अॅलेक्सी नवलनी : ते दोन तास ज्यांनी वाचवले पुतिनच्या कट्टर विरोधकाचे प्राण

अलेक्सी नावालनी

फोटो स्रोत, Reuters

    • Author, बीबीसी रशियन सेवा
    • Role, मॉस्को

रशियाचे विरोधी पक्षनेते अॅलेक्सी नवलनी सध्या बर्लिनमधल्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. ते अजूनही कोमात आहेत. अॅलेक्सी यांना 'नोविचोक नर्व्ह एजंट' हे विष देण्यात आल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे.

अॅलेक्सी नवलनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. 44 वर्षांचे नवलनी गेल्या महिन्यात सायबेरियाहून मॉस्कोला येत असताना विमानात अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे विमानाचा मार्ग बदलून जवळच्या ओम्स्क शहरात इमरजंसी लँडिंग करण्यात आलं.

तिथून अॅलेक्सी यांना एअरलिफ्ट करून जर्मनीला नेण्यात आलं. जर्मनीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बीबीसीने सायबेरियाहून मॉस्कोला निघालेल्या त्या विमानातला चालकदल आणि मेडिकल टिमच्या लोकांशी बोलून "त्या दिवशी नेमकं काय घडलं?" आणि अवघ्या दोन तासात इतक्या नाट्यमय पद्धतीने गोष्टी कशा बदलत गेल्या, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला

त्या सकाळी काय घडलं?

20 ऑगस्टचा दिवस होता. अॅलेक्सी नवलनी रशियाच्या टॉम्स्क शहरातून मॉस्कोसाठी विमानाने रवाना झाले. S-7 एअरलाइंसचं ते विमान होतं.

त्या दिवशी सकाळी त्यांनी काहीही खाल्लेलं नव्हतं. मात्र, नवलनी यांच्या प्रेस सचिव कीरा यार्मिश यांचं म्हणणं आहे की फ्लाईटमध्ये बसण्याआधी त्यांनी एक कप चहा घेतला होता. टॉम्स्क विमानतळावरच त्यांनी हा चहा विकत घेतला होता.

अलेक्सी नावालनी

फोटो स्रोत, ILYA AGEEV

फोटो कॅप्शन, अलेक्सी नावालनी

त्याच फ्लाईटमध्ये प्रवास करणाऱ्या आणखी एक प्रवासी इल्या अगीव यांनी टेक-ऑफच्या जवळपास तासभर आधी नवलनी यांना चहा पिताना पाहिलं होतं.

अगीव यांनी सांगितलं की नवलनी नॉर्मल दिसत होते. ते मजा-मस्करी करत होते आणि विमानतळावर त्यांना ओळखणाऱ्या लोकांकडे बघून ते स्माईलही करत होते.

Tomsk time (रशियन वेळेनुसार) 08:01 (01:01 GMT - ग्रीनविच मीन टाइम)

विमान उड्डाणाच्या अर्ध्या तासातच नवलनी यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं.

विमानाच्या चालक दलाचे सदस्य प्रवाशांना पाणी देत होते. पण नवलनी यांनी पाणी घेतलं नाही. काही वेळातच ते आपल्या सीटवरून उठले आणि स्वच्छतागृहाकडे गेले.

Tomsk time08:30 (01:30 GMT)

फ्लाईटमधल्या आणखी एका प्रवाशाला स्वच्छतागृहात जायचं होतं. मात्र, नवलनी जवळपास 20 मिनिटांपासून आत होते.

काही वेळातच स्वच्छतागृहाबाहेर वाट बघणाऱ्या लोकांची गर्दी वाढू लागली आणि चालक दलाला कळलं की त्यांच्या एका प्रवाशाची प्रकृती बरी नाही.

Tomsk time09:00 (02:00 GMT)

काही मिनिटातच विमानात कुणी डॉक्टर आहे का, अशी उद्घोषणा करण्यात आली. एव्हाना परिस्थिती गंभीर असल्याचं इतर प्रवाशांनाही कळून चुकलं.

चालक दलाने पायलटला याविषयी आधीच माहिती दिली होती. मात्र, उद्घोषणेनंतर नवलनी यांना वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न सुरू झाला.

नवलनी यांचे सहकारी इल्या पाखोमोव प्रवाशांना विनंती करत होते की कुणी वैद्यकीय तज्ज्ञ असेल तर त्याने मदत करावी. दरम्यान एक महिला प्रवासी पुढे आल्या. आपण नर्स असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, बीबीसी त्यांची ओळख पटवू शकलेलं नाही.

अलेक्सी नावालनी

फोटो स्रोत, ILYA AGEEV

पुढचा तब्बल तासभर चालक दल आणि त्या नर्स नवलनी यांना शुद्धीत ठेवण्याचा प्रयत्न करत होते. S-7 एअरलाईन्सने दिलेल्या माहितीनुसार विमानाची 'इमरजेंसी लँडिंग' होईपर्यंत चालक दलाकडून नवलनी यांना शुद्धीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू होते.

'ते बोलत नव्हते - फक्त ओरडत होते'

व्यवसायाने वकील असणारे सर्गेई नेगेनेट्स विमानाच्या मागच्या सीटवर बसले होते आणि तिथेच नवलनी यांच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न सुरू होते.

बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "फ्लाईट अटेंडंटने विमानात कुणी डॉक्टर आहे का, हे विचारलं तेव्हा माझं लक्ष त्या गोंधळाकडे गेलं. काही मिनिटातच पायलटने घोषणा केली की आपण काही क्षणातच ओम्स्क शहरात उतरणार आहोत. खरंतर आमची फ्लाईट मॉस्कोची होती. एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. फ्लाईट उतरल्यानंतर मी ट्वीटरवर बघितलं तेव्हा कळलं की आजारी असणारी व्यक्ती नवलनी होते."

सर्गेई यांनी सांगितलं, "फ्लाईटमध्ये नवलनी वेदनेने विव्हळत होते. त्यांना बघूनच वाटत होते की त्यांना खूप त्रास होतोय. ते खाली पडून होते. विमानातला चालक दल बसतो तिथे ते होते. त्यांना इतक्या वेदना होत होत्या की त्यांना बोलताही येत नव्हतं. ते फक्त ओरडत होते."

अलेक्सी नावालनी

फोटो स्रोत, ILYA AGEEV

विमानात मदतीसाठी त्या नर्स आल्या तेव्हा काय घडलं, याविषयी सांगताना सर्गेई म्हणाले, "त्या काय करत होत्या, मला माहिती नाही. मला त्या दिसल्या नाही. पण, मला त्यांचं बोलणं ऐकू येत होतं. त्या म्हणत होत्या अॅलेक्सी हे प्या. पिण्याचा प्रयत्न करा. प्लीज थोडा प्रयत्न करा. श्वास घेत रहा."

"नवलनी ओरडत होते. त्यांचं हे ओरडणं प्रवाशांना बरं वाटत होतं. कारण त्यावरून एवढं तरी कळत होतं की ते जिवंत आहेत. मात्र, तोवर नवलनी कोण आहेत, हे मला ठाऊकही नव्हतं."

सर्गेई यांनी सांगितलं की नवलनी यांचे दोन सहकारी त्यांच्याजवळच उभे होते. यापैकी एक होत्या त्यांच्या प्रेस सचिव कीरा यार्मिश.

सर्गेई यांनी सांगितलं, "त्यांच्या सचिव खूप घाबरल्या होत्या. त्यांना विचारलं की यांना काय झालं तर त्या म्हणाल्या की कदाचित यांच्यावर विषप्रयोग झाला आहे."

Omsk time 08:20 (02:20 GMT)

एअरलाईन्सने दिलेल्या माहितीनुसार ओम्स्क शहरात इमरजंसी लँडिंगची परवानगी मागताच लगेच परवानगी देण्यात आली.

जवळपास 30 मिनिटात विमान मार्ग बदलून ओम्स्क शहरात पोहोचलं.

मात्र, चालकदलाचे सदस्य वारंवार बाहेर बघून म्हणत होते की ढगाळ वातावरणामुळे नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतोय.

सर्गेई यांनी सांगितलं की नवलनी यांना पाणी प्यायला त्रास होत होता. मात्र, त्यांनी उलटी केली नाही.

ओम्स्क विमानतळाचे चीफ डॉक्टर वासिली सिदोरस यांनीही सांगितलं की 'नवलनी यांना जे काही देण्यात आलं ते त्यांच्या पोटातच आहे.'

अलेक्सी नावालनी

फोटो स्रोत, SIBIR.REALII

जाणकारांच्या मते जर्मनीचे डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे नवलनी यांना 'नोविचोक नर्व्ह एजंट' देण्यात आलं असेल तर विमानत उलटी केल्यावर इतरांवरही त्याचा परिणाम झाला असता किंवा जे कुणी उलटी स्वच्छ केली असती त्यांच्यावर परिणाम झाला असता.

दरम्यान, ओम्स्कच्या वेळेनुसार सकाळी नऊ वाजून एक मिनिटांनी विमान लँड झालं.

Omsk time 09:01 (03:01 GMT)

सर्गेई यांच्या माहितीप्रमाणे अवघ्या दोन मिनिटात विमानतळाचं वैद्यकीय पथक विमानात दाखल झालं. नवलनी यांना बघताक्षणी ते म्हणाले, "ही केस आम्ही सांभाळू शकणार नाही. यांना तात्काळ इंटेसिव्ह केअर युनिटची गरज आहे."

यानंतर आयसीयू अॅम्ब्युलंसला कॉल करण्यात आला.

सर्गेई यांनी सांगितलं, "अॅम्ब्युलंसला विमानापर्यंत यायला जवळपास 10 मिनिटांचा वेळ लागला आणि सर्वांनाच हा वेळ खूप मोठा वाटला. दरम्यानच्या काळात डॉक्टरांनी नवलनी यांचं बीपी तपासलं आणि त्यांना ड्रीप चढवलं. मात्र, डॉक्टर ज्या पद्धतीने काम करत होते त्यावरून हे स्पष्ट दिसत होतं की त्यांनासुद्धा याची कल्पना होती की याने काहीही होणार नाही."

ओम्स्कस विमानतळाचे चीफ डॉक्टर वासिली सिदोरस यांनी सांगितलं की त्यांनी स्वतः नवलनी यांच्यावर उपचार केले नाही. दोन तासात बऱ्याच गोष्टी बदलल्या. मात्र, त्यांच्या टीमने जी काही मेहनत घेतली त्यामुळे निश्चितच नवलनी यांचे प्राण वाचण्यात थोडीफार मदत नक्कीच झाली.

ते म्हणाले, "सर्वात मोठी अडचण ही होती की नवलनी यांना काही सांगता येत नव्हतं. ते काही बोलूच शकत नव्हते. त्यामुळे मोठ्या आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करणं, अत्यंत गरजेचं होतं."

विमानातल्या ज्या-ज्या प्रवाशाशी बीबीसीने बातचीत केली त्या सर्वांनीच सांगितलं की विमानतळाच्या वैद्यकीय पथकाने विमानात जवळपास 15-20 मिनिटं नवलनी यांचं निरीक्षण केलं.

Omsk time 09:37 (03:37 GMT)

यानंतर नवलनी यांना स्ट्रेचरवर ठेवून अॅम्ब्युलंसमध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि तिथून थेट ओम्स्क इमरजेंसी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

विमानातल्या प्रवाशांनी बीबीसीला सांगितलं की दरम्यानच्या काळात ओम्स्क विमानतळावर विमानात इंधन भरण्यात आलं आणि जवळपास 30 मिनिटांनंतर विमानाने मॉस्कोसाठी उड्डाण केलं.

सर्गेई यांनी बीबीसीला सांगितलं, "आमचं विमान मॉस्को विमानतळावर उतरलं तेव्हा काही पोलीस आणि साध्या वेशातले काही लोक विमानात चढले."

"त्यांनी नवलनी यांच्या जवळपासच्या सीट्सवर कोण-कोण बसलं होतं हे विचारून त्यांना विमानातच थांबायला सांगितलं. इतर प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. नवलनी विमानातल्या जवळपास मधल्या 10 व्या किंवा 11 व्या रांगेत बसले होते. विमानात पोलिसांना बघून काही प्रवाशांना विचित्रही वाटलं. कारण तोवर कुणाला याची कल्पनाही नव्हती की हे प्रकरण गुन्हेगारी स्वरुपाचंही असू शकेल."

'नवलनी यांना नोविचोक देण्यात आलं'

नवलनी यांना जवळपास दोन दिवस ओम्स्कच्या हॉस्पिटलमधल्या पॉइजनिगं विभागात ठेवण्यात आलं. सुरुवातीला हॉस्पिटलने नवलनी यांना जर्मनीला नेण्याची परवानगी दिली नाही. हॉस्पिटलचं म्हणणं होतं की नवलनी यांची प्रकृती खूप नाजूक आहे आणि प्रवासात त्यांच्या प्रकृतीला धोका होऊ शकतो.

अलेक्सी नावालनी

फोटो स्रोत, DJPAVLIN

मात्र, 22 ऑगस्ट रोजी नवलनी यांना एका चार्टर्ड एअर अॅम्ब्युलंसने बर्लिनला नेण्यात आलं. दोन दिवसांनंतर तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की 'नवलनी यांच्या ब्लड टेस्टवरून हे स्पष्ट होतं की त्यांच्यावर विषप्रयोग झाला आहे.'

मात्र, ओम्स्क इमरजंसी हॉस्पिटलमधले डॉक्टर्स आणि टॉक्सिकोलॉजी विभाग प्रमुख यांचं म्हणणं आहे की 'नवलनी यांच्या शरीरात विषाचा एकही अंश आढळलेला नाही.'

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मेटॅबॉलिक डिसॉर्डरमुळे नवलनी यांची प्रकृती बिघडली.

बीबीसीने ओम्स्क हॉस्पिटल व्यवस्थापनाशी संपर्क करून नवलनी यांच्यावर दोन दिवस करण्यात आलेल्या उपचाराविषयी प्रतिक्रिया मागितली. मात्र, हॉस्पिटलकडून उत्तर मिळालं नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)