You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हाफिज सईद: 26/11 मुंबई हल्ल्यातील मुख्य आरोपी सईदला 10 वर्षांची शिक्षा
26/11 मुंबई हल्ल्याचा कथित मास्टर माइंड आणि जमात उद दावाचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तानच्या कोर्टाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
पाकिस्तानच्या दहशतवादी विरोधी न्यायालयानं हाफिज सईदला बेकायदेशीर मार्गानं पैसा पुरवल्याच्या दोन खटल्यांमध्ये 10 वर्षांची ठोठवली. जुलै 2019 मध्ये हाफिजला अटक करण्यात आली होती.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. समुद्राच्या मार्गाने 10 दहशतवादी मुंबईत घुसले होते आणि त्यांनी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी हल्ले केले होते. या हल्ल्या हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळासकर यांच्यासह अनेक पोलीस दहशतवाद्यांकडून ठार झाले होते.
तब्बल 60 तासांहून अधिक काळ दहशतवादी आणि पोलीस यांच्यात चकमक चालली. हेड कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांनी एका हल्लेखोराला पकडण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली. त्या हल्लेखोराचे नाव अजमल कसाब आहे आणि तो पाकिस्तानातून आला आहे अशी माहिती तपासात मिळाली.
या हल्ल्याचे धागेदोरे पाकिस्तानमध्ये असल्याचं कळाल्यानंतर भारताने या हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद आहे असं म्हटलं होतं. हाफिज सईद याला अटक करावी अशी मागणी लावून धरली होती.
जमात-उद-दावा आणि लष्कर-ए-तोएबा या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदला शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीसुद्धा सईद आणि त्याच्या काही साथीदारांना अतिरेकी कारवायांना निधी पुरवल्या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती.
पाकिस्तानातल्या व्यावसायिक कर विभागाने जमात-उद-दावाच्या नेत्यांविरोधात एकूण 41 गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी 24 प्रकरणांचा निकाल लागला आहे. तर हाफिज सईदविरोधात आतापर्यंत 4 प्रकरणांमध्ये आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
ऑगस्टमध्ये पाकिस्तानातल्या दहशतवादविरोधी न्यायालयाने हाफिज सईदच्या तीन सहकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. लाहोरमधील मलिक जफर इकबाल आणि शेखपुरा येथील अब्दुल सलाम यांना प्रत्येकी 16 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
हाफिज सईद कोण आहे?
हाफिज सईद लश्कर-ए-तोएबा या अतिरेकी संघटनेचा संस्थापक आहे. पाकिस्तानात तो जमात-उद-दावा ही समाजसेवी संघटनाही चालवतो.
2008 साली 26 नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा तो मास्टरमाईंड आहे असं म्हटलं जातं. या हल्ल्यात पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवादी 166 जणांना ठार केलं होतं. तर शेकडो लोक या दहशतवादी हल्ल्यात जखमी झाले होते.
हाफिज सईद याला संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेने 'आंतरराष्ट्रीय दहशतवादी' घोषित केलं आहे. त्याच्यावर 1 कोटी डॉलर्सचं बक्षीसही ठेवण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय दबावामुळेच गेल्यावर्षी जुलै महिन्यात अतिरेकी कारवायांना निधी पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
हाफिज सईदला लाहोरमधल्या कडेकोट बंदोबस्त असलेल्या कोट लखपत कारागृहात ठेवण्यात आलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)