कोरोना : भारतातून परतणाऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना होऊ शकतो स्वतःच्याच देशात तुरुंगवास

फोटो स्रोत, EPA
कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भारतात असणाऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना त्यांच्याच देशात परतल्यास 5 वर्षं तुरुंगवास किंवा दंड ठोठावला जाऊ शकतो. भारतातून ऑस्ट्रेलियात जाणं काही काळापुरतं बेकायदेशीर असल्याचं ऑस्ट्रेलियन सरकारने जाहीर केलंय.
ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय, "भारतातून कोव्हिड 19चा संसर्ग घेऊन आलेल्या आणि सध्या क्वारंटाईन असणाऱ्या लोकांचं प्रमाण पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे."
भारतातून येणाऱ्या सगळ्या विमानांवर ऑस्ट्रेलियाने या आठवड्याच्या सुरुवातीला बंदी घातली. जवळपास 9 हजार ऑस्ट्रेलियन नागरिक भारतात राहतात. यापैकी 600 जण Vulnerable म्हणजे असुरक्षित असल्याचं म्हटलं गेलंय.
स्वतःच्याच देशात परतणं ठरणार गुन्हा
स्वत:च्याच देशात परतणं गुन्हा ठरवण्यात येण्याचं इतिहासात पहिल्यांदाच घडत असल्याचं ऑस्ट्रेलियन माध्यमांनी म्हटलंय.
भारतातून परतणाऱ्यांपासून जितका धोका आहे, त्याच्या तुलनेत हे पाऊल बरंच मोठं असल्याचं एका डॉक्टरांनी ABC न्यूजशी बोलताना सांगितलं.
जनरल फिजीशियन आणि आरोग्य विषयक घडामोडींवर भाष्य करणारे डॉ. व्योम शार्मर म्हणतात, "आमच्या कुटुंबीयांचा भारतात जीव जातोय. त्यांना तिथून सोडवण्याची कोणतीही संधी आम्हाला न देणं हे संकटकाळात त्यांना वाऱ्यावर सोडण्यासारखं आहे."
ऑस्ट्रेलियामध्ये दाखल होण्याच्या 14 दिवस आधी भारतात असणारी व्यक्ती सोमवार (3 मे) पासून ऑस्ट्रेलियात दाखल होऊ शकणार नाही.
या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना पाच वर्षांचा तुरुंगवास किंवा 66,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड किंवा दोन्ही ठोठावलं जाण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाचे आरोग्य मंत्री काय म्हणाले?
सरकारने विचारपूर्वक हा निर्णय घेतल्याचं ऑस्ट्रेलियाचे आरोग्य मंत्री ग्रेग हंट यांनी म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "ऑस्ट्रेलियातलं सार्वजनिक आरोग्य आणि क्वारंटाईन यंत्रणांसाठी हे गरजेचं आहे आणि कोव्हिड 19ची लागण झालेल्या क्वारंटाईन संस्थांमधल्या रुग्णांची संख्या कमी करणं आमचं उद्दिष्टं आहे. भारतातील नागरिक आणि भारतीय - ऑस्ट्रेलियन समाजाच्या आम्ही सोबत आहोत."
भारतात एकीकडे कोरोनाच्या संसर्गाची संख्या वाढतेय तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्ये सध्या साथ जवळपास संपुष्टात आली आहे.
इतर देशांच्या तुलनेत इथे मृत्यूही कमी झाले आहेत. लॉकडाऊनच्या कडक नियमांमुळे अनेक ऑस्ट्रेलियन नागरिक परदेशातच अडकले आहेत.
हा हक्कांचा प्रश्न- फ्रांन्सिस माओ, बीबीसी न्यूज सिडनी यांचं विश्लेषण
प्रत्येक ऑस्ट्रेलियन पासपोर्टच्या कव्हरच्या आतल्या बाजूला काही वाक्यं कोरलेली असतात. यामध्ये परदेशात असणाऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना संरक्षण आणि मदत देण्याबद्दल सांगितलेलं असतं.
पण, ऑस्ट्रेलियातल्या लोकांना स्वतःच्याच देशात परतण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असा विचार कोणीही केला नव्हता. आपल्या देशात परतता येणं आणि तिथे राहता येणं ही नागरिकत्वाची मूलभूत वैशिष्ट्यं असतात.
पण संयुक्त राष्ट्रांच्या कराराला ऑस्ट्रेलियन कोर्टात आव्हान देता येत नाही. बाहेर अडलेल्या नागरिकांबाबत नागरिकत्वाचे अनेक अधिकार आणि इतर प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिली जात नाही.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
म्हणूनच आणीबाणीच्या काळात एखादी गोष्ट गुन्हा असल्याचा निर्णय सरकारला रातोरात घेता येऊ शकतो.
कोव्हिड 19चा धोका पाहता ऑस्ट्रेलियात येणाऱ्या लोकांना आता नवीन नियमांचा सामना करावा लागू शकतो. दोन आठवड्यांच्या या निर्बंधांना कायदेशीर आव्हान द्यायला वेळ लागेल आणि यासाठी खर्चही खूप येईल. जनतेने विरोध करत दबाव आणणं हा एकमेव मार्ग अशा परिस्थितीत उरतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








