कोरोना लॉकडाऊनमुळे सिगारेट ओढण्याचं प्रमाण कमी झालं आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"मी दहावीत होतो तेव्हापासून मला सिगारेट ओढण्याची सवय लागली. माझे वडील सिगारेट ओढायचे. ते पाहून मला ही 'कूल' गोष्ट आहे असे वाटायचे.
कॉलेजमध्ये असताना मी कॉल सेंटरमध्ये काम करायचो. तिथेही मोठ्या संख्येने तरुण सिगारेट ओढायचे. तेव्हा तर दिवसाला दहा सिगारेट ओढून व्हायच्या." 32 वर्षांच्या जस्टीन जोसने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले.
जस्टीन सहाय्यक दिग्दर्शक म्हणून एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करतो. "गेल्या चार-पाच वर्षांपासून मी सिगारेट ओढणं कमी केलं होतं. आता लॉकडाऊनच्या पाच महिन्यांत सिगारेट पूर्णपणे बंद करण्याची संधी मिळाली." असंही तो सांगतो.
तर मीडियामध्ये काम करणाऱ्या अमितालाही (बदललेले नाव) गेल्या दहा वर्षांपासून सिगारेट ओढण्याची सवय होती. "पण लॉकडॉऊनमध्ये सर्वकाही बदललं. नाईलाजाने का होईना सिगारेट सोडण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला." अमिताने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले.

फोटो स्रोत, Alamy
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडॉऊन लागू होऊन आता तब्बल चार महिने उलटले आहेत. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रात तर सर्वच ठप्प होतं. त्यामुळे तंबाखू, गुटखा, सिगारेट उपलब्ध होत नव्हते.
लॉकडॉऊनच्या प्रतिकूल परिस्थितीत सिगारेट सोडल्याची अशी अनेक उदाहरणं समोर येत आहेत. मोठ्या संख्येने लोकांनी सिगारेट सोडण्याचा प्रयत्न केल्याचे विविध सर्वेक्षणांमधूनही समोर आले आहे.
"सुरुवातीला वाटले की, हा काही दिवसांचाच प्रश्न आहे. त्यामुळे मी संयम ठेवला. पण मग सिगारेट मिळतच नाही म्हटल्यावर अस्वस्थ वाटायलाही सुरुवात झाली." जस्टीन सांगत होता.
'लॉकडॉऊनमुळे सिगारेट सोडता आली'
लॉकडॉऊन सुरू झाल्यावर दुकानांसोबत वाहतुकीचेही सर्व पर्याय बंद होते. कोरोना व्हायरसची दहशतही प्रचंड होती. अशा परिस्थितीत कितीही इच्छा झाली तरी घराबाहेर पडणं शक्य होत नव्हतं.
अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने केवळ किराणा आणि भाजीपाला घरी येत होता. अशा परिस्थितीमध्ये सिगारेट विकत घेता येत नव्हती.
डॉक्टर्स सांगतात, सुरुवातीला सिगारेट मिळत नाही म्हणून अनेकांना त्रास झाला. पण 'हीच ती वेळ' हे देखील अनेकांनी ओळखले. लॉकॉऊनच्या परिस्थितीचे नामी संधीत रुपांतर करत अनेकांनी गेल्या पाच महिन्यांत सिगारेटला स्पर्शही केला नाही.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा सांगतात, "एप्रिल आणि मे महिन्यात मला दिवसाला 7-8 फोन कॉल्स येत होते. सिगारेट मिळत नसल्याने चिडचिड होतेय, काय करायचे ते कळत नाहीय, प्रचंड अस्वस्थ वाटतंय. अशा तक्रारी होत्या. तेव्हा सिगारेट सोडण्यासाठी मी अशा सगळ्यांना मदत करायचे ठरवले."

कोणतेही व्यसन सोडण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आवश्यक असते. हे जरी खरी असले तरी व्यसन सोडण्यासाठीही एका प्रक्रियेतून जावे लागते.
जस्टीन सांगतो, "गेल्या चार महिन्यांत मी सिगारेट ओढलेली नाही. मला याचा आनंद आहे. सिगारेट सोडण्याचे मी काही ठरवले नव्हते. पण दोन महिने सिगारेटशिवाय मी राहू शकलो हे लक्षात आल्यावर माझा आत्मविश्वास वाढला."
कोरोना आरोग्य संकटात सर्वाधिक धोका हा ज्येष्ठ नागरिकांना आहे याबाबत जनजागृती करण्यात आली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनीही आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी व्यसन सोडण्याचे प्रयत्न केल्याचे समोर येत आहे.
मुंबईत राहणाऱ्या शिवसहाय सिंग यांनी तब्बल 47 वर्षांनी दारू आणि सिगारेट सोडल्याचं ते सांगतात. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "मला दररोज सिगारेटची दोन ते तीन पाकिटं ओढायची सवय होती. लॉकडॉऊन अचानक लागू झाले. त्यामुळे काही दिवसातच माझ्याकडे असलेला साठा संपला."

फोटो स्रोत, Getty Images
"गेल्या पाच महिन्यांत मी एकाही सिगारेटला हात लावलेला नाही. यासाठी मला माझ्या कुटुंबाने सहकार्य केले. काही दिवस सिगारेट ओढत नसल्याने मी प्रसन्न दिसत असल्याचे माझी पत्नी आणि मुलाने मला सांगितलं. मलाही माझ्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल दिसू लागला. यामुळेच मला प्रेरणा मिळाली."
मोठ्या शहरांमध्ये विशेषत: ऑफिसबाहेर चहाच्या टपरीवर सिगारेट ओढणाऱ्या नोकरदारांची गर्दी कायम दिसते. दुपारी जेवणानंतर आणि संध्याकाळी ठिकठिकाणी घोळक्यानं काही लोक सिगारेट ओढतानाचे चित्र दिसते.
लॉकडॉऊन लागू झाल्यानंतर शहरांची जीवनशैली बदलली. कार्यालय बंद असल्याने, वाहतूक व्यवस्था नसल्याने कोट्यवधीच्या संख्येने नोकरदार वर्ग घरी आहे.
"कोरोनानंतर सगळंच बदललं आहे. गेले चार महिने ऑफिसेससुद्धा बंद होती. त्यामुळे सिगारेट ओढायला तशी सोबतही नव्हती. मी घरी बसून सिगारेट नाही ओढू शकत. त्यामुळे माझी सवय जवळपास सुटल्यातच जमा आहे." असं अमिता हसत हसत सांगत होती.
लॉकडॉऊनमध्ये सिगारेट सोडल्याचा सर्वेक्षणांचा अहवाल
फाऊंडेशन ऑफ स्मोक फ्री वर्ल्ड या जागतिक पातळीवरील संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, लॉकडॉऊनच्या काळात भारतातील 18-24 वयोगटातील 72 टक्के लोकांनी सिगारेट सोडण्यासाठी प्रयत्न केलाय.
66 लोकांनी सिगारेट सोडण्याबाबत विचार केला असून 63 टक्के लोकांनी सिगारेट सोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
इंडिया इन्फोलाईन फायनॅन्शिअल सर्विसेस IIFL या संस्थेकडूनही सिगारेटचे व्यसन असणाऱ्या 100 जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी 58 टक्के लोकांनी सिगारेट सोडली. लॉकडॉऊननंतर सिगारेट ओढण्याचे प्रमाण 66 टक्क्यांनी कमी झाल्याचे सर्वेक्षणात उघड झाले आहे.
तर युकेमध्ये 1 लाखाहून अधिक लोकांनी कोरोनाकाळात सिगारेट सोडल्याचा दावा चॅरिटी अॅक्शन ऑन स्मोकिंग अँड हेल्थ संस्थेने केला आहे.
सिगारेटमुळे कोरोना होण्याचा धोका अधिक?
सिगारेट ओढण्याची सवय असलेल्या लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग सहज होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनंही वर्तवली आहे. यामागे असणारं कारण म्हणजे सिगारेट ओढताना हात आणि तोंडापर्यंत व्हायरस सहज पोहचू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
सिगारेट ओढल्याने कोरोनाची लक्षणं अधिक गंभीरपणे दिसण्याची शक्यता जास्त आहे का ? याप्रश्नाचे उत्तर देताना WHO सांगते, "सिगारेटमुळे फुप्फुसांवर मोठा परिणाम होत असतो. निकोटीनच्या सेवनामुळे फुप्फुस आणि श्वसन मार्ग कमकुवत होतात. प्राथमिकदृष्ट्या कोरोना व्हायरस फुप्फुसांमध्ये पसरत असल्याने त्याच्याशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता चांगली असणे गरजेचे आहे.
संशोधनांनुसार धूम्रपान करणारी व्यक्ती कोरोना झाल्यावर हायर रिस्कमध्ये मोडते. याचाही उल्लेख WHO कडून करण्यात आलाय.
सिगारेटचे व्यसन कसे सोडायचे?
कोणत्याही व्यसनमुक्तीसाठी वैद्यकीय प्रक्रिया उपलब्ध आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडूनही सिगारेट मुक्तीसाठी एक विशेष वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.
मानसोपचारतज्ज्ञ सिगारेट सोडण्यासाठी नेमकी कोणती प्रक्रिया राबवतात ? या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. सागर मुंदडा सांगतात,
सिगारेटचे व्यसन म्हणजे प्रत्यक्षात निकोटीनचे व्यसन. सिगारेट पिणारा व्यक्ती निकोटीनच्या आहारी गेलेला असतो.
सर्वप्रथम निकोटीनवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही सुरुवातीला पूर्णपणे निकोटीनचे सेवन बंद करत नाही. तर शरीराला अचनाक त्रास होऊ नये म्हणून वैद्यकीय प्रमाणानुसार टप्प्याटप्याने निकोटीन कमी केले जाते.

फोटो स्रोत, Getty Images
या दरम्यान, सिगारेटची ओढण्याची इच्छा तुम्हाला वारंवार होते. अशावेळी तुमचे लक्ष सिगारेटपासून दुसरीकडे वळवण्यासाठी काही गोष्टी तुम्ही करायला हव्यात. उदा. मित्रांशी बोलणे, सिनेमा पाहणे, एखादा छंद जोपासणे.
सिगारेट ओढण्याची प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. कुणी मजा म्हणून ओढतं, कुणाला तणावात सिगारेट लागते, कुणी मित्रांच्यासोबत सिगारेट ओढतं. तुमचे कारण काय आहे ? हे तुम्ही ओळखायला हवे. कारण कळाले की त्या गोष्टीला पर्याय शोधणं सोपं जातं. यासाठी वैद्यकीय थेरपीसुद्धा उपलब्ध आहेत.
पण दीर्घकाळासाठी कायमची सिगारेट सोडायची असेल तर या सर्वांपेक्षाही मोठं शस्त्र आहे ते म्हणजे तुमच्या मनाची पक्की तयारी असणं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








