कोरोना टिप्स : कोरोनापासून बचाव करायचा असेल तर 'या' गोष्टी नक्की करा

तरुणी

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या जागतिक साथीमुळे जगण्याची पद्धतच बदलली आहे. मात्र, स्वतःला आणि आपल्यापासून इतरांनाही या विषाणूची लागण होऊ नये, यासाठीचे काही खबरदारीचे उपाय सांगण्यात आले आहेत. WHO ने हे उपाय अवलंबण्याचा वारंवार पुनरुच्चार केलाय. हे उपाय अवलंबले तर तुम्ही कोरोनापासून तुमचा बचाव करू शकता.

काय आहेत हे उपाय, जाणून घेऊयात…

स्वतःचा बचाव कसा कराल?

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितल्याप्रमाणे कोरोना व्हायरसची लागण होऊ नये, यासाठीच्या उपायांपैकी सर्वांत महत्त्वाचा आणि मूलभूत उपाय म्हणजे स्वच्छता राखणे.

  • साबण आणि पाण्याने किंवा अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरने हात स्वच्छ आणि वारंवार धुवा. यामुळे तुमच्या हातावर असलेले विषाणू निष्क्रीय होतात.
कोरोना
लाईन
  • डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा. आपले हात बऱ्याच पृष्ठभागांना स्पर्श करत असतात. त्यातून हाताला विषाणू चिकटू शकतात. अशा हातांनी डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श केल्यास हाताला चिकटलेले विषाणू तुमच्या शरीरात जाऊ शकतात.

कोरोनाचा प्रसार कसा रोखता येईल?

  • खोकताना किंवा शिंकताना टिश्यू पेपरचा वापर करा. टिश्यू पेपर नसेल तर कोपराच्या आतला भाग तोंडावर किंवा नाकावर ठेवा.
  • वापरलेला टिश्यू तात्काळ कचरापेटीत टाका. खोकताना किंवा शिंकताना अशाप्रकारे तोंडावर किंवा नाकावर टिश्यू पेपर ठेवला तर विषाणू पसरणार नाहीत आणि इतरांना त्यांची लागण होणार नाही.
  • शिंकेतून किंवा खोकल्यातून विषाणू पसरून त्याची इतर कुणाला लागण होऊ नये, यासाठीच दोन व्यक्तींमध्ये किमान 2 मीटर अंतर ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.
तरुणी

फोटो स्रोत, Getty Images

अत्यावश्यक कामं नसेल तर घराबाहेर पडू नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात येण्याची शक्यता कमी असते. घराबाहेर पडल्यावर कुणाशीही हस्तांदोलन करू नका. त्याऐवजी हात हलवून, वाकून नमस्कार किंवा हात जोडून नमस्कार करा, असं जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेलं आहे.

मास्क आणि ग्लोव्हजचा उपयोग होतो का?

बाजारात मिळणारे साधे मास्क मोकळे आणि सैल असतात. अशा साध्या मास्कमुळे विषाणूपासून बचाव होत नाही. दुसरं म्हणजे या मास्कमुळे डोळे झाकले जात नाही. ते उघडेच असतात. शिवाय दिर्घकाळ असे मास्क घालणं, शक्य होत नाही.

मात्र, एखाद्या कोरोनाग्रस्त व्यक्तीने हा मास्क घातला तर त्याच्या नाका-तोंडातून बाहेर पडलेले शिंतोडे इतरांपर्यंत पोहोचत नाहीत आणि संसर्ग पसरण्याला आळा बसतो.

कोरोना विषाणूची लागण झालेल्या अनेकांमध्ये आजाराची कोणतीच लक्षणं नसतात. त्यामुळे आपल्याला विषाणू संसर्ग झाला आहे की नाही, हे कळत नाही. म्हणून घराबाहेर पडताना सर्वांनीच मास्क वापरणं हिताचं आहे.

ग्लोव्जच्या बाबतीत जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे की ग्लोव्जने फारसा फरक पडत नाही. कारण हातात ग्लोव्ज असले तरीदेखील तुम्ही जेव्हा पृष्ठभागाला स्पर्श करता त्यावरचे विषाणू ग्लोव्जला चिकटतात आणि तोच हात चेहऱ्याला लावल्यास संसर्ग होऊ शकतो.

पुरुष

फोटो स्रोत, Getty Images

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते हात वारंवार साबणाने स्वच्छ धुणे ग्लोव्ज वापरण्यापेक्षा जास्त सुरक्षित उपाय आहे.

कोरोनाची लागण झाल्याचं कसं ओळखाल?

कोरोना विषाणूची महत्त्वाची लक्षणं म्हणजे ताप आणि कोरडा खोकला. याकडे बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

काही रुग्णांमध्ये घसा खवखवणे, डोकेदुखी, जुलाब अशी लक्षणंही आढळली आहेत. शिवाय गंध आणि चव न कळणे, हे देखील कोव्हिड-19 आजाराची लक्षणं मानली जात आहेत.

लक्षणं आढळल्यास काय कराल?

जागतिक आरोग्य संघटनेनुसार बरं नसेल तर घराबाहेर पडू नका. साधी डोकेदुखी आणि थोडं नाक गळत असेल तरीसुद्धा पूर्णपणे बरे होत नाहीत, तोवर घरातच थांबा.

एक गोष्ट कायम लक्षात असू द्या की 80% कोरोनाग्रस्तांमध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणं आढळतात. त्यामुळे इतरांसोबत संपर्क टाळा.

पुढे ताप, खोकला किंवा श्वसनाचा त्रास जाणवला तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या.

तरुणी

फोटो स्रोत, Getty Images

तुमच्या डॉक्टरांना वेळीच फोन करा. सध्या कोरोना विषाणूच्या साथीमुळे आरोग्य यंत्रणेवर बराच ताण आहे. डॉक्टर व्यग्र आहेत. त्यामुळे त्रास अंगावर काढत बसण्यापेक्षा त्रास सुरू झाल्यावर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.

कोव्हिड-19 आजार किती धोकादायक आहे?

The Lancet Infectious Diseases या आरोग्यविषयक नियतकालिकात एक संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या नव्या संशोधनानुसार कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांपैकी मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण 0.66% इतकं आहे.

ऋतू बदलामुळे होणाऱ्या फ्लूमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण 0.1% आहे. त्या तुलनेत कोरोना व्हायरसचा मृत्यूदर जास्त असला तरी यापूर्वी जो अंदाज व्यक्त करण्यात आला होता, त्यापेक्षा हा दर खूप कमी आहे.

मात्र, कोरोनाची लागण झालेल्यांची नेमकी आकडेवारी कळत नाही तोवर मृत्यूदराविषयी निश्चित सांगता येणार नाही.

कोरोना काळजी

फोटो स्रोत, Getty Images

जागतिक साथीच्या काळात संसर्गाची लागण होणं आणि मृत्यू ओढावणं, यात टाईम गॅप असतो. त्यामुळे जागतिक साथीच्या काळात नेमका मृत्यूदर काढणे, कठीण आहे.

एम्पेरियल कॉलेज ऑफ लंडनच्या अभ्यासानुसार, 80 वर्षांवरच्या व्यक्तींमध्ये या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण सरासरीपेक्षा 10 पट जास्त आहे तर 40 वर्षांच्या खालील व्यक्तीमध्ये खूप कमी आहे.

चीनमध्ये तब्बल 44 हजार रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. यात असं आढळून आलं की मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा श्वसनाचा आजार असलेल्यांमध्ये मृत्यू होण्याची शक्यता 5 पट जास्त आहे.

कोरोनावर उपचार आहे का?

सध्यातरी कोरोना विषाणू संसर्गावर कुठलंही ठोस औषध किंवा लस नाही. अँटिबायोटिक्सचाही यावर परिणाम होत नाही. (अँटिबायोटिक्स जिवाणूंवर (बॅक्टेरिया) प्रभावी असतात, विषाणूंवर (व्हायरस) नाही.)

प्रयोगशाळेतल्या रसायनांच्या चाचण्या

फोटो स्रोत, Getty Images

इतर काही उपचार आहेत. मात्र, बरेच जण यातून स्वतःच बरे होतात.

कोव्हिड-19 आजारावर लस शोधण्यासाठी जगभरातले शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. मात्र, कुठलीही नवी लस बाजारात येण्याआधी तिच्या बऱ्याच चाचण्या होतात. त्यामुळे लस यायला बराच वेळ लागणार आहे.

मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्याल?

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर जगभरात सर्वांच्याच जीवनात फरक पडला आहे. सध्या तणावाचा काळ आहे, यात शंका नाही.

त्यामुळे चिंतातूर, ताणग्रस्त, काळजी, दुःखी, कंटाळवाणं, एकटेपण किंवा निराश वाटणं स्वाभाविक आहे.

  • मानसिक आरोग्याला अपायकारक असणाऱ्या अशा भावना कशा हाताळाव्या, मन कसं प्रसन्न ठेवावं यासाठी ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्विसने (NHS) काही टिप्स दिल्या आहेत.
  • फोन कॉल, व्हिडिओ कॉल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून कुटुंबीय आणि मित्रांच्या संपर्कात रहा.
  • तुम्हाला काळजी वाटणाऱ्या गोष्टींविषयी मनमोकळेपणाने बोला.
  • इतरांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा.
पुरुष

फोटो स्रोत, Getty Images

  • लॉकडाऊनमुळे सर्वांचाच नित्यक्रम बदलला आहे. खाण्या-पिण्याच्या वस्तूंची खरेदी ते अगदी वर्क फ्रॉम होमपर्यंत अनेक गोष्टी बदलल्या आहेत. या नव्या रुटीनचं नियोजन करा आणि ते पाळा.
  • शरीराची काळजी घ्या : नियमित व्यायाम करा, सकस आहार घ्या, पुरेसं पाणी प्या. मद्यपान आणि धूम्रपान टाळा.
  • कोरोना व्हायरसच्या साथीविषयी विश्वासार्ह माहितीवरच विश्वास ठेवा. इतकंच नाही तर या आजारासंदर्भातली माहिती किती बघायची, यावरही मर्यादा घाला.
  • अस्वस्थ करणाऱ्या विचारांचा सामना करा : काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेरच्या असतात, हे स्वीकारा. त्यामुळे ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहेत किंवा ज्या गोष्टी तुम्ही करू शकता, त्याचा विचार करा.
  • आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी वेळ द्या. छंद जोपासा.
  • वर्तमानावर लक्ष केंद्रित करा आणि एक गोष्ट लक्षात असू द्या की सध्याची परिस्थिती तात्पुरती आहे.
  • पुरेशी झोप घ्या. त्यात तडजोड नको. झोपेच्या आधी कॅफिनयुक्त पेय किंवा स्क्रीनचा अतिरेकी वापर टाळा.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)