You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
LGBTQ+ झेंडा कुणी, कधी आणि कसा तयार केला, प्रत्येक रंगाचा अर्थ काय?
जगभरातील विविध देशांमध्ये जून हा महिना प्राईड मंथ म्हणून साजरा केला जातो. या काळात एलजीबीटीक्यू+(LGBTQ+) आणि यात समावेश असलेले इतरही समुदाय हे त्यांच्या अस्तित्वाचा आनंद साजरा करत असतात.
(एलजीबीटीक्यू+ म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्श्युअल, ट्रान्सजेंडर आणि पारंपरिकदृष्ट्या सर्वसामान्य लैंगिक ओळख असलेल्यांपेक्षा वेगळी ओळख अलेल्यांचा समुदाय.)
प्राईडची ओळख म्हणजे त्यांचा प्रसिद्ध इंद्रधनुष्यासारखा सहा विविध रंगांच्या पट्ट्यांचा झेंडा आहे. 1970 च्या दशकापासून हा झेंडा समुदायाची ओळख बनला आहे. गेल्या सुमारे 50 वर्षांच्या कालावधीमध्ये या झेंड्यामध्ये अनेक बदल होत गेले आहेत. प्रामुख्यानं गेल्या काही वर्षांमध्ये समुदायातील विविधता आणि स्वतंत्र ओळख दाखवणारे काही झेंडेही पाहायला मिळाले आहेत.
झेंड्यांमधील रंगांचा वापर करून मुकूट तयार करणारे ब्रूक हॉय्त यांच्या मते, लिंग आणि लैंगिकता यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वैविध्यता आहे. यात समावेश असलेले अनेक छोटे समुदाय फारसे समोर येत नाही. त्यामुळे हे प्राईड फ्लॅग समुदाय आणि समुदायाचा भाग म्हणून ओखळ मिळवून देण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
नेमका अर्थ काय?
जगभरात प्राईड महिना साजरा होत असताना यात प्रामुख्यानं झळकणाऱ्या विविध झेंड्यांबाबत आपण माहिती घेऊयात.
गिल्बर्ट बेकर प्राईड झेंडा
हा झेंडा सर्वांचं मूळ समजला जातो. चळवळीतील महत्त्वाचे कार्यकर्ते आणि ड्रॅग क्वीन अशी ओळख असणारे गिल्बर्ट बेकर यांना, अमेरिकेत गे म्हणून सर्वांत आधी ओळख जाहीर केलेले हार्वे मिल्क यांनी एक आव्हान दिलं होतं. गे समुदायाच्या प्राईडचं म्हणजेच अभिमानाचं प्रतिक असणारा झेंडा तायर करण्याचं हे आव्हान होतं. त्यानंतर 8 रंगांच्या पट्ट्या असलेला पहिला झेंडा बेकर यांनी तयार केला होता. 25 जून 1978 रोजी सॅन फ्रान्सिस्को इथं गे फ्रीडम डे परेडमध्ये सर्वप्रथम तो फडकावण्यात आला होता.
या झेंड्याचे आठ रंग हे बेकर यांना जाणवलेल्या समुदायाच्या विविध भावना यांचं प्रतिनिधित्व करतात. गुलाबी रंग लैंगिकतेचा, लाल रंग जिवनाचा, केशरी रंग सावरण्याचा, पिवळा सूर्यप्रकाशासाठी, हिरवा निसर्गाचा, टरक्वाईज हा कला किंवा चमत्काराचा, इंडिगो शांततेचा आणि जांभळा रंग आत्म्याचं प्रतीक आहे.
मूळ झेंडा तयार केल्यानंतर 25 वर्षांनी म्हणजे 2003 मध्ये बेकर यांनी, 2 किलोमीटर लांबीचा एक प्रचंड लांब झेंडा तयार केला होता. हा झेंडा फ्लोरीडामध्ये गल्फ ऑफ मेक्सिकोपासून ते अटलांटिक महासागरापर्यंत पसरलेला होता.
ग्रे प्राईड फ्लॅग
1978 च्या फ्रीडम डे परेड आणि हार्वे मिल्क यांच्या हत्येच्या काही महिन्यांनंतर, या झेंड्यांची मागणी वाढली त्यामुळे बेकर यांनी व्यावसायिकरित्या झेंडे तयार करण्यास सुरुवात केली.
मात्र, गुलाबी रंगाचे पुरेसे कापड उपलब्ध होत नसल्यामुळ्, डिझाईनमधून हा रंग वगळण्यात आला. रंगांची संख्या सम असावी म्हणून टरक्वाईज आणि इंडिगो एकत्र करून निळा करण्यात आला आणि सहा रंगांचा झेंडा तयार झाला.
आणि समुदायासाठी प्रामुख्याने वापरला जाणारा हा झेंडा ठरला. अनेक शतकांपासून अजूनही सर्वात प्रसिद्ध ठरलेला हा झेंडा वापरला जात आहे.
फिलाडेल्फिया प्राईड फ्लॅग
2017 साली प्राईड महिन्यादरम्यान, फिलाडेल्फियामधील 'मोअर कलर मोअर प्राईड' ग्रुपने या झेंड्यामध्ये आणखी दोन रंग जोडले. समुदायातील विविध रंगांच्या लोकांचं प्रतिनिधित्व म्हणून ब्लॅक (काळा) आणि ब्राऊन (तपकिरी) रंगांचा यात समावेश करण्यात आला.
हा झेंडा प्रामुख्याने त्यावेळी विनोदी लेखनासाठी एमी पुरस्कार मिळवलेल्या प्रथम कृष्णवर्णीय महिला लेना वेथ यांनी 2018 च्या मेट गाला मध्ये परिधान केला होता. त्यावेळी याची खूप चर्चा झाली होती. त्या वर्षीची थीम कॅथलिझम होती. केथ यांनी परिधान केल्यानंतर हा झेंडा अधिक प्रसिद्ध झाला होता.
ट्रान्सजेंडर फ्लॅग
हा झेंडा अमेरिकेच्या पाणबुडीवरील माजी क्रू मेंबर मोनिका हेल्म्स यांनी तयार केला होता. 1999 मध्ये त्यांनी ट्रान्सजेंडर प्राईड फ्लॅग तयार केला. तो सर्वप्रथम अॅरिझोनामधील फिनिक्स प्राईड परेडमध्ये 2000 साली झळकवण्यात आला.
या झेंड्यातील रंगांचा विचार करता मुलांसाठी निळा आणि मुलींसाठी गुलाबी रंगाचा समावेश केला होता. यात मध्यभागी पांढरा रंग होता. ज्यांना त्यांची लैंगिक ओळख वेगळी आहे असं वाटत असेल, किंवा लैंगिक ओळखीमध्ये बदल जाणवत असतील, तसेच ज्यांची लैंगिक ओळखच नसेल, त्याचबरोबर इंटरसेक्स असणाऱ्या अशा सर्वांसाठी हा रंग होता.
स्मार्टफोन इमोजीमध्ये याचा समावेश करण्याची मागणी 2 वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर सुरू होती. पण किबोर्ड्सवरील इमोजींबाबत निर्णय घेणाऱ्या युनिकोडला 2018 मध्येही या इमोजीचा किबोर्डमध्ये समावेश करणं शक्य झालं नाही. त्यानंतर यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. नेल आर्टिस्ट चार्ली क्रॅग यांनी जोपर्यंत झेंड्यांच्या समावेश इमोजीमध्ये होत नाही, तोपर्यंत समुदायाची ओळख म्हणून लॉबस्टरचा (एक प्रकारचा मासा) इमोजी वापरण्यास सांगितलं. अखेर 2020 मध्ये ट्रान्सजेंडर प्राईड फ्लॅगचा इमोजीमध्ये समावेश झाला.
बायसेक्श्युअल फ्लॅग
मायकल पेज यांनी 1998 मध्ये समुदायामध्ये या गटाचं अस्तित्व वाढावं या उद्देशाने 1998 मध्ये बायसेक्श्युअल फ्लॅग तयार केला. हा फ्लॅग प्रसिद्ध बायअँगल्स चिन्हावर आधारित होता, ज्यात निळा आणि गुलाबी त्रिकोण यांचा समावेश आहे.
यात समलैगिकांसाठी 40% गुलाबी, विरुद्ध लिंगाप्रती आकर्षण असणाऱ्यांसाठी 40% निळा आणि दोन्हींची मिळून ओळख तयार होणाऱ्यांसाठी दोन्हींच्या मध्ये 20% जांभळा रंग यांचा समावेश करण्यात आला, असं सांगितलं जातं.
पॅनसेक्श्युअल फ्लॅग
हा झेंडा 2010 मध्ये तयार करण्यात आला होता, पण त्याचा उगम कसा झाला हे अद्याप समोर आलंलं नाही. सर्वप्रथम हा झेंडा ऑनलाईन मार्केटमध्ये प्रसिद्ध झाला त्यानंतर तो लोकप्रिय झाला आणि त्याचा वापर सुरू झाला.
पॅनसेक्श्युयालिटीचा वेगळेपणा दर्शवण्यासाठी हा झेंडा तयार करण्यात आला. ही एखाद्याप्रती लिंग किंवा लैंगिक ओळख याचा विचार न करता असलेली निखळ आणि प्रचंड प्रेमाची भावना असते.
यात गुलाबी रंग हा महिलांप्रती आकर्षणाचं तर निळा रंग पुरुषांप्रती आकर्षणाचं प्रतीक असून पिवळा रंग हा इतरांप्रती असलेल्या आकर्षणाचं प्रतीक आहे.
जेंडरक्वीर फ्लॅग
जेंडरक्वीर लेखक, डिझायनर आणि संगीतकार असलेले मर्लिन रॉक्सी यांनी 2011 मध्ये या झेंड्याची अंतिम आवृत्ती डिझाईन केली.
यातील फिकट जांभळ्या रंगाची पट्टी पुरुष आणि महिलांसाठीच्या पारंपरिक निळ्या आणि गुलाबी रंगाची ओळख देणारे आहेत, तर जांभळ्या रंगाच्या विरुद्ध असा हिरवा रंग, पुरुष किंवा स्त्री अशी स्वतंत्र ओळख नसलेल्यांसाठी आहे. मध्यभागी असलेला पांढरा रंग लैंगिक ओळखीपासूनच पूर्णपणे अलिप्त असलेल्यांचं प्रतिनिधीत्व करतो.
नॉन बायनरी फ्लॅग
की रोवान यांनी वयाच्या 17 व्या वर्षी, 2014 मध्ये हा झेंडा तयार केला होता. जेंडरक्वीर फ्लॅगपेक्षा वेगळी ओळख असावी या मागणीमुळे त्यांनी हा झेंडा तयार केला. हा झेंडा काहीसा रॉक्सी यांच्या झेंड्यासारखाच पण चार रंगांच्या पट्ट्या असणारा होता. हे चार रंग वेगवेगळी लैंगिक ओळख असणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे होते.
पिवळा रंग स्त्री किंवा पुरुष असा संदर्भ नसलेली लैंगिक ओळख असलेल्यांसाठी होता. पांढरा रंग ज्यांना अनेक किंवा सर्वच लैंगिक भावना आहेत, त्यांचं प्रतिनिधीत्व करतो. जांभळी पट्टी पारंपरिक लैंगिक ओळख नसलेल्यांचं वेगळेपण दर्शवणारी आहे. तर शेवटची काळी पट्टी ज्यांना लैंगिक ओळखच नाही अशांसाठी आहे.
जेंडरफ्लुईड फ्लॅग
हा झेंडा अशांसाठी होता ज्यांची लैंगिक ओळख ही कायमस्वरुपी नसते किंवा भावनांनुसार ती बदलत असते. 2012 मध्ये जेंडर पॅनसेक्श्युअलचे समर्थक जेजे पीपल यांनी हा झेंडा अशा लोकांसाठी तयार केला होता, जे लैंगिकदृष्ट्या या समाजात फिट समजले जात नाहीत.
जेंडर फ्लुईडीटी या अंतर्गत अनेक उपगट आणि छोटे समुदाय आहेत, त्यापैकी अनेकांचे स्वतःचे झेंडेदेखिल आहेत.
यामध्ये जेंडरफ्लक्स (genderflux- यात अशा लोकांचा समावेश होतो जे भावनांनुसार एकापेक्षा अधिक लैंगिक ओळखींचा अनुभव घेत असतात, त्यांच्या लैंगिक भावना बदलत असतात), फ्लुईडफ्लक्स (fluidflux-यात एखाद्या व्यक्तीची दोन किंवा त्यापेक्षा अधिक प्रकारे लैंगिक ओळख बदलत असते तीही अत्यंत तीव्रपणे) आणि मल्टीजेंडर (multigender-ज्यांना एकापेक्षा अधिक लैंगिक ओळखीचा अनुभव होत असतो) या सर्वांचा संबंध लैंगिक ओळख बदलत असताना समोर आलेल्या विविध प्रकारांशी आहे.
ऑनलाईन जगतात समविचारी लोक भेटल्यानंतर फ्लुईडफ्लक्स म्हणून समोर आलेले एल (L) यांच्या मते, : "समुदायामध्ये झेंडे हा कायम महत्त्वाचा भाग ठरला आहे, कारण त्यामुळं आपली नेमकी ओळख कळते. ज्या पद्धतीनं देशांचे झेंडे तुम्हाला तुमचं राष्ट्रीयत्व किंवा तुम्ही कुठले आहात हे दर्शवण्यासाठी वापरते जातात, त्याच पद्धतीनं LGBTQIA झेंडे हे तुम्ही निवडलेली ओळख आणि तुमचं कुटुंब कोणतं हे दर्शवतात."
(LGBTQIA म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्श्युअल, ट्रान्सजेंडर, क्वीअर, इंटरसेक्स आणि ए सेक्श्युअल).
"झेंडे हे जल्लोषाचं प्रतीक आहेत. मी कोण आहे, त्याचा आनंद मी साजरा करत आहे. यात लवण्यासारखं काहीही नाही, असं हे झेंडे दर्शवतात. तुम्ही तुमची ओळख सर्वांसमोर मांडायला हवी, तुम्ही बिनधास्त व्हायला हवं."
इंटरसेक्स फ्लॅग
ऑस्ट्रेलियातील बायोथिसिस्ट, संशोधक आणि इंटरसेक्स कार्यकर्ते मॉर्गन कारपेंटर यांनी 2013 मध्ये हा झेंडा तयार केला. यातील वर्तुळ हे जन्मतः गुणसूत्र, संप्रेरकं आणि प्रायव्हेट पार्ट यांचा विचार करता वेगळे असलेल्या किंवा काही बदल असलेल्या इंटरसेक्स समुदायाबद्दलच्या पूर्णत्वाचं प्रतीक आहे.
जांभळा आणि पिवळा रंग वापरण्याचं कारण म्हणजे हे रंग प्रामुख्याने लैंगिक बाबींचा विचार करता तटस्थ असे मानले जातात.
ए सेक्श्युअल फ्लॅग
ए सेक्श्युअल याचा अर्थ अशी लैंगिक ओळख असणारे लोक ज्यांच्यात लैंगिक इच्छेची कमतरता असते, पण ते लैंगिक अनुभवापासून पूर्णपणे लांब नसतात. हा झेंडा 2010 मध्ये ए सेक्श्युअल व्हिजिबिलीटी अँड एज्युकेशन नेटवर्क यांच्या लोगोपासून प्रेरणा घेत तयार करण्यात आला होता.
काळा रंग ए सेक्श्युयालिटीचा प्रतीक आहे, तर करडा किंवा ग्रे रंग "ग्रेसेक्श्युअल्स" ( म्हणजे ए सेक्श्युअल आणि ज्यांना लैंगिक आकर्षण आहे अशा दोघांच्या मधले) यांचं तसंच डेमिसेक्श्युअल्स (ज्यांना भावनिक आकर्षण असतं) यांचं प्रतिनिधित्व करतो. पांढरा रंग इतर सहकाऱ्यांचं तर जांभळा रंग समुदायांचं प्रतिनिधीत्व करतो.
प्रोग्रेस फ्लॅग
प्रोग्रेस फ्लॅग किंवा मॉडर्न प्राईड फ्लॅग 2018 मध्ये ग्राफिक डिझायनर डॅनियल कासर यांनी तयार केला होता. समुदायाचा पारंपरिक सहा रंगांच्या पट्ट्या असलेल्या झेंड्यामध्ये पाच रंगांच्या पट्ट्यांची शेवरॉन डिझाईन वापरून तो तयार करण्यात आला होता.
काळा, तपकिरी, गुलाबी, निळा आणि पांढरा हे पाच नवे रंग इतर प्राईड फ्लॅगमधून घेण्यात आले आहेत. पण प्रामुख्याने क्वीअर समुदायामध्ये समावेशकता आणि सोबतच वेगळेपणाही राहावा यासाठी ट्रान्सजेंटर आणि फिलाडेल्फियातील लोकांशी संबंधित झेंड्यातून रंग वापरलेले आहेत.
साऊथ एशियन LGBTQIA+ समुदासाठी काम करणारी संस्था गेसियन्सच्या सीईओ रिता लोई यांच्या मते, "झेंडे माझ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. मला वाटतं की, यात वरचेवर बदल होतच राहतील. पण कोण जाणे? कदाचित एक वेळ अशीही येईल जेव्हा या झेंड्यांची गरजच राहणार नाही. माझ्यासाठी तेच सर्वांत योग्य असेल."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता..
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)