अमेरिकेने चीनला ह्यूस्टनमधील वकिलात बंद करण्याचे आदेश का दिले?

ट्रंप- जीनपिंग

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेने चीनला ह्यूस्टनमधील वकिलात बंद करण्याचे आदेश दिले आहेत. बीजिंगतर्फे राजकीय प्रक्षोभाला खतपाणी घातल्याच्या संशयावरून अमेरिकेने हा निर्णय घेतल्याचं समजतंय.

अमेरिकेच्या बौद्धिक मालमत्तेचं रक्षण करण्याच्या दृष्टीने अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने हा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय धक्कादायक आणि अन्यायकारक असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी म्हटलं आहे.

दूतावासाच्या परिसरात काही अज्ञात व्यक्ती काही कागदपत्रं जाळून टाकत असल्याचं चित्रणात स्पष्ट झालं होतं.

गेल्या काही दिवसात अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. व्यापार आणि कोरोना विषाणूच्या मुद्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी चीनवर आगपाखड केली आहे. हाँगकाँगमधल्या नव्या वादग्रस्त कायद्याच्या अंमलबजावणीवरूनही अमेरिका आणि चीन यांच्यात बिनसलं आहे.

कोव्हिड-19 विषाणूवर लस शोधण्यासाठी कार्यरत असलेल्या प्रयोगशाळांमधील गोपनीय माहिती भेदणाऱ्या हॅकर्सना चीन आर्थिक पाठिंबा देत असल्याचा आरोप अमेरिकेच्या कायदा विभागाने केला.

याप्रकरणी अमेरिकेच्या संशोधन कंपन्यांवर पाळत ठेवणाऱ्या चीनच्या दोन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. अन्य माहितीच्या चोरीसाठी त्यांना मदत मिळाल्याचंही स्पष्ट होतं आहे.

अमेरिकेने चिनी वकिलात बंद का केली?

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानंतर अमेरिकेने वकिलात बंद करण्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केलं.

कोरोना
लाईन

ह्यूस्टन इथली वकिलात बंद करण्यासंदर्भात आम्ही 'पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना'ला सूचना दिली आहे. अमेरिकेचे बौद्धिक संपदा हक्क आणि अमेरिकेच्या नागरिकांच्या गोपनीय माहितीचं जतन होण्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मॉर्गन ऑर्टगुस यांनी सांगितलं.

"चीनने आमच्या सार्वभौमतेचं तसंच नागरिकांच्या अधिकारांचं उल्लंघन केल्यास ते खपवून घेतलं जाणार नाही. चीनतर्फे राबवण्यात आलेल्या व्यापाराची अन्यायाकारी कार्यपद्धतीही सहन करून घेतली जाणार नाही. अमेरिकेतील नोकऱ्या चोरणं तसंच अन्य अनुचित गोष्टी स्वीकारल्या जाऊ शकत नाही," असं मॉर्गन यांनी स्पष्ट केलं.

व्हिएन्ना करारानुसार, पाहुण्या देशाने यजमान देशाच्या अंतर्गत मुद्यांमध्ये हस्तक्षेप करू नये असं धोरण आहे. अमेरिकेत चीनच्या पाच वकिलाती आहेत. यापैकी एक ह्यूस्टन इथं आहे.

या पाचमध्ये वॉशिंग्टन डीसीमधील कार्यालयाचा समावेश नाही. ह्यूस्टन इथल्या दूतावासावरच कारवाई का करण्यात आली याचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

line

अमेरिका-चीन संघर्ष चिघळणार

विश्लेषण- जोनाथन मार्कस, संरक्षण प्रतिनिधी

वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यातील बिघडत्या डावपेचात्मक संबंधांचा हा महत्त्वाचा टप्पा आहे.

चीनच्या सुरक्षा यंत्रणेच्या वतीने दोन माणसं अमेरिकेच्या कोरोनाविरुद्धच्या लस शोध मोहिमेवर पाळत ठेऊन होते असा अमेरिकाचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ह्यूस्टन इथला दूतावास बंद करण्याचे चीनला आदेश दिले. दोन घटनांशी एकमेकांशी परस्परसंबंध आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र ट्रंप प्रशासनानं त्यांच्या लोकांना बिजींगमधून परत बोलावण्याचा निश्चय केल्याचं यावरून दिसून येत आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. कोव्हिड-19 विषाणूच्या संसर्गाने अमेरिकेची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. अशा परिस्थितीत चीनच्या मुद्याचा राजकीय वापर करून घेण्याचा ट्रंप यांचा मनोदय दिसतोय.

ट्रंप यांच्या ध्येयधोरणांना आणि कार्यवाहीपासून चीन स्वत: रोखणं अवघड आहे. अमेरिकेतील अंतर्गत घडामोडी लक्षात घेता आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन बलाढ्य देशांमधील हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

line

चीनची काय प्रतिक्रिया?

'अत्यंत अविश्वसनीय आणि टोकाचं पाऊल' अशा शब्दात चीनने अमेरिकेच्या या निर्णयावर टीका केली आहे. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं चीनचं म्हणणं आहे.

अमेरिका चीनला विनाकारण बदनाम करत असून आमच्यावर तथ्यहीन आरोप केले जात असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग यांनी म्हटलं आहे.

चिनी वकिलातीत लागलेल्या आगीनंतर फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलावण्यात आल्या.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, चिनी वकिलातीत लागलेल्या आगीनंतर फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलावण्यात आल्या.

अमेरिकेने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं चीनने म्हटलं आहे. अशाच चुकीच्या पद्धतीने वागल्यास चीनला ठोस प्रत्युत्तर द्यावं लागेल, असं चीनने म्हटलं आहे.

चीनचे अमेरिकेतील आणि अमेरिकेचे चीनमधील वकिलात आणि माणसांची संख्या यांचा आढावा घेतला तर चीनच्या तुलनेत अमेरिकेची जास्त माणसं चीनमध्ये कार्यरत आहेत, असं वांग यांनी सांगितलं.

अमेरिकेच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून चीनमधील अमेरिकन वकिलात बंद करावा का? या आशयाचा कौल चीनमधील सरकारी प्रसारमाध्यम असलेल्या 'ग्लोबल टाईम्स'ने चालवला आहे.

वकिलातीत काय घडलं?

ह्यूस्टन इथल्या वकिलातीत काहीतरी संशसायस्पद सुरू असल्याचं या इमारतीची देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्यांना आढळलं.

केराच्या काही टोपल्यांना आग लागल्याचं त्यांच्या लक्षात आलं. काही अज्ञात माणसं काही कागदपत्रं या केराच्या टोपल्यांमध्ये टाकत होते. ही माणसं कोण हे अजून स्पष्ट झालेलं नाही. नंतर ही माणसं आग लावलेल्या केराच्या टोपल्यांवर पाणी शिंपडताना दिसत होती.

मंगळवारी (21 जुलै) संध्याकाळी आपात्कालीन यंत्रणेच्या लोकांना वकिलातीत पाचारण करण्यात आलं. मात्र ह्यूस्टन पोलिसांना या इमारतीत प्रवेश नाकारण्यात आल्याचं त्यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे. मात्र इमारतीतून धुराचे लोळ निघाल्याचं त्यांनी पाहिलं.

चीनच्या पराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ह्यूस्टन इथल्या दूतावासातील या घटनेचा थेट उल्लेख टाळला.

अमेरिका आणि चीन यांच्यात वाद कशावरून सुरू आहे?

अमेरिका आणि चीन यांच्यात गेले काही महिन्यांपासून अनेक मुद्यांवरून संघर्ष सुरू आहे.

कोरोना विषाणू- कोरोना विषाणूचा पहिला संसर्ग चीनमधील वुहानमध्ये आढळला, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं होतं. त्यांनी त्याला 'चायना व्हायरस' असं नाव दिलं. चीनच्या प्रयोगशाळेतून या विषाणूची निर्मिती झाली असल्याचं ट्रंप यांनी म्हटलं होतं.

हा विषाणू मानवनिर्मित नाही तसंच गुणसूत्रांच्या बदलातून घडलेला नाही , असं अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने स्पष्ट केल्यानंतरही ट्रंप यांनी त्याला चायना व्हायरस असं म्हटलं होतं. कोरोना विषाणूचं उगमस्थान अमेरिका असू शकतं असं चीनने म्हटलं होतं. मात्र याकरता त्यांनी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत.

व्यापार - व्यापाराची अन्यायकारी कार्यपद्धती, बौद्धिक संपदेची चोरी असे आरोप ट्रंप यांनी चीनवर केले होते. जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून चीनची ताकद कमी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचा सूर बीजिंगमध्ये आहे. 2018 पासून या दोन देशांमध्ये व्यापारातील मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप, टीका, कारवाई असं सुरू आहे.

हाँगकाँग - चीनने जून महिन्यात हाँगकाँगमध्ये नव्या सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे अमेरिकेने या प्रदेशाला असलेला खास आर्थिक दर्जा काढून घेतला. आमच्या अंतर्गत मुद्यांमध्ये अमेरिका घाऊक प्रमाणावर हस्तक्षेप करत असल्याचा आरोप चीनने केला आहे. हाँगकाँगमधील लोकांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर ट्रंप यांनी निर्बंध सुद्धा आणले आहेत. त्यावरून अमेरिका आमच्या अंतर्गत गोष्टींमध्ये ढवळाढवळ करत असल्याचा आरोप चीनने केला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)