You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बहारीनमध्ये गणेशमूर्ती तोडल्याने प्रशासनाची कडक कारवाई
बहारीनची राजधानी मनामाजवळील जुफैरमध्ये गणेशमूर्ती तोडल्याप्रकरणावरून सध्या गोंधळ सुरू आहे. मात्र, मूर्ती तोडणाऱ्या महिलेला मनामामधील पोलिसांनी तातडीनं अटक करून, कायदेशीर कारवाई केली आहे.
जुफैरमध्ये दुकानात शिरून एका महिलेनं गणेशमूर्ती तोडल्याचं व्हीडिओत दिसत आहे. बहारीन मुस्लिमांचा देश असल्याचंही ही महिला म्हणतेय.
व्हीडिओ हाती आल्यानंतर मनामाच्या पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत कायदेशीर कारवाई सुरू केली.
बहारीनमधील पोलिसांनी ट्वीटद्वारे दिलेल्या माहितीनुसार, 54 वर्षीय महिलेविरोधात कारवाई केली असून, प्रकरण न्यायालयाकडे सोपवलं आहे.
बहारीनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसंच, राजघराण्याचे सल्लागार खालिद बिन अहमद अल खलिफा यांनी ट्वीट करून म्हटलं की, "धार्मिक प्रतिकांची तोडफोड करणं हा बहारीनच्या संस्कृतीचा भाग नाही. हा गुन्हा असून, जे द्वेषाचं प्रतिनिधित्व करतील, त्यांचा आम्ही स्वीकार करणार नाही."
बहारीनमध्ये जवळपास 17 लाख लोक राहतात. यातील निम्म्याहून अधिक लोक बाहेरून आलेले आहेत. बहारीनमच्या गृहमंत्रालयानंही या घटनेबाबत ट्वीटद्वारे माहिती दिली आहे.
दुकानात तोडफोड करणे आणि विशिष्ट अनुयायांना दुखावल्याचा आरोप अटक केलेल्या महिलेवर ठेवण्यात आला आहे.
सोशल मीडियावरूनही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला आहे. बहारीनचे माजी परराष्ट्र मंत्री आणि राजघराण्याचे सल्लागार राहिलेल्या शेख खालिद अल खलिफा यांनी म्हटलं, अशा घटनेचं कुणीच समर्थन करू शकत नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)