टिकटॉकने ऐनवेळी मायक्रोसॉफ्टची ऑफर नाकारली, ओरॅकलला संधी

टिक टॉक हे लोकप्रिय अॅप अमेरिकेत ऑपरेट करण्यासाठी दिलेली ऑफर चिनी कंपनीनं नाकारल्याची माहिती मायक्रोसॉफ्टने दिली आहे. यामुळे आता ओरॅकलला शेवटच्या क्षणी बोली लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी चिनी मालकीचं हे अॅप विकण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी 15 सप्टेंबरची डेडलाइन दिली होती.

टिक टॉक आणि इतर चिनी अॅप्स राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा दावा ट्रंप प्रशासनाने केला आहे.

मायक्रोसॉफ्ट आणि ओरॅकल या दोन कंपन्या बाईटडान्स या चिनी कंपनीकडून टिक टॉक विकत घेण्याच्या स्पर्धेत आघाडीवर होत्या.

द वॉल स्ट्रीट जर्नल अॅण्ड रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ओरॅकल ही डेटाबेस तंत्रज्ञान आणि क्लाऊड सिस्टम व्यावसायिकांना विकणारी कंपनी आहे. त्यामुळे या क्षेत्राशी परिचित असलेल्या लोकांमुळे ओरॅकलने ही स्पर्धा जिंकली.

याआधी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, ओरॅकल, जनरल अटलांटिक आणि सिक्वेया कॅपिटलसह अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये टिक टॉकचा व्यवसाय खरेदी करण्याचा गांभीर्याने विचार करत होती.

टिक टॉकच्या एका प्रवक्त्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं, "आम्ही मायक्रोसॉफ्ट आणि ओरॅकलबाबत व्यक्त केला जाणाऱ्या अंदाजाबाबत भाष्य करू इच्छित नाही."

मायक्रोसॉफ्टने काय सांगितलं?

"बाईटडान्स टिक टॉकचं अमेरिकेतलं ऑपरेटींग मायक्रोसॉफ्टला विकत नसल्याचं त्यांनी कळवलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊनही आमचा प्रस्ताव टिक टॉक यूजर्ससाठी सर्वोत्तम होता याची आम्हाला खात्री होती."

"या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये ही सेवा कशापद्धतीनं विकसीत होते हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत," असंही मायक्रोसॉफ्टनं म्हटलंय.

यामुळे ओरॅकलचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर बोलताना ट्रंप म्हणाले,"टिक टॉकच्या अमेरिकी कामकाजाचा ताबा घेण्यासाठी ही 'एक महान कंपनी' असेल."

टिक टॉक एखाद्या अमेरिकन कंपनीने विकत घेतल्यास टिक टॉकच्या यूएस युनीट विक्रीचा मोठा हिस्सा अमेरिकन सरकारला मिळायला हवा असं डोनाल्ड ट्रंप या महिन्याच्या सुरुवातीला म्हणाले होते.

असे का घडत आहे ?

डोनाल्ड ट्रंप यांनी टिक टॉकचे मालक बाईटडान्स यांना अमेरिकतला टिक टॉकचा कारभार 90 दिवसांच्या आतमध्ये विकण्याचे आदेश दिले. अन्यथा अमेरिकेतला टिक टॉकचा व्यवसाय बंद होईल आणि याचा फटका अमेरिकेतील इतर चायनीज तंत्रज्ञान कंपन्यांनाही बसेल असा इशारा दिला.

ट्रंप यांनी म्हटलं आहे की, टिक टॉक, वीचॅट आणि उपकरण निर्मात् हुवेई (Huawei) सारख्या अॅप्समुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. कारण वापरकर्त्यांबद्दल गोळा केलेला डेटा चीन सरकारला पुरवला जाऊ शकतो. चिनी कंपन्या मात्र हा दावा फेटाळून लावतात.

टिक टॉक, वीचॅट आणि हुवेई (Huawei) यांसारख्या अॅप्समुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो. कारण या अॅप्समधून यूजर्सची माहिती गोळा करून ती चिनी सरकारला दिली जाऊ शकते, असा दावाही ट्रंप यांनी केला आहे.

हुवेईवर 15 सप्टेंबरला बंदी घालण्यात आली ज्याचा फटका गैरअमेरिकन कंपन्यांना बसणार आहे. ज्या कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये अमेरिकन तंत्रज्ञान वापरले जाईल अशा कंपन्यांना हुवेईशी (Huawei) व्यापार बंद कारवा लागेल. तसंच ज्यांना हुवेईला (Huawei) पुरवठा करायचा आहे त्यांना अमेरिकेच्या वाणिज्य विभागाकडून परवाना घेणं आवश्यक आहे, असंही ट्रंप यांनी सांगितलं.

याप्रकरणी चीनची भूमिका काय ?

दोन आठवड्यांपूर्वी चीनमध्ये तंत्रज्ञान उत्पादनांच्या निर्यातीवर नवीन निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. या निर्बंधांनुसार AI सारख्या तंत्रज्ञानाची निर्यात करण्यापूर्वी सरकारची मान्यता आवश्यक असेल.

टिक टॉकच्या प्रचंड लोकप्रियतेचं एक कारण म्हणजे वापरण्यात आलेले प्रगत असे अल्गॉरिदम्स. यामुळे यूजर्सना काय पाहायचे आहे याचा अंदाज वर्तवता येतो.

अशा प्रकराचे तंत्रज्ञान वापरलेल्या उत्पादनांवर चिनी सरकारची नजर असेल. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, असे अल्गॉरिदम्स विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाहीत.

टिक टॉकच्या विक्रीचा अर्थ काय ?

अमेरिकेत टिक टॉकचे 10 कोटी यूजर्स आहेत. पण अमेरिकेत टिक टॉक व्हीडिओ शेअरिंग अॅपचं नेमके काय होणार हे अद्याप स्पष्ट नाही.

मायक्रोसॉफ्ट किंवा ओरॅकल दोन्ही कंपन्या टिक टॉकसाठी साजेशा आहेत असं म्हणता येणार नाही. कारण दोघांकडेही असा तरुण वर्ग नाही जो शॉर्ट फॉर्म लिप-सिंकिंग व्हीडिओ शेअर करतो.

कोणत्याही व्यवहारात अमेरिका आणि चीन सरकार, बाईटडान्स आणि गुंतवणूकदारांसह अनेकांची सहमती आवश्यक असणार आहे.

टिक टॉक बंद केल्याप्रकरणी ऑगस्ट महिन्यात टिक टॉककडून ट्रंप सरकार विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)