इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष: 'अल-जझीरा आणि एपीचे ऑफिस असलेल्या इमारतींवरील हल्ला योग्यच' - नेत्यानाहू

गाझा सिटी येथील अल जल्ला नावाच्या इमारतीवर इस्रायलने हवाई हल्ला केला. याच इमारतीमध्ये असोसिएट प्रेस आणि अल जझीरा या दोन वृत्तसंस्थांची कार्यालयं होती. या हल्ल्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी या हल्ल्याचं समर्थन केलं आहे.
नेत्यानाहू म्हणाले की याच "इमारतीमध्ये पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी आश्रय घेतला होता. त्यामुळे या इमारतीला लक्ष्य करणे हे काही चुकीचे नाही. पण मी तुम्हाला खात्री देतो की या हल्ल्यात कोणत्याही सामान्य नागरिकाला इजा झालेली नाही, किंबहुना एकही मृत्यू झालेला नाही."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
नेमकं काय झालं होतं?
शनिवारी (15 मे) इस्रायलच्या हवाई हल्ल्यात अमेरिकेतील वृत्तसंस्था 'द असोसिएट प्रेस' (एपी) आणि कतारमधील न्यूज चॅनल अल-जझीरासह इतर अनेक परदेशी मीडिया संस्थांची कार्यालयं असणारी इमारत जमीनदोस्त झाली.
एपी आणि अल-जझीरा यांनी कठोर शब्दात या हल्ल्याचा निषेध केला आहे.
हा हल्ला 'भयंकर आणि आश्चर्यचकित करणारा' असल्याचं एपीने म्हटलं आहे, तर इस्रायल पत्रकारांना गाझापट्टीत त्यांचं कर्तव्य बजावण्यापासून रोखत असल्याचं' अल-जझीराने म्हटलं आहे.
शनिवारी (15 मे) आपण इस्रायलच्या सैन्याला अनेक कॉल करून हा हल्ला रोखण्याची विनंती केली, पण त्यांनी हल्ला थांबवला नाही, असं एपीने म्हटलं आहे.
एपीने यासंदर्भात काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे, "या इमारतीत हमासचं अस्तित्व असल्याचे पुरावे द्या, अशी विनंती आम्ही इस्रायल सरकारला केली होती. पण, त्यांनी असा कुठलाच पुरावा दिला नाही. गेल्या 15 वर्षांपासून एपीचं ब्युरो ऑफिस या इमारतीत होतं. या इमारतीत हमास असल्याचे कुठलेही संकेत आजवर मिळाले नव्हते. ही अत्यंत भयंकर परिस्थिती आहे. गाझापट्टीत जे काही घडतंय त्याची फारशी माहिती यापुढे जगाला कळणार नाही. आमची कार्यालयं उद्ध्वस्त झाली आहेत."

फोटो स्रोत, Reuters
एपी या अमेरिकी वृत्तसंस्थेने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, "शनिवारी ज्यावेळी इस्रायलने हल्ल्याची माहिती दिली त्यावेळी आमचे 12 पत्रकार गाझा ब्युरोत काम करत होते. इस्रायली सैन्याने इमारत सोडण्यासाठी केवळ तासाभराचा वेळ दिला होता.

फोटो स्रोत, EPA
सुदैवाने आमचे पत्रकार गरजेचं थोडं-फार साहित्य घेऊन इमारत सोडण्यात यशस्वी झाले. त्यानंतर थोड्याच वेळात इस्रायलची तीन क्षेपणास्त्रं या 12 मजली इमारतीवर कोसळली आणि बघता बघता इमारतीच्या जागी धुराचे लोट उठू लागले."
प्रसार माध्यम स्वातंत्र्यासाठी आवाज उठवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांनीही इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे.
इस्रायल करत असलेल्या कथित युद्धगुन्ह्यांची माहिती जगाला मिळू नये, यासाठी ते मीडियाच्या कामाला सेन्सॉर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या संस्थांनी केला आहे.
'हा हल्ला म्हणजे मानवाधिकारांचं उल्लंघन'
जी बहुमजली इमारत आपण पाडली त्यात प्रसार माध्यमांची कार्यालयं, काही घरं आणि त्यासोबतच त्या इमारतीच्या कुठल्यातरी मजल्यावर कट्टरतावादी संघटना असलेल्या हमासच्या सैन्याची एक गुप्त टीम बसत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती, असं स्पष्टीकरण इस्रायलने दिलं आहे.
अल-जझीराने आपल्या बातमीत म्हटलं, "अल-जला नावाच्या इमारतीत अनेक कार्यालयं होती आणि बरेच जणांची घरंही होती. इमारत रिकामी करण्यासाठी इस्रायलच्या सैन्याने केवळ तासाभराचा वेळ दिला. फोनवरून याची माहिती देण्यात आली होती. आम्ही आणखी थोडा वेळ देण्याची विनंती केली त्यावर आम्ही काहीही करू शकत नसल्याचं सांगण्यात आलं."

फोटो स्रोत, EPA
अल-जझीरा मीडिया नेटवर्कचे कार्यवाहक महासंचालक डॉ. मुस्तफा सुआग म्हणाले, "मीडियाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या या क्रूर हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय समुदायाने निषेध करावा, असं आम्हाला वाटतं. या हल्ल्यावरून इस्रायलवर कारवाई व्हावी, अशीही आमची इच्छा आहे. इस्रायल मीडियाची मुस्कटदाबी करू इच्छितो. मीडियाने गाझापट्टीतील लोकांना समस्यांविषयी मीडियाने बोलू नये, असं त्यांना वाटतं."
त्यांनी म्हटलं, "अल-जला इमारतीवर झालेला हल्ला मानवाधिकारांचं उल्लंघन आहे. हा एक गुन्हा आहे. केवळ अल-जझीराच नाही तर इतरही अनेक आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांची मुख्यालयं या इमारतीत असल्याचं इस्रायला माहिती होतं आणि याची पूर्ण कल्पना असूनही त्यांनी या इमारतीला लक्ष्य केलं. पत्रकारिता म्हणजे गुन्हा नव्हे, ज्यासाठी इस्रायल अशी शिक्षा देण्याचा प्रयत्न करतोय."
अनेकांवर बेघर होण्याची वेळ
गेल्या 15 वर्षांपासून अल-जला इमारतीचा सर्वात वरचा मजला इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातल्या संघर्षाचं वार्तांकन करण्यासाठीचा केंद्र बिंदू होता, असं असोसिएट प्रेसने म्हटलं आहे. 2009, 2012 आणि 2014 सालीही हिंसक संघर्ष झाले, मात्र त्यावेळीही आम्ही इथूनच काम केल्याचं एपीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

फोटो स्रोत, ALJAZEERA.COM
'द असोसिएट प्रेस'चे अध्यक्ष आणि चीफ एक्झिक्युटिव्ह गॅरी प्रूइट यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे, "या हल्ल्याने आम्हाला धक्का बसला आहे. हे भयंकर आहे. ज्या ठिकाणावरून अनेक आंतरराष्ट्रीय मीडिया संस्था माहिती पाठवत होत्या त्या इमारतीवर हल्ला करून इस्रायल मीडियाला लक्ष्य करेल, असं आम्हाला वाटलं नव्हतं. शनिवारी जे घडलं त्याचा परिणाम असा होईल की, जगाला गाझापट्टीत काय सुरू आहे, याची त्रोटक माहिती मिळेल आणि हे चुकीचं आहे. आमचे लोक थोडक्यात बचावले आहेत."
अल-जला इमारतीत राहणाऱ्या अनेक कुटुंबीयांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.
अल-जझीराने अल-जला इमारतीचे मालक जवाद मेहदी यांचा एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यात ते पत्रकारांना आपले कॅमेरे आणि महागडी उपकरणं बाहेर काढण्यासाठी आणखी 10 मिनिटांचा वेळ द्यावा, अशी विनंती इस्रायलच्या सैन्याला करताना दिसत आहेत.
'निर्दोष इमारत नाही'
अल-जलाचे मालक जवाद मेहदी फोनवर म्हणतात, "मी तुम्हाला केवळ चार लोकांची परवानगी मागतोय. त्यांना आता जाऊन कॅमेरे घेऊ द्या. तुम्हाला जे हवंय त्याचा आम्ही आदर करतो. पण, आम्हाला फक्त एवढं करू द्या. आम्हाला फक्त 10 मिनिटं द्या."

फोटो स्रोत, EPA
मात्र, इस्रायलच्या सैन्य अधिकाऱ्यांनी ही मागणी मान्य करण्यास नकार दिला. त्यावर मेहदी म्हणतात, "तुम्ही आमची संपत्ती, आमचं काम, आमच्या आठवणी आणि आमचं आयुष्य उद्धवस्त केलं आहे. मी फोन ठेवतो, तुम्हाला जे करायचं ते करा. पण, तुमच्या वरही ईश्वर आहे आणि तो सगळं बघतोय, हे लक्षात ठेवा."
हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यात त्यांनी म्हटलं, 'हमासही या इमारतीचा वापर करत होता. ही काही निर्दोष इमारत नव्हती.'
गेल्या काही दिवसात इस्रायलच्या सैन्याने हेच कारण देत हवाई हल्ला करून गाझापट्टीतील अनेक बहुमजली इमारती जमीनदोस्त केल्या. हमासकडून पत्रकारांचा मानवी-कवच म्हणूनही वापर व्हायचा, असंही इस्रायलच्या सैन्याचं म्हणणं आहे. मात्र, आपले दावे सिद्ध करण्यासाठी इस्रायलने आजवर कुठलाही पुरावा दिलेला नाही.
शनिवारच्या हल्ल्यानंतर अमेरिकेनेही इस्रायलला पत्रकारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितलं आहे.
व्हाईट हाउसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी ट्वीट करत म्हटलं, "आम्ही इस्लायलला स्पष्टपणे सांगितलं आहे की सर्व पत्रकार आणि स्वतंत्र मीडिया संस्थांची सुरक्षा सुनिश्चित करणं तुमची महत्त्वाची जबाबदारी आहे."
द फॉरेन प्रेस असोसिएशन, कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट आणि द इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्युटसह इतरही अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी इस्रायलच्या या हल्ल्याचा निषेध केला आहे.
इस्रायलचं सैन्य आणि आंतरराष्ट्रीय मीडिया यांच्यात पूर्वीपासूनच कठोर संबंध आहेत आणि आंतरराष्ट्रीय मीडिया आपल्याप्रती पक्षपाती असल्याचाही इस्रायलचा आरोप आहे, असं एपीने म्हटलं आहे. आपल्या रिपोर्टमध्ये ते पुढे असंही म्हणतात की इस्रायल गाझापट्टीत जमिनीवरून मारा करण्याची तयारी करत असल्याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांमध्ये येऊ लागल्यावर शनिवारी इस्रायलने गाझापट्टीतील 'मीडिया टॉवर'ला लक्ष्य केलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








