कोरोना काळात झूमची भरभराट, नफ्यात 355 टक्क्यांची वाढ

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना आणि त्यामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन यामुळे जगाला आर्थिक फटका बसत असताना व्हीडिओ कॉन्फरन्सिंग झूम अॅपने मात्र छप्परफाड कमाई केली आहे.
कोरोना काळात ऑफिसला जाण्याऐवजी वर्क फ्रॉम होम मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. कामासंदर्भात एकत्रित बोलण्यासाठी झूम कॉलद्वारे मीटिंगांचं प्रस्थ वाढलं. याचा थेट परिणाम म्हणजे झूमच्या कमाईत दुपटीपेक्षा वाढ झाली आहे.
31 जुलैला संपलेल्या तिमाहीत झूमचा नफा विक्रमी 355 टक्क्यांनी वाढला आणि कंपनीने 663.5 मिलिअन डॉलर एवढी घसघशीत कमाई केली. झूमला 500.5 मिलिअन डॉलर फायदा होईल असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला होता.
सोमवारी (31 ऑगस्ट) झूमच्या शेअरने प्रचंड भरारी घेतली. बाजार बंद झाला तेव्हा झूमचा शेअर 325.10 डॉलर्सवर स्थिरावला होता. झूमने वार्षिक नफ्यात 30 टक्क्यांनी आगेकूच केली आहे. झूमची वार्षिक उलाढाल 2.37-2.39 बिलिअन डॉलर्स एवढी असेल.
हे अॅप पैसे न भरता वापरणाऱ्या ग्राहकांच्या तुलनेत पैसे भरून वापरणाऱ्या कॉर्पोरेट क्लायंट्समध्ये झालेली वृद्धी हे झूमच्या यशाचं रहस्य आहे. झूम कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात 1 लाख डॉलर्सचा नफा कमावणाऱ्या कंपन्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगसाठी झूमला पसंती दिली आहे.

फोटो स्रोत, ZOOM
झूमचे प्रतिस्पर्धी असलेल्या सिस्को वेबएक्स आणि मायक्रोसॉफ्ट टीम्स यांच्याही गंगाजळीत मोठ्या प्रमाणावर भर पडली आहे. प्रत्यक्षात कार्यालयात जाऊन काम करण्याऐवजी घरच्या घरी बसून काम करण्याची पद्धत रूढ झाल्याने व्हीडिओ कॉन्फरन्सिंग करणं आवश्यक झालं.
झूमच्या वाढत्या लोकप्रियतेचा फटका कंपनीच्या पायाभूत व्यवस्थेला बसला. कारण अमेरिकेत गेल्या काही दिवसात तांत्रिक कारणांमुळे झूम कॉलद्वारे ऑनलाईन क्लासेसचं काम होऊ शकलं नाही. अधिकाअधिक लोक झूमद्वारे काम तसंच ऑनलाईन मीटिंग करत असल्याने, या बैठका तसंच गोपनीय काम हायजॅक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. यामुळे झूमच्या तंत्रज्ञानातील उणीवा स्पष्ट होऊ लागल्या आहेत. झूमने युझर डेटा फेसबुकला दिल्याचंही वृत्त आहे. यामुळे झूम कॉल हे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन असतात हे खोटं ठरताना दिसत आहे.
चीनशी सलगी असल्याने झूम कंपनीवर टीकाही होते आहे. चीनमध्ये झूमचे 700 कर्मचारी काम करतात. प्रॉडक्ट डेव्हलपमेंट टीमचं बहुतांश काम चीनमधूनच चालतं. सरकारी कामं, बैठका यासाठी झूम अॅप वापरणं सुरक्षित नाही असाही एक विचारप्रवाह आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








