You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘सेक्स हा आता वाईट शब्द राहिलेला नाही, हे काही 50चं दशक नाही’
- Author, अॅलिस डेव्हिस
- Role, बीबीसी न्यूज
कोरोनाची जागतिक साथ आणि लॉकडाऊनच्या काळात कर्ज फेडण्यासाठी आपण स्वतःचे न्यूड (नग्न) फोटो ऑनलाईन शेअर केल्याचं तिशीतल्या रेचल सांगतात.
साऊथ वेल्समध्ये राहणाऱ्या रेचल व्यवसायाने डेटा सायंटिस्ट आहेत. पण साथीच्या काळात घरातली कामं, जबाबदाऱ्या आणि ऑफिस यांचं गणित जुळत नसल्याने त्यांनी पूर्णवेळ नोकरी सोडली.
घरबसल्या पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून त्यांनी 'ओन्ली फॅन्स' नावाच्या वेसबाईटवर स्वतःचं वेबपेज तयार केलं. त्यानंतरच्या 4 आठवड्यांत त्यांची 2800 पौंडांपेक्षा जास्त मिळकत झाली.
"सेक्स हा आता वाईट शब्द राहिलेला नाही. हे काही 50चं दशक नाही. मला यापूर्वी आर्थिक अडचणी होत्या आणि त्या सगळ्या संपवत मला नवीन सुरुवात करायची होती," त्या सांगतात.
प्रा. टीला साँडर्स या युनिव्हर्सिटी ऑफ लीस्टरमध्ये क्रिमिनॉलॉजीच्या प्राध्यापक आहेत. युकेमधल्या ऑनलाईन सेक्स उद्योगांविषयी त्यांचा अभ्यास आहे.
त्या या व्यवसायाबाबत इशारा देत सांगतात, "ऑनलाईन सेक्सवर्कमधून मिळणारा पैसा आणि या कामात असणारं स्थैर्य, याबाबत लोकांच्या मनात चुकीचे समज आहेत. या कामातून पैसे मिळत असले तरी या कामातली असुरक्षितता लक्षात घ्यायला हवी. कोणत्याही क्षणी गोष्टी बंद होऊ शकतात. मग ते कायद्यामुळे असू शकतं किंवा मग वेबसाईटच बंद झाल्याने असू शकतं."
कोरोनाची साथ आणि लॉकडाऊन या काळात आपल्या वेबसाईट युजर्सची संख्या वाढल्याचं ओन्ली फॅन्सने म्हटलंय. नोव्हेंबर 2019च्या 75 लाख युजर्सवरून आता या वेबसाईटचे 8 कोटींपेक्षा युजर्स आहेत.
सबस्क्रिप्शन म्हणजे दरमहा फी भरून कन्टेन्ट पाहण्याची सेवा देणाऱ्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सच्या युजर्समध्ये लॉकडाऊनच्या काळात वाढ झालीय. ओन्ली फॅन्स ही वेबसाईट युकेमध्ये लोकप्रिय आहे.
या वेबसाईटवरच्या क्रिएटर्सचे फोटोज, व्हीडिओज वा लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी लोकांना दरमहा ठाराविक फी भरावी लागते. यातला 20 टक्के भाग कंपनीला तर उर्वरित भाग क्रिएटर्सना मिळतो. पण यावर फक्त अॅडल्ट मजकूरच असतो, अशातला भाग नाही.
"मी नोकरी सोडली होती, फ्रीलान्सिंग करत होते, म्हणून याला सुरुवात केली. पण नंतर मी अशा एका टप्प्यावर आले की मला स्वतःला कर्जाच्या ओझ्याखालून मुक्त करायचं होतं. या वेबसाईटमुळे मला ते करायला मदत होतेय," रेचल सांगतात.
'या कामात मज्जा आहे'
स्वतःचे फोटोज आणि व्हीडिओज ऑनलाईन शेअर केल्याने आपल्यातला आत्मविश्वास पूर्वीपेक्षा वाढल्याचं रेचल सांगतात.
"आणि खरं सांगायचं तर सुरुवातीची घालमेल आणि असुरक्षितता गेली की मग कामात मज्जा वाटायला लागते," त्या सांगतात.
"अशा प्रकारे गोष्टी सार्वजनिक करण्यातला मला वाटणारा सगळ्यांत मोठा धोका म्हणजे तुम्ही ज्यांना प्रत्यक्ष आयुष्यात ओळखता, अशांनाही सगळं कळणार असतं, आणि सगळेच जण याच्याशी सहमत असतील असं नाही.
"जर एखाद्याने शरीर वापरून पैसे कमवायचं ठरवलं तर मग त्यांच्या या निर्णयाबद्दल इतर कोणी काही बोलायचं कारण नाही. पण तुमच्यावर टीका होणार हे लक्षात घेत तुम्ही कणखर होणं गरजेचं आहे. सगळ्यांकडेच दुर्लक्ष करणं किंवा स्वतःची बाजू मांडणं सोपं नाही. खरंतर तुम्ही असं करणं गरजेचं नाही, पण अनेकदा तुम्हाला ते करावं लागेल."
'माझ्या फोनचा रोजचा स्क्रीन टाईम 17 तास होता'
ओन्ली फॅन्सवर असंच पूर्णवेळ काम करायला सुरुवात करणाऱ्यांपैकीच एक - कॅरेड (खरं नाव बदलण्यात आलेलं आहे.)
"लॉकडाऊनच्या काळामध्ये मला माझ्या दोन्ही अर्धवेळ कामांमधून बिनपगारी रजा देण्यात आली. माझ्याकडे वेळ होता म्हणून मग मी सगळा वेळ ओन्लीफॅन्सवर घालवू लागले. माझ्या फोनचा रोजचा स्क्रीनटाईम सुमारे 16-17 तास होता."
या वेबसाईटवरून कॅरेड यांना मिळणारं उत्पन्न पहिल्या लॉकडाऊनच्या काळात तिप्पट झालं.
पण ही वेबसाईट वापरणाऱ्यांची संख्या वाढलेली असतानाच स्पर्धाही वाढली असल्याचं त्या सांगतात. म्हणूनच अधिक प्रयत्न करणं गरजेचं असून या साईटवरून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून राहणं धोक्याचं झाल्याचं त्या म्हणतात.
"एकाच गोष्टीवर अवलंबून राहणं धोक्याचं आहे. आम्ही सगळे अशा एका वेबसाईटवर अवलंबून आहोत, जिथे कोणत्याही क्षणी बदल होऊ शकतात आणि आठवडाभरात तुमचं सगळंच उत्पन्न जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. ऑनलाईन सेक्स इंडस्ट्री ही पूर्णपणे कधीच संपुष्टात येणार नसली, तरी धोका राहतोच," त्या सांगतात.
ओन्लीफॅन्स आणि त्यासारख्या इतर वेबसाईट कॅरेड गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळ वापरतायत. आणि आपण आपलं कुटुंब आणि आप्त यांना या कामाबद्दल मोकळेपणाने सगळं सांगितलं असलं तरी आपल्या नोकरीच्या जागी याबद्दल कळलं तर काय, अशी भीती त्यांना आहे. त्यांची एक नोकरी शिक्षणक्षेत्रातली आहे.
"कोणाला जर याबद्दल कळलंच तर अशा व्यक्तीने शिक्षणक्षेत्रात काम करू नये, असं त्यांना का वाटू शकतं हे मी समजू शकते. तुम्ही शिक्षक असाल तर मग अजिबातच नाही. पण जर तुम्ही या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवणार असला तर शिक्षण क्षेत्रात नोकरी न मिळणं हे योग्य नाही."
या वेबसाईटवरचा आपण तयार केलेला कन्टेन्ट चोरून कोणतीतरी तो दुसरीकडे वापरेल, अशी भीतीही त्यांना आहे.
याबद्दल ओन्लीफॅन्सने सांगितलं, "युजर्सचा मजकूर कॉपी करणं, त्याची प्रत तयार करणं किंवा या गोष्टी रेकॉर्ड करणं हे आमच्या नियमांचा भंग करणारं आहे. आणि योग्य परवानगी न घेता अशाप्रकारे मजकूर प्रसिद्ध करण्यापासून डिजीटल मिलेनियम कॉपीराईट अॅक्ट आमच्या क्रिएटर्सना संरक्षण देतो."
"मजकुराचं संरक्षण करण्याला आमचं प्राधान्य आहे आणि याबद्दल सुधारणा करण्यावर आमचा भर आहे. यासाठी मोठी गुंतवणूक आम्ही सातत्याने करत असतो आणि हा कायदा समजणारी आमची टीमही मोठी आहे."
फी घेऊन सेवा देणाऱ्या अशाप्रकारच्या वेबसाईट्स आणि सेक्सवर्क याविषयीचा थोडाच डेटा उपलब्ध असल्याचं प्रा. साँडर्स सांगतात. पण कमिशनचा कमी दर आणि सध्या अशा वेबसाईटवर असणारे कमी निर्बंध यामुळे त्या सध्या लोकप्रिय असल्याचं साँडर्स सांगतात.
त्या म्हणतात, "सेक्सची ऑनलाईन विक्री होणारी ठिकाणं सातत्याने बदलतायत. ओन्लीफॅन्स आता मोठं झालं, इतकेदिवस ही वेबसाईट लहान होती, पण कोव्हिडमुळे हे सगळं बदललं. इथे तुम्ही पैसे कमवू शकता... पण त्यासाठी तुम्हाला अनेक तास द्यावे लागतात. तुमचं प्रोफाईल चर्चेत ठेवावं लागतं, वारंवार पोस्ट करावं लागतं. इथली स्पर्धा खूप मोठी आहे आणि याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो."
प्रा. साँडर्स पुढे सांगतात, "दुसरा धोका आहे डिजिटल फुटप्रिंटचा. म्हणजे इंटरनेटवर एकदा आलेली गोष्ट पूर्णपणे डिलीट करणं अतिशय कठीण आहे, आणि फार लोक याबद्दल पूर्णपणे विचार करताना दिसत नाहीत."
"पण असं असलं तरी कोणत्या वेळी काम करायचं, क्लायंटसना कधी भेटायचं हे ठरवता येत असल्याने इथे काम करणं अनेकांना सोयीचं वाटतं. इथे तुम्ही तिसऱ्या कोणासाठीतरी काम करत नसता," त्या सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)