ही राममुद्रा खरंच अमेरिका आणि नेदरलँड्समध्ये चलनात आहे का?

फोटो स्रोत, HTTPS://WWW.MAHARISHIVEDICCITY-IOWA.GOV
अयोध्येच्या राम मंदिराचा मुद्दा देशात ज्वलंत असताना अमेरिका आणि नेदरलँड्समध्ये राममुद्रा चलनात असल्याची चर्चा होत आहे. खरच किती तथ्य आहे?
राजस्थान आणि तेलंगणासह अन्य राज्यांमध्ये निवडणुकांनी वातावरण भारलं आहे. याच काळात इथे अनेक फेक न्यूज पसरवल्या जात आहेत.
अर्धवट स्वरूपाच्या गोष्टींना वेगळ्या दृष्टिकोनासह व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर अशा सोशल मीडियावर घाऊक शेअर केला जात आहे. अनेक नेटिझन्सनी आपल्या न्यूजफीडवर ही गोष्ट शेअर केलं आहे.

फोटो स्रोत, TWITTER/ZUVENILE4EVER
राम नाव लिहिलेल्या नोटा अमेरिका आणि नेदरलँड्स या देशांमध्ये दैनंदित वापरात असल्याची पोस्ट सोशल मीडियावर आम्हाला आढळली. या नोटांचे फोटो लोकांनी ट्वीट करत शेअर केले आहेत.
काही सोशल मीडिया युझर्सनी या नोटांचा तपशीलही दिला आहे. उदाहरणार्थ, नोटेवर 18 भाषांमध्ये राम हा शब्द लिहिला आहे. झळाळणाऱ्या नोटेवर रामाचं चित्र आहे. या नोटेची किंमत युरो आणि डॉलरपेक्षाही जास्त आहे, असंही काही जणांनी लिहिलं आहे.
हिंदी वर्तमानपत्र राजस्थान पत्रिका आणि दैनिक जागरण यांनी या राममुद्रेसह बातमी छापली आहे. "या देशांमध्ये चालते राममुद्रा, 10 युरोमध्ये मिळू शकते राममुद्रा" अशा मथळ्यासह त्यांनी बातमी छापली आहे.
या नोटांसंदर्भात थोडी शहानिशा केल्यावर ही राममुद्रा खरी असल्याचं स्पष्ट झालं. मात्र या नोटा अमेरिका किंवा नेदरलँड्समध्ये वापरात असल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचं उघड झालं आहे.
दोन्ही देशांच्या सेंट्रल बँकांनी या राममुद्रेला कधीही अधिकृत चलन म्हणून कायदेशीर मान्यता दिलेली नाही.
राममुद्रेचा दावा
राममुद्रेशी निगडीत माहिती आणि तपशील सोशल मीडिया आणि इंटरनेटवर याआधीच शेअर केले जात आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये राम मंदिराचा मुद्दा राजकारण्यांनी पुन्हा ऐरणीवर आणला आहे. त्या काळात सोशल मीडियावर राममुद्रेसंदर्भातील पोस्ट्सनी धुमाकूळ घातला आहे.

फोटो स्रोत, Twitter
राममुद्रेबाबत दावा करणाऱ्या ट्विटर युजरला अमेरिकेतील @spokenTwilight नावाच्या युजरने प्रत्युत्तर दिलं आहे.
"माझ्या मनीबॉक्समध्ये रामाचा फोटो असलेल्या काही नोटा आहेत. अमेरिकेतल्या अनेक शहरांमध्ये तसंच राज्यांमध्ये डॉलरप्रमाणे राममुद्रेचा स्वीकार केला जातो."

फोटो स्रोत, Twitter
अमेरिका हिंदू नवचेतना या संघटनेशी हे ट्विटर हँडल संलग्न आहे. हे हँडल 2018मध्येच सुरू झालं होतं.
राममुद्रा आहे तरी काय?
अमेरिकेतील मध्यवर्ती आयोवा राज्यातील महर्षी वेदिक सिटीमध्ये 'द ग्लोबल कंट्री ऑफ वर्ल्ड पीस' नावाच्या संघटनेनं 2002 मध्ये या नोटांची निर्मिती केली होती. याच वर्षी संस्थेने नेदरलँड्समध्ये राममुद्रेचं वितरण केलं.
वेदिक सिटी 'द ग्लोबल कंट्री ऑफ वर्ल्ड पीस' संस्थेचा भाग आहे. महर्षी महेश योगी (महेश प्रसाद वर्मा) यांनी या संस्थेची स्थापना केली आहे.
2008 मध्ये महर्षी महेश योगी यांचं निधन झालं. त्यानंतर राममुद्रेबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.
या कथित मुद्रा वैदिक सिटीच्या मुख्य आकर्षणाचा आजही भाग आहेत.
या संघटनेच्या वेबसाईटवर यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. 24 फेब्रुवारी 2002 मध्ये वेदिक सिटीने राममुद्रेचं वितरण करायला सुरुवात केली. सिटीच्या आर्थिक विकासासाठी आणि व्यापाराला चालना देण्यासाठी सिटी काउंसिलने राममुद्रेचा चलनात समावेश केला होता.
राममुद्रेचा एक कागद म्हणजे 10 अमेरिकन डॉलर्स, असं मूल्यांकन निश्चित करण्यात आलं होतं. अशा पद्धतीने कोणताही नागरिक राममुद्रा खरेदी करू शकतो. नोटांचे तीन मूल्यांमध्ये उपलब्ध आहेत - एक राम, पाच राम आणि दहा राम.
या मुद्रेचा वापर आश्रमाच्या अंतर्गत सदस्यांदरम्यानच होऊ शकतो.
अमेरिकास्थित महर्षी वैदिक सिटीने वेदिक स्टाईलच्या धर्तीवर कृषी, हेल्थकेअर आणि शिक्षणासाठी राममुद्रेची सुरुवात केल्याचं अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक पंकज जैन यांनी गेल्या वर्षी एका ट्वीटमध्ये सांगितलं होतं.
राममुद्रा बाँड
महर्षी योगी यांच्या अनुयायांची संख्या एकेकाळी 60 लाखांपेक्षा जास्त होती. अमेरिकेतील प्रसिद्ध बीटल्स बँडही योगींचे अनुयायी होते. त्यावेळी राममुद्रा एखाद्या बाँडप्रमाणे विकण्यात आली.
बीबीसीच्याच एका जुन्या बातमीनुसार 2003 मध्ये नेदरलँड्समध्ये 100 दुकानं, 30 गावं आणि शहरांमध्ये राममुद्रा चलनात होती. राममुद्रेकडे बारीक लक्ष असल्याचं डच सेंट्रल बँकेने म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Twitter
महर्षी योगी यांची संस्था आपल्या सदस्यांमध्येच याचा उपयोग होईल आणि कायद्याच्या कक्षेअंतर्गत राहूनच राममुद्रेचे व्यवहार होतील असा विश्वास डच सेंट्रल बँकेला होता.
नेदरलँड्सच्या सरकारी बँकेनुसार वेदिक सिटीने 2002 मध्ये एक लाख किमतीच्या राममुद्रा छापल्या आहेत. मात्र राममुद्रेला अधिकृत चलन म्हणून मान्यता देण्यात आलेली नाही.
राममुद्रा कागदाचा तुकडा आहे. एका संस्थेने त्याची विशिष्ट किंमत ठरवली आहे. श्रम किंवा उत्पादनासाठी व्यवहारादरम्यान राममुद्रेचा उपयोग करण्यात येतो.
राममुद्रा विदेशात आहे मग भारतात का नाही?
गुजरातमधील सनातन धर्म फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ट्विटरवर ओळख करून देणाऱ्या उमेद सिंह चावडा यांनी नेदरलँड्स तसंच अमेरिकेत राममुद्रेचं मूल्य 10 युरो असल्याचं म्हटलं होतं.
मात्र त्यांनी एक प्रश्नही मांडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करताना त्यांनी लिहिलं - "विदेशात राममुद्रा चलनात असू शकते मग भारतात का नाही?"
"भारतात रामराज्य आणण्यासाठी वैश्विक राममुद्रा भारतातही चलनात असायला हवी," अशी भलामण काही हिंदुत्ववादी संघटनांनी ही नोट चलनात यावी यासाठी केली आहे.
काही लोकांनी राममुद्रेला आक्षेप घेतला आहे. भारतात अजूनही नोटांवर फक्त महात्मा गांधीच का असा सवाल काहींनी केला आहे. अन्य देशांप्रमाणे भारतातही विविध व्यक्तींचे चेहरे छापावेत.
ईस्ट इंडिया कंपनीचे हिंदू शिक्के
सोशल मीडियावरची चर्चा फक्त राममुद्रेपुरती मर्यादित नाही.
ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने 17व्या शतकात हिंदूंच्या सन्मानार्थ आपल्या नाण्यांवर भारतीय देवदेवतांच्या चित्रांचा उपयोग केला होता. मात्र हे दावेही नकली असल्याचं स्पष्ट झालं आहे.

फोटो स्रोत, facebook
यासंदर्भात इंग्लंडमधील ऐशमोलियन संग्रहालयातील नाण्यांचे विशेषज्ञ शैलेंद्र भंडारे यांच्याशी आम्ही बातचीत केली.
"आधुनिक तंत्राच्या साह्याने ऐतिहासिक दिसणारी ही नाणी तयार करण्यात आली आहेत. धार्मिक कार्यक्रमांमध्ये आजही या नाण्यांचा वापर होतो. फकीर आणि साधू अनेकदा ही नाणी वापरतात. गरीब आणि मूलबाळ नसलेल्या लोकांना अशी नाणी बाळगण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र या नाण्यांना ऐतिहासिक म्हणता येणार नाही," असं शैलेंद्र यांनी सांगितलं.

फेक न्यूजशी लढणाऱ्या 'एकता न्यूजरूम' प्रकल्पाची ही एक बातमी आहे.
जर तुमच्याकडे अशी कुठलीही बातमी, व्हीडिओ, फोटो किंवा दावे करणारे मेसेज येतात, ज्यांच्यावर तुमचा सहज विश्वास बसत नाही किंवा तुम्हाला संशय येतो, तर त्याची सत्यता पडताळण्यासाठी +91 89290 23625 या नंबरवर व्हॉट्सअॅप करा.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








