मालदीव : माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद बॉम्ब हल्ल्यात जखमी, प्रकृती गंभीर

फोटो स्रोत, Reuters
मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्यावर गुरुवारी (6 मे) एक बॉम्बहल्ला करण्यात आला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
या स्फोटात एका ब्रिटिश नागरिकासह इतर चार जण जखमी झाले आहेत. हा एक दहशतवादी हल्ला असल्याचा दावा मालदीव सरकारकडून केला जात आहे.
आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याच संघटनेने घेतलेली नाही. बॉम्बस्फोटाचा तपास करण्यासाठी ऑस्ट्रेलिया मालदीवचं सहकार्य करणार असून त्यांचं एक पोलीस पथक लवकरच मालदीवला दाखल होणार आहेत.
मोहम्मद नशीद हे 2008 मध्ये राष्ट्राध्यक्षपदी निवडण्यात आले होते. पण चार वर्षांनंतर त्यांच्याविरुद्ध बंडखोरी झाली होती. त्यानंतर नशीद यांना आपल्या पदावरून हटावं लागलं होतं.
सध्या नशीद हे मालदीवच्या संसदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मालदीवमध्ये हे पद दुसऱ्या क्रमांकाचं शक्तिशाली पद म्हणून ओळखलं जातं.
मालदीव देश आपल्या लक्झरी हॉलीडे रेसॉर्टकरिता ओळखला जातो. पण या देशात राजकीय उलथापालथही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.
त्याशिवाय, मालदीव इस्लामिक कट्टरवादालाही तोंड देत आहे. 53 वर्षीय मोहम्मद नशीद कट्टरवादी इस्लामिक विचारसरणीचे विरोधक मानले जातात.
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम सोलिह यांनी मोहम्मद नशीद यांच्या घराबाहेर झालेल्या या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे.
मालदीवच्या लोकशाही आणि अर्थव्यवस्थेवरचा हा हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
मालदीवमधील नशीद यांच्या माले येथील घरासमोरील बॉम्बहल्ला स्थानिक प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजून 39 मिनिटांनी करण्यात आला.

फोटो स्रोत, Reuters
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, घरातच बनवण्यात आलेल्या काही स्फोटक वस्तू नशीद यांच्या कारजवळ एका दुचाकी गाडीवर ठेवण्यात आल्या होत्या.
या हल्ल्याची जबाबदारी घेण्यास अद्याप कोणतीही संघटना पुढे आलेली नाही. पण हा एक दहशतवादी हल्ला असल्याचे संकेत मिळत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 450 अधिकाऱ्यांना काम देण्यात आलं आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त मोहम्मद हमीद यांनी दिली.
ऑस्ट्रेलिया फेडरल पोलिसांचे दोन तज्ज्ञ शनिवारी (8 मे) मालदीवमध्ये दाखल होणार आहेत. मालदीव येथील एखाद्या गुन्ह्याच्या प्रकरणात ऑस्ट्रेलियन पोलिसांकडून मदत मिळण्याचा हा दुसरा प्रसंग आहे. यापूर्वी, 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया पोलीस आणि FBI ने तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला अमीन यांच्या स्पीडबोटमध्ये झालेल्या स्फोटाच्या तपासात मदत केली होती.
ड्रग्ज आणि गुन्ह्यांच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र कार्यालयाचे दोन ब्रिटिश अधिकारीही तपासात मदत करत आहेत.
नशीद यांना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या नशीद हे ICU मध्ये असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या हल्ल्यात नशीद यांच्यासह त्यांचे दोन अंगरक्षक आणि इतर दोन सर्वसामान्य नागरिक जखमी झाले आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
अधिकाऱ्यांच्या मते, त्यांच्यापैकी एक जण ब्रिटिश नागरिक असून त्याचं नाव अद्याप सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करण्यात आलं नाही.
या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल. दोषींना कठोर शिक्षा करण्यात येईल, असं वक्तव्य राष्ट्राध्यक्ष सोलिह यांनी केलं आहे.
दरम्यान, नशीद यांना दाखल करण्यात आलेल्या रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक जमा होत आहेत.
मोहम्मद नशीद कोण आहेत?
मोहम्मद नशीद सध्या मालदीवच्या राजकारणातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.
2008 मध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर 2012 मध्ये त्यांच्याविरोधात बंड झालं होतं. त्यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आलं.

फोटो स्रोत, AHMED SHURAU
पुढे दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत नशीद यांची रवानगी तुरुंगातही करण्यात आली होती. त्यांच्यावर एका विद्यमान न्यायमूर्तींच्या अटकेचे आदेश दिल्याबाबत गुन्हा सिद्ध झाला होता.
पण आपल्या मणक्याच्या आजारावर उपचार करण्यासाठी ब्रिटनला जाण्याची परवानगी नशीद यांना देण्यात आली होती.
दरम्यान, 2016 मध्ये नशीद यांना अभय देण्यात आलं.
2018 मध्ये नशीद यांच्या पक्षाने राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवला. त्यानंतर नशीद मालदीवमध्ये परतले आणि संसदेचं अध्यक्षपद स्वीकारलं.
मोहम्मद नशीद हे हवामान बदल याबाबतचं काम आणि धार्मिक कट्टरवादाचा विरोध यांसाठी ओळखले जातात. मालदीव एक सुन्नी मुस्लीमबहुल राष्ट्र आहे. भारतीय उपखंडाच्या दक्षिण-पश्चिमेला मालदीव देशाची 1192 वेगवेगळी बेटं आहेत.
मालदीवमध्ये दीर्घ काळ राष्ट्राध्यक्ष पदावर राहिलेल्या मॉमून अब्दुल गय्यूम यांचा 2008 साली पराभव झाला होता. तेव्हापासून मालदीवच्या राजकारणात अस्थैर्य कायम आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








