पुढच्या 80 वर्षांमध्ये लोकसंख्येत प्रचंड घट का होणार?

बाळ

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जेम्स गॅलाघर
    • Role, बीबीसी आरोग्य प्रतिनिधी

गेल्या काही वर्षांत मानवी प्रजनन दर निम्म्यावर आला असून त्यामुळे एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत जगभरात प्रत्येक देशाच्या लोकसंख्येवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

स्पेन आणि जपानसारख्या 23 देशांची लोकसंख्या तर 2100 सालापर्यंत जवळपास निम्म्यावर येऊ शकते.

याशिवाय, तोपर्यंत बहुतांश नागरिकांचं वय 80 च्या घरात असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे देशांच्या सरासरी वयातही वाढ होईल.

हे सगळं कशामुळे?

या सगळ्याचं प्रमुख कारण म्हणजेच प्रजनन दरातील घट.

एका महिलेकडून जन्माला येणाऱ्या अपत्यांच्या संख्येतील घट याला कारणीभूत आहे.

जर ही सरासरी 2.1 पेक्षा कमी होते, त्यावेळी लोकसंख्येत घट होऊ लागते.

1950 मध्ये जगभरात एका महिलेकडून जन्माला येणाऱ्या अपत्यांची संख्या सरासरी 4.7 इतकी होती.

युनिव्रहर्सिटी ऑफ वॉशिंग्टन इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रीक्स अँड एव्हल्यूशनमधील संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार 2017 मध्ये प्रजननक्षमतेचा दर 2.4 वर आला होता.

बाळ

फोटो स्रोत, Getty Images

लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकेत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. संशोधकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, 2100 सालापर्यंत हा दर 1.7 पर्यंत घसरू शकतो.

अभ्यासानुसार, 2064 पर्यंत जगाची लोकसंख्या 970 कोटींपर्यंत पोहोचू शकते, पण त्यानंतर जगाच्या लोकसंख्येत घट व्हायला सुरू होईल. या दशकाच्या अखेरपर्यंत जगाची लोकसंख्या 880 कोटी इतकी असू शकते, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

ही महत्त्वाची बाब असून जगातील बहुतांश भागातील लोकसंख्येत नैसर्गिक घट पाहायला मिळेल, असं संशोधक प्रा. ख्रिस्तोफर मरे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

त्यांच्या मते, "याबाबत आपण कधीच विचार केला नव्हता, पण नक्कीच ही मोठी गोष्ट असू शकेल. हे अनपेक्षित आहे. यामुळे आपल्याला समाजाची पुनर्रचना करावी लागू शकते."

प्रजननदरात घट कशामुळे?

साधारणपणे प्रजननदरात घट हा शब्द ऐकल्यानंतर आपण त्याचा संबंध पुरूषातील शुक्राणूंची संख्या किंवा तत्सम गोष्टींशी जोडू लागतो.

पण या अहवालात हे कारण देण्यात आलेलं नाही.

संशोधकांच्या मते, बहुतांश महिला आता शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात पुढे आल्या आहेत. शिवाय गर्भनिरोधक वस्तूंची उपलब्धता आता पूर्वीपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. त्यामुळे महिला कमी अपत्य जन्माला घालण्याचा निर्णय घेऊ शकतात.

त्यामुळे एका अर्थाने प्रजनन दरात घट ही यशकथाच मानली जाऊ शकेल.

कोणत्या देशावर जास्त परिणाम?

जपानची लोकसंख्या 2017 मध्ये 12 कोटी 80 लाख इतकी होती. या शतकाच्या अखेरपर्यंत जपानची लोकसंख्या निम्म्यावर येऊ शकते. 2100 पर्यंत या देशाची लोकसंख्या 5 कोटी 30 लाखांच्या आसपास असू शकते, असा अंदाज आहे.

तर इटलीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा बदल पाहायला मिळणार आहे. इथं सध्या जवळपास 6 कोटी लोकसंख्या असून शतकाच्या अखेरपर्यंत इटलीची लोकसंख्या 2 कोटी 80 लाखांपर्यंत खाली येऊ शकते.

जपान, इटलीप्रमाणे स्पेन, पोर्तुगाल, थायलंड, दक्षिण कोरियासर इतर 23 देशांची लोकसंख्याही निम्म्यावर येणार आहे.

कोरोना
लाईन

सध्या जगभरात चीनची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. त्यांची लोकसंख्या 140 कोटींपर्यंत वाढत जाईल. हा आकडा गाठल्यानंतर चीनच्या लोकसंख्येत पुढे घट व्हायला सुरूवात होईल. 2100 पर्यंत चीनची लोकसंख्या 70 कोटी 32 लाखांच्या जवळपास असू शकेल.

त्यावेळी भारत जगभरातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश असू शकतो.

युकेची लोकसंख्या 2063 पर्यंत 7 कोटी 50 लाखांपर्यंत जाईल त्यानंतर 2100 पर्यंत हा आकडा किंचित घटून 7 कोटी 10 लाखांवर स्थिरावेल.

म्हणजेच, 195 देशांपैकी 183 देशांचा जन्म दर घटणं हा जागतिक मुद्दा बनणार आहे.

जन्मदर घटल्यानंतर कोणत्या समस्या?

लोकसंख्येतील घट ही पर्यावरणासाठी चांगली गोष्ट असू शकेल, कमी लोकसंख्येमुळे कार्बन उत्सर्जनात घट होईल, शेतजमिनी तयार करण्यासाठी होणारी जंगलतोड थांबेल, असं आपल्या सर्वांना वाटू शकतं.

पण हा मुद्दा या गोष्टीपर्यंत मर्यादित नाही.

असं घडल्यास तरुणांपेक्षा वयोवृद्ध व्यक्तींची जास्त संख्या अशी समाजाची रचना होईल. समाजाच्या या उलट्या रचनेचे नकारात्मक परिणामच जास्त असू शकतात, असं प्रा. मरे यांना वाटतं.

अभ्यासानुसार,

  • 2017 मध्ये वय वर्षे 5 पेक्षा कमी वयाच्या बालकांची संख्या 6 कोटी 81 लाखांच्या जवळपास होती. ही संख्या 2100 साली 4 कोटी 1 लाखांपर्यंत खाली येऊ शकते.
  • 80 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींची संख्या 2017 साली 1 कोटी 41 लाख इतकी होती. या संख्येत प्रचंड वाढ होऊन 2100 साली 80 पेक्षा अधिक वयाच्या लोकांची संख्या 8 कोटी 66 लाखांपर्यंत जाऊ शकते.

प्राध्यापक मरे सांगतात, " यामुळे आमूलाग्र सामाजिक बदल होईल. मला आता आठ वर्षांची मुलगी आहे. भविष्यातलं जग कसं असेल, याचा विचार करून मला काळजी वाटते."

वयस्कर लोक जास्त असलेल्या जगात कोण टॅक्स भरेल? वयोवृद्ध लोकांच्या उपचारासाठी कोण पैसे भरेल? त्यांच्याकडे कोण लक्ष देईल? लोक कामातून निवृत्त होऊ शकतील का?

त्यामुळे या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आपल्याला एका 'सॉफ्ट लँडींग'ची गरज आहे, असं प्रा. मरे यांना वाटतं.

या परिस्थितीवरचा उपाय काय?

युकेसह इतर काही देशांनी या परिस्थितीला मात देण्यासाठी स्थलांतराचा मार्ग अवलंबला आहे. यातून लोकसंख्येची वाढ योग्य प्रमाणात ठेवता येईल, असा विचार त्यांनी केला आहे.

पण, प्रत्येक देशातच अशा प्रकारची घट पाहायला मिळणार असल्यामुळे हा उपाय किती फायदेशीर आहे, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

मरे यांच्या मते, देशांच्या सीमा खुल्या करण्यातून या समस्येचं उत्तर मिळू शकत नाही.

काही देशांनी बाळंतपणाच्या सुट्ट्या, मोफत चाईल्डकेअर, आर्थिक भत्ते यांसारख्या काही उपाययोजना करण्याचं धोरण स्वीकारलं आहे, पण यातून तोडगा निघेलच, असं ठामपणे सांगू शकत नाही.

स्वीडनने त्यांचा जन्मदर 1.7 वरून 1.9 पर्यंत वाढवला. पण इतर देशांना या कामात असंख्य अडचणीचा सामना करावा लागला. सिंगापूरचा प्रजननदर अजूनही 1.3 च्या आसपास आहे.

प्रा. मरे सांगतात, "याबाबतची माहिती लोक हसण्यावारी नेतात. ते याबाबत विचार करू शकत नाहीत. त्यांना वाटतं, महिलेला फक्त मुलं जन्माला घालायची असतात. तुम्ही यातून मार्ग काढला नाही तर आपली मानवजात येत्या काही शतकांमध्ये नामशेष होऊ शकते.

महिलांचं शिक्षण आणि गर्भनिरोधकांच्या सहज उपलब्धतेशी निगडीत या गोष्टी असल्यामुळे संशोधक याबाबत इशारा देताना दिसतात.

प्रा. स्टीन इमिल वॉलसेट सांगतात, "लोकसंख्येची घट या विषयावर काम करत असताना महिलांच्या शिक्षणाबाबत कोणतीही तडजोड करण्यात येऊ नये.

आफ्रिकेत काय परिस्थिती?

आफ्रिका खंडातील लोकसंख्या 2100 पर्यंत 300 कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

अभ्यासानुसार, त्यावेळी नायजेरिया जगभरात लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा मोठा देश असेल, असा अंदाज आहे. नायजेरियातील लोकसंख्या 2100 साली 79 कोटी 1 लाख इतकी असू शकते.

प्रा. मरे सांगतात, अंदाजानुसार परिस्थिती राहिल्यास बऱ्याच देशांमध्ये आफ्रिकन वंशाचे लोक राहतील. यांची संख्या मोठी असेल तर वर्णद्वेषाबाबत जागतिक आव्हान आणखी मोठं होऊ शकतं."

जन्मदराची मर्यादा 2.1 का?

जन्मदराचं प्रमाण 2.0 इतकं असावं, म्हणजेच एका दाम्पत्याला प्रत्येकी दोन अपत्यं असतील तर लोकसंख्येचं प्रमाण ठराविक मर्यादेत राहील, असं आपल्याला वाटू शकतं.

पण योग्य देखभाल करूनसुद्धा अनेक बालकं काही कारणामुळे जगू शकत नाहीत. शिवाय, पुरुष बालकं जन्माला येण्याचं प्रमाणही कमी आहे. त्यामुळे विकसित देशांमध्ये जन्मदराचं संतुलित प्रमाण 2.1 इतकं ठेवण्यात आलं आहे.

बालमृत्यूंचं प्रमाण जास्त असलेल्या देशांमध्ये जास्त जन्मदर असण्याची गरज आहे.

तज्ज्ञांचं म्हणणं काय?

युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनचे प्रा. इब्राहिम अबुबकर यांच्या मते,"हे अंदाज काही प्रमाणात जरी खरे ठरले, तर जगभरातील देशांसाठी स्थलांतर गरजेचं ठरेल.

या समस्येतून मार्ग काढण्यासाठी जागतिक राजकारणाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे, असं अबु बकर यांना वाटतं.

मानवाच्या अस्तित्वासाठी कामासाठी योग्य अशी लोकसंख्या जगभरात असणं महत्त्वाचं आहे, असं ते सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)