You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : डोनाल्ड ट्रंप म्हणतात, 'आता मी सर्वांचं चुंबन घेऊ शकतो'
कोव्हिड-19 ची लागण झाल्यानंतर दोन आठवड्याच्या आतच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचारांसाठी डोनाल्ड ट्रंप यांना काही दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एकादिवसापूर्वी डॉक्टरांनी, त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.
त्यांनी स्वत: कोव्हिड-19 वर मात कशी केली याबाबत सांगताना ते म्हणाले, "मी इम्युन झालो आहे. मला शक्ती मिळाल्यासारखं वाटतंय. मी सर्वांना किस करेन. पुरुषांना आणि सुंदर महिलांनासुद्धा."
फ्लोरिडामधल्या सॅनफोर्डमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ट्रंप यांच्या निवडणूक प्रचार रॅलीला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. पुढील चार दिवस ट्रंप प्रचार करणार आहेत.
3 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. ट्रंप आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडन लोकांपर्यंत पोहोचून मतदारांची मतं आपल्या पारड्यात पाडण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
मतदानपूर्व चाचणीनुसार जो बायडन हे ट्रंप यांच्यापेक्षा 10 अंकांनी पुढे आहेत. रिअर क्लिअर पॉलिटिक्सने गोळा गेलेल्या माहितीनुसार, काही राज्यांमध्ये बायडन यांची आघाडी खूप कमी आहे. उदाहरणार्थ, फ्लोरिडासारख्या राज्यामध्ये बायडन फक्त 3.7 अंकानी आघाडीवर आहेत.
फ्लोरिडाला "सनशाईन स्टेट" म्हणून ओळखलं जातं. या राज्यात "व्हाइट हाऊस" ची निवडणूक जिंकण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली 270 इलोक्टोरल कॉलेज वोट मिळवणं निर्णायक ठरणार आहे. जी बेलेट काउंट पद्धतीने निश्चित केली जात नाहीत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना 11 दिवसांपूर्वी कोव्हिड-19च्या संसर्गाची लागण झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना वॉल्डर रीड मेडिकल सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं.
पण, रविवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी डॉक्टरांनी, ट्रंप यांच्याकडून इतरांना कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका नसल्याचं स्पष्ट केलं. तर, सोमवारी डॉक्टरांनी ट्रंप यांच्या लागोपाट दोन दिवस करण्यात आलेल्या टेस्ट निगेटिव्ह असल्याची माहिती दिली. पण, त्यांनी तारखा सांगितल्या नाहीत.
ट्रम्प यांच्यावर विश्वास ठेवणारे त्यांना पाहण्यासाठी आले
नोमिया इक्बाल, बीबीसी न्यूज, सॅनफर्ड, फ्लोरिडा याचं विश्लेषण
शेकडोंच्या संख्येने जमा झालेल्या जनसमुदायाकडून 'आणखी चार वर्षं' अशा घोषणा ऐकू येत होत्या. ज्याठिकाणी ट्रंप येणार होते, त्याठिकाणी लोक रांगा लावून पोहोचत होते.
लोकांना ताप आहे का नाही याची तपासणी करण्यात येत होती, त्यांना मास्क वाटण्यात येत होते. ट्रंप यांच्या चाहत्यांना इतक्या लवकर ते बाहेर होतील असं वाटलं नव्हतं. ट्रंप यांचे चाहते त्यांची यासाठी प्रशंसा करतात. याठिकाणी मला एका व्यक्तीने सांगितलं, तो मूळचा न्यूयॉर्कचा आहे. पण, त्याने आपल्या हिरो प्रमाणे, प्लोरिडाला आपलं घर बनवलं आहे.
डोनाल्ड ट्रंप यांच्या कॅम्पेन टीमला फ्लोरिडाचं महत्त्व माहीत आहे. त्यामुळे कॅम्पेन टीम आपलं सर्वस्व फ्लोरिडामध्ये पणाला लावलं आहे. फ्लोरिडामध्ये पराभव म्हणजे ट्रंप यांचा "व्हाईट हाऊस" मध्ये जाण्याचा रस्ता बंद होण्यासारखं आहे.
डोनाल्ड ट्रंप यांचा मोठा मुलगा, डोनाल्ड ट्रंप ज्युनिअर याने गेल्या आठवड्यात फ्लोरिडामध्ये बस टूर पूर्ण केली. 'फायटर्स अगेन्स्ट सोशलिझम' च्या मार्फत हिस्पॅनिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. व्हेनझुएला, प्यूर्तोरिको आणि व्हिएतनामी वंशाचे 100 पेक्षा जास्त लोक एकत्र बसून ट्रंप ज्युनिअर यांचं ओर्लेंडोमधील भाषण ऐकत होते. त्यांच्यासोबतीला या भागातील स्टार असलेले क्यूबन-अमेरिकन फायटर जॉर्ज मासविडालही होते.
उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी निवृत्त लोकांची कॉलनी 'द व्हिलेजेस' ला भेट देऊन, निवृत्त लोकांची मतं मिळवण्यासाठी प्रयत्न केले.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांचे समर्थक जरी कोरोना व्हायरसपासून निश्चिंत दिसत असले. तरी, कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव फ्लोरिडामध्ये मोठ्या प्रमाणात झाला होता. या राज्यात 15,000 पेक्षा जास्त लोकांचा कोरोनाने बळी घेतलाय. ट्रंप याचे प्रतिस्पर्धी डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन मंगळवारी या भागात येणार आहेत. त्यांची टीम ट्रंप सरकारने ज्या पद्धतीने कोरोनाची स्थिती हाताळली यावर लक्ष केंद्रीत करून आहे.
या भागातील महत्त्वाच्या उपनगरांमध्ये शांतपणे पण जोरदार प्रचार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना आशा आहे की, या भागातील मतदार त्यांच्या बाजूने कौल देतील, आणि या राज्यात निळा रंग दिसून येईल.
ट्रंप फ्लोरिडामध्ये काय म्हणाले?
कोरोनाची लागण आणि बरं झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा हा पहिला प्रचार दौरा होता. उपचारानंतर पुन्हा निवडणूक प्रचारात उतरलेल्या ट्रंप यांनी पुन्हा जो बायडेन यांच्यावर खास शैलीत हल्ला चढवला. ट्रंप यांनी आपल्या भाषणात स्टॉक मार्केटमधील वाढ, अमेरिकन स्पेस फोर्सेस असा त्यांच्या यशाचा पाढा मतदारांसमोर वाचून दाखवला.
ट्रंप यांनी बायडेन यांच्या मानसिक तीव्रतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावेळी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यातील काहींनी चेहऱ्यावर मास्क घातले नव्हते.
त्याचसोबत यावेळी ट्रंप यांनी डेमोक्रॅट्सकडून करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनच्या समर्थनाचा निषेध केला.
त्यांनी स्वत: कोव्हिड-19 वर कशी मात केली याबाबत सांगताना ते म्हणाले, "ते म्हणाले, मी इम्युन आहे. मला शक्ती मिळाल्यासारखं वाटतंय. मी चालत येईन आणि सर्वांना किस करेन. पुरुषांना आणि सुंदर महिलांना मी किस करेन."
ट्रंप यांनी निवडणूक प्रचाराला पुन्हा सुरूवात करण्यासाठी फ्लोरिडासारख्या सनशाईन स्टेटची केलेली निवड अजिबात आश्चर्यकारक नव्हती.
फ्लोरिडा त्यांना जिंकायचं आहे. 2016 च्या निवडणुकीत त्यांना या राज्यात निसटता विजय मिळाला होता. फ्लोरिडा त्यांनी दत्तक घेतलेलं राज्य आहे. न्यूयॉर्कचे रविवासी असलेले ट्रंप गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये फ्लोरिडाचे निवासी झाले.
देशभरात ट्रंप जरी मागे दिसत असले तरी, काही राज्यामध्ये चुरशीची लढत असल्यामुळे ट्रंप अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णायक इलेक्टोरल वोट्स मिळवून पुन्हा निवडणूक जिंकण्याची शक्यता आहे.
ट्रंप यांच्या प्रचारातून एक गोष्ट लक्षात आली की, कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याच्या बाबतीत ते अजूनही बदललेले नाही आणि येत्या काळात पेन्सलव्हेनिया, नॉर्थ कॅरोलिना या भागातील प्रचारातही ते बदलणार नाहीत.
लोकांना मास्क घालण्यासाठी आणि सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी प्रोत्साहित न केल्याबद्दल अनेकांनी ट्रंप यांची निंदा केली आहे.
जो बायडन यांनी मात्र ट्रंप यांच्यावर हल्ला चढवलाय. "ट्रम्प सॅनफर्डला आले, ते त्यांचं बेपर्वा वागणं आणि लोकांमध्ये फूट पाडणारं भाषा घेऊन," असं त्यांनी म्हटलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)