कोरोना लशीचा एक डोस घरात संसर्ग पसरण्याची शक्यता 50 टक्क्यांनी कमी करतो - संशोधन

कोव्हिड-19 विरोधी लस फायदेशीर आहे? डोस घेतल्यानंतर कोरोना संसर्गापासून संरक्षण मिळेल? लस घेतल्याने मिळणारं संरक्षण किती काळ टिकेल? पुन्हा लस घ्यावी लागेल? लस घेतल्यानंतरही कोरोना का होतो? असे अनेक प्रश्न सामान्यांच्या मनात आहेत.

तज्ज्ञांच्या मते, लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला. तरी त्याची तीव्रता कमी होते. त्यामुळे लशीबद्दल गैरसमज न ठेवता प्रत्येकाने लस घेतली पाहिजे.

लोकांच्या मनात लशीबाबत प्रश्न असतानाच एक समाधानकारक माहिती समोर आली आहे.

कोव्हिड-19 विरोधी लसीचा एका डोस घेतल्याने, घरात होणारा कोरोनासंसर्ग 50 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. यूकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग, पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या (Public Health England) संशोधनात ही माहिती समोर आलीये.

संशोधनाचे परिणाम काय?

कोरोनाविरोधी लशीचा संसर्ग रोखण्यासाठी फायदा होत असल्याचं दिसून आलंय.

यूकेच्या आरोग्य विभागाच्या संशोधनानुसार,

• फायझर किंवा ऑक्सफर्डची लस घेतल्यानंतर तीन आठवड्यात कोरोनाग्रस्त झालेल्यांकडून त्यांच्या घरातील लस न घेतलेल्या कुटुंबियांना संसर्ग होण्याची शक्यता 38 ते 49 टक्क्यांनी कमी झाली.

• लस घेतल्यानंतर 14 दिवसांनी संसर्गापासून संरक्षण मिळाल्याचं आढळून आलं.

• लस घेतलेल्या व्यक्तीला आजाराची लक्षणं दिसण्याची शक्यता चार आठवड्यानंतर 60 ते 65 टक्के कमी.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत व्हायरस म्युटेट झाला. महाराष्ट्रात डबल म्युटंट तर, पश्चिम बंगालमध्ये ट्रीपल म्युटंट आढळून आला. या नवीन व्हायरसची संसर्ग क्षमता जास्त आहे.

पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या माहितीनुसार, लसीकरणामुळे घरात तीव्रतेने पसरणाऱ्या संसर्गावर निर्बंध घालणं शक्य आहे असं दिसून आलंय.

संशोधन कसं करण्यात आलं?

• 24 हजार घरातील 57 हजार कॉन्टॅक्ट संशोधनासाठी घेण्यात आले .

• या घरात लस देण्यात आलेला कोरोना रुग्ण होता.

• याची तुलना लस न देण्यात आलेल्या 1 दशलक्ष कॉन्टॅक्टसोबत करण्यात आली.

यूकेचे आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक सांगतात, "लशीमुळे जीव वाचतो हे आपल्याला माहिती होतं. पण, आता स्पष्ट झालंय की, व्हायरसच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी याचा फायदा होतोय. लशीमुळे आपण सुरक्षित होतोय आणि आपल्यामुळे कुटुंबातील इतरांना अजाणतेपणाने संसर्ग होण्यास प्रतिबंध होतोय."

यूकेच्या आरोग्य विभागाला संशोधनातून, ज्येष्ठ नागरिकांमध्ये लस घेतल्यामुळे संसर्गाचं प्रमाण कमी होत असल्याचं आढळून आलंय.

यूकेच्या लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. मेरी रामसे म्हणतात, "लशीमुळे आजार गंभीर होण्याची शक्यता कमी होते. ज्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. आता, लशीचा फायदा संक्रमण रोखण्यासाठी होत असल्याचं स्पष्ट झालंय."

लसीकरणाची भारतातील परिस्थिती

भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट त्सुनामीसारखी पसरतेय. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतेय. तज्ज्ञ सांगतात, कोरोनावर नियंत्रणासाठी लसीकरण एक प्रभावी पर्याय आहे.

बुधवारपर्यंत (28 April) देशभरात 15 कोटी लोकांना कोरोनाविरोधी लस देण्यात आलीये. तर, महाराष्ट्रात आत्तापर्यंत दीड कोटी लोकांना लस मिळाली आहे.

निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल म्हणतात, "कोरोनासंसर्ग मोठ्याप्रमाणात पसरत असतानाही लसीकरण मोहीम पूर्ण क्षमतेने सुरू ठेवावी लागेल. लसीकरणाचा वेग कमी होऊन चालणार नाही."

लोकांनी लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करून, लस घेण्यासाठी पुढे आलं पाहिजे, असं आवाहन केंद्र सरकारने केलंय.

लस घेतल्यानंतर भारतात किती लोकांना संसर्ग झाला?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आत्तापर्यंत लस घेतल्यानंतर किती लोकांना कोरोना संसर्ग झाला ही माहिती सार्वजनिक केली होती.

केंद्र सरकारच्या माहितीनुसार, कोव्हॅक्सिन घेतलेल्या 9.3 दशलक्ष लोकांपैकी फक्त 4,208 लोकांना संसर्ग झाला, तर कोव्हिशिल्ड घेतलेल्या 100.3 दशलक्ष नागरिकांपैकी 17,145 लोक पॉझिटिव्ह आले

आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, "लस आजाराविरोधात संरक्षण देते. डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनंतर शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यास सुरूवात होते."

तर, बीबीसी मराठीच्या वेबिनारमध्ये बोलताना महाराष्ट्र टास्कफोर्सचे डॉ. शशांक जोशी म्हणतात, "लसीकरणामुळे आजाराची तीव्रता कमी होऊ शकेल. मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)