कोरोना लॉकडाऊनः वर्षभर पलंगावरूनच काम केल्याने काय होतं?

फोटो स्रोत, Alamy
- Author, ब्रायन लुफ्किन
- Role, बीबीसी
पलंगावरून काम करण्याचा मोह तीव्र स्वरूपाचा असतो, पण पलंगावरच ऑफिससारखं काम करायला लागलं, तर त्यातून मानसिक व शारीरिक अशा दोन्ही प्रकारांमधील आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
'घरातून काम करणं' (वर्किंग फ्रॉम होम) हे अनेकांसाठी 'पलंगावरून काम करणं' (वर्किंग फ्रॉम बेड) ठरलं आहे. बाहेरचे कपडे घालून काहीएक प्रवास करून ऑफिसला जायचं- हा नित्यक्रम बदलून तोंडावर पाणी मारायचं, कम्प्युटर उघडायचा आणि पुन्हा पांघरूण अंगावर ओढून पलंगावर बसायचं- असा क्रम कामाशी जोडला गेला आहे.
प्रचंड संख्येने लोक पलंगावर बसून काम करू लागले आहेत, असं नोव्हेंबर 2020मधील एका अभ्यासातून समोर आलं आहे. या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या 1,000 अमेरिकी व्यक्तींपैकी 72 टक्के लोकांनी सांगितली की कोव्हिड जागतिक साथीदरम्यान त्यांनी ऑफिसपासून दूर असताना पलंगावर बसूनच काम केलं. ही साथ सुरू होण्याआधी हे प्रमाण 50 टक्के होतं.
दहा टक्के लोकांनी "त्यांचा आठवड्याभरातील कामाचा बहुतांश किंवा सगळाच कालावधी"- म्हणजे 24 ते 40 तास किंवा अधिक वेळ- पलंगावर काढला. विशेषतः तरुण कामदारांबाबत हे जास्त लागू पडणारं आहे. युनायटेड किंगडममध्ये 18 ते 34 वर्षं वयोगटातील कामदारांकडे योग्य टेबल व खुर्ची असण्याची शक्यता सर्वांत कमी असते, आणि त्याहून वयस्क कामदारांपेक्षा ही तरुण मंडळी पलंगावर बसून काम करण्याची शक्यता दुप्पटीने जास्त असते.
पण पलंगावरून काम करण्याचा प्रकार केवळ योग्य खुर्चीअभावी होत असतो असं नाही. अनेकांना पलंगाच्या अवकाशातला उबदारपणा आणि निवांतपणा हवाहवासा वाटतो. इन्स्टाग्रामवर हजारो फोटोंसोबत #WorkFromBed हा हॅशटॅग जोडलेला दिसतो. यातील अनेक लोक घरातले कपडे घालून हातात कॉफीचा कप घेऊन किंवा अगदी ट्रेमध्ये नाश्ता घेऊन पलंगावर हसत बसलेले असतात.
पण आपल्या पलंगालाच ऑफिससारखं वापरायला सुरुवात केली, तर त्यातून अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात- मानसिक व शारीरिक अशा दोन्ही प्रकारच्या या समस्या आहेत. आत्ता या समस्या लक्षात आल्या नाहीत- तरी त्याचे विपरित परिणाम बहुधा कायमस्वरूपी राहू शकतात- आणि आयुष्याच्या उत्तरकाळात ते डोकं वर काढू शकता.
कार्यपरिस्थितीसंबंधीचं दुःस्वप्न
घरातून काम करणं ही एक विशेषाधिकार पुरवणारी स्थिती आहे आणि लाखो लोकांना ही चैन परवडत नाही, हे मान्य करणं महत्त्वाचं आहे. शिवाय, ऑफिसपासून दूर राहून काम करणाऱ्या अनेकांना परिपूर्ण कार्यपूरक अवकाश उपलब्धच नसतो, त्यांना पलंगावरून काम करणँ हाच एकमेव पर्याय उपल्ध असण्याची शक्यता असते.
पण अनेकांसाठी हा एक सहजसोपा पर्याय असतो आणि त्यात काही अडचणही येत नाही. (तसंही कोव्हिड साथीदरम्यान प्रेरणादायी स्थिती नीचांकीच गेलेली होती.) कम्प्युटर ठेवण्यासाठी टेबल असलं तरीही तसं न करण्याची निवड अशा लोकांनी केलेली असते.
पण पलंगावरून काम करणं टाळता येण्याजोगं असेल किंवा नसेल, तरी कार्यपरिस्थितीसंबंधीचा सल्ला एकच आहे: पलंगावरून काम करणं तुमच्या शरीरासाठी चांगलं नाही, त्यामुळे आपल्या शरीराची बसण्याची ढब बदलत राहणं आणि शक्य असेल तेव्हा शरीराच्या वेगवेगळ्या भागांना आधार देणं अतिशय आवश्यक असतं.

फोटो स्रोत, Alamy
आपल्याला आडवं होण्याची भुरळ घालणाऱ्या कोणत्याही मऊ पृष्ठभूमीवर असताना आपली मान, पाठ, ढुंगण व इतरही अवयवांवर ताण येतो. "असं काम करणं अजिबातच इष्ट नसतं," असं सुझान हॉलबेक सांगतात. अमेरिकेतील सर्वांत मोठ्या वैद्यकीय संशोधन संस्थांपैकी एक असलेल्या मायो क्लिनिकमध्ये त्या आरोग्यसेवाव्यवस्था अभियांत्रिकी विभागाच्या संचालक आहे. "पलंगावरन काम करताना आपल्याला कार्यपूरक असा कोणताच आधार नसतो."
अशा चुकीच्या सवयींना तरुण लोक खासकरून बळी पडण्याची शक्यता असते, कारण त्यांना आत्ता थेट ताण जाणवणार नाही कदाचित, पण आयुष्याच्या उत्तरकाळात ही वेदना डोकं वर काढेल, याकडे त्या निर्देश करतात. गेल्या वर्षभरात आपण किती वाईट सवयी लावून घेतल्या, याचा विचार केला, तर काहीएक नुकसान आधीच झालेलं असावं. हे त्या-त्या व्यक्तीवर अवलंबून असतं, पण वय वाढल्यानंतर कार्यपरिस्थितीविषयी तुम्हाला ज्या समस्यांना सामोरं जावं लागणार असेल, ते थोपवण्याची वेळ बहुधा सरून गेली असावी.
साध्या डोकेदुखीसारखे आजारही याच्याशी निगडीत आहेत, आणि पाठीमध्ये कायमस्वरूपी ताठरपणा येणं, सांधेदुखी, मानेचे आजार, असे टोकाचेही परिणाम दिसू शकतात. "चुकीची सवय सुरू ठेवण्यापेक्षा त्यावर उपाय करणं कधीही चांगलंच. थांबणं शक्य असेल तेव्हा थांबावंच," असं हॉलबेक म्हणतात.
तुम्हाला पलंगावरूनच काम करावं लागणार असेल ("वाईट सवयींच्याही श्रेणी आहेत", असं हॉलबेक म्हणतात), तर शक्य असेल तितकं ताठ खुर्चीवर बसल्यासारखं बसायचा प्रयत्न करा आणि "न्यूट्रल पोश्चर" टिकवण्याचं उद्दिष्ट ठेवा- म्हणजे शरीराच्या कुठल्याही एका भागावर ताण येणार नाही असा प्रयत्न करा.
उशीची गुंडाळी करून तुमच्या पाठीच्या खालच्या बाजूला आधारासाठी ठेवा, तुमच्या गुडघ्यांखाली उश्या ठेवा, शक्य असेल तर कम्प्युटरचा डिस्प्ले कीबोर्डपासून वेगळा करा आणि डिस्प्ले स्क्रिन नजरेच्या पातळीवर किंवा वरच्या बाजूला ठेवा. काहीही झालं तरी पालथं पडून काम करणं टाळाच, त्याने मानेवर आणि कोपरावर खरोखरच ताण येतो.
साशंक झालात, तर सर्जनशीलतेचा आधार घ्या- म्हणजे इस्री करायच्या फळीचा वापर तात्पुरत्या टेबलासारखा करा. "दीर्घ काळ तुम्ही घरातून काम करणार असाल" (आणि तशी शक्यता असल्याचं अनुमान बहुतांश तज्ज्ञांनी वर्तवलं आहे), तर "चांगल्या वर्कस्टेशनमध्ये पैसे खर्च करणं खरोखरच उपयोगी ठरतं- अगदी छोटेखानी वर्कस्टेशन असेल तरी चालतं," असं हॉलबेक म्हणतात.

फोटो स्रोत, Alamy
मेंदूवरील परिणाम
वर्षभर पलंगावरून काम केल्याने केवळ शरीरालाच अपाय होतो असं नव्हे, तर आपली उत्पादकता व झोपेच्या सवयींवरही याचा विपरित परिणाम होतो.
"निद्रातज्ज्ञ म्हणून आम्ही पलंगाचा वापर तीन गोष्टींसाठी करायला सुचवतो: झोपण्यासाठी, सेक्ससाठी आणि आजारी असताना वापरण्यासाठी. एवढंच," असं राशेल सलास सांगतात. मेरीलँडमधील जॉन हॉपकिन्स विद्यापीठात त्या मज्जाशास्त्राच्या सहायक प्राध्यापक आहेत व निद्रातज्ज्ञ आहेत.
"पलंगावर बसून टीव्ही पाहिला, व्हीडिओ गेम खेळले आणि पलंगावर पडल्यावर लगेच झोपलं नाही, तर आपला मेंदू हे शिकत राहतो, 'अच्छा, ठीक आहे, म्हणजे या गोष्टीही पलंगावर करता येतात तर.' असे दुवे मेंदू जोडतो आणि त्यातून आपल्या वर्तनालाही आपोआप तसा आकार मिळतो."
याला तज्ज्ञ मंडळी 'झोपेविषयीची स्वास्थ्यता' असं म्हणतात- रात्री ठरलेले कपडे घालावेत, जेणेकरून आता काम बंद करायची वेळ झालेय असा संदेश शरीराला मिळतो. पलंगावर बसून नुसतं स्क्रोलिंग करत राहणं किंवा ई-मेल पाठवणं झोपेविषयीच्या स्वास्थ्यतेबाबत अत्यंत चुकीचं आहे.
त्यामुळे लॅपटॉप, फोन, आणि कामासाठी लागणाऱ्या सर्व चकाकत्या स्क्रिन आसपास ठेवून तुम्ही पलंगावरच दुकान थाटता, तेव्हा पलंग विश्रांतीसाठी आहे हा संबंधच मेंदू व शरीराला जोडता येत नाही. त्यामुळे या साथीच्या काळात 'कोरोनासोम्निया' / कोरोनाजन्य निद्रानाश वाढू लागला आहे, असं सलास म्हणतात.
पलंगावरून काम करताना "तुम्ही स्वतःच्या मेंदूला सतर्क राहण्यासाठी प्रशिक्षित करत असता, आपले विचार अमुक ठिकाणी बसल्यावर सुरू होतात, तिथे बसल्यावर आपण पूर्णतः कामात गुंतलेले असतो, असे संकेत मेंदूला दिले जातात," असं सलास म्हणतात. त्यामुळे मग आपण कम्प्युटर बंद करून झोपी जातो, तेव्हाही आपला मेंदू आपल्याला सांगतो, 'थांब जरा, काय करतोय आपण? ही कामाची वेळ आहे."
हे वर्षभर किंवा अधिक काळ करत राहिलं, तर त्यातून निद्रानाश उद्भवू शकतो किंवा किर्काडियन रिदम डिसऑर्डर- म्हणजे रातकिड्याच्या तालातला आजार होऊ शकतो. झोपण्याची वेळ कोणती, हे सांगणारी आपल्या शरीरातली नैसर्गिक वेळ दीर्घ काळ गायब होऊन जाते. शिवाय, पाय सतत अस्वस्थ राहण्यासारख्या झोपेशी निगडीत नसलेल्या समस्याही यातून निर्माण होण्याची शक्यता असते, अशा वेळी संबंधित अवयवांना विश्रांती गरजेची असते, याकडे सलास लक्ष वेधतात.
रात्रीची झोप धड न होणं, शरीरात वेदना होणं किंवा दोन्ही गोष्टी होत राहणं याचा अर्थ असा की, कामामध्येही तुम्ही कमी उत्पादक, कमी सर्जनशील व कमी लक्ष केंद्रित करणारे होऊन जाता, असं तज्ज्ञ म्हणतात. अशा वेळी आपल्या कामावरच विपरित परिणाम होत असतो.

फोटो स्रोत, Getty Images
सर्वांसमोरचाच प्रश्न?
परंतु, यातील सर्व संभाव्य समस्या पलंगावरून काम करणाऱ्या काही लोकांमध्ये दिसू शकतात, तर इतर काहींवर याचा परिणाम न होण्याची शक्यता असते, हा सगळ्यांत गंभीर मुद्दा आहे.
"आपल्याला काही असली अडचण नाही: आपण पलंगावरून काम करू शकतो, आणि तिथे झोपूही शकतो, असं काही जण ठामपणे म्हणतील," असं सलास सांगतात. "त्यांनी पलंगावर काहीही केलं, तरी त्याचा त्यांच्या झोपेवर नकारात्मक परिणाम होत नाही."
जनुकीय रचना, पर्यावरणीय घटक, सवयी किती वाईट थराला गेल्या आहेत आणि किती काळ हे केलं जातं, शिवाय आपलं वय: हे सगळे घटक या संदर्भात कारणीभूत ठरतात, आणि पलंगावरून काम केल्याचे आपल्यावर खरोखरच वाईट परिणाम होणार आहेत का, हे ठरतं. "डोस दिला, प्रतिसाद मिळाला- असं हे नसतं," याकडे हॉलबेक लक्ष वेधतात.
पलंगावरून काम करण्याची सवय कदाचित तुम्हाला बदलता येणार नाही, पण ती बदलायची इच्छा तुम्हाला असू शकते, तेव्हा एवढं तरी लक्षात ठेवावं की- या सगळ्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या शरीराला व मेंदूला आत्ता जाणवणार नाही, पण कधीतरी तो जाणवू शकतो. "आत्ता त्यांना काही जाणवत नाही," विशेषतः तरुणांना हा परिणाम जाणवत नाही, असं हॉलबेक सांगतात, "पण वय झाल्यानंतर हे आजार डोकं वर काढतात."
कोव्हिड-19 काळामध्ये ही आणखी एक चिंता वाढवणारी गोष्ट आहे, असं कोणाला वाटू शकतं. पण या कालखंडाने आपल्याला एवढं तरी नक्की शिकवलं आहे की, किमान आरोग्याच्या बाबतीत पश्चात्तापापेक्षा प्रतिबंध बरा. "तुमच्यावर याचे काही नकारात्मक परिणाम होत नसतील, तर उत्तम आहे," असं सलास म्हणतात. "पण प्रत्येक वेळी तसंच होईल असं नाही."

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)









