You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रंप यांना हॉस्टिपलमधून डिस्चार्ज, लवकरच प्रचारासाठी परतण्याचा विश्वास
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना वॉल्टर रीड मिलिटरी हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं आहे. या हॉस्पिटलमध्येच त्यांच्यावर कोव्हिड-19 चे उपचार सुरू होते.
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तीन दिवसांपासून ट्रंप यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अमेरिकेत याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
ट्रंप लवकरात लवकर निवडणूक प्रचारात सहभागी होऊ इच्छितात. हॉस्पिटमधून निघाल्यानंतर ट्रंप यांनी ट्वीट करून म्हटलं, की लवकरात लवकर निवडणूक प्रचारासाठी बाहेर पडेन.
दरम्यान, व्हाइट हाऊसचे डॉक्टर शॉन कॉनली यांनी म्हटलं आहे की, ट्रंप यांची तब्येत सुधारत आहे आणि ते हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊ शकतात. ते पूर्ण बरे झाले नसले, तरी घरी जाणं त्यांच्यासाठी सुरक्षित आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातच ट्रंप यांना कोरोना झाल्यामुळे सर्वांपासून दूर राहावे लागत असताना त्यांनी सोमवारी (5 ऑक्टोबर) आपल्या कारमध्ये बसून चाहत्यांना अभिवादन केले.
लवकरच मी तुमच्या भेटीसाठी येणार आहे असं त्यांनी ट्वीट केलं होतं. ट्रंप यांनी हॉस्पिटलमधून व्हीडिओ ट्वीट केला होता. त्यात त्यांनी सांगितलं की त्यांची प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी ते ऐकत आहेत.
खबरदारी आणि काळजी म्हणून ट्रंप यांना वॉल्टर रीड नॅशनल मेडिकल मिल्ट्री सेंटरमध्ये भरती करण्यात आल्याचं व्हाऊट हाऊसनं एका निवेदनाद्वारे स्पष्ट केलं होतं.
त्यांची पत्नी आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रंप यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
डोनाल्ड ट्रंप यांनी ट्वीट करून ही माहिती दिली होती. लवकरच आम्ही यावर मत करूत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
यापूर्वी ट्रंप यांचे सहकारी होप हिक्स यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर ट्रंप यांनी पत्नीसहित क्वारंटाईन होत असल्याचं सांगितलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, होप हिक्स यांच्यात कोरोनाचे लक्षणंही दिसत आहेत. 31 वर्षांच्या होप हिक्स राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत.
त्या राष्ट्राध्यक्षांसोबत त्यांच्या एयर फोर्स वन या विमानात प्रवास दौरे करतात.
गेल्या काही दिवसांत निवडणूक प्रचारादरम्यान त्या ट्रंप यांच्यासोबत उपस्थित होत्या. नुकत्याच पार पडलेल्या प्रेसिडिन्शियल डिबेट दरम्यान आणि मिनेसोटा निवडणूक मोहिमेदरम्यान त्या ट्रंप यांच्यासोबत होत्या.
ट्रंप यांनी म्हटलं, होप हिक्स क्षणाचीही विश्रांती न घेता निवडणूक मोहिमेचं काम पाहत आहेत. आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ही वाईट बातमी आहे. यानंतर मी आणि मेलेनिया दोघांनी तपासणीसाठी सॅम्पल दिले आहेत आणि निकालाची वाट पाहत आहोत. तोपर्यंत आम्ही दोघं क्वारंटाईनमध्ये राहू.
वृत्तसंस्था AFPनुसार, ट्रंप यांनी फॉक्स न्यूजला सांगितलं, होप हिक्स प्रचंड मेहनत घेतात. मास्कसुद्धा घालतात. पण, त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही आमची चाचणी केली आहे आणि निकालाची वाट पाहत आहोत. पण, तोवर आम्ही क्वारंटाईन राहू.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट)