ऑस्ट्रेलिया : फेसबुकचा रूपर्ट मरडॉक यांच्या न्यूज कॉर्पसोबत करार

ऑस्ट्रेलियातल्या बातम्या वापरण्यासाठी फेसबुकने रूपर्ट मरडॉक यांच्या न्यूज कॉर्पसोबत करार केलाय. टेक कंपन्यांना ते वापरत असलेल्या बातम्यांसाठी वृत्तसंस्थांना पैसे देण्याबद्दलचा वादग्रस्त कायदा काही आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलियात मंजूर करण्यात आलाय.

न्यूज कॉर्पच्या मालकीच्या ऑस्ट्रेलियातल्या प्रकाशनांच्या मजकुरासाठी हा तीन वर्षांचा करार करण्यात आलाय. पण याची रक्कम न्यूज कॉर्पने जाहीर केलेली नाही. गेल्याच महिन्यात त्यांनी गुगलसोबत एक जागतिक करारही केलाय.

रूपर्ट मरडॉक यांना माध्यम सम्राट म्हटलं जातं आणि ऑस्ट्रेलियातल्या वर्तमानपत्रांपासूनच त्यांनी या साम्राज्याला सुरुवात केली होती.

न्यूज कॉर्पच्या मालकीच्या अनेक वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियात आहेत. ऑस्ट्रेलियातल्या वर्तमानपत्रांच्या एकूण सर्क्युलेशपैकी 70% हिस्सा हा न्यूज कॉर्पच्या मालकीच्या द ऑस्ट्रेलियन, द डेली टेलिग्राफ आणि द हेराल्ड सन या आणि इतर वर्तमानपत्रांचा आहे.

ऑस्ट्रेलियातील स्काय न्यूज ऑस्ट्रेलिया हे टीव्ही नेटवर्क आणि news.com.au ही वेबसाईटही न्यूजकॉर्पच्या मालकीची आहे.

अमेरिकेतल्या आपल्या मालकीच्या वृत्तसंस्थांच्या मजकुरासाठी न्यूज कॉर्पने यापूर्वीच फेसबुकशी एक वेगळा करार केलाय.

गेल्या दशकभरात जाहिरातदार फेसबुक, गुगल आणि इतर वेबसाईट्कडे वळल्याने ऑस्ट्रेलियातल्या वर्तमानपत्रांची अवस्था बिकट झालीय.

फेसबुक, गुगलसारख्या टेक कंपन्यांनी बातम्या वा वृत्तसंस्थांचा मजकूर वापरण्यासाठी त्यांना पैसे द्यावेत, असं सांगणारा कायदा ऑस्ट्रेलियात मांडण्यात आला. त्यानंतर गदारोळ उडाला होता.

फेसबुक, गुगल या कंपन्यांनी यावर आक्षेप घेतला होता. आपल्या प्लॅटफॉर्मवरून युजर्स या वर्तमानपत्रांच्या वा माध्यमांच्या वेबसाईटवर पोहोचत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं.

या कायद्याच्या निर्षेधार्थ आपण ऑस्ट्रेलियातूनच बाहेर पडू, अशी धमकीही फेसबुकने दिली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात फेसबुकने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून सगळा वृत्तविषयक मजकूर काढून टाकला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)