You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तब्बल 14 तास तो कचऱ्याचा आधार घेत प्रशांत महासागरात तरंगत राहिला
म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार. एका मालवाहू जहाजातून चुकून प्रशांत महासागरात पडलेलेल्या एका व्यक्तीला याची प्रचिती आली.
त्यांचं नाव व्हिदम पेरेव्हेरटिलोव्ह. 52 वर्षांचे व्हिदम पेरेव्हेरटिलोव्ह दोन दिवसांपूर्वी प्रशांत महासागारत एका मालवाहू जहाजाने जात असताना चुकून खाली समुद्रात पडले. त्यांनी लाईफ जॅकेटही घातलेलं नव्हतं. अशावेळी समुद्रातल्या कचऱ्याने त्यांचा जीव वाचवला.
समुद्रात पडल्यानंतर त्यांना दूरवर एक छोटा काळा ठिपका दिसला. ते कित्येक मैल त्या छोट्या काळ्या ठिपक्याच्या दिशेने पोहत गेले. ठिपक्याजवळ पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आलं की तो ठिपका म्हणजे समुद्रात मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्याचं टोक होतं.
खराब झालेलं ते जाळं कुणीतरी समुद्रात फेकून दिलं होतं. मात्र, या छोट्याशा तुकड्यानेच व्हिदम पेरेव्हेरटिलोव्ह यांचे प्राण वाचवले.
व्हिदम पेरेव्हेरटिलोव्ह तब्बल 14 तास या तुकड्याला धरून होते. 14 तासांनंतर बचाव पथकाने त्यांना सुखरूप बाहेर काढलं.
या अनुभवाविषयी सांगताना त्यांचा मुलगा मॅरेटने न्यूझिलँडच्या 'स्टफ' या न्यूज पोर्टलला सांगितलं, "ते 20 वर्षं आणखी म्हातारे आणि खूप थकलेले दिसत होते. पण ते जिवंत होते."
पेरेव्हेरटिलोव्ह लिथुआनियाचे नागरिक आहेत. 'सिल्व्हर सपोर्टर' या कंपनीत ते इंजीनिअर म्हणून काम करतात. ही कंपनी न्यूझिलँडचं टॉरंगा बंदर ते पिटकॅर्न या ब्रिटीश बेटापर्यंत मालाची वाहतूक करते.
मॅरट यांनी दिलेल्या माहितीनुसार 16 फेब्रुवारीला इंजिन रूममध्ये दिवसभर काम केल्याने त्यांना खूप उकडत होतं आणि थोडी चक्करही येत होती. त्यामुळे ताजी हवा घेण्यासाठी ते डेकवर गेले. वेळ पहाटे चारची होती.
चक्कर आल्यानेच ते समुद्रात पडले असावे, असं मॅरट यांना वाटतं. व्हिदम पेरेव्हेरटिलोव्ह यांना मात्र नेमकं काय झालं ते काहीच आठवत नाही.
इकडे आपल्या जहाजावरचा एक खलाशी समुद्रात पडला हे जहाजातल्या कुणालाच कळलं नाही. त्यामुळे ते पुढे निघून गेलं.
आता सूर्य उगवेपर्यंत जिवंत रहायचं होतं. अशावेळी पेरेव्हेरटिलोव्ह समुद्रात तरंगण्याचा प्रयत्न करत होते. सूर्य उगवताच त्यांना क्षितिजाच्या दिशेने एक काळा ठिपका दिसला. त्यानी ठिपक्याच्या दिशेने पोहोण्याचा निर्णय घेतला.
पण तो काळा ठिपका म्हणजे समुद्रातला कचरा निघाला. मॅरेट सांगतात, "मासेमारीच्या जाळ्याला असलेलं ते टोक कुण्या जहाजातून टाकलेलं नव्हतं. तो कचरा होता."
तब्बल सहा तासांनंतर जहाजावरच्या खलाशांना आपला एक कर्मचारी जहाजावर नसल्याचं कळलं. त्यांनी जहाज वळवलं.
पेरेव्हेरटिलोव्ह कुठे पडले असावे, याचा अंदाज त्यांच्या वर्क लॉगवरून लावण्यात आला. वर्क लॉगनुसार पेरेव्हेरटिलोव्ह पहाटे 4 वाजेपर्यंत काम करत होते. त्यावरून आपण जवळपास 400 नॉटिकल माईल्स पुढे आल्याचा आणि पेरेव्हेरटिलोव्ह फ्रान्सच्या ऑस्ट्रल बेटाजवळ समुद्रात पडल्याचा अंदाज जहाजाच्या कॅप्टनने लावला.
लगेच या जहाजावरून एक खलाशी बेपत्ता झाल्याचा रेडियो संदेश त्या भागातल्या इतर जहाजांवर पाठवण्यात आला. संदेश मिळताच फ्रान्सच्या नौदलाचं हेलिकॉप्टर शोधमोहिमेत सामिल झालं.
फ्रान्सच्या हवामान विभागाने पहाटेपासून वाऱ्याचा वेग आणि दिशा काय होती, यावरून पेरेव्हेरटिलोव्ह कुठल्या दिशेने वाहून जाऊ शकतात, याचा अंदाज बांधला.
मोठी शोधमोहीम सुरू झाली. अखेर पेरेव्हेरटिलोव्ह यांच्याच जहाजाने त्यांना शोधून काढलं.
पेरेव्हेरटिलोव्ह यांना जहाज दिसताच त्यांना जोरात ओरडून हाका मारायला सुरुवात केली. जहाजावरच्या एका प्रवाशाने आपल्याला 'दुरून मानवी आवाज' ऐकू येत असल्याचं सांगितलं. मग त्या आवाजाच्या दिशेने शोध सुरू झाला. अखेर जहाजाने पेरेव्हेरटिलोव्ह यांना शोधून काढलं आणि त्यांना जहाजावर परत घेतलं.
मॅरेट सांगतात, त्यांनी कायमच स्वतःला तंदुरुस्त आणि सुदृढ ठेवलं होतं आणि म्हणूनच कदाचित ते वाचले, असं मला वाटतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)