जपानमधल्या वाढत्या आत्महत्या जगासाठी इशारा का ठरू शकतात?

- Author, रुपर्ट विंगफिल्ड-हायेस
- Role, बीबीसी न्यूज, टोकियो
जगातल्या इतर कुठल्याही देशाच्या तुलनेत जपानमध्ये आत्महत्यांसंबंधीचा अहवाल अधिक वेगाने आणि अचूकपणे नोंदवला जातो. जपानमध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटी सर्व आकडेवारी संकलित केली जाते. कोव्हिड काळातली ही आकडेवारी काळजीत टाकणारी आहे.
2020 साली जपानमध्ये गेल्या 11 वर्षात पहिल्यांदाच आत्महत्यांचं प्रमाण वाढलं. आश्चर्याची बाब म्हणजे पुरूषांच्या आत्महत्येच्या प्रमाणात किंचित घट दिसून आली आणि स्त्रियांच्या आत्महत्येच्या प्रमाणात थोडीथोडकी नाही तर तब्बल 15 टक्क्यांची वाढ झाली आहे.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात स्त्रियांचं आत्महत्येचं प्रमाण मागच्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत तब्बल 70 टक्क्यांनी वाढलं.
ही आकडेवारी बघता कोव्हिड-19 च्या साथीचा स्त्रियांवर एवढा जास्त परिणाम का होतोय, हा प्रश्न उपस्थित होतो.
वैधानिक इशारा : या लेखातील काही भाग अस्वस्थ करणारा असू शकतो
आम्ही एका तरुण महिलेला भेटलो. तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिच्याशी भेटण्याचा अनुभव अस्वस्थ करणारा होता. तिला भेटून लोकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचं काम करणाऱ्यांप्रती माझा आदर आणखी वाढला.
मी 'बाँड प्रोजेक्ट' या आत्महत्या रोखण्यासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या योकोहोमा शहरातल्या रेड-लाईट परिसरातल्या एका कार्यालयात बसलो होतो.
माझ्यासमोर 19 वर्षांची एक तरुणी बसली होती. ती एकदम शांत होती. पुढे तिने तिची कहाणी सांगायला सुरुवात केली. तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते.
ती 15 वर्षांची असताना ही कहाणी सुरू होते. तिचा थोरला भाऊ तिला अमानुष मारहाण करायचा. या मारहाणीला कंटाळून एक दिवस ती घरातून पळून गेली. मात्र, पळून जाणं, हे तिच्या समस्येचं उत्तर नव्हतं. तिला अधिकच एकटं वाटू लागलं. एकटेपणाचं दुःख तिला सहन होत नव्हतं.
यातून कायमची सुटका करुन घेण्याचा आत्महत्या हाच एकमेव मार्ग असल्याचं तिला वाटू लागलं.
ती सांगत होती, "गेल्या वर्षी याच महिन्यांपासून माझ्या हॉस्पिटलच्या वाऱ्या वाढल्या. मला अनेकदा भरती करावं लागलं. मी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, सगळे प्रयत्न फसले. त्यामुळे मी आता आत्महत्येचे प्रयत्न सोडले आहेत."
या तरुणीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात 'बाँड प्रोजेक्ट'ने महत्त्वाची भूमिका बजावली. या संस्थेने तिच्यासाठी तिला हक्काचं वाटेल अशा सुरक्षित ठिकाणी आणलं. सोबतच तिचं काउंसलिंगही करण्यात आलं.
जुन ताचीबाना 'बाँड प्रोजेक्ट'च्या संस्थापिका आहेत. वयाच्या चाळीशीत असणाऱ्या ताचीबाना अतिशय आशावाादी आणि तेवढ्याच कणखर आहेत.
त्या सांगत होत्या, "मुली जेव्हा खरंच अडचणीत असतात, संकटात सापडतात तेव्हा काय करावं त्यांना सुचत नाही. त्यासाठी आम्ही आहोत. आम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेतो. आम्ही तुमच्यासोबत आहोत, हा विश्वास त्यांना देतो."
ज्या मुली आधीच कुठल्यातरी संकटात आहेत त्यांच्यावर कोव्हिड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा जास्त परिणाम झाल्याचं ताचीबाना सांगतात. गेल्या काही महिन्यात त्यांच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांना आलेल्या फोनकॉलविषयी त्यांनी सांगितलं.

त्या म्हणाल्या, "आम्हाला खूप फोन येतात. बऱ्याचजणी 'आम्हाला जगायचं नाही', 'माझ्यासाठी या जगात काही उरलं नाही', असं म्हणतात. 'मी खूप एकटी पडली आहे. हे खूप त्रासदायक आहे. मला गायब व्हावसं वाटतं', असं त्या म्हणतात."
आधीच शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार सहन करत असलेल्या महिलांसाठी कोव्हिड-19 मुळे परिस्थिती अधिकच चिघळली आहे.
ताचिबाना सांगतात, "मी एका मुलीशी बोलले. तिने सांगितलं, तिचे वडीलच तिच्यावर लैंगिक अत्याचार करतात. कोव्हिड-19 मुळे वडील सध्या घरीच आहे. त्यामुळे त्यांचे अत्याचार अधिकच वाढलेत. दिवसभर घरी असल्यामुळे त्यांच्यापासून पळूनही जाता येत नाही, असं तिचं म्हणणं आहे."
'असामान्य' पॅटर्न
जपानवर यापूर्वी अनेक संकटं कोसळली आहेत. 2008 सालचं बँकिंग संकट, जपानचं स्टॉक मार्केट कोसळलं त्यावेळचं संकट, 1990 साली स्थावर मालमत्तेसंबंधीचं संकट, अशी अनेक संकट जपानने झेलली. मात्र, त्यावेळी या संकटांचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय पुरुषांना बसला. त्यावेळी पुरुषांच्या आत्महत्येच्या संख्येत वाढ दिसून आली होती.
मात्र, कोव्हिडची परिस्थिती या सर्वांपेक्षा खूप वेगळी आहे. कोव्हिडचा सर्वाधिक फटका तरुणांना बसतोय. विशेषतः तरुण मुलींना. यामागे अनेक गुंतागुंतीची कारणं आहेत.
विकसित राष्ट्रांपैकी जपानमध्ये आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी जपानने बरेच प्रयत्न केले. परिणामी गेल्या दशकभरात आत्महत्येच्या प्रमाणात एक तृतीयांशानं घट झाली आहे.
प्रा. मिचिको उएडा जपानमधल्या प्रमुख आत्महत्याविषयक तज्ज्ञांपैकी एक आहेत. बऱ्याच प्रयत्नांनंतर जपानमधलं आत्महत्यांचं प्रमाण कमी झालं होतं. मात्र, गेल्या काही महिन्यात हे प्रमाण पुन्हा वाढतंय आणि हे फार त्रासदायक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "स्त्रियांचं आत्महत्येचं वाढतं प्रमाणं हा अतिशय असमान्य असा पॅटर्न दिसतोय."
"या विषयावर मी गेली अनेक वर्ष संशोधन करतेय. मात्र, माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी एवढी मोठी वाढ कधी बघितलेली नाही. पर्यटन, फूड आणि रिटेल इंडस्ट्रिला कोव्हिड-19 च्या जागतिक साथीचा सर्वाधिक फटका बसला आहे. परिणामी या इंडस्ट्रीत काम करणाऱ्या महिलांवर त्याचा परिणाम झाला."
जपानमध्ये गेल्या काही वर्षात स्त्रीची पारंपरिक भूमिका निभावण्याएवजी लग्न न करता एकट्याने राहणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण वाढतंय. त्यामुळे तथाकथित अनिश्चितता असणाऱ्या रोजगारांमध्ये अशा स्त्रियांचं प्रमाणही मोठं आहे.
उएडा म्हणतात, "जपानमध्ये अनेक स्त्रिया अविवाहित आहेत. त्यांनाच त्यांच्या आयुष्याची काळजी घ्यायची आहे आणि त्यांना कायमस्वरुपी नोकरी नाही. त्यामुळे काहीही घडलं की, त्याचा या स्त्रियांना खूप मोठा फटका बसतो. गेल्या आठ महिन्यात अस्थायी कर्मचाऱ्यांचं नोकरी जाण्याचं प्रमाण अतिशय जास्त आहे."
वाढत्या आत्महत्यांच्या दृष्टीने जपानसाठी 2020 सालचा ऑक्टोबर महिना सर्वात वाईट होता. या एका महिन्यात तब्बल 879 महिलांनी आत्महत्या केल्या.
अर्थातच जपानमधल्या वर्तमानपत्रांसाठी ही मोठी बातमी होती. काहींनी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या आत्महत्या आणि कोव्हिड-19 मुळे झालेले मृत्यू यांच्या आकडेवारीची तुलना केली. जपानमध्ये ऑक्टोबर महिन्यात कोव्हिड-19 आजारामुळे एकूण 2087 जणांचा मृत्यू झाला. तर स्त्री आणि पुरूष मिळून आत्महत्येची आकडेवारी होती 2199. म्हणजेच कोव्हिडमुळे मरणाऱ्यांपेक्षा आत्महत्यांचं प्रमाण जास्त होतं.
27 सप्टेंबरला जपानच्या लोकप्रिय अभिनेत्री युको ताकेयुची राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या. तपासाअंती त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं. त्या 40 वर्षांच्या होत्या.
यासूयुकी शिमुझू माजी पत्रकार आहेत. त्या सध्या जपानमधल्या आत्महत्येच्या समस्येवर काम करतात. त्यांनी एक बिगर-सरकारी संस्थाही सुरू केली आहे.
बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येची बातमी कळताच जपानमध्ये पुढचे जवळपास 10 दिवस आत्महत्यांचं प्रमाण खूप वाढलं होतं."
"27 तारखेला युकोने आत्महत्या केली. पुढच्या 10 दिवसात जपानमधल्या तब्बल 207 महिलांनी आत्महत्या केली."
यातही युकोच्या वयाच्या महिलांमध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त होतं.
"40 वर्षांच्या युको यांच्या आत्महत्येनंतर या वयातल्या स्त्रियांचं आत्महत्येचं प्रमाण दुप्पट झालं."
त्यामुळे एखाद्या लोकप्रिय व्यक्तीने आत्महत्या केल्यास त्याचा प्रभाव इतरांवरही होतो, असं जपानमधल्या तज्ज्ञांना वाटतं.
सेलिब्रिटींच्या आत्महत्येचे पडसाद
जपानमध्ये सेलिब्रिटींच्या आत्महत्येचे पडसाद उमटण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे तिथे आत्महत्यांचं वार्तांकन एक क्लिष्ट विषय आहे. सेलिब्रिटींच्या आत्महत्येनंतर प्रसार माध्यमं आणि सोशल मीडियावर त्याची जेवढी चर्चा होते तेवढी असुरक्षित लोकांमध्ये (vulnarable people) आत्महत्येचं प्रमाण वाढताना दिसतं.
माई सुगानामासुद्धा आत्महत्या प्रतिबंधासाठी काम करतात. सुगानामा लहान असताना त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली होती.
कोरोना विषाणूमुळे दगावलेल्यांचे अंत्यसंस्काराचे अनेक नियम आहेत. या नियमांमुळे कुटुंबीयांना आपल्या प्रियजनांना अखेरचा निरोपही नीट देता येत नाही. त्याचाही लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचं सुगानामा सांगतात.
बीबीसीशी बोलताना माई सुगानामा म्हणाल्या, "मी जेव्हा पीडितांच्या कुटुंबीयांशी बोलते तेव्हा त्यांच्या बोलण्यातून आपण आपल्या प्रिय व्यक्तीला वाचवू शकलो नाही, ही तीव्र भावना त्यांच्या मनात असल्याचं मला जाणवतं. मलाही मी माझ्या वडिलांना वाचवू शकले नाही, असं वाटायचं."
"लोकांना घरीच थांबण्याचे निर्देश आहेत. मात्र, घरात बसल्याने ही अपराधीपणाची भावना अधिक वाढेल, अशी भीती मला वाटते."
जपान आता कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. सरकारनेही दुसऱ्या टप्प्याची आणीबाणी लागू केली आहे. संपूर्ण फेब्रुवारी महिना हीच परिस्थिती असेल, अशी चिन्हं आहेत. अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार्स बंद आहेत. अनेकजण बेरोजगार होत आहेत.
ही सगळी परिस्थिती बघता प्रा. उएडा यांना आणखी एक प्रश्न सतावतोय. जर जपानसारख्या देशात जिथे कठोर लॉकडाऊन नाही आणि कोव्हिडमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही कमी आहे अशा ठिकाणी ही परिस्थिती असेल तर जगातल्या इतर देशात जिथे कोव्हिड-19 ने थैमान घातलंय तिथे काय परिस्थिती असेल?
या लेखात उपस्थित केलेल्या समस्येने तुम्ही ग्रस्त असाल तर BBC Action Line वर तुम्हाला मदत मिळू शकते.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








