खंडग्रास चंद्रग्रहण : वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण कधी, कुठे आणि कसं पाहाल?

फोटो स्रोत, AFP
या वर्षातलं शेवटचं खंडग्रास चंद्रग्रहण आज म्हणजे 8 नोव्हेंबरला होईल. सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी आली की चंद्रग्रहण होतो. जर हे तीन्ही अगदी सरळ रेषेत नसतील तर खंडग्रास ग्रहण होतं.
हे खंडग्रास चंद्रग्रहण संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी 6 वाजून 18 मिनिटांनी संपेल. म्हणजे, केवळ तासभरच चंद्र आणि सूर्याच्या मधे पृथ्वी असेल.
पश्चिम बंगालमधील कोलकाता आणि सिलिगुडी, आसाममधील गुवाहाटी, बिहारमधील पटना, झारखंडमधील रांची, दिल्ली इथून चंद्रग्रहण दिसेल. तसंच, कोहिमा, अगरतळा, भुवनेश्वरमधूनही पाहता येईल.
श्रीनगर, अहमदाबाद, मुंबई, नागपुर, पुणे, नोएडा, गुरुग्राम, चंडीगड, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नई, सूरत, जयपुर, लखनऊ, मदुराई, उदयपूर यांसह काही भागात पूर्ण चंद्रग्रहण दिसणार नाही.
ग्रहण ही अंतराळातील दुर्मिळ आणि अतुल्य अशी खगोलशास्त्रीय स्थिती म्हणून ओळखली जाते. नागरिक अत्यंत उत्सुकतेने ग्रहणाची प्रतीक्षा करत असतात. अनेक पर्यटक तर ग्रहण पाहण्यासाठी विविध देशांचं पर्यटन करत फिरतात.
साधारणपणे ग्रहण दोन प्रकारचे असून तांत्रिकदृष्ट्या दोन ताऱ्यांचा समावेश असलेला एक तिसरा ग्रहण-प्रकारही असल्याचं खगोलशास्त्रज्ञ जुआन काल्रोस बि्यामिन यांनी त्यांच्या इलुस्ट्रेटेड अॅस्ट्रोनॉमी या पुस्तकात लिहिलं आहे.
जुआन यांच्या पुस्तकात देण्यात आलेले ग्रहणांचे प्रकार खालीलप्रमाणे -
पृथ्वी स्वतःभोवती प्रदक्षिणा घेता-घेता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, तर चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातल असतो.
यादरम्यान, चंद्र हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये आल्यानंतर जी स्थिती निर्माण होते, त्याला सूर्यग्रहण म्हटलं जातं.
तर, सूर्य आणि चंद्र यांच्यादरम्यान पृथ्वी आल्यानंतर निर्माण होणाऱ्या स्थितीला चंद्रग्रहण असं संबोधलं जातात.
ग्रहण कोणतंही असो त्याचे 3 प्रकार असतात. खग्रास ग्रहण, कंकणाकृती ग्रहण आणि खंडग्रास ग्रहण हे ग्रहणाचे तीन प्रकार आहेत. किती प्रमाणात चंद्र किंवा सूर्य झाकोळले जातात, किती प्रमाणात त्यांची सावली एकमेकांवर दिसून येते, त्यावर ग्रहणाचा प्रकार अवलंबून असतो. सूर्यग्रहण खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती अशा तीन प्रकारचं असतं. तर चंद्रग्रहणाचे खग्रास, खंडग्रास आणि उपछाया असे तीन प्रकार आहेत.
या ग्रहणांची आपण सविस्तरपणे माहिती घेऊ -
खग्रास चंद्रग्रहण
नासाने दिलेल्या माहितीनुसार, चंद्र, पृथ्वी आणि सूर्य हे सरळ एका रेषेत आल्यानंतर खग्रास चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होते. यावेळी चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीखाली येतो. पण तरीही काही प्रमाणात सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतोच. यावेळी चंद्राचा हा भाग थोडा लालसर दिसू लागतो. याला ब्लड मून असं संबोधलं जातं.

फोटो स्रोत, NASA
सूर्य आणि चंद्रग्रहणात फरक काय असा प्रश्न आपल्याला पडला आहे. याचं उत्तर म्हणजे सूर्यग्रहण पृथ्वीवरील विशिष्ट भागातूनच पाहता येऊ शकतं. पण चंद्रग्रहण काही प्रमाणात अख्ख्या जगभरातून पाहायला मिळू शकतं.
8 नोव्हेंबर 2022 ला खग्रास चंद्रग्रहण होईल जे भारतातून नीट दिसेल.
खंडग्रास चंद्रग्रहण
चंद्राचा फक्त काही पृष्टभागच पृथ्वीच्या सावलीखाली आल्यास खंडग्रास चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होते. ही सावली किती मोठी आहे, तितका याचा प्रभाव दिसून येतो. यावेळी चंद्राच्या इतर भागांवर गडद लालसर किंवा चॉकलेटी रंगछटा दिसू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
उघडा भाग आणि सावलीखालील भाग यांचं मिश्र स्वरुप तयार होऊन चंद्रावर विविध रंगछटा दिसतात.
खग्रास चंद्रग्रहण दुर्मिळ असून दोन वर्षांच्या अंतराने ते दिसू शकतात. मात्र खंडग्रास चंद्रग्रहण वर्षातून दोन वेळा दिसू शकतं.
आगामी खंडग्रास चंद्रग्रहण 18-19 नोव्हेंबर 2021 रोजी दिसेल. उत्तर-दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, काही प्रमाणात युरोप तसंच आशिया खंडांमध्ये ते पाहिलं जाऊ शकतं.
छायाकल्प चंद्रग्रहण
या ग्रहणप्रकारात पृथ्वीची किंचित सावली चंद्रावर पडलेली असते. ती अतिशय पुसट असू शकते. मानवी डोळ्यांना ते चटकन लक्षात येईल इतकंही प्रभावी नसतं. अतिशय छोट्या स्वरुपाचं हे ग्रहण असतं. कधी-कधी तर असे चंद्रग्रहण कॅलेंडरमध्ये नोंदवलेलेही नसतात.

फोटो स्रोत, Getty Images
खग्रास सूर्यग्रहण
खग्रास सूर्यग्रहणादरम्यान चंद्र पूर्णपणे सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो. त्यामुळे काही क्षण पृथ्वीवर चंद्राची संपूर्ण सावली पडते. या कालावधीत रात्र असल्याप्रमाणेच काही क्षण काळोख होतो.

फोटो स्रोत, NASA
नासाच्या शब्दांतच सांगायचं झाल्यास, खग्रास चंद्रग्रहण एका खगोलीय योगायोगामुळेच शक्य झालं आहे. सूर्य हा चंद्रापेक्षा 400 पटीने मोठा आहे. पण तो त्याहीपेक्षा 400 पटीने लांब अंतरावर आहे. त्यामुळेच खग्रास सूर्यग्रहण होणं शक्य आहे.
पण, हे विशिष्ट कोनातूनच दिसू शकतं. पृथ्वीच्या इतर भागातून ते काही प्रमाणात दिसतं, इतर भागात यालाच खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. जिथं हे ग्रहण पूर्णपणे दिसतं, त्या भागाला पाथ ऑफ टोटॅलिटी असं संबोधलं जातं. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांची स्थिती यांच्यानुसार पृथ्वीवर हे ग्रहण कुठे दिसेल, ते अवलंबून असतं.
शास्त्रीयदृष्ट्या, सर्वात लांब सूर्यग्रहण 7 मिनिटं 32 सेकंदांपर्यंत चालू शकतं, असं जुआन सांगतात.
खग्रास सूर्यग्रहण इतकंही दुर्मिळ नाहीत. दर 18 महिन्यांनी पृथ्वीवर हे ग्रहण दिसू शकतं. मग यामध्ये दुर्मिळ असं काय, तर ज्याठिकाणी हे खग्रास ग्रहण दिसलं, तिथं 375 वर्षांनीच खग्रास सूर्यग्रहण पुन्हा दिसू शकतं, हे विशेष.
यंदाच्या वर्षीही खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. मात्र ते स्पष्टपणे पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी तुम्हाला अंटार्क्टिका खंडावर जावं लागेल, असं जुआन यांनी सांगितलं.
कंकणाकृती सूर्यग्रहण
एखाद्या सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र पृथ्वीपासून थोडा दूर असेल. या स्थितीत तो पूर्णपणे सूर्याच्या मध्यभागी आला. यादरम्यान एका अंगठीप्रमाणे सूर्य दिसत असल्यास त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हटलं जातं. हे ग्रहणसुद्धा विशिष्ट भागातूनच पाहिलं जाऊ शकतं.

फोटो स्रोत, Getty
येत्या 10 जून रोजी उत्तर गोलार्धातील कॅनडा, ग्रीनलँड, रशिया या देशांमध्ये काही प्रमाणात कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. युरोप तसंच मध्य आशिया आणि चीन या देशांमधूनही थोडाफार ग्रहणाचा प्रभाव दिसून येईल.
नासाच्या माहितीनुसार कंकणाकृती सूर्यग्रहण हे बराचवेळ चालतात. काही ठिकाणी ते दहा मिनिटांपर्यंत तर काही ठिकाणी पाच ते सहा मिनिटांसाठी पाहिले जाऊ शकतात.
खंडग्रास सूर्यग्रहण
ज्या ग्रहणावेळी सूर्याचा फक्त काहीच भाग सावलीने व्यापलेला दिसतो, अशा ग्रहणाला खंडग्रास सूर्यग्रहण संबोधलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
कंकणाकृती किंवा खग्रास सूर्यग्रहणाच्या स्थितीपेक्षा किंचित पुढे मागे चंद्राची स्थिती असल्यास खंडग्रास सूर्यग्रहण दिसून येतं. खंडग्रास सूर्यग्रहण ही दुर्मिळ मानली जातात. एकूण सूर्यग्रहणांपेक्षा फक्त 4 टक्के ग्रहण खंडग्रास प्रकारची असू शकतात, असं IAC संस्थेने म्हटलं आहे.
यापूर्वीचं खंडग्रास सूर्यग्रहण 2013 मध्ये झालं होतं. तर पुढील खंडग्रास सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी दिसणार आहे, असं IAC ने सांगितलं आहे. हे ग्रहण इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि पपुआ न्यू गिनी या देशांमधून पाहता येऊ शकेल.
स्टेलार ग्रहण
स्टेलार ग्रहण ही नवी संकल्पना जुआन बिअॅमिन यांनी त्यांच्या पुस्तकात मांडली आहे.
त्यांच्या मते, पृथ्वीवर फक्त चंद्र किंवा सूर्याचेच ग्रहण होतात, असं नाही.
या दोहोंशिवाय इतर ग्रहांसोबतही विशिष्ट स्थिती निर्माण झाल्याने ग्रहण होऊ शकतात. असं जुआन यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








