इराणचे अणुशास्त्रज्ञ मोहसीन फखरीजादेह यांची हत्या का करण्यात आली?

अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह

फोटो स्रोत, HAMSHAHRIONLINE

फोटो कॅप्शन, अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह
    • Author, डॉ. मसुमेह तोरफेल
    • Role, रिसर्च असोसिएट, एलएसई अँ सोआस

इराणमधील बहुतांश नागरिकांना शुक्रवारपर्यंत त्यांच्या देशातील अणुशास्त्रज्ञ मोहसीन फखरीजादेह यांच्याबद्दल फारशी माहितीही नव्हती. शुक्रवारी अणुशास्त्रज्ञ मोहसीन फखरीजादेह यांची हत्या करण्यात आली.

मात्र, इराणच्या अणवस्त्र मोहिमेतील लोकांना मोहसीन फखरीजादेह यांची चांगलीच माहिती होती. पाश्चिमात्य देशातील सुरक्षातज्ज्ञ त्यांना इराणच्या अणवस्त्र मोहिमेचे प्रमुख मानत होते.

इराणमधील प्रसारमाध्यमांनी अणुशास्त्रज्ञ मोहसीन फखरीजादेह यांना फारसं महत्त्व देणं टाळलं आहे. इराणच्या माध्यमांनी त्यांना एक शास्त्रज्ञ आणि संशोधक म्हटलं आहे. कोव्हिड-19 साठी देशांतर्गत टेस्ट किट विकसित करण्यासाठी ते प्रयत्न करत होते.

अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA

लंडनच्या इंटरनॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटिजिक स्टडीज'चे असोसिएट फेलो मार्क फिट्जपॅट्रीक इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमावर लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी ट्वीट केलंय, "इराणचा अणवस्त्र कार्यक्रम कोणत्या एका व्यक्तीवर अवलंबून असण्याच्या स्थितीपासून खूप पुढे निघून गेला होता."

हत्या करण्याचं कारण?

अणुशास्त्रज्ञ मोहसीन फखरीजादेह यांच्यावर हल्ला झाला. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक सुरक्षारक्षक उपस्थित होते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, इराण त्यांच्या सुरक्षेच्या मुद्यावर किती गंभीर होता. अशा परिस्थितीत त्यांच्या हत्येचं कारण अणवस्त्र मोहिमेपेक्षा राजकीय असल्याचे जास्त संकेत मिळत आहेत.

मोहसीन फखरीजादेह यांच्या हत्येची दोन कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे, अमेरिकेत नवीन येणाऱ्या जो बायडेन प्रशासनामुळे इराण आणि अमेरिका यांच्यातील परस्परसंबंध सुधारण्याची शक्यता संपवणं. दुसरं कारण म्हणजे, इराणला याचं प्रत्युत्तर देण्यासाठी उकसवणं.

इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी

फोटो स्रोत, EPA/IRANIAN PRESIDENCY OFFICE

फोटो कॅप्शन, इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी

इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी या हत्याकांडावर प्रतिक्रिया देताना म्हणतात, "शत्रूला गेल्या काही दिवसापासून तणावपूर्ण वातावरणाचा सामना करावा लागत आहे."

ते पुढे म्हणतात, "जगभरात परिस्थिती बदलत असल्याची त्यांना चिंता आहे आणि या परिसरातील परिस्थिती अस्थिर करण्यात ते आपला वेळ खर्ची करत आहेत."

इस्रायल आणि सौदी अरेबिया

जेव्हा रुहानी शत्रूंबद्दल बोलतात, तेव्हा त्यांचा निशाणा ट्रंप सरकार, इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्याकडे असतो.

इस्रायल आणि सौदी अरेबिया, अमेरिकेत जो बायडेन राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर या परिसरातील राजकारणात होणारे बदल आणि त्याच्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांमुळे चिंतेत सापडले आहेत.

आपल्या निवडणुक प्रचारात बायडेन यांनी स्पष्ट केलं होतं की, इराण पुन्हा अणवस्त्र कराराच्या बाजूने जोडला जावा अशी त्यांची इच्छा आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2015 साली इराणसोबत अणवस्त्र संधी केली होती. 2018 मध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी हा करार रद्द केला.

अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह या कारमध्ये होते.

इस्रायलमधील माध्यमांच्या माहितीनुसार, एका कथित बैठकीदरम्यान इस्रायल आणि सौदी अरेबियाने इराणबाबत चर्चा केली होती. ही बैठक इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान यांच्यात गेल्या रविवारी नियोममध्ये झाली.

राजकीय पाऊल

सौदी अरेबियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अशी बैठक झाल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे.

मिळालेल्या माहितीप्रमाणे, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू, सौदी अरेबिया आणि इस्राइलच्या परस्परसंबंधाबाबत मोहम्मद बिन सलमान यांचं मन वळवण्यात अयशस्वी ठरले.

सोमवारी, येमेनमध्ये इराणचे समर्थक हूथी विरोधकांनी जेद्दाहमध्ये सौदी तेल कंपनी 'आरामको' वर हल्ला केला. तेव्हा इराणला या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाची थट्टा उडवण्याची एक संधी मिळाली.

अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह

फोटो स्रोत, Empics

इराणमधील कट्टरपंथी प्रेस ने हूथी विरोधकांनी 'कुद्स-2' मिसाईलच्या मदतीने केलेल्या या साहसी हल्ल्याची स्तुती केली.

मेहर न्यूज एजेंसीच्या माहितीप्रमाणे, "हे एक राजकीय पाऊल होतं. सौदी आणि इस्राइलच्या मिटिंगच्या वेळी हे एक चांगलं टायमिंग होतं. त्याचसोबत एका चुकीच्या पावलाचे परिणाम काय होऊ शकतात. हे याच्या माध्यमातून दाखवण्यात आलं."

इराणचे प्रमुख अणवस्त्र ठिकाणं

अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी आपलं पुस्तक 'द रूम व्हेअर इट हॅपेंड'मध्ये सांगितलंय की, "ट्रंप प्रशासनाच्या दृष्टीत इराणच्या हूथी विरोधकांना दिलं जाणारं समर्थन म्हणजे, मध्य-पूर्व भागात अमेरिकेच्या हितांच्या विरोधात एक मोहीम होती."

नियोममध्ये झालेल्या बैठकीची व्यवस्था अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोंपियो यांनी केली होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ते, कतार आणि यूएईच्या दौऱ्यावर होते. मात्र, त्यांच्या चर्चेचा प्रमुख मुद्दा होता इराण.

इराण

फोटो स्रोत, WANA VIA REUTERS

अमेरिकन माध्यमांच्या माहितीनुसार, दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी आपल्या सहकाऱ्यांना इराणच्या प्रमुख अणुकार्यक्रमाच्या ठिकाणावर सैन्य कारवाई करण्याचा पर्याय उपलब्ध आहे का? अशी विचारणा केली होती. सत्ता सोडण्यापूर्वी इराणसोबत दोन हात करण्याची ट्रंप यांची इच्छा असल्याची माहिती आहे.

जानेवारी महिन्यात, ट्रंप यांनी इकारमध्ये इराणचे सैन्यदल प्रमुख जनरल कासिम सुलेमानीचा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर स्तुती केली होती.

कासिम सुलेमानी यांची हत्या

सुलेमानी यांची हत्या त्यांच्या आदेशावरून झाल्याचं ट्रंप यांनी सांगितलं होतं. त्यानंतर 'युएन' च्या एका दूताने याला अवैध म्हटलं होतं.

या हत्यांचा राष्ट्रपतींनी विरोध केला नाही. दुसरीकडे, अणुशास्त्रज्ञ मोहसिन फ़खरीजा़देह यांच्या हत्येनंतर, या हत्येमागे इस्रायल असल्याचं इराणच्या राष्ट्रपतींनी म्हटलं होतं.

तेहरान

फोटो स्रोत, Reuters

2018 मध्ये एका टीव्ही मुलाखतीत इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमात अणुशास्त्रज्ञ मोहसीन फखरीजादेह यांची प्रमुख भूमिका असल्याचं वक्तव्य केलं होतं.

इस्रायलची चिंता

नवीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कारकीर्दीतही अमेरिका इस्रायलच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करेल याची खात्री इस्रायलला आहे. मात्र इस्रायलला चिंता नवनिर्वाचित परराष्ट्रमंत्री एंटोनी ब्लिंकेन यांची आहे.

ब्लिंकेन इराणसोबत झालेल्या अण्वस्त्र कराराचे खंदे समर्थक आहेत. ब्लिंकेन यांनी तेलअविवमध्ये असलेला अमेरिकेचा दूतावास यरूशलमला नेण्याच्या ट्रंप सरकारच्या निर्णयाला विरोध केला होता.

सुरक्षा आणि यंत्रणांची चूक

इराणच्या एक्सपीडियंसी काउंसिलचे प्रमुख मोहसेन रेजाई यांनी या घटनेमागे सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांची चूक असल्याचा संकेत दिलाय.

ते म्हणतात, "इराणच्या गुप्तचर यंत्रणांना देशात शिरलेल्या आणि दुसऱ्या देशाच्या गुप्तचरांचा शोध घ्यायला हवा. हत्या करणाऱ्या टीमचा प्रयत्न मोडून काढला पाहिजे."

अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह

फोटो स्रोत, Reuters

दुसरीकडे, सोशल मीडियावर असणारे अनेक इराणी नागरिक हा प्रश्न विचारतायत की, सैन्य आणि गुप्तचर यंत्रणा असूनही सुरक्षा घेऱ्यातील व्यक्तीची दिवसाढवळ्या हत्या कशी शक्य झाली?

आता ट्रंप सरकार जात असताना, इस्रायल आणि सौदी अरेबियाकडे कोणीही प्रमुख मित्र नाही. अशी परिस्थितीत इराण बायडेन सरकारकडून निर्बंध कमी करण्यासाठी आणि अर्थव्यवस्था पुन्हा नव्याने उभारण्यासाठी एक संधी मिळेल, अशी अपेक्षा ठेऊन आहेत.

(डॉ. मसुमेह तोरफेल लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स आणि स्कूल ऑफ ओरिएंटल आणि अफ्रिकन स्टडीजमध्ये रिसर्च असोसिएट आहेत. त्या राण, अफगाणिस्तान आणि मध्यपूर्व आशियातील राजकारणाच्या तज्ज्ञ आहेत.)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)