You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गर्भनिरोधासाठी वापरल्या जाणाऱ्या या गोष्टीची माहिती तुमच्या अंगावर काटा आणेल...
- Author, कॅट्रिओना व्हाईट
- Role, बीबीसी
रोज गर्भनिरोधाची गोळी घेताना किंवा काँडम वापरण्याचा क्षण संकोच वाटणारा असेल तर एक गोष्ट नक्कीच लक्षात घेतली पाहिजे की संतती नियमन आणि लैंगिक आरोग्याच्या दृष्टीने गेल्या दशकातले हे सर्वांत महत्त्वाचे शोध आहेत.
असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांना आळा घालण्यात काँडमने मोठी भूमिका बजावली आहे. तर गर्भनिरोधक गोळ्यांमुळे स्त्रियांना पहिल्यांदा खऱ्या अर्थाने गर्भनिरोधासाठीचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला.
अर्थात गर्भनिरोधाच्या उपायांचे धोके असतात. मात्र, संतती प्रतिबंधाच्या या उपयांचा शोध लागण्यापूर्वी गर्भनिरोधासाठी जगभरात जे विचित्र आणि भयंकर असे उपाय केले जायचे, ते बघता गर्भनिरोधक गोळ्या आणि काँडम यांनी आज माणसाचं आयुष्य किती सुकर केलं आहे, याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.
या लेखात इतिहासात गर्भनिरोधाच्या अंगावर काटा आणणाऱ्या अशाच काही उपायांची माहिती आपण घेणार आहोत.
1. बैठका आणि शिंकणे
बैठका किंवा स्क्वॅट्स हा एक उत्तम व्यायाम आहे. मात्र, प्राचीन ग्रीक काळात असा समज होता की स्क्वॅट केल्याने गर्भधारणा होत नाही. संभोगानंतर लगेच उड्या मारून स्क्वॅटिंग केल्याने शुक्राणू गर्भशयापर्यंत पोहोचत नाही, असं शास्त्र त्यामागे सांगितलं जायचं आणि एवढं करूनही गर्भधारणेची थोडीफार शक्यता असेल तर शिंकण्याने तीही संपते, असं मानलं जाई.
2. मुंगुसाचे वृषण
मध्ययुगीन युरोपातला हा अत्यंत विचित्र उपाय होता. चेटुक करणाऱ्या स्त्रियांकडून हा उपाय केला जायचा. मुंगूसाचे वृषण टेस्टिकल्स स्त्रीच्या पायाला बांधले तर गर्भधारणा होत नाही, असं मानलं जाई. चमत्काराने काम होत असेल तर विज्ञानाची वाट कशाला धरायची, असा काहीसा समज.
पण खरं पाहिलं तर जोडीदाराच्या पायांना असे मुंगूसाचे टेस्टिकल्स बांधलेले बघून शरीरसुखाची इच्छा तर तिथेच मरत असावी.
3.लोहारकाम करणाऱ्या व्यक्तीच्या घरचं पाणी
प्राचीन रोमन साम्राज्यात आणखी एक समज (गैरसमज) होता. लोहारकाम करणाऱ्या माणसाच्या घरचं पाणी प्यायल्याने गर्भधारणा होत नाही, अशी धारणा होती. अवजार बनवल्यानंतर तप्त अवजार ज्या पाण्यात थंड करतात त्या पाण्याचा वापर गर्भनिरोधक म्हणून केला जायचा.
हा प्रभावी उपाय होता. मात्र, यामागे खरंखुरं विज्ञान आहे. अवजार थंड करण्याच्या पाण्यात शिसं उतरतं. या शिश्यामुळे गर्भधारणा होत नाही. मात्र, याचे दुष्परिणाम रोगापेक्षा इलाज भयंकर असेच होते. कारण शिश्यामुळे मळमळ, किडन्या निकामी होणे, कोमा आणि मृत्यूसुद्धा ओढावत.
अगदी अलीकडे म्हणजे पहिल्या महायुद्धापर्यंत अशाप्रकारचे उपाय केले जायचे. कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी स्त्रिया स्वतःहून पुढे येत. कारण एकच कारखान्यातील शिश्याच्या संपर्कात आल्याने आपली गर्भधारणेपासून सुटका होईल, असं त्यावेळी स्त्रियांचा समज होता.
4. मगरीची विष्ठा
अत्यंत किळसवाणा हा प्रकार इजिप्तमधला आहे. योनीच्या मुखाशीच गर्भधारणेला मज्जाव करण्यासाठी काहीतरी अडथळा निर्माण करता आला तर शुक्राणू गर्भाशयापर्यंत पोहोचणारच नाही, या कल्पनेतून योगीमुखाला मध आणि मगरीची विष्ठा लावण्याची युक्ती शोधून काढण्यात आली.
वैद्यक विज्ञानाने प्रगती केल्यावर संतती नियमनासाठी योनीमुखाच्या आत एक पातळ पडदा लावण्याचा शोध लागला. कॉन्ट्रासेप्टिव्ह डायफ्राम म्हणतात. त्यातलाच हा प्रकार. मात्र, आजची डायफ्राम पद्धतही पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी नाही आणि प्राचीन इजिप्तमध्ये वापरला जाणारा तो किळसवाणा उपाय तर खचितच परिणामकारक नव्हता, हे वेगळं सांगायला नको.
5. वृषणांचा चहा!
सोळाव्या शतकात कॅनडामध्ये गर्भनिरोधासाठी हमखास केला जाणारा उपाय म्हणजे 'टेस्टिकल टी'. कदाचित इजिप्तच्या उपायापेक्षाही किळसवाणा प्रकार. यात उंदीर प्रजातीच्या एका प्राणाच्या टेस्टिकल्सची पावडर करून ती दारुत मिसळून प्यायचे. याला 'टेस्टिकल टी' असंही म्हणतात. रोमन स्त्रिया पायाला मुंगूसाचे टेस्टिकल बांधायच्या. पण कॅनडात तर अक्षरशः पावडर करून ते प्यायचे.
6.प्राण्यांचे आतडे
खरं सांगायचं तर प्राण्यांचे आतडे म्हणण्यापेक्षा याला ओरिजनल काँडम म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल. कारण काँडमप्रमाणेच पूर्वी प्राण्यांचं आतडं शिश्नावर आवरण म्हणून बांधलं जायचं.
अगदी काँडमचा इतिहास बघितला तर पहिला काँडम हा डुकराच्या आतड्यापासून बनवलेला होता. त्यासोबत एक मॅन्युअलही यायचं. हे काँडम कसं वापरयाचं, याच्या सूचना त्या मॅन्युअलमध्ये असायच्या.
ऐकायला विचित्र वाटेल पण शरीरसुखाआधी कोमट दुधात हे काँडम भिजवून वापरण्याची सूचना त्यात होती.
7. कॅसानोव्हाज् लेमन
अगदी शब्दशः घेऊ नका. पण या प्रकारात लिंबू अर्धं चिरून त्यातला गर काढून ती अर्धगोल साल गर्भाशयमुखाशी लावायचे. लिंबाच्या सालीमुळे गर्भाशयमुख बंद करण्यास मदत व्हायची. शिवाय, लिंबातलं अॅसिड शुक्राणूनाशक म्हणून काम करायचं.
8. पारा
इ. स. पूर्व 900 मध्ये चीनमध्ये गर्भनिरोधासाठी संभोगानंतर लगेच बेडकाचे 16 भ्रूण पाऱ्यात तळून खाण्याची पद्धत होती. लोहाराच्या अवजारांच्या पाण्याप्रमाणेच ही पद्धतही शरीरासाठी विषारीच.
त्यामुळे हा उपाय करणाऱ्या अनेक स्त्रियांना वंध्यत्व यायचं. मात्र, लिव्हर, किडनी अशा शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवांवरही त्याचा मोठा दुष्परिणाम व्हायचा. बऱ्याच स्त्रियांचा या अघोरी उपायामुळे मृत्यूसुद्धा ओढावला होता.
9.अफू
गर्भनिरोधासाठी अफूचा वापर करायचा शोध लागला सुमात्रा बेटावर. या बेटावरच्या स्त्रिया शरीरसंबंध ठेवताना झाडाच्या सालीचा डायफ्रामसारखा वापर करायच्या. म्हणजेच मऊ साल गर्भाशयमुखाला लावायची. तर काही स्त्रिया अफूचं फुलही योनीच्या आत टाकायच्या. अफू ओढल्याने जी नशा चढते तशीच नशा या फुलांमुळेही चढायची.
मात्र, या पद्धतीचा कितपत उपयोग व्हायचा, याबाबत खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही.
10. कोकाकोला
वर सांगितलेले सर्व उपाय शेकडो वर्षांपूर्वीचे आहेत. मात्र, कोकाकोलाचा वापर तर अगदी अलिकडच्या काळापर्यंत म्हणजे जवळपास सहा दशकांपूर्वीपर्यंत चलनात होता.
कोकाकोलाचे अनेक उपयोग आहे. दारूत टाकून पिण्यासाठी, उन्हात शरीराची काहिली झाल्यानतंर रिफ्रेश होण्यासाठी इतकंच कशाला तर जास्तीचा दात विरघळवण्यासाठीसुद्धा कोका कोला वापरतात. मात्र, गर्भनिरोधासाठीसुद्धा कोकाकोलाचा वापर व्हायचा, हे अनेकांना माहिती नसेल.
संबंधांनंतर स्त्रिया त्यांच्या योनीत कोका कोला ओतायच्या. डॉक्टरांचं म्हणणं होतं की कोका कोलाच्या कार्बोनेशनमुळे हे पेय योनीत आत ढकललं जातं त्यातल्या साखरेमुळे शुक्राणूंचा नाश होतो.
म्हणूनच कदाचित संभोगानंतर कोका कोला पिण्याचंही फॅड होतं. मात्र, ही पद्धतही 100% परिणामकारक होती का? तर याचंही उत्तर नाही, असंच आहे.
एकूणच काय तर गर्भनिरोधासाठी असे अत्यंत विचित्र आणि जीवघेणे उपाय भूतकाळात वापरले गेले आहेत. यापैकी कुठलाही उपाय आजमावून बघू नका. हे उपाय म्हणजे जीवाशीच खेळ आहे म्हटलं, तर वावगं ठरणार नाही. आतातरी गर्भनिरोधक गोळ्या आणि काँडम यांचं महत्त्व नक्कीच पटलं असेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)