You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीबीसीचे प्रतिनिधी इथिओपिया लष्कराच्या ताब्यात
इथियोपियाच्या वादग्रस्त तिग्रे प्रांतात बीबीसीच्या प्रतिनिधीला लष्कराने ताब्यात घेतले आहे.
बीबीसी टायग्रिनियासाठी काम करणाऱ्या गिरमय गेब्रू यांना प्रादेशिक राजधानी मेकेल येथील एका कॅफेतून इतर चार जणांसोबत नेण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
गिरमय यांना मेकेल येथील लष्करी छावणीत नेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
प्रतिनिधीला ताब्यात घेण्याबाबत बीबीसीने अद्याप कारण स्पष्ट केलेले नाही. पण बीबीसीने इथियोपियन प्रशासनाकडे चिंता व्यक्त केली आहे.
फायनॅन्शियल टाईम्स आणि एएफपी वृत्तसंस्थेत काम करणारे अलुला अकालू आणि फिट्सम बर्हाणे या दोन अनुवादकांनाही अलीकडच्या काही दिवसांत ताब्यात घेण्यात आले.
इथियोपियाचे सरकार नोव्हेंबरपासून तिग्रेमध्ये बंडखोरांविरोधात लढा देत आहे. या ठिकाणी संघर्ष सुरू झाल्यापासून कित्येक महिने प्रभावी प्रसारमाध्यमे ब्लॅकआऊट होती. यामुळे सरकारने गेल्या आठवड्यात काही आंतरराष्ट्रीय माध्यमांना प्रवेश दिला.
एएफपी आणि फायनान्शियल टाईम्स या दोन्ही वृत्तसंस्थांना वार्तांकनांसाठी परवानगी देण्यात आली होती.
प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीला सांगितले की, लष्कराच्या गणवेशात आलेल्या सैनिकांनी गिरमय यांना ताब्यात घेतले.
बीबीसीचे प्रवक्ते सांगतात, "आम्ही इथियोपियन प्रशासनाकडे चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहत आहोत."
इथियोपियन सरकारने तिग्रे पीपल्स लिबरेशन फ्रंटवर विजय जाहीर केला असला तरीही तिग्रेमध्ये संघर्ष सुरुच आहे. यात शेकडो लोकांचा मृत्यू झालाय तर हजारो लोक विस्थापित झालेत.
पत्रकार सांगतात, आंतरराष्ट्रीय पातळीवरही या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या संघर्षामुळे मानवतावादी संकट वाढत चालले आहे.
"आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांची दिशाभूल" करणाऱ्यांविरोधात कडक पावलं उचलली जातील असा इशारा नुकताच इथियोपियाच्या सत्ताधारी पक्षाच्या एका अधिकाऱ्याने दिला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)