इस्रायल : अशांतता पसरल्याने लोड शहरात आणीबाणी, हमासकडून तेल अविववर रॉकेट्सचा मारा

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायलमधल्या लोड (Lod) या मध्यवर्ती शहरामध्ये उसळलेल्या दंगलींनंतर या शहरात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. तर गाझापट्टीतल्या एका बहुमजली इमारतीवर इस्रायलने हवाई हल्ला करून ती पाडल्यानंतर आपण इस्रायलमधल्या तेल अविव शहरावर 1000 क्षेपणास्त्रं डागल्याचं पॅलेस्टाईन कट्टरवाद्यांनी म्हटलंय.
लोड शहरामध्ये उसळलेल्या दंगलींमध्ये इस्रायली अरबांचा सहभाग होता. यामध्ये गाड्या पेटवून देण्यात आल्या. तर एका कारवर रॉकेट आदळल्याने इस्रायली अरब बाप-लेकीचा यात मृत्यू झाला.
गाझामधल्या द हनाडी टॉवर या 13 मजली इमारतीवर हवाई हल्ला करण्यात आला. हल्ला होण्याच्या दीड तास आधीच इथले रहिवासी आणि स्थानिकांनी परिसर रिकामा करावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या, असं रॉयटर्स वृत्तसंस्थेने म्हटलंय.
पण आपण रॉकेट्सनी हल्ला करत गाझामधल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करत असल्याचं इस्रायलच्या सैन्याने म्हटलंय.
गेल्या काही वर्षांमधला हा सर्वांत भयानक हिंसाचार असून यामध्ये आतापर्यंत 40 जण मारले गेले आहेत.
सोमवार संध्याकाळपासून पॅलेस्टाईन कट्टरवाद्यांनी मध्य आणि दक्षिण इस्रायलच्या दिशेने हजारापेक्षा जास्त रॉकेट्स डागली असल्याचं इस्रायलच्या लष्कराने म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images
तर इमारतींवर हवाई हल्ला करण्यात आल्यानंतर तेल अविव आणि बीरशेबावर 200 पेक्षा जास्त क्षेपणास्त्रं डागल्याचं पॅलेस्टाईन कट्टरवाद्यांनी म्हटलंय.
तेल अविवजवळच्या लोड शहरात इस्रायली अरबांनी निदर्शनं केली. त्याचं रूपांतर नंतर दंगलींत झालं. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, तर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी स्टेन ग्रेनेड वापरले. या दंगलींत 12 जण जखमी झाले आहेत.
एका कारवर रॉकेट आदळल्याने इस्रायली अरब बाप-लेकीचा यात मृत्यू झाला, तर आई या हल्ल्यात जखमी झाल्याची बातमी टाईम्स ऑफ इस्रायलने दिली आहे.

फोटो स्रोत, EPA
सिनेगॉग आणि काही दुकानंही पेटवून देण्यात आल्याचं इस्रायली माध्यमांनी म्हटलंय.
जेरूसलेममध्ये अशांतता निर्माण झाल्यानंतरच्या गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही बाजूंनी शांतता बाळगण्याचं आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाकडून करण्यात येतंय.
कट्टरवाद्यांनी इस्रायलमधल्या जेरुसलेम आणि इतर भागांच्या दिशेने शेकडो रॉकेट्स डागलेली आहेत.
इस्रायलमधल्या या भागांमध्ये 3 जण मारले गेले आहेत. तर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 28 पॅलेस्टाईन नागरिक मारले गेले आहेत.
हमास या कट्टरवादी गटाने गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच जेरुसलेमच्या दिशेने रॉकेट्स डागत मर्यादेचं उल्लंघन केलं असल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलंय.
गाझावर हमासचा ताबा आहे. आणि जेरुसलेममधल्या अल्-अक्सा मशीदीचं आपण इस्रायली आक्रमकपणा आणि दहशतवादापासून संरक्षण करायचा प्रयत्न करत असल्याचं हमासने म्हटलंय.
मुस्लिम आणि ज्यूंसाठी पवित्र अशा या मशिदीच्या इथे सोमवारी इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टाईन नागरिकांमध्ये झटापटी झाल्या होत्या.

फोटो स्रोत, EPA
2017नंतरचा हा जेरूसलेममधला सगळ्यात भयंकर हिंसाचार आहे. जेरुसलेमच्या पूर्वेला राहणाऱ्या पॅलेस्टाईन कुटुंबांना त्यांच्या राहत्या घरातून हुसकावण्याचा प्रयत्न ज्यू लोक करत असल्याच्या रागातून हा हिंसाचार उफाळून आला. शहराच्या अरब बहुल भागात आंदोलक आणि पोलिसांमध्ये होत असलेल्या चकमकींमुळे इथे गेला महिनाभर तणाव होता.
सध्याच्या युद्धाविषयी
'शत्रूने निवासी इमारतींना लक्ष्य केल्याने' आपण तेल अविव आणि त्याच्या उपनगरांवर रॉकेट्स डागल्याचं हमासने म्हटलंय.
रात्रीच्या अंधारात शहराच्या आकाशातून उजेडाचा ओरखडा उठवत जाणारी, इस्रायलची प्रतिरोधक रॉकेट्स डागल्यानंतर स्फोट होणारी काही क्षेपणास्त्रं व्हीडिओमध्ये दिसतात.
तेल अविव जवळच्या रिशॉन लझिऑनमध्ये रॉकेट हल्ल्यात 50 वर्षांची एक महिला मारली गेल्याचं इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

फोटो स्रोत, EPA
तेल अविवमधल्या हॉलॉन उपनगरात रॉकेट एका रिकाम्या बसवर आदळल्याचं इस्रायल पोलिसांचे प्रवक्ते मिकी रोझनफेल्ड यांनी AFP वृत्तसंस्थेला सांगितलं. या शहरात 5 वर्षांची एक मुलगी आणि दोन महिला जखमी झाल्या आहेत.
तेल अविव शहरामध्ये सायरन वाजल्याबरोबर पादचाऱ्यांनी आसरा घेण्यासाठी पळायला सुरुवात केली तर रेस्टॉरंटमध्ये जेवणारे बाहेर पडू लागले, अनेकांनी रस्त्याच्या कडेला आडवं होत बचावाचा प्रयत्न केल्याचं रॉयटर्सने म्हटलंय.

फोटो स्रोत, Reuters
बेन गुरियन विमानतळावरची विमानसेवा काही काळ थांबवण्यात आली होती. तर एलियात आणि अश्केलॉन शहरादरम्यानच्या इंधन पाईपलाईनवरही रॉकेट आदळलं.
गाझामधला हनाडी टॉवरवर पाडण्यात आल्यानंतर ही रॉकेट्स तेल अविववर डागण्यात आली. हनाडी टॉवरमध्ये हमासच्या राजकीय नेत्यांचं ऑफिस होतं.
ही इमारत कोसळल्याच्या काही तासांनंतरही जीवितहानीचं वृत्त समजू शकलं नाही.
आणखी एक बहुमजली इमारतही रिकामी करण्यात आल्यानंतर त्यावर इस्रायलने हल्ला करत ती पाडल्याचं वृत्त आहे.
ही 'इस्रायलच्या हल्ल्याची फक्त सुरुवात असल्याचं' संरक्षण मंत्री बेनी गँट्झ यांनी म्हटलंय.
"दहशतवादी गटांवर जोरदार हल्ला करण्यात आला असून त्यांनी इस्रायलवर हल्ला करायचं ठरवल्याने आम्ही हे हल्ले करत राहू आणि लवकर दीर्घ काळासाठीची शांतता परतेल," ते म्हणाले.
तर इस्रायलने हे प्रकरण वाढवलं तर आपण त्यासाठी तयार असल्याचं हमासने म्हटलंय.
या हल्ल्यांविषयीची चर्चा करण्यासाठी बुधवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक होणार आहे.
हमासने पाच मिनिटांच्या काळात 137 रॉकेट्स डागली आणि युद्ध असंच सुरू राहिल्यास असेच आणखी धक्के देण्याची आपली तयारी असल्याचं त्यांनी म्हटलंय.

फोटो स्रोत, Reuters
या हल्ल्यानंतर इस्रायलच्या हॉस्पिटल्समध्ये 95 लोकांवर उपचार करण्यात आले. तर यापैकी 90 टक्के रॉकेट्सना आपण प्रतिहल्ला करत रोखल्याचं इस्रायली लष्कराने म्हटलंय.
कशामुळे सुरू झाला हिंसाचार?
पूर्व जेरुसलेममध्ये पवित्र ठिकाणी इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टाईन नागरिकांमध्ये झालेल्या झटापटींनंतर इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू झालं.
ही जागा मुस्लिम आणि ज्यू दोघांसाठीही पवित्र आहेत. मुस्लिम याला हराम अल् - शरीफ ( पवित्र ठिकाण) म्हणतात तर ज्यू याला टेंपल माऊंट म्हणून ओळखतात.

फोटो स्रोत, AFP
इस्रायलने इथून आणि जवळच्या अरब बहुल शेख जराह भागातून पोलीस हटवावेत अशी मागणी हमासने केली. या भागात पॅलेस्टाईन कुटुंबांना ज्यू नागरिक हुसकावत असल्यावरून वाद सुरू झाला होता.
जेरुसलेममधला पूर्व भाग हा आपल्या होऊ घातलेल्या देशाची राजधानी असल्याचा पॅलेस्टाईनचा दावा आहे.
न सुटलेल्या तिढ्याची भळभळती जखम
जेरेमी बोवेन, मिडल-ईस्ट संपादक
नव्याने होत असलेल्या या हिंसाचारामागचं मूळ कारण जुनंच आहे. ज्यू आणि अरबांमधली ही भळभळती जखम आहे. आणि यामुळे पिढ्यान पिढ्या पॅलेस्टाईन आणि इस्रायली जीव गेले आहेत.

फोटो स्रोत, MAHMUD HAMS/GETTY IMAGES
जेरुसलेममधल्या तणावामुळे सध्याचा हा हिंसाचार घडतोय. जुन्या शहारातली ही पवित्रं ठिकाणं राष्ट्रीय आणि धार्मिक मानचिन्हं आहेत आणि त्यांच्यावरून होणाऱ्या वादातून अनेकदा हिंसाचार उफाळून येतो.
इस्रायली पोलिसांनी रमझानदरम्यान पॅलेस्टिनी नागरिकांवर लक्ष ठेवणं आणि इस्रायलली कोर्टाने पॅलेस्टिनी नागरिकांना त्यांचं घर सोडण्याचा आदेश देण्यावरून या वादाची यावेळी ठिणगी पडली.
पण इतर काही घटनांमुळेही हे घडलंच असतं. हा वाद होणारच होता.
दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आपापल्या बाजू भक्कम करण्यावर लक्ष्य केंद्रित केलंय. पण शांतता प्रस्थापित करण्याच्या आव्हानाकडे गेल्या काही वर्षांमध्ये कोणीही गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








