'अमेरिकेने चीनवर अणुबाँब टाकण्याचा विचार केला होता'

फोटो स्रोत, 3DSCULPTOR
अमेरिकेच्या सैन्य अधिकाऱ्यांनी 1958मध्ये तैवानच्या सुरक्षेसाठी चीनवर अणुबाँब डागण्याची वकिली केली होती.
पेंटागॉन पेपर्समुळे चर्चेत आलेले अमेरिकेचे माजी सैन्य विश्लेषक डेनियन एल्सबर्ग यांनी यासंबंधीच्या कथित गोपनीय दस्तावेजांचा काही भाग ऑनलाईन पोस्ट करत असा दावा केला आहे.
यासोबत असाही दावा करण्यात आलाय की, त्यावेळी अमेरिकेच्या सैन्य अधिकाऱ्यांनी हेसुद्धा मान्य केलं होतं की, तत्कालीन सोव्हिएत संघ अण्वस्त्रांसोबत आपला सहकारी असलेल्या चीनच्या मदतीला धावून येईल. यामुळे मग मोठ्या संख्येनं लोकांचा जीव जाऊ शकतो.
अमेरिकी वृत्तपत्र द न्यूयॉर्क टाईम्समधील रिपोर्टनुसार, अमेरिकेचे सुरक्षाविषयक रणनीतिकार तैवानच्या सुरक्षेसाठी ही किंमत मोजायलाही तयार होते.
डेनियल एल्सबर्ग यांनी ज्या गोपनीय कागदपत्रांचा काही भाग सार्वजनिक केला आहे, त्यातील काही भाग पहिल्यांदा 1975मध्ये सार्वजनिक झाला होता.
90 वर्षीय एल्सबर्ग 1971मध्ये चर्चेत आले होते, त्यावेळी त्यांनी व्हिएतनाम युद्धाशी संबंधित एक टॉप सिक्रेट पातळीचा अभ्यास अमेरिकेच्या माध्यमांमध्ये लीक केला होता. याला पेंटागॉन पेपर्स या नावानं ओळखलं जातं.
एल्सबर्ग यांनी द न्यूयॉर्क टाईम्सला सांगितलं की, त्यांनी 1970च्या दशकातील सुरुवातीच्या काळात तैवान संकटाशी संबंधित टॉप सिक्रेट अभ्यासाला कॉपी केलं होतं. आता तैवानविषयी अमेरिका आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव असल्याने हा अभ्यास त्यांनी ऑनलाईन पोस्ट केला आहे.
या कागदपत्रांच्या मते, तत्कालीन ज्वाईंट चीफ ऑफ स्टाफ जनरल नाथन ट्विनिंग यांनी स्पष्ट केलं होतं की, जर आक्रमण वगैरे झालं असतं तर अमेरिकेनं चीनच्या हवाई निर्बंधांच्या अभियानाला रोखण्यासाठी चीनच्या वायूदलांवर आण्विक हल्ला केला असता.
निर्णय
पण जर यामुळे हल्ला थांबला नसता तर चीनच्या आत घुसून उत्तर शांघायमध्ये जाऊन आण्विक हल्ला केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असंही या कागदपत्रात ट्विनिंग यांच्या हवाल्याने सांगण्यात आलंय.
पण याप्रकरणी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डी डी आयसेनहॉवर यांनी पारंपरिक हत्यांरांचा वापर करण्याचा निर्णय घेतला.
चीनच्या सैन्यानं तैवानच्या नियंत्रणाखालील द्वीपांवरील तोफांचे हल्ले थांबवले तेव्हा 1958मधलं संकट संपुष्टात आलं. या क्षेत्राला च्यांग काई-शेकच्या यांच्या नियंत्रणाखाली सोडण्यात आलं.

फोटो स्रोत, KEYSTONE
चीनला तैवान आपला भाग असल्याचं वाटतं. अमेरिका 1979 पासूनच चीनला मान्यता देत असलं तरी तैवान आपला महत्त्वाचा सहकारी आहे, असं अमेरिकेला वाटतं.
इतर अनेक देशांप्रमाणे अमेरिकेचे तैवानसोबत राजकीय संबंध नाही. पण एका कायद्याअंतर्गत अमेरिका तैवानच्या आत्मसंरक्षणासाठी मदत करू शकतं.
तैवानविषयीचा चीनचा आक्रमक रोख पाहून अमेरिकेनं नुकताच चीनला इशारा दिला होता.
चीन तैवानला 'वन चायना पॉलिसी' याअंतर्गत आपला भाग मानतं, तर दुसरीकडे तैवान स्वत:ला एक स्वतंत्र राष्ट्र मानतं.
चीन आणि तैवान
1949पासून चीनमधील गृहयुद्ध संपुष्टात आल्यापासून चीन आणि तैवानमध्ये वेगवेगळी सरकारं राहिली आहेत.
चीननं अनेक वर्षांपासून तैवानच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींना कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. दोघांनीही प्रशांत महासागरातील प्रभावासाठी संघर्ष केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून दोघांमधील तणाव वाढला आहे आणि चीनने तैवानला आपल्या ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर करण्याला नकार दिलेला नाहीये.

फोटो स्रोत, KAGENMI
दुसरीकडे तैवानला थोड्याच देशांनी अधिकृत मान्यता दिली आहे. पण, तैवानच्या लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या सरकारचे जगातल्या अनेक इतर देशांशी व्यावसायिक आणि अनौपचारिक संबंध आहेत.
अमेरिकेचे तैवानसोबत काही राजनयीक संबंध नाहीत. पण, अमेरिका तैवानला आपली सुरक्षा करण्यासाठी मदत करू शकते, असा अमेरिकेतील एक कायदा अमेरिकेला अधिकार देतो.
अमेरिकेची चिंता
तैवानच्या सरकारची आपल्या स्वातंत्र्याची औपचारिक घोषणा करण्याकडे वाटचाल सुरू आहे, या बाबीमुळे चीन चिंतेत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. असं कोणतंही पाऊल उचलण्यासंबंधी चीन तैवानला इशारा देत आहे.
पण, तैवानच्या राष्ट्रपती साई इंग वेन यांनी वारंवार म्हटलंय की, तैवान पहिल्यापासूनच एक स्वतंत्र देश आहे. यासाठी कोणत्याही औपचारिक घोषणेची गरज नाहीये.

फोटो स्रोत, MATT ANDERSON PHOTOGRAPHY
तैवानची आपलं स्वत:ची राज्यघटना, लष्कर आणि लोकशाही पद्धतीनं निवडून आलेले नेते आहेत.
पण, तैवानचा आपल्यात समाविष्ट करून घेण्यासाठी वेळप्रसंगी बळाचा वापर करण्याच्या शक्यतेला चीननं कधीच नाकारलेलं नाहीय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








