अमेरिका-चीन तणाव : ही नवीन शीतयुद्धाची सुरुवात आहे का?

ट्रंप आणि जिनपिंग

फोटो स्रोत, Reuters/EPA

अमेरिका आणि चीन यांच्यातल्या तणावाची एक झलक संयुक्त राष्ट्रांच्या 75 व्या अधिवेशनात बघायला मिळाली.

संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा चीनला कोरोना विषाणूच्या उद्रेकासाठी जबाबदार धरलं. याबाबतीत 'चीनची जबाबदारी' निश्चित करण्यात यावी, असंही ते म्हणाले.

तर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग 'कुठल्याही राष्ट्राविरोधात शीतयुद्धात उतरण्याचा चीनचा कुठलाच इरादा नाही' असं आपल्या भाषणात म्हणाले.

अमेरिका आणि चीन दोन्ही मोठ्या जागतिक शक्ती आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून या दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्द्यांवरून तणाव आहे. अनेक मुद्द्यांवर तर या दोन्ही देशांनी एकमेकांना थेट इशारेही दिले आहेत.

न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्रांची यंदाची वार्षिक शिखर परिषद व्हर्च्युअल होती. या परिषदेसाठी सर्वच राष्ट्रनेत्यांनी रेकॉर्डेड भाषणं पाठवली.

या नव्या स्वरुपामुळे संयुक्त राष्ट्र महासभेत दरवर्षी दिसणारं 'भू-राजकीय नाट्य' यंदा दिसलं नाही. प्रत्येक देशाने आपापला एकेकच प्रतिनिधी यावर्षीच्या शिखर परिषदेसाठी पाठवला आहे. त्यामुळे एखाद्या राष्ट्राकडून एखाद्या मुद्द्यावर दुसऱ्या देशाला तात्काळ प्रत्युत्तर देणं आणि वाद घालणं, याची शक्यता यंदा कमीच आहे.

मात्र, भाषणांच्या माध्यमातून थोड्या प्रमाणात का होईना कुरघोडी करणं सुरूच आहे. त्याचंच उदाहरण म्हणजे संयुक्त राष्ट्रात केलेल्या भाषणाचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंपयांनी स्वतःची कामगिरी सांगण्यासाठी आणि प्रतिस्पर्धी राष्ट्रांवर कुरघोडी करण्यासाठी वापर केला.

ट्रंप : चीनने जगभर संसर्ग पसरवला

भाषणात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी उघडपणे हा आरोप केला की "ही साथ जगभरात पसरवणाऱ्या चीनची जबाबदारी निश्चित करण्यात यावी."

ट्रंप

फोटो स्रोत, Reuters

ट्रंप म्हणाले, "कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये चीनने देशांतर्गत विमानसेवा बंद केली. मात्र, आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरूच ठेवली. चीनमधून फ्लाईट्स परदेशात सुरूच राहिल्या आणि जगभरात संसर्ग पसरत गेला. मी चीनवर लावलेल्या प्रवास बंदीचा विरोध केला आहे आणि हा विरोध अशावेळी केला ज्यावेळी त्यांनी स्वतः देशांतर्गत विमान वाहतूक बंद करत लोकांना आपापल्या घरातच राहण्याच्या सूचना दिल्या होत्या."

ज्यांच्या स्वतःच्या कोरोना रेकॉर्डवर प्रश्न उपस्थित होत आहेत आणि अमेरिकेतल्या निवडणुका येऊ घातल्या आहेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी चीनवर पुन्हा एकदा हा आरोप केला की "त्यांनी कोरोना संसर्गाविषयी माहिती लपवण्याचा प्रयत्न केला."

ट्रंप म्हणाले, "चीनने ठरवलं असतं तर या साथीला आळा घालता आला असता." मात्र, चीनने हे सर्व आरोप निराधार असल्याचं म्हटलं.

कोरोना
लाईन

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी कोरोना विषाणूच्या साथीविषयी यापूर्वीच म्हटलं होतं की "जागतिक आरोग्य संकटाच्या या काळात स्वार्थाला स्थान नाही. लोकानुनय आणि राष्ट्रवाद अपयशी ठरले आहेत. उलट विषाणूला आळा घालण्यासाठीच्या या विचारधारांमुळे परिस्थिती अधिक बिकट बनली आहे."

मात्र, गुटेरस यांच्या या मताच्या विरोधात जात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आपल्या भाषणात म्हणाले, "तुम्ही तुमच्या नागरिकांची काळजी घेऊ शकलात तरच तुम्हाला सहकार्य करण्यासाठीचा योग्य आधार मिळेल."

संयुक्त राष्ट्र

फोटो स्रोत, EPA

दरम्यान, अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झालेल्यांची आकडेवारी 2 लाखांच्याही पुढे गेली आहे. जगातल्या इतर कुठल्याही राष्ट्रापेक्षा ही संख्या जास्त आहे. जाणकारांच्या मते, "अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप जगातल्या त्या मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी सुरुवातीला या साथीला गांभीर्याने घेतलं नाही आणि आज अमेरिकेला त्याचीच किंमत मोजावी लागतेय."

चीन आणि अमेरिका यांच्यात अनेक मुद्द्यांवरून तणाव आहे. मात्र, अमेरिकेने व्यापार, तंत्रज्ञान, हाँगकाँग आणि चीनच्या शिंजियांग प्रांतातल्या विगर मुसलमानांचा होणारा छळ, या मुद्द्यांवर उघडपणे चीनवर टीका करायला सुरुवात केली आहे.

चीनचं उत्तर

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचं रेकॉर्डेड भाषण संपल्यानंतर लगेच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचं भाषण लावण्यात आलं. त्यांनी आपल्या भाषणात 'दोन सभ्यतांच्या संघर्षात असणाऱ्या जोखिमींविषयी' इशारा दिला.

त्यांनी आपल्या भाषणात या मुद्द्यावर बराच भर दिला की दोघांमध्ये संघर्ष झडला तर त्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात.

शी जिनपिंग आपल्या भाषणात म्हणाले, "आम्ही चर्चेच्या माध्यमातून आपापसातले मतभेद आणि वाद सोडवण्याच्या दिशेने काम करू. केवळ स्वतःचा विकास करावा, असा विचार आम्ही करत नाही. शिवाय, वादामुळे कुठल्यातरी युद्धात उतरण्याचीही आमची इच्छा नाही."

जिनपिंग

फोटो स्रोत, EPA

आपल्या भाषणापूर्वी शी जिनपिंग म्हणाले होते की "कुठल्याही देशाला हा अधिकार नाही की त्याने जागतिक मुद्द्यावर वरचढ ठरण्याचा प्रयत्न करून इतरांची नियती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करावा किंवा विकासाच्या सर्व संधी आणि त्यातून होणारे फायदे केवळ स्वतःसाठी ठेवावे."

जिनपिंग यांनी आपल्या भाषणात हा उल्लेख केला असला तरी स्वतः चीनच जागतिक मुद्द्यांवर वरचढ ठरण्याचा प्रयत्न करत असतो, असा आरोप अनेक जाणकार करतात.

संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत दिलेल्या भाषणात जिनपिंग म्हणाले, "ग्रीन हाऊस गॅसेसचा जगातला सर्वात मोठा उत्सर्जक असणाऱ्या चीनचं 2060 सालापर्यंत कार्बन न्यूट्रल व्हायचं उद्दिष्टं आहे."

नव्या शीतयुद्धाच्या दिशेने प्रवास?

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी महासभा चर्चेसाठी खुली केली. त्यावेळी त्यांनी चीन किंवा अमेरिकेचं नाव न घेता हा इशारा दिला होता की, "आपण खूपच चुकीच्या दिशेने पुढे चाललोय. हे जग दोन जागतिक शक्तींचा संघर्ष सहन करू शकणार नाही. त्यामुळे दुसरं शीतयुद्ध टाळण्यासाठी आपण सर्व ते प्रयत्न करायला हवे."

आता इतरही अनेक जागतिक नेत्यांना अमेरिका आणि चीनमधला हा संघर्ष 'आंतरराष्ट्रीय स्थिरतेला धोका' असल्याची काळजी वाटतोय. फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रोन यांनी ज्या प्रकारे विद्यमान परिस्थितीवर चिंता व्यक्त केली त्यावरून ही काळजी स्पष्ट होते.

ते म्हणाले, "आज जगाला चीन आणि अमेरिका यांच्यातल्या स्पर्धेसाठी सोडलं जाऊ शकत नाही."

'अमेरिकी मतदारांना लक्ष्य'

बीबीसीच्या वरिष्ठ प्रतिनिधी लॉरा ट्रेवेलयान यांनी आपल्या विश्लेषणात लिहिलं आहे की अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीसाठी आता 40 दिवसांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे चीनला उकसवणं, चीनला बरं-वाईट बोलणं, ट्रंप यांच्या निवडणूक प्रचाराचा भाग आहे.

जागतिक आरोग्य संकटासाठी चीनला जबाबदार धरून ट्रंप अमेरिकेत साथ आटोक्यात आणण्यात सरकारला आलेलं अपयश झाकू इच्छित आहेत.

डोनाल्ड ट्रंप

फोटो स्रोत, Reuters

मात्र, दोन ध्रुवीय जग, असं जग जिथे अमेरिका आणि चीन दोघांनाही स्वतःचं वर्चस्व हवं आहे, त्याची परिणती अखेर एका युद्धात होईल का? संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांना याचीच काळजी आहे.

या 'महा-फुटी'च्या परिणामांवर खुल्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे जग किती वेगाने बदलतंय आणि आहे ती परिस्थिती कायम ठेवण्यासाठी डिप्लोमॅट्सची तारेवरची कसरत सुरू आहे.

'कुठल्याच प्रकारच्या युद्धात उतरण्याची आपली इच्छा नसल्याच' चीनच्या अध्यक्षांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं आहे. मात्र, अनेक गोष्टी एकत्रितपणे घडत असल्याने हा संर्घष कुठल्या मार्गावर जाईल, हे आत्ताच सांगण कठीण आहे.

विश्लेषकांच्या मते, "संयुक्त राष्ट्रांच्या बैठका अत्यंत सृजनात्मक असायच्या. यात मोठ-मोठे जागतिक नेते एकमेकांशी डिप्लोमॅटिक चर्चा करायचे. मात्र, आता या चर्चांमध्ये केवळ अराजकता दिसते. इतकंच नाही तर बहुतांश नेते संकुचित स्वार्थांच्या पुढे जाऊन चर्चा करताना दिसत नाहीत."

कोरोनाच्या जागतिक संकट काळात संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरस यांचं म्हणाले होते की "ही एकत्र मिळून काम करण्याची वेळ आहे." मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी "सर्व जागतिक नेत्यांनी आपलं अनुसरण करत आपला देश आणि आपले नागरिक यांना प्राधान्य द्यायला हवं", असं म्हणत गुटेरस यांच्या अगदी विरोधी भूमिका मांडली.

बीबीसीच्या प्रतिनिधी लॉरा लिहितात, "डोनाल्ड ट्रंप दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले तर त्यांचा एकपक्षवाद अधिक स्पष्ट होईल. इतकंच नाही तर अमेरिका संयुक्त राष्ट्रांना आणखी दूर सारेल."

यामुळे नेटोमध्येसुद्धा अमेरिकेचं उत्तरदायित्व कमी होईल का? या प्रश्नावर लॉरा लिहितात, "जो बायडेन अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले तर अमेरिका आणि चीन यांच्यातला तणाव काही प्रमाणात कमी नक्कीच होईल. मात्र, दोन्ही देशात अमेरिका-चीन ही जी काही मूळ स्पर्धा आहे ती मात्र, कायम असेल."

जगात एक नवी 'ग्लोबल ऑर्डर' तयार होत आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. जग नव्याने संघटित होत आहे. यामुळे परिस्थिती बदलताना दिसतेय. त्यामुळे जुनी बहुपक्षीय व्यवस्था हा बदल कसा स्वीकारेल, हा प्रश्न उपस्थित होतो. हा प्रश्न यासाठी महत्त्वाचा ठरतो कारण यावरूनच भविष्यातल्या जगाचं नेतृत्त्व कोण करणार, हे ठरणार आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)