You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रिन्स फिलीप यांच्या अंत्यविधीची तयारी कशी सुरू आहे?
महाराणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबरा प्रिन्स फिलीप यांचं वयाच्या 99 वर्षी निधन झालं. प्रिन्स फिलीप यांनी शुक्रवारी (10 एप्रिल) अखेरचा श्वास घेतला.
प्रिन्स फिलीप यांचा अंत्यविधी पुढील शनिवारी म्हणजेच 17 एप्रिल रोजी होणार आहे.
आता त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू आहे. पण हा कार्यक्रम मोठ्या स्वरुपात न करता औपचारिक पद्धतीने याचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
पुढं काय होईल?
प्रिन्स फिलीप यांच्या अंत्यविधीच्या दिवशी सकाळी 8 वाजता सर्व सरकारी इमारतींवरील युनियन जॅक आणि राष्ट्रीय झेंडे अर्ध्यावर फडकवण्यात येतील, अशी माहिती ब्रिटिश सरकारने दिली आहे. महाराणी उपस्थित नसलेल्या सर्वच ठिकाणी लावण्यात आलेले युनियन जॅक अर्ध्यावरच फडकवले जातील.
राजघराण्याच्या सार्वभौमत्व आणि सामर्थ्य प्रदर्शित करणारा रॉयल स्टँडर्ड झेंडा कधीच अर्ध्यावर फडकवला जात नाही.
शनिवारी दुपारी ब्रिटन आणि जिब्राल्टरमध्ये प्रिन्स फिलीप यांना तोफांची सलामी देण्यात आली. एडिनबरा, कार्डिफ, लंडन, नॉर्दर्न आयरलँडच्या हिल्सबोरो कॅसल आणि पोर्ट्समॅथ आणि डेव्हनपोर्टच्या नौदलाच्या तळावर 41 तोफांची सलामी देण्यात आली. इथं प्रत्येक मिनिटाला एक अशी 40 मिनिटे सलामी सुरू होती.
प्रिन्स फिलीप यांनी द्वितीय विश्व युद्धात नौदलाचे अधिकारी म्हणून सहभाग नोंदवला होता. त्यांनी लॉर्ड हाय एडमिरल कार्यालयही सांभाळलं होतं.
यामुळे HMS डायमंड आणि HMS मोंटेरोस यांसारख्या रॉयल नेव्ही जहाजांनीही प्रिन्स फिलीप यांना सलामी दिली.
पुढील महिन्यात इथं निवडणुका होणार आहेत. पण प्रिन्स फिलीप यांच्य सन्मानार्थ इंग्लंड, स्कॉटलँड आणि वेल्सच्या प्रमुख राजकीय पक्षांनी प्रचाराला स्थगिती दिली आहे. सोमवारी ब्रिटिश संसद ड्यूक ऑफ एडिनबरा यांना श्रद्धांजली देईल.
जनता श्रद्धांजली कशी वाहणार?
इंग्लंडमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या एकत्रित येण्यावर बंधनं आहेत. त्यमुळे अंत्यविधी करण्याबाबत नियोजन केलं जात आहे. लोकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊ नये, अशी सूचना त्यांना करण्यात येत आहे.
लोकांनी शाही कुटुंबाच्या इमारतींबाहेर फुले वगैरे अर्पण करू नये, फुले वाहण्याऐवजी लोकांनी चॅरिटीअंतर्गत निधी गोळा करावा, असं आवाहन शाही कुटुंबाने केलं आहे.
बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर ड्यूक यांच्या निधनाबाबत एक सूचना लावली होती. पण लोक तिथं एकत्र होण्याची शक्यता पाहून ही पाटी हटवण्यात आली. पण तरीसुद्धा लोक त्याठिकाणी येऊन श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.
लोक अंत्यदर्शन करू शकतील का?
आपला अंत्यविधी कमी गर्दीत करण्यात यावा. आपलं पार्थिव शरीर सार्वजनिकपणे दर्शनासाठी ठेवण्यात येऊ नये. त्याऐवजी विंडसर कॅसलमध्ये ते ठेवण्यात यावं, अशी प्रिन्स फिलीप यांची इच्छा होती, असं सांगण्यात येत आहे.
ड्यूक यांचा झेंडा या कार्यक्रमात दिसू शकतो. त्यांच्या झेंड्यात त्यांच्या आयुष्याचं प्रतिबिंब दिसून येतं. त्यामध्ये त्यांना मिळालेल्या ब्रिटिश उपाधीचाही समावेश आहे.
1946 मध्ये प्रिन्सेस एलिझाबेथ यांच्यासोबत त्यांचा साखरपुडा झाल्यानंतर त्यांनी आपली ग्रीक उपाधी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते ब्रिटिश नागरिक बनले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या आईचं इंग्रजी नाव माऊंटबॅटन हे वापरण्याचा निर्णय घेतला होता.
अंत्यविधीत कोण सहभागी होतील?
ड्यूक ऑफ एडिनबरा यांच्या निधनानंतर अंत्यविधीसाठी मोठा कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार होता. पण कोरोना संकट आणि लोक मोठ्या प्रमाणात जमा होण्याचे संकेत पाहून हा विचार बदलण्यात येऊ शकतो.
अंत्य संस्कारांसाठी प्रिन्स फिलीप यांचं पार्थिव थोडंसं दूर सेंट जॉर्ज चॅपल याठिकाणी नेलं जाऊ शकतं.
शाही कुटुंबातील राजा, राणी, राजकुमार आणि राजकुमारींना याच ठिकाणी सेंट जॉर्ज चॅपलमधील रॉयल वॉल्टमध्ये दफन करण्यात येतं.
याच ठिकाणी प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांचं लग्न झालं होतं. राजकुमारे इवेजिन आणि जॅक ब्रुक्सबँक यांनी 2018 मध्ये याच ठिकाणी लग्न केलं होतं.
याठिकाणी कुटुंबातून कोण सहभागी होतील, कुणाला निमंत्रित करण्यात येईल, याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
पण प्रिन्स हॅरी या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. अमेरिकेत राहत असलेले ड्यूक ऑफ ससेक्स आणि डचेज ऑफ ससेक्स यांनी गेल्या वर्षी राजघराण्यातील वरीष्ठ सदस्यपदाची पदवी सोडली होती. त्यानंतर ते अजूनही ब्रिटनला परतलेले नाहीत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)