कोरोना औषध : रेमडेसिव्हिर कुणालाही देऊ नका - WHOची सूचना

औषध

कोव्हिडग्रस्त रुग्णांना ते कितीही गंभीर स्थितीत असले तरी रेमडेसिव्हिर हे औषध दिलं जाऊ नये, अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

कोव्हिड 19वर अजूनही थेट परिणामकारक औषध उपलब्ध नसलं तरी सुरुवातीपासूनच रेमडेसिव्हिर हे औषध गंभीर रुग्णांना बरं करण्यासाठी दिलं जात होतं. त्याच्यावरचं अवलंबत्व इतकं वाढलं की दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांमध्ये त्याचा काळाबाजार होऊ लागला. पण कालांतराने हे औषध खरंच प्रभावी आहे का, असे प्रश्न विचारले जाऊ लागले.

रेमडेसिव्हिर कितपत प्रभावी?

ऑक्टोबर महिन्यात WHOने केलेल्या सॉलिडॅरिटी ट्रायल्समध्ये रेमडेसिव्हिरची कोव्हिडचे रुग्ण बरे होण्यात, त्यांचा मृत्यू रोखण्यात किंवा त्यांना असलेली व्हेंटिलेटरची आवश्यकता कमी करण्यात फारशी मदत झालेली नसल्याचं दिसून आलं होतं.

पण अमेरिकेतल्या गिलियाड फार्मास्युटिकल्स या रेमडेसिव्हिरचं उत्पादन करणाऱ्या कंपनीने हे निष्कर्ष फेटाळून लावले होते. तेव्हा अमेरिकेने देशात झालेल्या काही चाचण्यांच्या जोरावर या औषधाच्या वापराला परवानगी दिली होती.

रेमडेसिव्हिर

फोटो स्रोत, ALLAN CARVALHO/NURPHOTO VIA GETTY IMAGES

अमेरिकेत या औषधाच्या वापराला परवानगी देताना FDA ने म्हटलं होतं की, व्हेकलरी या ब्रँडनेम खाली विकलं जाणारं रेमडेसिव्हिर हे औषध कोव्हिड रुग्णांचा बरं होण्याचा दर पाच दिवसांनी कमी करतंय.

FDA ने याबद्दल म्हटलं, "प्रौढ तसंच बारा वर्षं वयावरच्या रुग्ण मुला-मुलींमध्ये आणि ज्यांचं वजन किमान 40 किलो असेल अशा रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांसाठी हे औषध वापरता येईल."

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनाही कोव्हिडची लागण झाल्यानंतर उपचारादरम्यान रेमडेसिव्हिर देण्यात आलं होतं. ट्रंप सुद्धा काही दिवसांतच बरे होऊन निवडणूक प्रचारात पुन्हा सहभागी झाले होते.

या औषधाच्या तीन वेगवेगळ्या क्लिनिकल चाचण्यांमधून चांगले निष्कर्ष आल्याचं अमेरिकेची औषध नियमन संस्था FDA ने म्हटलं होतं. मात्र WHO ने 30 वेगवेगळ्या देशांमध्ये यासंदर्भातल्या चाचण्या केल्या आणि त्यानंतर रेमडेसिव्हिरचा फारसा उपयोग झाला नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

रेमडेसिव्हिरचा महाराष्ट्रात वापर

महाराष्ट्रात रेमडेसिव्हिरचा कोव्हिड रुग्णांवर वापर बऱ्यापैकी झाला. HO च्या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांबद्दल कोव्हिड टास्क फोर्स तसंच इतर तज्ज्ञांशी बोलून रेमडेसिव्हिरच्या वापराबद्दल निर्णय घेतला जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी WHOच्या ऑक्टोबर महिन्यातील निष्कर्षांबाबत बोलताना बीबीसी मराठीला सांगितलं होतं.

तेव्हाच ICMRचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनीसुद्धा म्हटलं होतं, "रेमडेसिव्हिरच्या ट्रायलसाठी चार औषधांची चाचणी करण्यात आली. मात्र, अंतरिम निष्कर्षानुसार कोणत्याही औषधाने मृत्यूदर कमी होत नाही किंवा रुग्णालयात दाखल रुग्णांना व्हॅन्टिलेटरची गरज भासणं कमी होत नाही."

आता मात्र रेमडेसिव्हिर खरंच काम करतं, हे सांगणारे पुरेसे पुरावे आपल्याकडे नसल्याने त्याचा वापर करण्यात अर्थ नसल्याचं WHOने स्पष्टपणे म्हटलंय.

पण महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी आजही काही गंभीर पेशंट्सना बरं करण्यासाठी रेमडेसिव्हिर दिलं जातंय.

इंजेक्शन

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसी मराठीच्या मयांक भागवत यांच्याशी बोलताना महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले, "चार महिन्यांपूर्वीच टास्कफोर्सने सर्व डॉक्टरांना 'रेमडेसिव्हिर'चा योग्य वापर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. सरसकट सर्व रुग्णांना रेमडेसिव्हिर न देता योग्य रुग्णाला, आजाराच्या पहिल्या टप्प्यात हे औषध देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरने, रुग्णाला रेमडेसिव्हिरची गरज आहे का, हे ओळखून उपचार करावेत."

"टास्कफोर्सने केलेल्या सूचनांनंतर राज्यात रेमडेसिव्हिरचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झालाय. सद्यस्थितीत उपलब्ध असलेली सर्व औषधं रिसर्चच्या टप्प्यात आहेत आणि कोव्हिड-19 वर ठोस उपचार नाहीत, " असं डॉ. शशांक जोशींनी सांगितलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)