाने ओळखल्या जातात.
खरंतर शहरयारच्या मते त्याच्या पत्नीने फक्त त्याच्याशीच शारीरिक संबंध ठेवले पाहिजेत. म्हणजे एखाद्या महिलेने शारीरिक संबंध ठेवले ती तो पुरुष तिचा मालक होतो. यामध्ये तो पत्नीला बरोबरीचा हक्क देत नाही.
भारतामध्ये लिहिलेल्या कामसूत्रात शारीरिक संबंधात बाईलाही बरोबरीचा दर्जा दिला आहे. म्हणजे प्राचीन असूनही कामसूत्र आधुनिक आहे असं म्हणता येईल. अरब देशातले लोक जरी याच्यावर बोलत नसले तरी नवी पिढी हे चित्र बदलू पाहात आहे.
अरब देशांमध्ये पुन्हा एकदा शारीरिक संबंधांवर आधारित साहित्य लिहिलं जात आहे. अम्मार अब्दुल हामिद यांनी 2001 साली 'मेन्स्ट्रुएशन' नावाने पुस्तक लिहिलं होतं. यात एका इमामाच्या मुलाची कहाणी होती. या मुलाचं एका विवाहित महिलेशी प्रेम जुळतं आणि तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवतो असं त्यात लिहिलेलं आहे.
अरब देशांमधील समाज
आता अरबी महिलांनीही अशा प्रकारच्या साहित्यात प्रवेश केला आहे. 2005 साली 'नज्मा' नावाचं एक पुस्तक एका महिलेनं लिहिलं होत. अरब जगताचा इतिहास पाहाता शारीरिक संबंधावर एखाद्या महिलेनं पुस्तक लिहिण्याची ही पहिलीच वेळ होती. यानंतर अशी अनेक पुस्तकं आली.
मोरक्कोतील मोहम्मद चौकरीनी आपल्या पुस्तकात वेश्या आणि लैंगिक रोगांचेही वर्णन केले आहे. आता या गोष्टींमुळे दचकण्याची गरज नाही असं सीरियन लेखिका सल्वा नईमी सांगतात. अरबी समाजात सेक्सला सर्वात आनंददायी गोष्ट मानलं गेलं आहे.
जुनं साहित्य
त्यांच्यामते अरबी बोली ही सेक्सची बोली आहे. अरबी समाजात मुलगा आणि मुलगीत मोठा भेदभाव होतो हा भाग वेगळा. तिथल्या लोकांच्या आयुष्यावर धर्माचा मोठा पगडा आहे. मुलगा आणि मुलगी यातलं नातं कसं असावं हे धर्मच सांगतो. एकांतात त्यांनी एकमेकांबरोबर कसं वागलं पाहिजे हेसुद्धा तेच सांगतो.
बहुतांश युरोपियन कलाकार आणि लेखकांच्या मते अरब देशात सेक्स हे फक्त मौजेसाठी असल्यासारखं मानतात. मात्र अरब देशातील सेक्स विषयाचे तज्ज्ञ त्याला दुजोरा देत नाहीत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.