डायनांची मुलाखत बीबीसीच्या पत्रकाराने फसवणूक करून मिळवली - चौकशी समिती

बीबीसीचे पत्रकार मार्टिन बशीर यांनी युवराज्ञी डायना यांची घेतलेली सुप्रसिद्ध मुलाखत चुकीच्या पद्धतीने फसवेगिरी करून मिळवल्याचं एका तपासात समोर आलं आहे.

ही मुलाखत कशा प्रकारे मिळवण्यात आली, यासंदर्भात नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

निवृत्त न्यायाधीश लॉर्ड डायसन यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाचा तपास करण्यात आला होता.

प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या गोष्टींसाठी बीबीसी ओळखली जाते, पण या प्रकरणामुळे या प्रतिमेला धक्का लागला आहे, असं मत न्या. लॉर्ड डायसन यांनी यावेळी बीबीसीकडे नोंदवलं.

बीबीसीने याप्रकरणी चूक मान्य केली असून या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

समितीने दिलेल्या अहवालानुसार, पत्रकार मार्टिन बशीर यांनी डायना यांचे भाऊ अर्ल स्पेन्सर यांच्याकडे काही बनावट कागदपत्रे दाखवली होती. या कागदपत्रांच्या आधारे बशीर यांनी अर्ल यांचा विश्वास संपादन केला. त्या माध्यमातून त्यांनी डायना यांच्याशीही ओळख करून घेतली.

पण, दुसरीकडे बीबीसीच्या व्यवस्थापकांसमोर मात्र बशीर यांनी बनावट कागदपत्रे दाखवल्याचं मान्य केलं नव्हतं. 1995 साली घडलेल्या या प्रकरणातील बशीर यांचं वर्तन आश्चर्यजनक, अविश्वसनीय, तसंच अप्रामाणिक असल्याचंही अहवालात म्हटलं आहे.

पत्रकार मार्टिन बशीर यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी बनावट कागदपत्र दाखवल्याबाबत माफी मागितली, पण डायना यांच्या मुलाखतीबाबत खूपच जास्त अभिमान वाटतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुलाखत देणं हा युवराज्ञी डायना यांचा वैयक्तिक निर्णय होता. त्याचा बँकेच्या कागदपत्रांशी काहीएक संबंध नव्हता. त्यांनी त्यांच्या स्वहस्ते लिहिलेली कागदपत्रे मी लॉर्ड डायसन समितीला दिली होती. त्याने हे सिद्ध होतं, असा बचाव बशीर यांनी केला.

बीबीसीचे महासंचालक टीम डेवी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देऊन बीबीसीची बाजू स्पष्ट केली आहे.

बीबीसीसोबत मुलाखत होणार आहे, याची कल्पना प्रिन्सेस ऑफ वेल्स यांना होती, असं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. पण तरीही ती मुलाखत मिळवण्याची पद्धत चुकीची होती. प्रेक्षकांना बीबीसीकडून हे वागणंअपेक्षित नाही. लॉर्ड डायसन यांनीही त्याकडे लक्ष वेधलं आहे. आम्ही त्याबाबत दिलगीर आहोत, असं टीम डेवी यांनी म्हटलं आहे.

सध्या बीबीसीच्या कार्यपद्धतीत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यापुढे अशा प्रकारच्या चुका टाळायला हव्यात. या चुकीची भरपाई करणं अवघड आहे. या चुकीसाठी बीबीसी मनापासून प्रेक्षकांची माफी मागत आहे. यापुढे अशा चुका होणार नाहीत, याची मी ग्वाही देतो, असंही डेवी म्हणाले.

युवराज्ञी डायना यांचा मार्टिन बशीर यांनी बीबीसी पॅनोरामासाठी घेतलेली मुलाखत त्याकाळी अत्यंत लक्षवेधी ठरली होती. ही मुलाखत सुमारे 2.3 कोटी वेळा पाहण्यात आली आहे.

या मुलाखतीत युवराज्ञींनी केलेलं एक वक्तव्य अतिशय गाजलं.

'या विवाहात तीन लोक सहभागी होते,' असं युवराज्ञी या मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

युकेच्या शाही कुटुंबातील एखाद्या सदस्याने प्रथमच अशा प्रकारे अत्यंत स्पष्ट शब्दांत मत मांडलं होतं. यामध्ये राजकुमारी डायना यांनी आपलं आयुष्य, त्यांचं प्रिन्स चार्ल्स यांच्यासोबतचं वैवाहिक आयुष्य, त्यांचे अफेअर्स यांच्याविषयी अत्यंत मनमोकळेपणाने संवाद साधला होता.

त्यावेळी डायना या त्यांचे पती चार्ल्स यांच्यापासून वेगळ्या झाल्या होत्या. पण तोपर्यंत त्यांचा घटस्फोट झालेला नव्हता. 31 ऑगस्ट 1997 रोजी डायना यांचा एका कार अपघातात मृत्यू झाला.

अर्ल स्पेन्सर यांच्याकडून आरोप

डायना यांच्या मुलाखतीनंतर त्यांचे भाऊ अर्ल स्पेन्सर यांनी ही मुलाखत खोटेपणाने मिळवण्यात आल्याचे आरोप केले होते.

डायना यांच्याशी ओळख करून देण्यासाठी बशीर यांनी अर्ल यांना बनावट बँक स्टेटमेंट दाखवलं होतं, असा आरोपही अर्ल यांनी त्यावेळी केला होता.

गेल्या वर्षी अर्ल स्पेन्सर यांनी सार्वजनिक व्यासपीठावरसुद्धा हे आरोप केले. त्यानंतर बीबीसीने या प्रकरणी एक स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त केली होती. याबाबत बीबीसीने केलेली बातमी तुम्हाला याठिकाणी वाचता येईल

त्यानंतर डायसन यांच्या समितीने दिलेला अहवाल गुरुवारी (20 मे) प्रकाशित करण्यात आला आहे.

58 वर्षीय बशीर हे युकेमधील एक अत्यंत नावाजलेले पत्रकार म्हणून ओळखले जातात.

डायना यांच्या मुलाखतीप्रमाणेच बशीर यांनी 2003 मध्ये घेतलेली पॉपस्टार मायकल जॅक्सन यांची मुलाखतही चांगलीच गाजली होती.

आरोग्यविषयक समस्यांमुळे मार्टिन बशीर यांनी गेल्या आठवड्यातच बीबीसीच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. ते 2016 पासून बीबीसीचे धार्मिक विषयांचे प्रतिनिधी आणि संपादक होते.

या प्रकरणी बीबीसीचे अध्यक्ष रिचर्ड शार्प यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. लॉर्ड डायसन यांच्या समितीने दिलेला अहवाल बीबीसी कोणताही खुल्या मनाने स्वीकारत आहे. अशा चुका नक्कीच अस्वीकारार्ह आहेत. ही ऐतिहासिक चूक होती, हे आम्ही मान्य करतो, असं शार्प यांनी म्हटलं.

अहवालाच्या पूर्वसंध्येला अर्ल स्पेन्सर यांनी त्यांचा आणि युवराज्ञी डायना यांचा बालपणातला एक फोटो ट्वीटर केला आहे. काही नाती कायमची असतात, असं कॅप्शन त्यांनी फोटोसोबत जोडलं आहे.

पॅनोरामाने या मुलाखतीबाबत केलेल्या तपासाचा अहवाल पुढील आठवड्यात बीबीसी वन या चॅनेलवर प्रसारित केला जाणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)