ट्विटर हॅक : ओबामांसह अनेकांच्या ट्विटर अकाउंटवरून पैसे दुप्पट करण्याचं आमिष

बिल गेट्स, जेफ बेझोस, इलॉन मस्क

फोटो स्रोत, Getty Images

बिल गेट्स, जेफ बेझोस, इलॉन मस्क यांच्यासारख्या अब्जाधीशांसोबतच अमेरिकेतल्या अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट्स एका सायबर हल्ल्याद्वारे हॅक करण्यात आले आहेत.

हे एक बिटकॉईन स्कॅम आहे.

याद्वारे बराक ओबामा, जो बायडन, कान्ये वेस्ट यांच्या ऑफिशल अकाऊंट्सकडेही क्रिप्टोकरन्सीमध्ये देणगी मागण्यात आली.

यानंतर बिल गेट्स यांच्या अकाऊंटवरून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, "समाजाची परतफेड करण्यास मला प्रत्येकजण सांगत असतो, आता ती वेळ आली आहे. तुम्ही मला 1000 डॉलर् पाठवला, मी तुम्हाला 2000 डॉलर्स परत पाठवीन."

कोरोना
लाईन

टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांच्या ट्विटर हँडलवरूनही अशाच प्रकारचं ट्वीट करण्यात आलं होतं. पुढच्या ३० मिनिटांत आपल्याला बिटकॉईनमध्ये पाठवण्यात आलेले पैसे दुप्पट करून देणार असल्याचं यात म्हटलं होतं.

बिटकॉईनची लिंक देत या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, "कोव्हिडच्या जागतिक साथीमुळे मी हे दान देत आहे."

पोस्ट करण्यात आल्याच्या काही मिनिटांमध्येच ही ट्वीट्स डिलीट करण्यात आली.

मस्क यांच्या अकाऊंटवरचं पहिलं ट्वीट डिलीट करण्यात आल्यानंतर काही वेळातच दुसरं ट्वीट आलं, मग तिसरंही आलं.

ट्वीट

फोटो स्रोत, TWITTER

रॅपर कान्ये वेस्ट, त्याची बायको आणि रिएलिटी टीव्ही स्टार किम कार्डेशियन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत असलेले जो बायडन, मीडिया क्षेत्रातले अब्जाधीश माईक ब्लूमबर्ग यांच्यासह उबर आणि अॅपलसारख्या मोठ्या कंपन्यांच्या ट्विटर हँडल्सनाही टार्गेट करण्यात आलं.

यानंतर ट्विटरने तातडीने कारवाई करत ब्लू टिक - म्हणजेच व्हेरीफाईड अकाऊंट्ववरून काहीही ट्वीट करताच येणार नाही, याची खबरदारी घेतली.

पासवर्ड बदलण्यासाठीच्या रिक्वेस्टही यानंतर नाकारण्यात आल्या.

क्राऊडस्ट्राईक या सायबर सिक्युरिटी कंपनीचे सहसंस्थापक दिमित्री अल्पेरोविच यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितलं, "हा एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हल्ला असावा."

'अकाऊंट हॅक करण्यात आल्याच्या काही मिनिटांतच ट्विटरने अकाऊंट लॉक केला असून संबंधित ट्वीट काढून टाकण्यात आलं आहे,' असं बायडेन यांच्या कार्यालयाने म्हटलंय.

तर बिल गेट्स यांच्या प्रवक्त्याने असोसिएट प्रेस वृत्तसंस्थेला सांगितलं, "ही ट्विटरसमोरची सध्याची मोठी समस्या आहे."

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

तर लोकांनी या स्कॅममध्ये सहभागी होऊ नये असा इशारा देणारं ट्वीट 2017 साली जगातला पहिला बिटकॉईन अब्जाधीश होणाऱ्या कॅमरून विंकलवॉस यांनी केलंय.

हॅक झालेल्या या अकाऊंट्सवरून करण्यात आलेली ट्वीटस थोडा वेळच ऑनलाईन होती. तरीही या काळात या अकाऊंटसकडे 1,00,000 अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त पैसे लोकांनी पाठवल्याचं ब्लॉकचेनच्या उपलब्ध रेकॉर्ड्सवरून दिसून येतंय.

हॅक करण्यात आलेल्या या सगळ्या ट्विटर अकाऊंट्सचे लाखो फॉलोअर्स आहेत.

ट्वीट

फोटो स्रोत, Tweet

याबाबत आपण तपास करत असून लवकरच याविषयी अधिक माहिती देण्यात येणार असल्याचं ट्विटरने म्हटलंय.

जोपर्यंत या घटनेचा तपास करण्यात येतोय तोपर्यंत पासवर्ड रिसेट करता येणार नाही अथवा ट्वीटही करता येणार नसल्याचंही ट्विटरने म्हटलंय.

आपल्याला ट्वीट करता येत नसल्याचं यानंतर अनेक युजर्सनी म्हटलंय.

आम आदमी पार्टीशी संबंधित सोशम मीडिया अॅक्टिव्हिस्ट अंकित लाल यांनी फेसबुकवर लिहिलंय, "हॅकिंगनंतर ट्विटर डाऊन आहे. अनेकदा पोस्ट करण्याचा प्रयत्न केला पण ट्विटर सुरू नाही."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)