रडल्यामुळे मन मोकळं होतं की डोळ्यात पाणी येण्याची कारणं वेगळी असतात?

रडणे, आरोग्य

फोटो स्रोत, iStock

    • Author, जेसन जी. गोल्डमन
    • Role, बीबीसी फ्युचर

तणाव कमी करण्यासाठी रडणं हा एक चांगला उपाय असल्याचं बरेचदा म्हटलं जातं. या धारणेला विज्ञानाचा आधार आहे का?

अगदी अलीकडेपर्यंत रडण्याच्या मुद्द्यावर वैज्ञानिक व लेखक यांच्यात तीव्र असहमती होती. 'किंग हेन्री सिक्स्थ' या नाटकात शेक्सपिअरने लिहिलं होतं, "रडणं म्हणजे दुःखाची खोली कमी करणं."

अमेरिकन लेखक लेमनी स्निकेट म्हणतात, "तुम्ही अगदी खूप, खूप जास्त सुदैवी असाल तर गोष्ट वेगळी, अन्यथा परिस्थिती कणभरही बदललेली नसतानाही बराच वेळ रडल्यावर आपल्याला चांगलं वाटतं हे तुम्हाला माहीत असेलच."

दुसऱ्या बाजूला, चार्ल्स डार्विनला असं वाटत होतं की, अश्रूंची निर्मिती (ही अर्थातच रडण्याची निष्पत्ती आहे) म्हणजे डोळ्यांभोवतीच्या स्नायूंच्या कामकाजाचा एक आनुषंगिक परिणाम असतो.

रक्ताचा प्रवाह ओसंडू नये यासाठी तिथल्या स्नायूंना ठराविक वेळेनंतर सतत आकुंचन पावावं लागतं आणि या शरीरप्रक्रियेचा आपोआप झालेला परिणाम म्हणजे अश्रू बाहेर येणं, असं डार्विन मानत होता. (पण रडल्यामुळे लहान बाळांना त्यांच्या पालकांचं लक्ष वेधून घेता येतं, एवढं मात्र त्याने कबूल केलं होतं).

रडणं- म्हणजे प्रौढ व्यक्तीचं असतं ते- म्हणजे विशिष्ट प्रकारच्या भावनिक उत्तेजनेला दिलेला व्यामिश्र शरीरशास्त्रीय प्रतिसाद आहे, हे आता आपण जाणतो. अश्रू बाहेर येणं हे अर्थातच याचं सर्वांत ठळक वैशिष्ट्य आहे, पण त्यात चेहऱ्यावरील भाव आणि श्वासोच्छवासाची लयदेखील बदलते. उदाहरणार्थ, 'मुसमुसणं' म्हणजे वेगाने श्वासोच्छवास करणं असतं, आणि रडताना बहुतेकदा तसं होतंच.

रडणे, आरोग्य

फोटो स्रोत, iStock

वैज्ञानिक परिप्रेक्ष्यातून पाहिलं, तर एखाद्या रासायनिक पदार्थाच्या संपर्कामुळे डोळ्यातून येणारं पाणी- म्हणजे मसालेदार अन्नपदार्थ खाताना चुकून आपण डोळे चोळले तर जे काही होतं ते आणि रडताना येणारे अश्रू यांच्यात फरक आहे.

हे अश्रूही एकमेकांपासून भिन्न असतात. मिनेसोटामधील मानसशास्त्रज्ञ विल्यम एच. फ्रे दुसरे यांना 1981 साली असं आढळलं की, दुःखद चित्रपट पाहताना येणारे अश्रू अधिक प्रथिनयुक्त असतात, त्या तुलनेत ताजे कांदे कापताना डोळ्यांतून येणारे 'अश्रू' कमी प्रथिनं राखून असतात.

डोळ्यांतून पाणी येईल इतकं हसायला लावणारा विनोदी कार्यक्रम असेल किंवा वराने विवाहावेळच्या प्रतिज्ञा वधूसमोर वाचून दाखवणं असेल, अशा वेळी येणारे अश्रू काही केवळ खिन्न भावनांच्या मर्यादेतले नसतात. आनंद असो वा दुःख, रडण्याशी संबंधित भावनांशी आपल्या सर्वांचा परिचय असला, तरी प्रौढ व्यक्ती म्हणून आपण का रडतो याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही- पण याबद्दल बऱ्याच कल्पना मांडल्या गेल्या आहेत.

बाळं रडतात त्याहून प्रौढांचं रडणं प्रत्यक्षात फारसं वेगळं नसतं, अशी एक कल्पना आहे- किमान सामाजिक स्वरूपाच्या रडण्याबाबत अशी मांडणी केली जाते. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, ओक्साबोक्शी रडणं लक्ष वेधून घेण्यासाठीची टाहो असतो, पाठिंबा मिळवण्यासाठी वापरलेलं साधन असतं किंवा अत्यंत गरजेच्या वेळी मित्रांकडून मदत मागण्याचा प्रकार असतो. आपल्याला पूर्णतः शब्दांत मांडणं शक्य होत नसेल अशा वेळी आपली आंतरिक भावना इतरांपर्यंत पोचवण्याचा हा एक मार्ग आहे.

रडणे, आरोग्य

फोटो स्रोत, iStock

यातून रडण्याच्या काही प्रकारांचा उलगडा होत असला, तर प्रौढ व्यक्ती बहुतेकदा पूर्णतः एकट्या असताना रडतात, असं अनेक संशोधकांना आढळलं आहे. दुसरी एक शक्यता अशी आहे की, रडण्याचा वापर 'दुय्यम चाचपणी'सारखा केला जातो- त्यातून लोकांना स्वतःच्या भावना समजून घ्यायला, आपण किती नाराज आहोत हे समजून घ्यायला मदत होते. ही कुतूहलजनक कल्पना आहे, आणि काही प्रसंगी तिला आधार देणारा किमान स्वरूपाचा पुरावा उपलब्ध आहे.

याव्यतिरिक्त भावविरेचनाची कल्पना आहे: भावनिकदृष्ट्या तणावदायक परिस्थितीत रडल्याने मोकळं वाटतं. केवळ शेक्सपिअरच्या नाटकाशी नव्हे, तर रोमन कवी ओव्हिडच्या विधानाशीदेखील ही कल्पना मिळतीजुळती आहे.

ओव्हिडने लिहिलं होतं: "रडणं म्हणजे मोकळं होणं; शोक पूर्ण होतो आणि अश्रूंवाटे बाहेर निघून जातो." ग्रीस तत्त्वज्ञ अॅरिस्टॉटलने असं म्हटलं होतं की रडल्याने "मन स्वच्छ होतं."

अमेरिकेतील लोकप्रिय नियतकालिकांचा व वर्तमानपत्रांचा 1986 साली अभ्यास केल्यानंतर एका मानसशास्त्रज्ञाला असं आढळलं की, रडल्याने मानसिक तणाव निवळायला मदत होते, असं रडण्यासंबंधीच्या 94 टक्के लेखांमध्ये म्हटलेलं होतं.

तीस देशांमधील सुमारे 4,300 तरुण प्रौढ व्यक्तींचा एक अभ्यास 2008 साली करण्यात आला. त्यानुसार, रडण्याची उबळ येऊन गेल्यावर आपल्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यात सुधारणा होत असल्याचं बहुतेकांनी नमूद केलं. पण सर्वांनी असंच म्हटलं नाही. रडल्यानंतरही आपल्या स्वास्थ्यात काहीच फरक पडत नसल्याचं काहींनी सांगितलं, आणि काहींनी तर रडल्यावर आणखी वाईट वाटत असल्याचंही सांगितलं.

हा भेद सामाजिक संदर्भाशी निगडित आहे: उदाहरणार्थ- लोकांसमोर रडण्यात एखाद्या व्यक्तीला लाज वाटत असेल, तर त्यांना एकट्याने किंवा एकटा निकटचा मित्र वा मैत्रीण असताना अधिक सहजतेने रडता येत असेल, पण इतर लोक असताना त्यांना निर्धारपूर्वक रडता येत नसेल. लोक स्वतःचं रडणं दाबण्याचा किंवा लपवण्याचा प्रयत्न करत, तेव्हा नंतर कमी मोकळं वाटायला लागल्याचंही या अभ्यासात दिसून आलं.

'रडणं चांगलं' ही कल्पना निराधार नाही, पण रडणं परिणामकारक होण्यासाठी बहुधा योग्य प्रकारचा सामाजिक आधार आवश्यक असेल. म्हणजे अखेरीस, लहान बाळं ज्या कारणासाठी रडतात, त्याच कारणासाठी प्रौढ व्यक्ती रडत असाव्यात: आपल्या मित्रपरिवाराकडून व कुटुंबियांकडून मदत मागण्यासाठीच ते रडत असावेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)