भारत-नेपाळ वाद: RAW चे प्रमुख आणि नेपाळचे पंतप्रधान ओली यांच्यात गुप्त बैठक

फोटो स्रोत, Twitter/@kpsharmaoli
"नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि भारतीय गुप्तचर यंत्रणा असलेल्या RAW चे प्रमुख सामंत गोयल यांच्यात बुधवारी (21 ऑक्टोबर) झालेल्या चर्चेची कुणालाच माहिती नव्हती", असं नेपाळच्या सत्ताधारी पक्ष सीपीएनचे प्रवक्ते नारायण काजी श्रेष्ठ यांनी सांगितलं आहे.
केपी शर्मा ओली हे सीपीएनच्या दोन अध्यक्षांपैकी एक आहेत.
नारायण काजी श्रेष्ठ यांच्या मते, सीपीएनचे दुसरे अध्यक्ष पुष्पकमल दहल प्रचंड, पक्षातील इतर वरिष्ठ नेते किंवा नऊ सदस्यांच्या पार्टीचं सचिवालय यांपैकी कुणालाही ओली-रॉ प्रमुखांच्या चर्चेची माहिती नाही.

फोटो स्रोत, RSS
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलंय की, भारतीय गुप्तचर यंत्रणा असलेल्या रॉचे प्रमुख सामंत गोयल यांच्या दौऱ्याबद्दल काहीच माहिती नव्हती. मात्र, नेपाळचे पंतप्रधान ओली यांच्या माध्यम सल्लागाराने गुरुवारी जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय की, गोयल यांच्याशी ओली यांची बातचीत झाली.
टीका आणि शंका
नेपाळचे पंतप्रधान ओली यांचे माध्यम सल्लागार सूर्य थापा यांनी सोशल मीडियावर या भेटीचं पत्रक प्रसिद्ध केल्यानंतर सीपीएनचे नेते, कार्यकर्ते आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान ओली यांच्यावर जोरदार टीका केली.
अनेक लोकांचं म्हणणं आहे की, पंतप्रधान ओलींनी मुत्सद्देगिरीच्या आचारसंहितांचा पालन केलं नाही.
माजी परराष्ट्र मंत्री आणि पक्षाचे विद्यमान प्रवक्ते नारायण काजी श्रेष्ठ यांच्या म्हणण्यानुसार, "पंतप्रधान साधारणत: परदेशी अधिकारी किंवा राजकीय नेत्यांसोबत भेटीगाठी घेत असतात. मात्र, त्यावेळी नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयातील एक औपचारिक प्रतिनिधीही असायचा."
'कोड ऑफ कंडक्ट'चं पालन व्हायला हवं, या गोष्टीवर श्रेष्ठ जोर देतात.

फोटो स्रोत, RSS
श्रेष्ठ हे या बैठकीला 'असामान्य' म्हणत पुढे म्हणाले, "पंतप्रधानांनी गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखासोबत का बैठक घेतली, हे गंभीरपणे विचारलं जाणं स्वाभाविक आहे. ही बैठक का झाली, हा प्रश्न आहेच, पण त्याहून मोठा प्रश्न म्हणजे, अशा पद्धतीने बैठक का झाली?"
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "हलक्यात घ्यावं अशातला हा विषय नाही आणि परिस्थितीही नाही. यावर चर्चा होईल आणि व्हायलाही हवी."
गुप्त बैठक
नेपाळने मे महिन्यात नवा राजकीय नकाशा प्रसिद्ध केला होता. त्यानंतर बराच वादही झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच भारतातील कुणी अधिकारी नेपाळच्या दौऱ्यावर गेला.
विश्लेषकांच्या मते, "जेव्हा भारत आणि नेपाल यांच्यातील संबंध म्हणावे तितके सामान्य नाहीत, अशावेळी रॉ प्रमुखांचं नेपाळमध्ये जाणं आणि पंतप्रधानांना भेटणं, या गोष्टीला बरेच अर्थ आहेत."
"या गुप्त बैठकीची नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती नव्हती. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे," असं विश्लेषकांचं म्हणणं आहे.
बैठकीत नेमकं काय झालं?
नेपाळचे पंतप्रधान ओली यांचे माध्यम सल्लागार सूर्या थापा यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉचे प्रमुख सामंत गोयल यांच्यासोबत ओली यांनी राजशिष्टाचारान्वयेच भेट घेतली.
त्यांनी पुढे सांगितलं, "भारत-नेपाळमध्ये मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यावर भारतीय रॉप्रमुख आणि नेपाळच्या पंतप्रधानांमध्ये चर्चा झाली. चर्चेतूनच प्रश्न सोडवणं आणि एकमेकांचं सहकार्य वाढवण्यासंदर्भातही चर्चा झाली."
हे अधिकृत पत्रक जारी होण्याआधी नेपाळच्या कुठल्याच विभागानं यासंदर्भात काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, काही नेत्यांनी हे स्पष्ट केलंय की, ते गोयल यांना भेटले नव्हते.
इतकी नाराजी का?
भारतासोबतच्या वादावर तोडगा काय काढायचा, यावर विचारमंथन करण्यासाठी नेपाळमधील सत्ताधारी सीपीएन पक्ष नुकतंच या गोष्टीसाठी तयार झाला होता. हा निर्णयही अशावेळी घेण्यात आला होता, जेव्हा सरकारच्या काही भूमिकांबाबत पक्षाअंतर्गतच मतभेद होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मात्र, कुणालाही न सांगता पंतप्रधान ओली यांनी रॉप्रमुखांची भेट घेतल्याने पक्षातल्या नेत्यांमध्ये आणखी गोंधळ निर्माण झाला आहे.
सामंत गोयल हे नेपाळला पोहोचल्याची बातमी समोर आल्यानंतर पुष्पकमल दाहाल (प्रचंड), वरिष्ठ नेता माधव कुमार आणि नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादुर देऊबा यांनी स्पष्ट केले की, भारताच्या रॉ प्रमुखांशी त्यांची बातचीत झाली नाही.
सीपीएनच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि माजी उपपंतप्रधान, गृहमंत्री भीम रावल यांनी गुरुवारी ट्वीट करून आपली नाराजीही व्यक्त केली. भीम रावल यांनी रॉ प्रमुखांसोबत पंतप्रधान ओलींच्या चर्चेला आक्षेपार्ह ठरवलं आहे.
मत्सुद्देगिरीचा मुद्दा का उपस्थित करण्यात येतोय?
परराष्ट्रीय संबंधांच्या जाणकारांना वाटतं की, ओली यांची रॉ प्रमुखांसोबतची भेट मत्सुद्देगिरीविरोधात होती.
माजी राजदूत दिनेश भट्टाराय यांच्या मते, "नेपाळमधील चीनच्या वाढत्या प्रभावामुळे भारताची काळजी वाढलीय. रॉ प्रमुखांच्या या दौऱ्याच्य निमित्ताने नेपाळ भारताशी चर्चेचा दरवाजा उघडू पाहतोय, मात्र या दौऱ्याचा आगामी काळात मोठा परिणाम होईल."
"ज्या पद्धतीने रॉ प्रमुखांशी पंतप्रधान ओली यांची भेट झाली, त्यावरून अशीही शंका आहे की, ओलींनी आपल्या वैयक्तिक समस्या सांगितल्या असाव्यात आणि भारताने त्यांना मदतीचं आश्वासन दिलं असावं. याबाबतही काही चर्चा नक्कीच होईल," असं दिनेश भट्टाराय म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे म्हणतात, "असं काही झालं असेल तर आता तात्पुरता फायदा होईल, मात्र मोठ्या कालावधीसाठी हा मुद्दा बनण्याची शक्यता आहे."
नेपाळचे माजी परराष्ट्रमंत्री रमेश नाथ पांडेय यांच्या मते, "मत्सुद्देगिरीची काही सीमा नसते आणि रॉ प्रमुखांच्या आताच्या दौऱ्याचं त्या आधारावर मूल्यांकन व्हायला हवं."
"सैन्यातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध समस्या सोडवल्याचा भारत आणि नेपाळचा इतिहास आहे. दोन्ही देसात गैरसमज असेल, संवादाची कमतरता असेल, तर दूर करण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्यातून काय साध्य झालं, यावर याचा निर्णय व्हायला हवा," अंही पांडेय म्हणतात.
मात्र, दिनेश भट्टाराय यांच्यानुसार, मुत्सद्देगिरीमध्ये सर्व गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








