कोरोना व्हायरस : लॉकडॉऊनमध्ये दारू पिण्याचीही पद्धत बदलली?

दारू

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, फर्नांडो दुआर्टे
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्विस

मार्चपासून कोव्हिड-19 मुळे पूर्ण जग ठप्प झालं. परंतु टिना रॉड्रिग्ज त्यांच्या आऱोग्याबद्दल आधीपासूनच जागृत होत्या. त्यासाठी एक पर्सनल ट्रेनर त्यांच्या मदतीला होती. टीना यांनी जानेवारीपासूनच दारू पिणं सोडलं होतं.

टीना सांगतात, मी माझ्या आहारामध्ये सुधारणा केली. जर नीट जगायचं असेल तर हे केलंच पाहिजे असं माझ्या डोक्यात होतं.

कायमची दारू सोडली पाहिजे असं माझं मत नव्हतं पण लॉकडाऊन सुरू झाल्यावर दारू पिण्यात काहीच अर्थ उरलेला नव्हता.

त्या सांगतात त्यांचा दोन वर्षाचा लहान मुलगा घरात असल्यामुळे दारू सोडणं सोपं झालं.

आम्ही बाहेर पडलोच नाही. लोकांमध्ये मिसळता आलंच नाही. घरात दारू पिणं हा काही उपाय नव्हताच.

अर्थात, साथीच्या या काळामध्ये दारूची विक्री वाढल्याचं दिसून आलं आहे. परंतु दारु कमी पिण्याचा ट्रेंडही दिसून येत आहे. जगभरात या ट्रेंडमध्ये टीनासारख्या अनेक लोकांनी सहभाग घेतला आहे.

26 वर्षांच्या टीना यांनी जुलैमध्ये पब्स आणि रेस्टोरंट्स सुरू होऊनसुद्धा दारूपासून लांबच राहाण्याचा निर्णय घेतला. 'मला दारु पिण्याची गरजच भासत नाही', असं त्या सांगतात.

कोरोना काळात दारू पिणं कमी झालं की वाढलं ?

कोरोना काळात लोक आणि दारू यांच्या संबंधातल्या अनेक बातम्या समोर आल्या.

कोरोना आरोग्य संकटात मद्यविक्रीत झपाट्याने वाढ होत असल्याने भारतासह ब्राझील, अमेरिका आणि अनेक युरोपीय देशांसह जगभरातील आरोग्य विभागाकडून इशारा देण्यात आला.

अमेरिकेत एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात लॉकडॉऊन लागू करण्यात आले तेव्हा ऑनलाईन दारूविक्री 400 टक्क्यांनी वाढली. दक्षिण आफ्रिकेसह काही देशांना तर दारू विक्री बंद करावी लागली.

दारू

फोटो स्रोत, Getty Images

ब्रिटनमध्ये राहणारी टीना सांगते, इथे एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, 30 टक्के ब्रिटिश लोक कोरोना काळात दारू पिण्याचे प्रमाण वाढल्याचे मान्य करतात.

हे वाढलेले प्रमाण चिंताजनक असले तरी दारू पिण्याचे प्रमाण कमी केल्याचे आणि दारू पूर्णपणे सोडून देण्याचाही ट्रेंड दिसून येत आहे.

या सर्वेक्षणानुसार, 37 टक्के लोक दारू पिण्याची सवय कमी करण्यासाठी सक्रिय पावलं उचलत असल्याचे दिसून आले. यामध्ये मद्यपान न करणे आणि मद्यपान पूर्णपणे सोडून देणारे लोक आहेत.

दारुचे व्यसन सोडलेले आणि आता यासाठी लोकांना थेरपी देण्याचे काम करणारे जेम टिमोन्स सांगतात, "लॉकडॉऊनमध्ये अनेक लोकांना स्वत:कडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. अनेकांनी याकडे संधी म्हणून पाहिलं. या काळात लोकांना संघर्ष करावा लागला नाही असे मी म्हणणार नाही. पण लॉकडॉऊनमुळे अनेकांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली."

मद्यपान नियंत्रणात ठेवण्याकडे तरुण पिढीचा कल अधिक आहे.

तरुण पिढी दारू पिताना संयम बाळगते ?

1981 ते 1996 दरम्यान जन्मलेले हजारो लोक त्यांच्या आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत कमी मद्यपान करतात.

1996 नंतर जन्मलेली जनरेशन-झी किंवा झूमर्स म्हणजेच तरुण मद्यपानाबाबत अधिक संयम बाळगताना दिसतात. 2018 साली लिहिलेल्या एका पुस्तकात अमेरिकन लेखक रुबी वेलिंग्टन यांनी अशा तरुणांसाठी "सोबर क्युरियस" हा शब्द वापरला आहे. हे पुस्तक दारू आणि व्यक्ती यांच्यातल्या संबंधांवर प्रकाश टाकते.

कॅलिफोर्निया विद्यापीठाने 1976 ते 2016 या 30 वर्षांच्या कालावधीत 80 लाख अमेरिकन किशोरवयीन मुलांवर एक संशोधन केले. त्यानुसार, गेल्या पिढ्यांच्या तुलनेत तरुणांमध्ये मद्यपान केल्याचा परिणाम कमी झालेला दिसतो.

कोरोना
लाईन

मिंटेल या रिसर्च फर्ममधील अल्कोहोल इंडस्ट्री एक्सपर्ट जॉनी फॉर्सिथ म्हणतात, "20 वर्षांपूर्वी निरोगी असणं ही एक विचित्र गोष्ट मानली जात होती. आताची पिढी निरोगी असणं कूल मानते. समाज आता अधिक जागरूक झाला आहे आणि पूर्वीपेक्षा दारू पिण्याच्या सवयींबाबत समाज काटेकोर आहे."

ते सांगतात, "ही तरुण पिढी आतापर्यंतची सर्वाधिक निरोगी पिढी आहे. ही पिढी पूर्ण मद्यपान व्यवसायाला बदलू शकते."

सोशल मीडियावर व्हरिंग्टनचे 'ऑन अल्कोहोलिझम' हे पुस्तक प्रकाशित झाल्यापासून डिजिटल सोब्रिटी म्हणजेच संयम बाळगून मद्यपान करण्याला एक वेगळी ओळख प्राप्त झाली.

केली फिट्झगेराल्डसारखे लोक 'सोबर सॅनोरिटा'सारख्या टॅगखाली इन्स्टाग्रामवर अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध 'सोब्रिटी सिस्टर्स' बनल्या आहेत. त्या सांगतात, "साथीच्या रोगाच्या काळात सोब्रोटी हे एक आव्हान असेल याची मलाही कल्पाना नव्हती. पण हे वास्तव असून अनेकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे."

"कोरोनाच्या आधी प्रचंड दारू पिणाऱ्या लोकांना जेव्हा लॉकडॉऊनच्या काळात घरी एकटे रहावे लागले तेव्हा त्यांना व्यसन घातक असल्याची जाणीव झाली," असंही त्या सांगतात.

गे सोबर या नावाने इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असलेले ली मेंगो मान्य करतात की, या काळात अनेकांना मद्यपान करण्याचीही संधी मिळाली आहे."लोक सोब्राइटीची सवय लावून घेत आहेत. पण तरीही अनेक लोकांना असेही वाटते की सोबरम्हणजे कंटाळवाणे."

"पूर्वी मला याचा राग येत होता. पण आता कुणीही काही बोलले की, मी सांगतो सोबर लोक रात्री स्वत: ड्राईव्ह करून घरी जाऊ शकतात. त्यांना टॅक्सीसाठी थांबावे लागत नाही."

27 वर्षीय पत्रकार मिली गूच 'द सोबर गर्ल सोसायटी' हा सपोर्ट ग्रुप चालवतो. लॉकडॉऊनचा काही लोकांवर सकारात्मक परिणाम झाल्याचं तो सांगतो.

दारू

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसीला एका ई-मेलमध्ये त्याने म्हटलं,"कोरोना काळात मर्यादेत मद्यपान करणं हे एक आव्हान आहे. कारण कुणालाही वैयक्तिक मदत करता येत नाही. शिवाय, अस्वस्थता वाढल्याने लोकांमध्ये मद्यपानाचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक आहे."

"पण आमच्या अनेक सदस्यांनी सांगितले की लॉकडॉऊनमध्ये दारु कमी पिणं सोपं झालं."

दारूमुक्त पेयांना अधिक प्रतिसाद

तज्ज्ञांच्या मते, सवयी बदलल्यामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये नव्या व्यावसायिक संधी निर्माण झाल्या आहेत. काही काळात जगभरातही या संधी वाढू शकतील.

90 देशांमध्ये 70,000 पेक्षा जास्त सदस्य असलेल्या 'वन इयर नो बिअर' या वेबसाइटने आपल्या कामकाजात झालेल्या बदलांचा प्रभाव अनुभवला आहे. ही कंपनी लोकांना दारुची सवय सोडण्यासाठी मदत करते.

मार्च महिन्यापासून कंपनीचे सदस्यत्व 30 टक्क्यांनी वाढले. या कंपनीने एक अत्यंत यशस्वी क्राउडफंडिंग मोहीम सुरू केली आहे. सामान्य लोकांमध्ये आरोग्याच्या चांगल्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी मदतही मिळवली आहे.

कमी मद्य आणि मद्यमुक्त पेय बनवणाऱ्या कंपन्यांची विक्रीही कोरोना आरोग्य संकटात वाढली आहे. ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ आणि बारचे मालक पॉल मॅथ्यूज यांनी गेल्या वर्षी नोलो अॅप्रिटिफची निर्मिती केली. याची विक्री ते बार आणि रेस्टॉरंट्समध्ये करतात.

कोरोना आरोग्य संकट म्हणजे वाईट दिवस आले आहेत असे मॅथ्यूला वाटले. त्यामुळे त्याने आपले ड्रिंक्स थेट सामान्य लोकांना विकण्याचा प्रयत्न केला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांची विक्री 4,000 टक्यांनी वाढली.

ते सांगतात, "दर महिन्याला आम्ही जवळपास शंभर बॉटल्स विकत होतो. आता आम्ही हजारो बॉटल्स विकतो. आम्ही कधीही याची कल्पना केली नाही."

दारू

फोटो स्रोत, Getty Images

नॉन-अल्कोहोलिक बियरच्या ऑगस्ट महिन्यातील एका अहवालात म्हटले आहे की, ग्राहक आता दारूमुक्त पेयांकडे वळत आहेत. या अहवालानुसार एकट्या युरोपमध्ये 2024 पर्यंत हा व्यवसाय 6 अब्ज डॉलरपेक्षा जास्त असेल. आफ्रिका आणि मध्यपूर्वेतही हा व्यवसाय वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नोलो क्षेत्र दारुच्या 1 लाख डॉलर्सच्या मोठ्या जागतिक विक्रीचा एक छोटासा भागही नाही. पण दारुच्या उद्योगातील दिग्गजांनीही मद्यमुक्त पेयांच्या कामाला गती दिली आहे.

याचे सर्वात ताजे उदाहरण म्हणजे हेनीकेन झिरोची घोषणा. ही एक दारूमुक्त बियर आहे. युएफा प्रथमच युरोपा लीगचा मुख्य प्रायोजक असेल. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सहसा मोठ्या अल्कोहोल ब्रँड्स आणि विशेषतः बिअर ब्रँड्सद्वारे प्रायोजित केल्या जातात.

तसेच, रम बनविणाऱ्या बाकार्डीने केलेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की, 2019 मध्ये मॉकटेल्सच्या गुगल सर्चमध्ये 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दारु नसलेल्या कॉकटेल्सना मॉकटेल म्हटलं जातं.

चांगल्या सवयी राहातील का?

टीना रॉड्रिग्ज म्हणतात पुढच्या सोशल इव्हेंटमध्ये त्यांना बोलावलं गेलं तर तिथं दारू पिण्याची इच्छा मनात जास्त येऊ शकते. त्या सांगतात की, आता त्यांच्या बहुतांश मित्रांनी दारू पिणं कमी केलं आहे किंवा काहींनी जवळपास सोडूनच दिलं आहे.

दारू

फोटो स्रोत, Getty Images

पण ही सवय सगळं काही नॉर्मल झाल्यावर टिकेल का? याचं उत्तर फक्त लोकांच्या इच्छाशक्तीमधून मिळणार नाही असं तज्ज्ञ सांगतात.

लेखिका मॅंडी मॅनर्स यांच्या मते ही जबाबदारी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रावरही आहे.

त्या म्हणतात, "जे लोक दारू पित नाहीत त्यांनाही बार आणि रेस्टॉरंटमध्ये सेवा देणं महत्त्वाचं आहे."

पुढच्या पिढीने काही चांगले संकेत दिले आहेत. 'वन इयर, नो बिअर' सारख्या मोहिमेत बहुतांश लोकांचे वय 35 ते 55 मधले आहे. तसेच त्यात सहभागी होणाऱ्या सदस्यांमध्ये 40 पेक्षा जास्त वयाचे लोक अधिक आहेत.

कोरोनाच्या काळामध्ये दारुबरोबरच आपल्या नात्यांकडे नव्या दृष्टीने पाहाण्यात काही आश्चर्य वाटत नाही असं मिली गूच म्हणतात. त्या सांगतात, "कारण आपण सोशल मीडियावाल्या पिढीचे आहोत. याबाबतीत आपण जास्त दृढनिश्चयी आहोत."

परंतु, काही चांगले लोक दारू कमी प्यायली जावी यासाठी प्रेरणा देत आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)